23. Rajasthan - land of king - 5 books and stories free download online pdf in Marathi

२३. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ५

२३. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ५

* राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळे-

४. माउंट अबू- अप्रतिम हिल स्टेशन

माउंट अबू हे राजस्थान मधले एकमेव हिल स्टेशन आहे. हिरवाईने नटलेले हे हिल स्टेशन राजस्थान मधील आवडते पर्यटन स्थळ आहे. माउंट अबू हे भारताच्या राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील आरवली पर्वतरांगे मधले उंच शिखर आहे. ते गुजरात राज्याच्या पालनपूरपासून ५८ कि.मी. दूर आहे. माउंट अबू पर्वताचे २२ कि.मी. लांब आणि ९ कि.मी. रुंद असे खडकाळ पठार आहे. गुरु शिखर हे अरवली पर्वत रांगेचे सर्वात उंच शिखर आहे. ते समुद्रसपाटीपासुन १७२२ मीटर उंच आहे. माउंट अबू हे 'वाळवंटातले नंदनवन' म्हणून ओळखले जाते कारण त्यात अनेक नद्या,तलाव,धबधबे आणि सदाहरीत जंगले आहेत. माउंट अबू चे प्राचिन नाव अर्बुदांचल असे आहे. राजस्थान आणि गुजरात उष्ण प्रदेश आहेत. उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी माउंट अबू ही वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. इथला निसर्ग पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. माउंट अबू मध्ये काय पाहता येईल-

* दिलवाडा मंदिर- ही जागा माउंट अबू मधली पर्यटकांची अत्यंत लोकप्रिय जागा आहे. ही एकूण पाच जैन मंदिरे आहेत. संगमरवरी कलाकुसरीचे उत्तम उदाहरण म्हणून ह्या मंदिरांना पाहिलं जाते. या सर्व मंदिरांत आदिनाथांपासून ते महावीरांपर्यंतच्या जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. मंदिरे बाहेरून पाहिल्यास अतिशय सामान्य वाटतात. पण मंदिराच्या आत गेल्यावर तिथली संगमरवरावर केलेली कलाकुसर पाहून डोळे दिपून जातात. उत्कृष्ठ कलाकुसरीचे नमुने इथे पाहायला मिळतात. ताजमहालच्या संगमरवरी बांधकामाशी तुलना करायची असेल तर ताजमहालची वास्तू म्हणून भव्यता आहे पण त्याचबरोबर, दिलवाडाची मंदिरे संगमरवरावरील अतिशय बारीक कलाकुसरीत वैशिष्टपूर्ण ठरतात. ही जागा फक्त मंदिर म्हणून नाही तर आर्किटेक्चर पाहण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. इथे एकदा भेट दिली की पर्यटक मंत्रमुग्ध होतात आणि ह्या जागी परत परत भेट द्यावीशी वाटत राहते. ह्या मंदिरात कॅमेरा, मोबाईल, बेल्ट्स बाहेर ठेवावे लागतात. पण पैश्याच पाकीट आत नेता येत. इथे स्त्रियांना स्कर्ट किंवा शोर्टस घालून प्रवेश मिळत नाही. पुरुषांना सुद्धा शोर्ट्स मध्ये मंदिरात प्रवेश मिळत नाही.

