MAZYA LOVEMARRIAGECHI GOSHT - 22 books and stories free download online pdf in Marathi

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 22

२२

वैदेही गमन!

कृत्तिका उभी समोर नि मी जांभई देत बसलोय.

आजूबाजूचे काही समजेना मला. वैदेही कुठे असेल? निघून तर गेली नसेल ना? मी डोळे चोळत कृत्तिकाकडे पाहात म्हणालो,

“बाकी कोणी दिसत नाहीत?”

“बाकी म्हणजे? आहेत ना.. सगळे आहेत.. काकू आहे.. काका.. आई.. बाबा सगळे आहेत..मी आहे, तू ही आहेस.”

का कोणास ठाऊक मला तिचा आवाज थोडा कडवट वाटला.

न राहवून मी विचारले .. “आपण सगळे आहोतच पण बाकीचे गेस्ट..?”

अजूनही मी वै बद्दल थेट विचारू धजत नव्हतो..

“आहेत की.. ते मंगू मामा नि तात्या आहेत. झालेच तर रत्नागिरीच्या मावशी आहेत. राजापूरच्या आत्याबाई आहेत. सगळे आहेत. बाजूच्या घरात. झोपले आहेत.”

“हुं.. खूपच झोपलो मी.. थकलो होतो.”

“झोपलास ना.. छान! आता मी झापणार आहे तुला..”

"अगं पण कृत्तिका .."

माझे न ऐकताच कृत्तिका तरातरा निघून गेली.

एकूण लक्षात आले ते हेच.. बुरकुले फॅमिली म्हणजे वै निघून गेली होती.. त्यांना जाणे भाग होतेच. पण मग आता पुढे काय? विचार करून डोके चालेना.

बागेत एकटाच येऊन बसलो. बागेत पाणी घालण्याचा प्रसंग आठवला.. नि व्यायाम करतानाच्या गप्पा ही. जगात कित्येक गोष्टी न बोलल्याने बिघडतात नाही? नको ते बोलणे नि हवे ते न बोलणे सगळ्या समस्यांचे मूळ आहे.. कुठल्याशा स्वामींनी म्हटले असणारच हे. असला फिलाॅसाॅफिकल विचार करत बसलेलो तर मागून कृत्तिका आली..

“काय मग..?”

“तू मला झापणार का होतीस..”

“झापणार? नुसता झापणार नाही, ठोकणार मी तुला. युजलेस. तू अकलेचा कांदा.. वैदू गेली निघून.. तू डायरेक्ट ते ही मला विचारत नाहीस..”

“गेली.. माहिती आहे.. पण मला नव्हते ठाऊक.. इतक्यात जाईल ते.”

“हो.. आणि ठाऊक असते तर फार फरक पडला असता?”

मी विचारात पडलो..

"म्हणजे तू होऊन तिच्याशी बोलणार होतास?"

"मी कालच बोललो तिच्याशी..

"छान! हवा पाण्याच्या गप्पा की तुमच्या मेडिकलची डिस्कशन्स? वैदूने सांगितले मला."

"अगं पण.. मी अजून काय बोलू तिच्याशी?"

“नाही ना कळत? मग काल ती तुला काही सांगू पाहात होती नि तू टाळत होतास तिला.."

"मी? मी कशाला टाळेन तिला?"

"ते माहिती नाही पण ती मला म्हणाली असे.. आणि आज ती गेली तेव्हा तू ढाराढूर.. काय समजावे तिने?”

“म्हणजे? तिला .. ती ..”

“तुला अक्कल कमी आहे का? कमी आहे का नाही.. कमीच आहे अक्कल तुला. मद्दड. कसा डॉक्टर झालास कुणास ठाऊक.. कॉपीबिपी करून पास झालास की काय.. साधी भाषा कळत नाही. ती तुझ्यापाठी येते नि तू बोलायचे टाळतोस?”

“मी?”

“नाही.. मी..”

“ऐक ना कृत्तिका.. झाले ते झाले.."

"मग गात बसा गाणे .. झाले गेले विसरूनी जावे.."

"प्लीज.. तुला खरे सांगतो.. वै मला आवडली..”

“वै?”

“हो.. वैदू नाही वै च. इतकी की तिला पाहताच मी ब्लॅंक होतो.. मग तिच्याशी बोलू ते काय नि कसे? त्यात तिला मी आवडेन की नाही ते माहित नाही.. तुझ्याशी मी बोलतो की नाही हवे तितके.. तो माझा स्वभाव, पण ती समोर आली की.. आणि गेले दोन दिवस पाहतेस तू.. इतके काम की..”

“छान..”

“आता?”

“आता काय..खाली डोके वर पाय.. गेली बस निघून आता करा ठणाणा.. करा भजन.. मला का विचारतोस?”

