Bhatkanti - Suruvaat aeka pravasachi - 4 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ४)

चार दिवस सहल होती त्यांची.... तशी दरवर्षी पावसात सहल जायची त्यांची.... प्रत्येकवेळेस एक-एक दिवसच जायची. यावेळेस मात्र जरा जास्त दिवसांची ठरवली होती. एका अनोळखी ठिकाणी जायचे हे ठरले होते.एकूण २० लोकं तयार झाले. त्यात मुलींची संख्या होती बऱ्यापैकी. राहायचे होते म्हणून प्रत्येकी दोन माणसांमागे एक असे तंबू सुद्धा घेतले होते. प्रत्येकाकडे त्या भागाचा मॅप बनवून दिला होता, त्यातल्यात्यात कोणी हरवू नये म्हणून. सर्व तयारी झाली आणि सगळे निघाले. प्रथम गाडीने प्रवास करून ते ठरलेल्या जागी पोहोचले. प्रवास सुरु झाला. २० जणांमध्ये संजना, सुप्री सुद्धा होत्या. त्यातल्या त्यात ज्यांना ट्रेकिंगचा अनुभव होता ते पुढे होते. सगळ्याकडे त्या भागाचा मॅप असला तरी नकाशात प्रत्येक गोष्टी दिसत नाहीत ना. तरीही ते चालत होते, अंदाज लावत लावत. सुमारे २.३० तास ते चालतच होते. त्यात पाऊस. रस्ते निसरडे झालेले. बहुतेक जणांचे "पडून" झालेले. अश्याच एका ठिकाणी ते पोहोचले आणि finally त्यांना कळलं कि आपण वाट चुकलो आहोत.


तसे ते सगळेच एकत्र होते. पण एका चुकीच्या निर्णयामुळे सगळेच हरवलेले होते. त्यात भरीसभर म्हणून तो २० जणांचा ग्रुप आता एक जंगलात उभा होता. अनोळखी ठिकाणी जाण्याचे धाडस आता त्याच्या अंगाशी येणार होते बहुतेक. काय करावे सुचेना. दुपार झालेली, पोटात कावळे ओरडत होते. पावसाने अजूनच काळोख केलेला. त्यात जंगलात म्हणे रात्र लवकर होते, असं कोणीतरी माहिती पुरवली. म्हणजे लवकरात लवकर एका सुरक्षित ठिकाणी जावेच लागणार. चार-पाच जण पुढे गेले. एक माळरान शोधून आले. १० मिनिटात पोहोचले तिथे. तिचेच एका लहान डोंगराच्या आडोशाला तंबू लावायचे ठरले. लगेच दुसरा प्रश्न पुढे... तंबू तर घेतले होते मोठया हौशेने... ते बांधता कोणाला येतात... पण करणार काय ? पुस्तकात दिसेल तसं कसेतरी उभे केले तंबू.... कोणी कल्पना तरी केली होती का त्यात राहायची. रात्र अनुमान केल्याप्रमाणे लवकर झाली. भूक तर लागली होती. प्रत्येकाने प्रवासात खाण्यासाठी बिस्किट्स घेतली होती म्हणून बरी. नाहीतर उपाशीच झोपावं लागलं असतं. कशी-बशी रात्र काढू, सकाळी पुन्हा प्रवासाला निघू, असं ठरवून सगळेच दमलेले झोपी गेले.


सकाळ उजाडली तीच विजेच्या गडगडाटाने.... सुप्रीला जाग आली तशी तिने घडयाळात पाहिलं. सकाळचे ७ वाजले होते. संजनाला सुद्धा जाग आली. सगळेच आपापल्या तंबू मधून बाहेर आले. वर आकाशात कसले भयानक आवाज येत होते. बेभान वारा वाहत होता. पाऊस नसला तरी हवेत कमालीचा गारवा होता. विजा जणूकाही एकमेकींवर आढळत होत्या. सगळेच घाबरलेले. परस्पर सगळ्यांनी आपलं सामान बांधायला सुरुवात केली. १० मिनिटात सगळे तयार झाले. पण जायचे कुठे आता ? मागे तर जंगल आणि पुढच्या वाटेचा पत्ता नाही. वारा सुद्धा " सू.... सू.... " करत आवाज करत होता. भयाण वातावरण अगदी. ग्रुप मधल्या २ मुली रडू लागल्या. कोणालाच पुढे काय करावं ते कळत नव्हतं.