* माउंट अबू वन्यजीव अभयारण्य- हे अभयारण्य जैव विविधतेने नटलेले आहे त्यामुळे छोट्याश्या माउंट अबू मधले हे अभयारण्य जरूर भेट द्याव असच आहे. ह्या जागेला अभारण्याचा दर्जा १९६० साली देण्यात आला. हे अभयारण्य २८८ वर्ग किलोमीटर मध्ये विस्तृत आहे. निसर्गप्रेमींसाठी ही जागा जणू पर्वणीच आहे. इथे ८२० प्रकारची झाडे पाहायला मिळतात. इथे विविध प्रकारचे गुलाब आणि ऑर्किड सुद्धा पाहयला मिळतात. इथे अंदाजे २५० प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्यांसाठी ही एक उत्तम जागा आहे. पक्ष्यांबरोबर इथे वेगवेगळ्या प्रकराचे प्राणी सुद्धा पाहायला मिळतात. त्यात मुख्यतः बिबट्या, स्लॉथ बेअर, मोर, सांबर, चिंकारा, जंगली डुक्कर, नीलगाय, ससा, लंगुर इत्यादी पाहायला मिळतात. इथे थंडीत गेल तर जास्तीत जास्त पक्षी पाहायला मिळतात. उन्हाळ्यात बरेचसे प्राणी पाहायला मिळतात. ह्या अभयारण्यात हिंडता येते त्याचबरोबर, हायकिंग, ट्रेकिंग ची मजा सुद्धा इथे अनुभवता येते. आणि फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी ही जागा उत्तम आहे.

* नक्की लेक- नक्की सरोवर हा माउंट अबू ची शान आहे. तसेच, नक्की सरोवर माउंट अबूला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. सरोवर आणि त्याच्या आजूबाजूचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी इथं नेहमी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. या सरोवरा विषयी तिथल्या स्थानिक लोकांकडून अनेक कथा ऐकायला मिळतात. इथे बोट राईड ची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. इथून आजूबाजूला असलेल्या पर्वत रांगांचे आणि अप्रतिम निसर्गाचा विलोभनीय सौंदर्याचा आनंद घेता येतो. ३० मिनिटांमध्ये पूर्ण तलावाची फेरी मारता येते. ही जागा सर्व वयोगटातल्या पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. इथे फोटोग्राफीसाठी येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. थंडगार हवा आणि अप्रतिम निसर्गाचा आस्वाद माउंट अबू मधल्या नक्की सरोवरात घेता येतो. इथे जवळच असलेला टोड रॉक ह्या जागेला अधिकच सुंदर बनवतो. एक तोड पाण्यात उडी मारणार आहे असा भास होतो. ह्या पॉइंट ला 'द मॅस्कॉट ऑफ माउंट अबू' ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. इथे पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळते. ह्या रॉक वर चढून आजूबाजूला असलेले अप्रतिम दृश सुद्धा अनुभवता येते.

* गुरु शिखर- गुरु शिखर हे अरावली पर्वतरांगांमधले सर्वोच्च शिखर आहे. ह्याची उंची १७२२ मीटर आहे. इथे दत्तात्रेयांचे मंदिर आणि पाऊलखुणा आहेत. ह्याच्या समोरच एक ऑब्झरव्हेटरी आहे. इथे १.२ इन्फ्रारेड टेलिस्कोप आहे. इथल्या ढगांच्या अनुकूल स्थितीमुळे ही ऑब्झरव्हेटरी महत्वाची आहे. गुरु शिखर वरून समोरच्या पर्वतरांगांचे विलोभनीय दॄष्य दिसते. १५ किलोमीटर गाडीने गेल्यावर त्यापुढे काही पायऱ्या चढल्या की शिखरापर्यंत पोचता येते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये हवामान ढगाळ असते आणि तिथे धुके सुद्धा असते. गुरु शिखरावर ह्या काळात भेट दिली तर त्यावेळी शिखरावर चालतांना ढगातून आणि धुक्यातून चालतोय असा आभास निर्माण होईल. अत्यंत अप्रतिम अनुभव इथे घेता येईल. गुरु शिखर ला पोहोचायच्या रस्त्यावर चहा आणि खाद्यपदार्थांचे बरेच स्टॉल्स आहेत. त्यामुळे हा प्रवास सुखकर होतो. चहा आणि खाद्यपदार्थ तसे स्वस्तात उपलब्ध होतात. पॅक्ड फूड, चिप्स, पाण्याच्या बाटल्या सुद्धा ह्या पूर्ण प्रवासात उपलब्ध होतात. गुरु शिखराच्या उच्च शिखरावर जुनी घंटा आहे ज्यावर १४११ AD असे लिहिलेले आहे. उंच शिखरावर पोचून जेव्हा पर्यटक घंटा वाजवतात तेव्हा यशस्वी कामगिरी बद्दलचे यश जणू पूर्ण अबू च्या दरीत खूप काळ गुंजत राहते.

