तुंबाड - चाकोरी बाहेरील सिनेमा

 'तुंबाड' चाकोरी बाहेरील सिनेमा

कण-कण कोई कनक,

कोई भनक, कानों कान दिया |

धन-धन ये जो धनक,

ये जो खनक, धरा छान लिया |

अरे आओ ना तुम्बाड़ जोगना है तुम्हें रे

अरे जाओ ना तुम्बाड़ भोगना है तुम्हें रे

                अजय-अतुल च्या भन्नाट संगीताच्या लयीवर अतुल ने गायलेले हे सनसनाटी टायटल सॉंग जेंव्हा सिनेमागृहात वाजते तेंव्हा अक्षरशः शरीरातील रोमा रोमात एक थरार - एक जोश आपोआपच थिरकू लागतो. हृदय जणू गाण्याच्या ठेक्यावर धडधडू लागते. ऐकताना 'फँड्री' मधील अजय-अतुलचे 'पिरतीचा हा इंचू मला चावला...' किंवा 'चांग भलं...' या गाण्यांची आठवण येते तरी सुद्धा 'तुंबाड' चा वेगळेपणा संगीताच्या माध्यमातून रहस्यमयी वातावरण साकारण्याचे कसब अजय-अतुल यांनी उत्तमरीत्या सांभाळले आहे यात शंकाच नाही. जोडीला बॅग्राऊंड स्कोर दिलाय जेस्पर कीड या डॅनिश म्युझिक कंपोझर आणि साऊंड डिझायनरनी ज्याने 'असॅसिन क्रीड' सारख्या व्हिडीओ गेमला म्युझिक दिले आहे तसेच असे कैक हिट सिनेमाझ,गेम सिरीज साठी त्याचे नाव प्रचलित आहे. भारतीय थरार चित्रपटांच्या श्रेणीत 'तुंबाड' चे संगीत नक्कीच अविस्मरणीय आहे. कानात ते सतत वाजत राहते. या संगीताच्या मोहिनीतून बाहेर पडणे सहजासहजी शक्य होत नाही हे मात्र खरे...!