तेव्हाच त्यातल्या एकाला , दूर कोणीतरी एक मानव सद्रूक्ष आकृती दिसली. " हे... तो तिकडे आहे कोणीतरी... त्याला माहित असेल इकडचे काही... " सगळेच त्याच्याकडे बघून हातवारे करू लागले, ओरडू लागले. त्या सुसाट वाऱ्यात आणि विजांच्या कडकडाटात कूठे जाणार आवाज त्याला. तरी देखील तो गोंगाट ऐकून तो जाणारा माणूस क्षणभर थांबला. "अरे.... त्याने आपल्याला बघितलं वाटते.... ओरडा अजून जोरात... " संजना म्हणाली. तसे सगळे अजून मोठयाने ओरडू लागले. सुप्रीला तर फार मज्जा येत होती तसं करताना. मधेच हसत पण होती ती. " काय गं... तुला काय एवढं हसायला येते आहे... " संजनाने विचारलं. " भारी वाटते ना असं ओरडायला... घरी जरा आवाज केला कि आई धपाटा मारते पाठीत ..... असं वेड्यासारखं ओरडला कि कसं मोकळं मोकळं वाटते.. " संजनाने कपाळावर हात मारला.

ती व्यक्ती आता स्पष्ट दिसू लागली होती. सगळेच पुढे गेले त्याला भेटायला. सुप्री सर्वात पुढे...
" अरेच्या !!! याला तर ओळखते मी " सुप्री म्हणाली. संजनाने निरखून बघितलं. तसं ओरडणं बंद करून मागेच राहिली.
" तू ओळखतेस त्याला... " एकाने विचारलं.
" हो... माझा friend आहे तो. " तो जवळ आला तसा सुप्रीने हात पुढे केला.
" Hello... mister A "... हो.. तो आकाशच होता. त्या सगळ्यांना तिथे बघून त्याला आश्यर्य वाटलं.
" इकडे कूठे तुम्ही.... आणि या सर्वाना कशाला आणलंत इथे... " आकाशने सुप्रीकडे बघत विचारलं.
" मी नाही आणलं. मलाचं घेऊन आले आहेत सगळे... " आकाशच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह.... काय हि .... इकडे प्रसंग काय आणि हिला मस्करी सुचते आहे... संजना मनात म्हणाली. तिलाच पुढे यावं लागला आता.
" एक मिनिट , मी सांगते... आम्ही इकडे पिकनिकला आलो होतो... आणि आम्ही हरवलो आहोत.. तुम्हाला इकडचं माहित आहे का .... रस्ते वगैरे... " संजनाने काकुळतीने विचारलं.
" ओ... mister "A"... हीच ती.... तुमच्या अंगावर चिख्खल उडवणारी पोरगी... " सुप्रीने मोठयाने सांगितले. तसं संजनाने हाताने तिचं तोंडच बंद केलं. आकाशने एकदा पाहिलं संजनाकडे. नंतर बोलला.
" रस्ता सांगेन मी... पण आता इथे थांबू नका... धोका आहे इथे... चला पटकन माझ्या बरोबर.. " सगळेच सामान उचलून त्याच्या मागोमाग गेले. तोपर्यत आकाशात ढगांची गर्दी झालेली. वारा नुसता घोंगावत होता. पुढे एक लहानशी गुहा होती. आकाशने सगळ्यांना आत जाण्यास सांगितलं. गुहा लहान असली तरी २० जणांसाठी खूप होती ती. सगळे आत आलेले पाहून आकाश सुद्धा आत आला.