“म्हणजे.. नो रिटर्न..?”

“तू वेडा की खुळा.. इतक्यात सोडून देतोस.. हलव की हातपाय..”

“हलवेन.. पण कुठल्या दिशेने?”

“ते ही मीच सांगू? इच्छा तिथे मार्ग..”

“सांग ना.. अगं खरे सांगतो गेल्या चार दिवसात एक ही क्षण गेला नाही ज्यात तिचा विचार आला नाही.. आता..”

“आता काय? मारा बाता..”

“प्लीज.. यू आर द होल ॲंड सोल.. प्लीज हेल्प..”

“ठीक.. ग्रांटेड ऑन वन कंडिशन..”

“बोल.. लवकर बोल..”

“एक.. तू तिला उद्देशून पत्र लिहायचे..”

“मी?”

“नाही मी.."

"ठीक करतो काहीतरी."

"आणि दुसरे.."

“पण.. तू एकच कंडिशन बोललेलीस..”

माझ्याकडे दुर्लक्ष करत कृत्तिका म्हणाली, “दुसरे हे की तू स्वतः ते पत्र तिला द्यायचे!”

“मी?”

“नाही मी..”

“तसे नाही गं.. विषयच असा की मी मी म्हणणाऱ्यांची वाट लागते.”

“अव्वल दर्जाच्या स्टुपिडा.. मीच विचार केला तुझा म्हणून सांगते.. तिच्याशी डायरेक्ट बोलणे तेरे बस की बात नहीं.. म्हणून लिही.."

"आणि बाय पोस्ट पाठवून देऊ.. ती पोहोचेपर्यंत पत्र अमेरिकेत. पण कुणा दुसऱ्याच्या हाती पडले तर.. पण हे जमेल.. डन्.."

"तू मला पुरते बोलू देत नाहीस.. ते पत्र तुझ्या शिवाय दुसरे कुणीच तिला ते दिलेले चालणार नाही.. दिलेलेच.. हँड डिलिव्हरी.."

“अगं पण.. ती अमेरिकेत.. मी कसा जाणार..”

“वाटलंच तू असे विचारणार. पण ती गेलेली नाही अजून.."

"ओह! ती इथेच आहे? म्हणजे शी इज हिअर?"

"स्टुपिड. मला कळते नीट मराठी. उगाच इंग्रजी नको माझ्या समोर.."

"ते ठीक गं. पण ती कुठेय? गेली नाही ना अजून?"

"युजलेस, मूर्खा, आज रात्रभर असेल ती मुंबईत. आजच गाठ तिला.. उद्या जातील सगळे अमेरिकेत. काल बिचारी रात्रभर हैराण होती. झोपली पण नाही..”

“खरेच?”

“नाही.. खोटे सांगते तुला.. मी असते ना तर सरळ काट मारली असती तुझ्यावर.. पण या अमेरिकन बाई ठरल्या सतयुगातील.. ती काय बोलली माहितीय..”

“बोल.. वै जे काय बोलली..”

“आता ऐक.. तुझ्याबद्दल तिला आधीच ठाऊक होते.. म्हणजे फोटो बिटो पाह्यला होता तिने.. आणि तसा तू आहेसच म्हणा रूबाबदार .. ॲंड इट्स लव्ह ॲट फर्स्ट साईट .. ऑफ फोटोग्राफ!”

“काय सांगतेस.. माझ्याबद्दल तू आज पहिल्यांदा काही चांगले बोलतेयस..”

“हुं.. कधी कधी खोटे बोललेले आरोग्यास हितावह असते .. दुसऱ्याच्या. तर ती म्हणाली, मला आवडतो हा गाय..”

“गाय? हा गाय .. की ही गाय? साधे मराठी व्याकरण कृत्तिका..”

“चूप.. इंग्लिश मधला गाय.. त्यामुळे तुला पटवण्याचा ती प्रयत्न करत होती..”

“ती?”

“नाही मी.. आणि तू दूर दूर पळतोयस.. मूर्ख. अक्कल कशाशी खातात माहिती नाही.. तरी बरे मी सगळा ट्रॅक ठेवलाय तिचा .. आणि आय टेल यू शी इज अ जेम ऑफ अ पर्सन”

“आय नो ..”

“व्हॉट यू नो? मी तिला तुझ्याहून जास्त ओळखते..”

“हुं.. काही वर्षे.. मी जन्मजन्मांतरी..”

“वा! आता कंठ फुटतोय साहेबांना. हेच आणि असेच लिही..”

“मराठीत?”

“हो.. आणि रस्त्यात विकत घेऊन एक मराठी इंटू इंग्रजी डिक्शनरी पण दे.. फुकट नाही तू अव्वल दर्जाचा बावळट म्हणून प्रसिद्ध आहेस.. पण तसा चांगला आहेस म्हणून .. आता हातपाय हलव.. लवकरच निघ..”