       टिपिकल बॉलिवूड हिंदी सिनेमा नसलेला 'तुंबाड' विषयी मुद्दाम लिहावेसे वाटले कारण,हा सिनेमा बनवण्या मागील जो प्रवास जो स्ट्रगल आहे तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. 'तुंबाड' चा शोध घेत प्रवासाला निघालेल्या राही यांना अखेर 'तुंबाड' सापडलं असं म्हणायला हरकत नाही आणि खऱ्या अर्थाने ते 'तुंबाड' चे राही (प्रवासी) झाले. असं ईथे मला नमूद करावंसं वाटतं. साधारणपणे आपल्याकडे कोणताही लेखक-दिग्दर्शक सिनेमा बनवण्याची संधी सोडत नाहीत आणि मूळ ज्या संकल्पनेमुळे किंवा ज्या विचारधारेमुळे तो या क्षेत्राकडे वळला तो विचार ती कल्पनाच विसरून जातो आणि प्रवाहासोबत वहात जातो. 1997 मध्ये 'तुंबाड'चा ड्राफ्ट लिहिला गेला. गेली दहा वर्षे भारतीय दर्शकांना 'तुंबाड' पसंत पडणारच नाही यावर बरेच नामवंत निर्माते ठाम होते असल्याने कोणीही या विषयावर पैसे लावायला तयार नव्हते. परंतु 2008 साली विनायकच्या भूमिकेत नवाज सिद्दीकीला घेऊन पहिल्यांदाच  'तुंबाड' चे टेस्ट शूट झाले. सारेकाही सुरळीत चालू असताना चित्रीकरण अचानक थांबविण्यात आले. राही यांना यावेळी कर्जाच्या मायावी विळख्याने जखडून टाकले. अशा परिस्थितीत अनुराग कश्यपने मदतीचा हात दिला आणि चार वर्षं सातत्याने  'तुंबाड' साकारण्यासाठी कष्ट घेतले. पण 'तुंबाड' मध्ये पैसे गुंतवायला त्यावेळी कोणीही तयार होत नव्हते. पुन्हा 2010 साली 'तुंबाड' चा प्रवास लांबला. मी लांबला म्हणेन कारण तो थांबला कधीच नव्हता. अखेर 2012 साली सोहम शाह फिल्म्सनी यात रस दाखविला. आणि स्वतः सोहम शाह यांनी विनायक ची भूमिका देखील साकारली जी अत्यंत दमदार आणि कसदार अभिनयाने सत्यात उतरली आहे. जवळपास आठ ते नऊ वर्षं एकच कल्पना साकारण्याची धडपड, आपल्या विषयावर असणारा ठाम विश्वास आणि ती कल्पना साक्षात पूर्ण करून पडद्यावर आणे पर्यंतची चिकाटी लेखक-दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी दाखविली नसती तर खरोखरच आपण एक अप्रतिम कलाकृती पहायला मुकलो असतो. त्यांच्यासोबत सह-दिग्दर्शन आदेश प्रसाद यांचे असून नॅशनल अॅवॉर्ड विनिंग मुव्ही 'शिप ऑफ थिसेस' चे दिग्दर्शक आनंद गांधी यांनी क्रिएटिव्ह डायरेक्ट म्हणून आपली कामगिरी चोख बजावली आहे.
      मी काही कोणी समीक्षक किंवा सिनेमा विषयी जाणकार नाही पण जगभरातील निरनिराळ्या विषयांवर आधारित सिनेमे पहाणे ही आवड नव्हे व्यसनच म्हणा हवं तर, असे असल्याने 12 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला आणि अजूनही चित्रपट गृहात ठाण मांडून बसलेला 'तुंबाड' कौतुकास्पद वाटला म्हणून त्या विषयी मत मांडण्याचा मोह आवरता आला नाही आणि 'तुंबाड' विषयी लिहावेसे वाटले इतकेच. सहसा एकदा पाहिल्यावर पुन्हा तोच चित्रपट पहाण्याची ईच्छा होत नाही. कारण ती उत्सुकता, ते कुतूहल एकवार पहाण्यातच निघून जाते. पण 'तुंबाड' विषयीचे आकर्षण काहीकेल्या जात नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे कारण हा सिनेमा मी तब्बल अकरावेळा पाहिलाय. