Aajaranch Fashion - 6 books and stories free download online pdf in Marathi

आजारांचं फॅशन - 6

अनिल गॅरेज वर पोहोचत नाही तर त्याचा एक कस्टमर जयराम पाटील आणि त्याचे कामगार त्याची वाट बघत होते.

“अरे अनिल किती वेळ, कधीपासून वाट बघतोय”

“काय झालं राव परत काय झालं का?

“अरे गियर टाकायला प्रॉब्लेम होतोय, गियर अटकतायत”

अनिल गाडीत बसला आणि चेक करायला लागला आणि गाडीत बसूनच बोलला.

“साहेब क्लच प्लेट गेलीय”

“नक्की?

जयराम पाटलाने विचारले.

“हजार टक्के, आत्ताच बदलून घ्या नाहीतर कुठे तरी रस्त्यात फसाल”

अनिल गाडीतून उतरत उतरत बोलला.

अनिल आपल्या कामात खूप तरबेज होता, त्याला सगळे लोक गाड्यांचा डॉक्टर बोलत, नुसतं एक वेळा बघून गाडीचा त्रास अचूक सांगणं आणि हात लावला की गाडी नीट केल्याशिवाय माघार नाही अशी अनिलची ख्याती होती.

“कर मग बदली, किती वेळ लागलं?

जयराम पाटलाने विचारले.

“दिवस जाईल पुरा, गियर बॉक्स उतरावा लागतो साहेब”

अनिलने उत्तर दिले

“कर बाबा काय हे ते पण संध्याकाळी गाडी पाहिजेल, उद्या पुण्याला जायचंय”

जयराम पाटलाने अनिलला बजवाले.

“आहो बोललो म्हणजे बोललो, घेऊन जा संध्याकाळी”

अनिलने आत्मविश्वासाने सांगितले.

संध्याकाळी ६.३०-७ च्या दरम्यान अनिलचा फोन वाजला, सविता होती.

“हा बोल ग”

“पाणीपुरी खायला नेणार होते ना”

अनिलने हातातला पाना डोक्यात मारला आणि बोलला.

“अग निघालोयच, रस्त्यातच हे, आलो लगेच”

“रस्त्यात हे मग हवेचा आणि गाड्यांचा आवाज का नई येत?

सविताने नवा प्रश्न केला

“ये जेम्स बॉण्ड, लई नको वकिला सारखे प्रश्न करू, आलो तयारी करून ठेव”

अनिलने त्याचा कामगार छोटूला गाडीची डिलीव्हवरी द्यायला सांगितलं आणि कपडे बदलून घरी निघाला.

सविता आणि मुले तयारी करून अनिलची वाट बघतच बसले होते, सविता तोंडाने जरा तापट पण मनाने खूप गोड होती, नवरा, घर, मुले हे तीच विश्व, मुलांची नीट काळजी घेणं, नवऱ्याच्या खाण्या पिण्याची कपड्या लत्त्याची खबरदारी ठेवणं, कधी सासू सासरे, नातेवाईक वैगेरे आले तर पूर्ण मनापासून त्यांचे आदरतिथ्य करणे

खूप चांगले जमायचे किंबहुना ती ते खूप मनापासून आणि आपुलकीने करायची. सविताच्या इच्छा आणि अपेक्षाही खूप मोठ्या नव्हत्या छोट्या छोट्या गोष्टीतून जश्या पाणी पुरी, मसाला डोसा, वडापाव, एखादी साडी किंवा ड्रेस, मुलांसाठी नवीन कपडे, त्यांना गार्डन मध्ये खेळवणे, इत्यादीने खुश होणारी एक आदर्श पत्नी होती, तिला फक्त दारूचा प्रचंड राग.

अनिल आला आणि बाहेरूनच हॉर्न वाजवून सविताला आवाज दिला.

“आलो आलो”

सविता दाराला कुलूप लावता लावता बोलली आणि लगबगीने मुलांना घेऊन अनिल पाशी आली.

मुलगी मी पुढे बसणार बोलून अनिलकडे धावली, अनिलने तिला उचलून त्याच्या पुढे बसविले, तसा मुलगा लगेच अनिलच्या मागे त्याला पकडून बसला.

“कशी दिसतेय मी?

सविताने मागच्या भांडणा नंतर घेतलेला ड्रेस घातला होता, तो दाखवत अनिलला विचारले.

“हा भारी वाटतेय बस लवकर”

अनिलने गाडीला किक मारत उत्तर दिले.

सविता देखील लगेच गाडीवर बसली आणि सगळे जण गुप्ताची पाणी पुरी खायला निघाले.

“ओ आम्हाला वडापाव पण पाहिजेल”

सविता अनिलच्या खांद्यावर हात ठेवत लाजत बोलली.

“खा ना मी कधी खायला नई बोलतो का, नई तर हॉटेल मधूनच जेवून जाऊ”

“काय नको उगाच पैसे घालवाचे, असच पाणी पुरी बिरी खाऊ, घरी जाऊन वाटल्यास तुमच्या आवडीची खिचडी बनवते”

“अग काय एवढं पैश्याचं, आपण कमावतो कशासाठी”

अनिल सविताला मोठ्या फुशारकीने बोलला.

“काही नको”

सविता एवढं बोले पर्यंतर गुप्ताची पाणीपुरीची गाडी आली, सविता आणि मुलांनी मनभरून पाणीपुरी, शेवपुरी वर ताव मारला, रस्त्यात मुलांनी आणि सविताने आवडेल ते खाल्ले आणि सगळे ख़ुशी ख़ुशी हसत बागडत घरी आले.

अनिलला सोडून बाकी सगळे खुश होते, तसा अनिलदेखील दिवसभर कामात आणि संध्याकाळी फॅमिली सोबत फिरताना ठीक ठाकच होता पण घरी परत येताना त्याची नजर मनोज कापडनेच्या श्रध्दांजलीच्या त्या १० बाय १५ च्या बॅनर वर पडली होती आणि पुन्हा एकदा मरणाच्या किंवा हार्ट अटॅक च्या भीतीने त्याच्या डोक्यात फणा उभारला होता, तो कपडे बदलून सोफ्यावर शांत बसला होता, त्याचा चेहरा सुन्न पडला होता, हृदय जोरात धड धडत होत, कपाळावर आट्या आणि घाम होता, उजवा हात डाव्या मनगटावर आणि नजर घड्याळाच्या सुई कडे होती. पुन्हा एकदा पॅनिक अटॅक म्हणजेच भीतीचा झटका अनिलला उभा खात होता.