" सगळ्यांनी रिलॅक्स व्हा.... पाऊस थांबला कि पुढचा प्रवास करा... " आकाश त्याच्या पाठीवरची सॅक खाली ठेवत म्हणाला.
" पण पाऊस कूठे आहे आता, वाराचं तर आहे ना... " संजना हळू आवाजात म्हणाली. आकाश गुहेच्या तोंडाजवळ उभा होता. त्याने हाताने खूण करून सगळ्यांना बाहेर बोलावलं. सगळेच सामान ठेवून त्याच्या मागे येऊन उभे राहिले.
" ते बघा... " आकाशने बोट वर करून सांगितलं. " त्या ढगांची रचना सांगते आहे कि वादळ येणार आहे... जोराचे वादळ.... सोबतीला पाऊस सुद्धा असतो. " सगळ्याचे डोळे, वर आभाळाकडे लागले. ढगांची गोलाकार संरचना होत होती. ५ मिनिटांतच पावसाने मुसळधार सुरुवात केली. तुफान वारा सोबतीला, विजांचा आवाज.... आकाश सोडून बाकी सगळेच घाबरले होते. आकाश शांतपणे बाहेर बघत बसला होता. एक तास तरी ते वादळ चालू होतं. त्यानंतर मात्र पावसाने आवरतं घेतलं.

पाऊस गेलेला पाहून आकाश बाहेर आला. बाहेरचं वातावरण त्याने पाहिलं. " या आता बाहेर... " आकाश म्हणाला तसे सामान उचलून सगळा ग्रुप बाहेर आला. सुप्रीच पुढे होती.
" WOW !!!! काय मस्त वातावरण आहे ना... " सुप्री आनंदात म्हणाली. तिच्या बाजूला संजना उभी होती. आकाशकडे चोरून बघत होती. कळलं ते त्याला.
" चला निघूया आता... " म्हणत आकाश निघाला. त्याच्या मागोमाग सगळेच... "तुम्ही पिकनिकला आला आहेत ना.. मग अश्या ठिकाणी का आलात ? " आकाशचा प्रश्न.
" अश्या ठिकाणी म्हणजे ? " त्यातल्या एकाने उलट प्रश्न केला.
" अश्या ठिकाणी म्हणजे.... या इथे सहसा कोणी येत नाही... आणि पावसात तर बिलकूल नाही.. इथे दरडी कोसळण्याचे प्रमाण खूप आहे. त्यात रहायला कूठे सोयच नाही. " सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह... तो काय बोलतो आहे कोणालाच कळतं नव्हतं. आकाशच्या लक्षात आलं ते.
" चला.... मघाशी तुम्ही जिथे उभे होतात, तिथे जाऊ पुन्हा... " आकाशच्या मागोमाग सगळे. आकाशने त्यांना लांबूनच दाखवलं. सकाळी ज्या सपाट माळरानावर तंबू होते, तिथे आता बरेचशे मोठे दगड पडलेले दिसत होते. " कळलं... मी का बोललो ते... तुम्ही ज्याचा आडोसा घेऊन तंबू लावलेले होते, त्या डोंगरावरचे ते दगड आहेत... "... काळजात धस्स झाला सगळयांच्या...." हि जागा खूप सुंदर दिसते पावसात ...चहुबाजुकडे नजर फिरवली तरी ... एकचं रंग... हिरवा.. " ,
" किती छान ना ... " संजनाच्या तोंडातून अचानक बाहेर आले शब्द.
" छान ना... हो , खूप छान... पण त्यात तुम्हाला एक तरी गाव, वस्ती दिसते का ते पहा. " सगळे माना वर वर करून पाहू लागले.
" नाहीच दिसणार... कारण हि सर्व जंगलं आहेत... मानववस्ती तर दूर-दूर पर्यंत कुठेच नाही. संकटात सापडला तर साधं पाणी विचारायला सुद्धा कोणी येत नाही. डोंगर,दऱ्या, झाडं.... पशु-पक्षी.... याशिवाय कोणीच राहत नाही इथे.... मग पिकनिकचा प्लॅन कोणी केला इथे येण्याचा... " कोणीच काही बोलत नाही म्हणून सुप्रीचं बोलली.

============================= क्रमश :