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, व्हिज्युअल इफेक्टस, धुवांधार स्टार्ट टू एंड पडणारा पाऊस, कोकणस्थ ब्राह्मणी कुटुंबाला शोभेल असा ब्रिटिश कालीन वाडा, पोशाख, बोलण्याचा लहेजा, कथा-पटकथा, मोजकेच पण प्रभावी संवाद, काळजाचा ठोका चुकविणारे लोकेशन्स, रंग-संगती, सेट्स, उत्तम अभिनय, कलाकार, या अन कित्येक बाबींनी 'तुंबाड' जिवंत साकार झालाय. एकंदर हा सिनेमा म्हणजे एक उत्कृष्ट पेंटिंग वाटते. बऱ्याच वर्षांनी असा दर्जेदार भारतीय थरारपट पहायला मिळाला. जो ब्रिटिश राजवटीतील ऐतिहासिक काळ दर्शवतो. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच मुसळधार बरसणारा गूढ पाऊस वेड लावतो. शेवटपर्यंत कोसळणारा हा पाऊस आणि चोहीकडे पसरलेले काळे ढग ईतके प्रभावी आहेत की थिएटर बाहेर पडल्यावर देखील पाऊस असावा अशी मनात शंका आल्याशिवाय रहात नाही. 'तुंबाड' या गावाशी, त्याला मिळालेल्या शापवाणीशी आपण ईतके एकाग्र होऊन जातो की, ही काल्पनिक कथा हळूहळू आपल्या मनावर घट्ट पकड करू लागते आणि त्याच विचारांत सुन्न अवस्थेत आपण प्रेक्षागृहातून बाहेर येतो. विशेष म्हणजे नारायण धारप यांच्या कथांनी प्रेरित हा सिनेमा आहे. 'धनंजय' सारख्या दिवाळी अंकासाठी मी जेंव्हा लिखाण करत होते तेंव्हा त्याचे संपादक,प्रकाशक श्री. राजेंद्र कुलकर्णी यांच्यामुळे अशा मातब्बर लेखकांच्या सोबत अनुक्रमणिकेत स्वतःचे नाव पाहून त्यावेळी मजा यायची. सहज गंमत म्हणून लिखाणाला 1997 साली सुरुवात केली होती वडील लेखक असल्याने मुळात लिखाणाचा किडा रक्तात होताच त्यात राजेंद्र कुलकर्णी यांचे मार्गदर्शन. सुहास शिरवळकर, मल्लिका अमरशेख, जोसेफ तुस्कानो, डॉ.बाळ फोंडके, रत्नाकर मतकरी, नारायण धारप अशा कैक लेखकांसोबत आपले नाव येणे हेच तेंव्हा माझ्यासाठी मोठा सन्मान मिळाल्यासारखे.  सिनेमाच्या टायटल्समध्ये इंस्पायर्ड बाय नारायण धारप यांचे नाव वाचल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या काळातले ते स्टीफन किंग. असो,
            'तुंबाड' ची कथा सुरू होते ती अगदी नारायण धारप स्टाईल बाबांच्या गोष्टी सारखी म्हणजे कथेचा नायक विनायक आपल्या मुलाला आपल्या पूर्वजांची कहाणी सांगू लागतो. पूर्ती ची देवता आणि तिचे उदर म्हणजे ही पृथ्वी... तर पूर्तीच्या देवीने तेहेतीस कोटी देव जन्माला घातले परंतु तिला सर्वांत प्रिय तिचा पाहिला पुत्र 'हस्तर' होता. देवीने आपल्या उदरातून सोने तसेच धान्य उदयास आणले. परंतु धूर्त आणि लालची हस्तर ने संपूर्ण सोन्यावर आपला ताबा मिळवला व तो धान्याकडे वळणार, त्याक्षणी त्याच्या ईतर भावंडांनी म्हणजेच ईतर देवांनी त्याच्यावर हल्ला केला. हस्तर नष्ट होणार इतक्यात त्याच्या आईने देवी मातेने त्याला वाचवले व आपल्या उदरात लपवले. त्याला अभयदान देण्याची एक अट देवांनी घातली ती म्हणजे पृथ्वीवर कोणीही हस्तरला पुजणार नाही. हस्तरला सोने मिळाले परंतु धान्य कधीच प्राप्त झाले नाही तो कित्येक वर्षं भुकेला आपल्या आईच्या उदरात बंदिस्त राहिला. पण एकेदिवशी विनायकच्या पूर्वजांनी हस्तरचे मंदिर बनविले, त्याची पूजा केली. आणि देवतांची शापवाणी त्यांचा प्रकोप बनून 'तुंबाड' वर पावसाच्या रूपाने बरसू लागली. हस्तरची शापवाणी 'तुंबाड'साठी फायद्याची ठरली आणि अशा रीतीने त्याचा ठावठिकाणा सापडला व हस्तर सोबत असलेले गुप्तधन देखील.
