तथास्तु

आज मात्र कोणत्याही परिस्थितीत मरायचेच असं ठरवून मी दारू सोबत झोपेच्या गोळ्या घेऊन टाकल्या. आत्महत्येचा हा धरून माझा अकरावा प्रयत्न आहे. या आधीचे सारे प्रयत्न फेल झाले अगदी आयुष्यात काहीच धड करता येणार नाही हे जणू शिक्कामोर्तबच झाले. अपयशाने वैतागून आत्महत्या करणे सुद्धा मला जमू नये हे मात्र फारच लज्जास्पद होतं. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. सही करून पेपर उशीजवळ ठेवला आणि हळूहळू झोपेच्या गोळ्यांनी स्वर्ग दाखवायला सुरुवात केली. आता सगळे प्रॉब्लेम्स सुटणार. मालकाला घरभाडं नको द्यायला, पोटापाण्यासाठी नोकरी शोधत नको फिरायला, स्वातीने केलेल्या ब्रेकअपचे दुःख नको कुरवाळायला. आई-बाबा येतोय मी तुमच्याकडे. मी डोळे मिटले.
माझ्या खोली सारखा स्वर्ग का दिसतोय..? डोके प्रचंड दुखतेय. देवा..! नक्की कुठे आहे मी..? दार कुणीतरी जोर जोरात बडवत होते. तसेच डोके धरून सावरत दार उघडले. तर अख्खा शेजारपाजार जमला होता. घरमालक डोळे वटारून पहात भडकले, "दोन दिवसांपासून दार बंद आहे. काय करत होतास..? कामचुकार..! भाडे बुडवण्यासाठी आत्महत्या केलीस की काय म्हणून पोलिसांना बोलवणार होतो. असले फालतू धंदे माझ्या खोलीत खपवून घेणार नाही. समजले..? काही भरोसा नाही तुझा. तू आत्ताच्या आत्ता खोली रिकामी कर. म्हणजे झाले."
"अहो..! पण मालक दोन दिवस तरी द्या. मी असा अचानक कुठे जाऊ..?"
"ते काही मला माहित नाही. निघ बाबा इथनं. तू नको नि तुझे घरभाडे नको."
हा प्रयत्न सुद्धा फेल ठरला. आणि डोक्यावरचे छप्पर गेले ते वेगळे. परमेश्वरा..! मरण देत नाहीस तर निदान जगण्यासाठी कारण तरी दे. मारुतीच्या देवळात घंटा वाजली. आता तूच आधार म्हणत शरणार्थ्या सारखा मी देवळात गेलो. दहा-पंधरा लोक जमले होते आणि आध्यात्मिक ज्ञानदानाचे धडे गिरवले जात होते. मीही त्यात सामील झालो.
"स्वर्गलोकी देवाचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील एक हजार वर्षं. जसे अंतराळातील विविध ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रकाशाच्या गतीने धावणारे वाहन लागेल अन्यथा कैक वर्षे प्रवास करीत जावे लागेल. तसेच परमेश्वरापर्यंत प्रकाशाच्या माध्यमाद्वारे पोहोचणे केवळ आपल्या आत्म्यास जमते, जे ध्यानसाधनेने सहज शक्य होते. परमेश्वराचे आपल्याकडे सदैव लक्ष असते. आपल्या प्रार्थनेला देखील तो हाक देतो पण आपण प्रार्थनाच मुळात चुकीच्या पद्धतीने करतो. उदाहरणार्थ काय तर मला लवकर नोकरी मिळू देत. देव म्हणतो ठीक आहे तुला उद्याच नोकरी देतो आता देवाचा उद्या म्हणजे आपली हजार वर्षे. देवाने तासाभरात जरी आपली प्रार्थना पूर्ण करायची म्हटली तरी आपली कित्येक वर्षे त्यात जातील तसे आपल्यास चालेल काय..? म्हणून देवाकडे काही मागताना म्हणावे मला नोकरी मिळाली आहे, जे व्हावयाचे आहे ते वर्तमानात घडले आहे अशी प्रार्थना फळास येते.."
मी लक्षपूर्वक सारे ऐकले हसू आले. खरेच असे होत असेल..? मारुती समोरील प्रसाद खात गंमत म्हणून सहज म्हटले 'देवा..! माझ्याकडे पंधरा लाख आले आहेत. जगायला आता कारण मिळाले आहे..' मनातल्या मनात हसत मारुतीकडे पाठ फिरवून तडक गावी जायला वळालो. बाहेरच्या गावी जाण्यासाठी स्टेशनात बरीच रेलचेल होती. त्याच गर्दीत मी देखिल स्वतःला सामील केले. भग्न स्वप्ने घेऊन परतीच्या वाटेला मीही निघालो. एवढ्यात गोळीबाराचा आवाज कानावर पडला. चार अज्ञात इसम धडाधड दिसेल त्यास गोळ्या घालून ठार करीत होते. मरणाची संधी समोरून चालून येत होती. आणि मला ती सोडायची नव्हती. ते त्या लहान मुलाला गोळीने उडवणार इतक्यात माझ्या अंगात प्रसंगावधान सळसळले. मी त्याला वाचविण्यासाठी झेप घेतली. ते अंदाधुंद गोळ्या चालवीत पुढे जात होते. पोलीस प्रतिहल्ला करीत होतेच. बेसावधपणे घडणाऱ्या या क्षणी मी शक्य तितक्या लोकांना सुरक्षित स्थळी नेऊ लागलो. जसे जमेल, जसे सुचेल तसे मदत करीत गेलो. नाहीतरी ईथे जगायचे होते कुणाला..? पायात आणि पाठीवर चटके बसल्यागत सणकुन अंगात काहीतरी घुसत होते. अखेर मरणाचा प्रयत्न सफल संपूर्ण होणार असे दिसू लागले. सुटलो.
डोळे उघडले..निदान आता तरी स्वर्ग दिसावा या आशेने. पण नाही हा देखिल प्रयत्न वाया. हॉस्पिटलमध्ये पडून होतो. काही दिवसांत डिस्चार्ज मिळाला पण दोन्ही पाय मात्र गमावून बसलो. जीवाची पर्वा न करता आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नागरिकांचे प्राण वाचविल्याबद्दल बक्षीस म्हणून सरकारकडून पंधरा लाख मिळाले शिवाय सरकारी खात्यात नोकरी सुद्धा. आनंद साजरा करावा की दुःख तेच कळत नव्हतं एक मात्र लक्षात आलं की, देवाकडे प्रार्थना करताना विचारपूर्वक करावी किंवा काही मागूच नये कारण देवाने मरणाला नव्हे तर जगण्याला कारण दिले होते आणि माझ्या प्रार्थनेला 'तथास्तु' म्हटले होते. ज्याची अशा रीतीने पूर्तता होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.

दीप्ती मेथे
मुंबई

***

Rate & Review

Verified icon

From Turkey 2 months ago

Verified icon

Shubham Davange 6 months ago

Verified icon

Surekha 6 months ago