MAZYA LOVEMARRIAGECHI GOSHT - 19 books and stories free download online pdf in Marathi

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 19

१९

समरभूमीकडे कूच!

काही असो, कालच्या पातकाचे प्रायश्चित्त झाले म्हणून मी निश्वास सोडला. खरे सांगू तर वायफळ आणि निरर्थक बोलण्यात माझ्याशी स्पर्धा करणारे कोणी नसेल पण इथे आल्यावर हिला बघून मी आतापर्यंत ब्लॅंकच होत आलो होतो. बहुधा ते आता संपले. मग मी माझ्या भाग्याचा हेवा करत बसलो. काय सुंदर दिवसाची सुंदर सुरूवात अशा सुंदर साथीने.. हे क्षण असेच फ्रीझ करून ठेवावेत.. लेखक वगैरे असतो तर मनाच्या कुपीत बंदिस्त करून ठेवावेत असे म्हटले असते.. असा विचार करत बसलो आणि तिथेच परत फसलो. कारण पुढे काय बोलावे सुचेना मला. मी तिच्या हातावरल्या मेंदीकडे पाहात बसलो.. काही वेळ गेला असावा. मग एकाएकी म्हणालो, “हॅड यू अप्लाइड मेहंदी एनी टाइम अर्लीयर..”

“नो.. फर्स्ट टाइम.. व्हेरी फर्स्ट टाइम.. इट्स सो ब्युटिफुल नो..”

“या..”

पुढे तुझ्याहून नाही म्हणायचे होते मला पण नाही म्हणालो. असे काही बाही सुचते पण जीभेवर का येत नसेल ते? याबाबतीत काही कुठे सुभाषित.. मला थोड्याच वेळापूर्वीचा माझा निश्चय आठवला.. म्हटले मारो गोली टू सुभाषित्स..

तरीही पुढे म्हणालो.. “सो? हॅप्पी हिअर इन इंडिया?”

“या.. यू नो बट आय कुड हॅव बीन हॅपीयर..”

म्हणजे? हिला विचारू? ही हिंट तर नाही.. आणि नसेल हिंट तर.. किती गैरसमज? मी चूप राहण्याचा निर्णय परत घेतला. एकदा ठेच लागून शहाणा न झाल्याची शिक्षा होईल का मला? विचार करे पर्यंत झालीच.. कारण एकाएकी वै उठली..

“आय विल लिव्ह.. गॉट्टु गेट रेडी..” म्हणत ती गेली निघून. मी पाहात राहिलो.. परत माझे काही चुकले की काय? आणि ही रागावली की काय?

असे रियल लाईफ प्राॅब्लेम्स कुणीच कुठेच का शिकवत नाहीत?

सकाळ अशी सुरू झाली. बरीचशी गोड. थोडीशी आंबट. वर आलो तर आई हसत होती माझ्याकडे पाहून. कारण सरळ होते.. आज किती वर्षांनी मी व्यायाम करीत होतो, ते ही स्वतःहून.

“काय मग.. काय विचार?”

“काही नाही गं, खूप दिवसात अंग जरा जड झाले..”

“हो का? मग काय म्हणाली वैदेही?”

“ती.. ती कशाला काही म्हणेल.. आणि म्हणाली तरी तिची भाषा कळतेय थोडीच!”

हा माझा उगाच शेंड्या लावायचा उद्योग होता. काय आहे की अमेरिकन लोक तोंडातल्या तोंडात बोलतात खरे पण याबाबतीत वै ला नाव ठेवायला जागा नव्हती हे खरे. तरी मी असा का बोलत होतो.. मूळ स्वभाव.. कुठेही पचकायचा..

“पण चांगली आहे ती मुलगी..”

“असेल.. अगं चांगले नि वाईट आपण समजण्यावर असते!”

बाप रे! माझी ही फिलॉसॉफीकल बाजू मला देखील आजवर ठाऊक नसावी?

आईने माझा नाद सोडला. म्हणाली, “लवकर तयार हो.. खाऊन घे काहीतरी.”