“आणि ती कुठे भेटेल..?”

“ते पण मीच .. हुं .. मीच सांगायला हवे.. रात्रभर जागून प्लॅन बनवून ठेवलाय आम्ही. वैदू म्हणजे तुझी वै म्हणाली, अंदाज घे आधी.. इफ ओन्ली द्याट मोदक लाइक्स हर.. कॅरी आऊट पुढचा प्लॅन ..

मोदक म्हणे.. पुरण नाही बटाटे भरलेत तुझ्या डोक्यात.. मोडक!”

मग मी थोडा विचार केला..

लिहिण्याचे आणि माझे वाकडेच तसे. कविता काय नि पत्र काय.. लिहिणे मला जमायचे नाही.. वै समोर बोलती भले बंद होत असो, पण मला बोलण्याची हौस भारी. तेच लिहायला बसलो की शब्द सुचणे कठीण. तर आता करू तर काय.. आणि ही शेवटची संधी. आता गप्प राहिलो तर .. वै चा आयुष्यभर गैरसमज आणि तो होऊ नाही द्यायचाय मला.

मी पटकन स्टेशनरीच्या दुकानात गेलो. दोन गुलाबी कागद घेतले.. त्यावर ॲनाटॉमीत शिकवतात तसे चार चेंबर्सचे हृदय लाल रंगात काढले.. तशी चित्रकला चांगली आहे माझी. आणि सगळ्या भागांना नावे दिली रीतसर! इतपत मी माझ्यासारखाच वागलो.. पण नंतर हिंमत केली.. त्याच हृदयात उजव्या बाजूला एक 'पेसमेकर' असतो जो त्या हृदयास धडधड करायला लावतो.. तेवढ्या त्या भागाला मी तिचे नाव दिले.. 'वैदेही द पेसमेकर:

टू माय स्वीटहार्ट..' असे शीर्षक घालून तो कागद खिशात घातला. काकाच्या मिलिटरी शिस्तीत कदाचित कोर्टमार्शल होईल याची तमा न बाळगता त्याच्या बाईक वर टांग मारून मुंबईला सुसाट निघणार इतक्यात कृत्तिका आली..

"काय मग? काय लिहिलेस? पत्र की कविता? शायरी?"

"छे गं! लिहितोय कसला. डायरेक्ट जाऊन मी भेटतो तिला.."

प्रेमापाठोपाठ चोरटेपणा एकावर एक फ्री मिळतो का? माझ्याकडे दुर्लक्ष करत कृत्तिका म्हणाली,

“तू काय लिहिलेस ते नाही विचारत मी.. पण हे घे..”

“हे काय?”

“तुला तिथे जायला साॅलिड आणि व्हॅलीड कारण.. यात वै चा एक सोन्याचा हार आहे.. मुद्दाम विसरलीय ती.. तो देणे .. आहे की नाही अर्जंट..”

“च्यायला.. कृत्तिका.. अफलातून प्लॅनिंग तुझे..”

“नॉट ओन्ली माईन.. तुझी वै इज इक्वली पार्टनर इन क्राईम.. आता आम्ही एवढी मेहनत घेतलीय तर..”

“मी सुद्धा काही घोटाळा करू नये इतकेच ना.. एक सांगू का.. नको तुला नको..”

“सांग सांग ..”

“अगं आता कसले टेन्शन.. तिच्याकडून हो आहे ना मग चिंता नाही .. आता बघ मी ..”

“सॉरी.. तुला एक सांगायचे राहिले.. तू गेलास की तुझी ती तोंडी परीक्षा घेईल मगच ठरवेल.. बघ .. नसशील जात तर..”

मी निघण्याआधी कृत्तिकाने शेवटची साधून घेतली.

मी बाईक सुसाट सोडली. वै चा तो हार नीट जपून छातीशी ठेवला. पत्र जपून ठेवले त्याच बाॅक्समध्ये. आता काही तासांचा अवधी आणि वै वुड बी माइन. कृत्तिकाच्या मदतीबद्दल मला अत्यंत कृतज्ञता दाटून आली.. चार दिवसांच्या सगळ्या गोष्टी स्वप्नवत.. त्यातली वै तर स्वप्नसुंदरी. बहुधा आमची गाठ त्या तिथे वरून बांधण्याचे ठरलेच असावे.. नाहीतर इतके योगायोग?

एका धुंदीत मी मुंबईत पोहोचलो.

मी कृत्तिकाला म्हणालो नव्हतो, पण मला सांगायचे हेच होते की एकदा वै चा होकार गृहित असला की मी माझा नॉर्मल सेल्फ .. म्हणजे .. काहीही बोलायला मोकळा होतो. ते दिसलेच लवकर!