        संपुर्ण कथानक फिरते एकोणिसाव्या शतकातील भारतात असलेल्या 'तुंबाड' या गावा बाहेरील निर्जन अशा एका जुन्या वाड्या भोवती व त्यातील गुप्तधना संबंधी प्रचलित असलेल्या रहस्या भोवती. ही कहाणी आहे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अशा षड्रिपुनी युक्त असणाऱ्या विनायकची. जो गावच्या प्रमुखाच्या म्हणजेच सरकारच्या दासीचा पुत्र आहे. सरकार वयाने खूप थकलेला आहे. हस्तर या शापित देवतेच्या स्पर्शाने अत्यंत भयंकर अवस्थेतील अमरत्व लाभलेल्या राक्षसी आजीचा सांभाळ विनायकच्या आईची जबाबदारी असते. कारण सरकारची ती आई असली तरीही तिचा सांभाळ करण्यास कोणीही तयार नसते. विनायकची आई सोन्याच्या मोहरेच्या आशेने सरकार म्हणेल ते करीत असते. आजी एकेकाळची रशीवरून चढण्यात, उतरण्यात चपळ असते परंतु धनाच्या लालसेपोटी हस्तरच्या शापाने ती कुरूप जख्खड अमरत्व लाभले असले तरीही भयंकर रूप तिला प्राप्त झाले आहे. तिला सांभाळणे जोखमीचे असल्याने अखेर सरकारच्या मृत्यूनंतर मनाविरुद्ध विनायकला आईसोबत 'तुंबाड' सोडावे लागते पण सरकारच्या मरणोपरांत दासीपुत्र विनायक स्वतःला वारसदार समजू लागतो. व धनाच्या लालसेपोटी आजीला सोडून जाण्यास तयार नसतो पण तिच्याकडून खजिन्याची माहिती मिळविणे तितकेसे सोपे नसल्याने 'तुंबाड' सोडून जाणे हिताचे असे विनायकची आई हट्टाने विनायकला सांगते आणि पुन्हा कधीही वळून सुद्धा 'तुंबाड' कडे पहाणार नाही असे त्याच्याकडून वचन घेते. विनायकवर लहानपणापासूनच वाड्यातील आपल्या पूर्वजांच्या गुप्तधनाविषयी ऐकिवात असलेल्या दंतकथेचा जबरदस्त पगडा असल्याने खजिना मिळवण्याची लालसा त्याला स्वस्थ बसू देत नाही. ती तळमळ दर क्षणी वाढत जाते आणि आईच्या मृत्यूनंतर पंधरा वर्षानंतर विनायक पुन्हा 'तुंबाड' मध्ये परततो. यावेळी मात्र आपल्या आजीकडून खजिन्याविषयी विचारणा केल्याशिवाय परतायचे नाही या जिद्दीने विनायक आजीची भेट घेतो ती अजून जिवंत असते. तिचे हृदय एका झाडाला लटकलेले तो पहातो आणि त्या खालोखाल त्याची नजर जाते ती त्याच्या आजीच्या चेहऱ्याकडे तिच्या शरीरातून झाडांची मुळे बाहेर पडली असली तरीही तिच्यात प्राण असलेले दिसताच विनायकला आनंद होतो. ती प्रचंड वेदनेने कळवळते व विनायककडे याचना करते की मला अग्नी दे आणि यातून मुक्त कर. परंतु विनायक खजिन्याचा मार्ग सांगितल्याशिवाय तसे करण्यास नकार देतो. अखेर आजी गुप्तधनाचे रहस्य त्याला सांगते. विनायक तिच्या बोलण्याची शहानिशा करतो. सोन्याच्या मुद्रांचा खजिना त्याला सापडतो आणि आजीला वचन दिल्याप्रमाणे तिला अग्नी देऊन त्या शापित जीवनातून तिला मुक्ती देतो. इथून सुरू होतो खरा चित्रपट जो एक अनुभव आहे आणि तो ज्याचा त्याने घ्यावा त्यामुळे पुढील कथानक मी सांगण्यापेक्षा ते पाहणे जास्त रोमांचक आहे. लालसेने सुरू झालेली कथा लालसेपोटी काय घडवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा आहे. कधी कधी भुताखेतांपेक्षा अति हाव असणाऱ्या माणसाची भीती जास्त वाटते. हेच खरे आहे. 

***

Rate & Review

Verified icon

Tejas Kakade 10 months ago

Verified icon

Tashi Smith Carlos 10 months ago

Verified icon

Sanket Mane 11 months ago

Verified icon

Ashwini Patil 12 months ago

Verified icon

Amar Jagdhane 12 months ago