* अर्बुदा देवी मंदिर- अर्बुदा देवी मंदिर हे माउंट अबू मधल धार्मिक स्थळ आहे. हे स्थळ खूप लोकप्रिय आहे आणि नवरात्रीच्या वेळी ९ दिवस भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. ह्या मंदिरात जाण्यासाठी ३६५ पायऱ्या चढाव्या लागतात. ह्यातली प्रत्येक पायरी म्हणजे वर्षाच्या प्रत्येक दिवसाच प्रतिक आहे. ह्या पायऱ्या चढून मंदिर पर्यंत जाण्याचा मार्ग थकवू शकतो पण वरून पूर्ण शहरच दर्शन घेतलं की सगळा थकवा पळून जातो. आणि ३६५ पायऱ्या चढण्याच्या कष्टाचं चीज झाल्याची भावना मनात येते. हे मंदिर एका संपूर्ण खडकात बांधले गेले आहे. हे मंदिर एका खडकात बांधल्याच उत्तम उदाहरण आहे. आत जाण्यासाठी छोट्या गुहेत गुढग्यावर रांगत जावे लागते. भारतात देवीची ५१ शक्तिपीठे आहेत. प्रत्येक शक्तिपीठाच वेगळच महत्व आहे. ह्या शक्तिपीठांमध्ये अर्बुदा देवी मंदिर आहे. अत्यंत उत्तम अशी ही जागा आहे.

* अचलगड गाव- अचलगड गाव हे अतिशय नयनरम्य आहे. अचलगड गावात अचलगड किल्ला आणि मंदिर आहे. अचलगड किल्ला हा मेवाड चे राजा कुंभा ह्यांनी एका डोंगरावर नवीन रूप दिले. परमार आणि चौहान यांचे इष्टदेव अचलेश्वर महादेवांचा प्राचीन मंदिर अचलगगड मध्ये आहे. टेकडीच्या तळाशी 15 व्या शतकात बांधलेला अचलेश्वर मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. असे म्हटले जाते की येथे भगवान शिव यांच्या पायाचा ठसा आहे. जवळच १६व्या शताब्दी मध्ये बांधलेलं काशीनाथ जैन मंदिर सुद्धा आहे. अचलगगढ येथून १० मिनिटे चढल्यावर तुम्हाला सुंदर आणि ऐतिहासिक जैन मंदिराकडे जाते येते. ही जैन मंदिरे अतिशय सुंदर स्थान म्हणून प्रसिद्ध आहेत आणि सुंदर शिल्पकलासाठी प्रसिद्ध आहे. अचलेश्वर मंदिरामध्ये प्रसिद्ध नांदी आहे. हा नंदी सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त बनलेला असल्याचे मानले जाते.

माउंट अबू ही राजस्थानातली जागा पर्यटकांच्या विशेष आवडीची आहे. इथला बाजार विशेष प्रसिद्ध आहे. इथे राजस्थानी कपडे, पेंटिंग, बांगड्या, लेदर च्या वस्तू आणि राजस्तानी शैलीतल्या वस्तू मिळतात. तसेच, युनिवर्सल पीस हॉल, श्री रघुनाथ जी मंदिर, गोमुख मंदिर, सनसेट पॉइंट, हनिमून पॉइंट, ब्रम्हकुमारी युनिवर्सिटी इत्यादी जागा सुद्धा प्रसिद्ध आहेत. नव विवाहित जोडपी सुद्धा इथे यायला पसंती देतात. अतिशय सुंदर अशी माउंट अबू ही जागा आहे.