हे माझ्या लक्षात आलेच नव्हते. ब्रेकफास्टला वै येईलच. मी झपाटल्यासारखा तयारीस लागलो. पटापट आटोपून आलो खाली तेव्हा कृत्तिका, वै आणि रागिणीच्या मैत्रिणी ब्रेकफास्ट संपवून परत आपल्या खोलीत चालल्या होत्या खिदळत. मला पाहून त्यातील एकीने हाय म्हटले.. मी हात हलविला आणि झटक्यात निघालो. मी थांबायला हरकत नव्हती. पण नाही थांबलो. पोरी कुठे चालल्या असाव्यात? कुणास ठाऊक. हळदी समारंभ संध्याकाळी होता आणि रात्री आमचे मॅरेज हॉलवर कूच! तसा हॉल जवळ होता पण काकाच्या शिस्तबद्ध तयारीसाठी जाणे भाग होते. लांब चेहऱ्याने खायला बसलो ब्रेकफास्ट. व्यायामानंतर भूक लागतेच. खूप दिवसांनी तो केला तर भूकही खूपच लागते!

आता वै नाही आहे घरात एवढे नक्की तर करायचे काय? शेजारील घरातील व्हरांडा माझ्या खास आवडीचा. मस्त पाय पसरून बसावे, जाणारे येणारे न्याहाळत बसावे. वै भेटण्याआधी मी काकाच्या घराच्या अवतीभोवती सर्वेक्षण केले होते. पण त्याच संध्याकाळी वै ला पाहिले नि पुढच्या सर्व्हेची गरज उरली नाही. तरीही व्हरांडयात बसलो मी. वै आणि इतर कधी परत येतात हे बघायला. व्हरांडयातून काकाचे घरही नीट दिसते त्याचा हा फायदा! दुपारी काकूने जेवायला बोलावले. काकूच्या तावडीत सापडणे तसे धोकादायक, पण वै बद्दल माहिती न मागता मिळण्याचे आमची अन्य कुठेही शाखा नाही म्हणणारी ती एकमेव जागा होती. त्यामुळे थोडा धोका पत्करूनही काकूच्या पुढे जाणं गरजेचेच होते.

"कंटाळलेला दिसतोस .. घरी कुणी नाही म्हणून?"

"नाही, आहेत ना सगळे .. कंटाळून कसे चालेल?"

मला वाटले मी चांगलाच धोबीपछाड घातला काकूला! पण ती सवाई, म्हणाली, "खरंय तुझं रे. पण काही जणं नसली तर करमत नाही ना?"

"कोणाबद्दल बोलतेस तू?"

"अरे, ती बुरकुले मंडळी. तुला काय वाटते?"

आता काकूला मी काय उत्तर देणार? मी काय बोलायला हवे? खरे उत्तर तर नाही देणार मी.. मग नेहमीचे उत्तर देऊन मोकळा झालो..

"हुं.." आणि विषय बदलण्यासाठी म्हणालो, "काकू आई कुठेय?"

इतक्यात आईच समोर उभी. आता एका ऐवजी दोन जणी ताणणार माझी..

"ही बघ. अगं हा आतुरतेने वाट पाहात होता.."

"कुणाची?"

"अजून कोण? तुझीच असणार. आली बघ रे आई तुझी."

काकू वाढत होती नि वाढता वाढता असले काही बोलत होती. मी घाईघाईत खाणं आटोपून परत शेजारच्या घरी येऊन बसलो.

दुपार अशीच गेली. चार एक वाजले असावेत. सगळ्या जणी परत येताना दिसले मला. पटकन् मी खाली यायला निघालो. आता तरी ही भेटेल.. बोलेल. खाली घाईघाईत निघालो, मुद्दाम निघालो असे वाटू नये अशा चालीत. पोरी घरात शिरतच होत्या. मी आत शिरणार तोच काकाची हाक आली,

म्हणाला, “मोदका, बरा भेटलास. तुलाच शोधत होतो. आता तुझे काम सुरू. तुला दिलेली कामे समजावून सांगतो. आता तुझी खरी गरज आहे राजा.”

थोडक्यात काय मिशन रागिणी लग्नाच्या समरभूमीवर म्हणजे लग्नाच्या हाॅलवर कूच करण्याचा हुकूम आला काकाकडून.. आता पुढे काय?