Aajaranch Fashion - 10 books and stories free download online pdf in Marathi

आजारांचं फॅशन - 10

अंघोळ वैगेरे आणि नाश्ता पाणी आटपून अनिल खोकत शिंकत गॅरेजवर गेला, एखादा तास भर थांबला आणि छोटूला बोलला, खूप सर्दी खोकला झालाय डॉक्टर कडे जाऊन आलो, छोटूसाठी देखील अनिलच आजारपण आणि डॉक्टरच्या वाऱ्या नवीन नव्हत्या.

“आज काय झालं अनिल?

डॉक्टर अडवाणी खुर्चीवर डुलत डुलत बोलले

“खूप सर्दी आणि खूप खोकला आहे सकाळपासून”

“अच्छा अजून काही?

डॉक्टरांनी नेहमीच्या शैलीत विचारलं

“नाही अजून काही नाही”

अनिलने हळूच उत्तर दिले

डॉक्टरांनी स्वतःजवळची काही औषधें दिली आणि दोन औषधें बाहेरची लिहून दिली आणि कशी घायची ते समजावले.

अनिल औषधें घेऊन सरळ घरी गेला.

“अरे आज तुम्ही दुपारीच घरी, तब्येत ठीक आहे ना”

सविता ने दरवाजा बंद करत विचारले

“खूप सर्दी खोकला झालाय, च्यायला एक गेलं की दुसरं टेन्शन आहेच”

“आता ह्यात काय टेन्शन, रात्री दोन आईस्क्रिम खाल्ले म्हणून झाला अजून काय”

सविताने अनिलला समजावले

“अग पण आईस्क्रिम आपण सगळ्यांनीच खाल्लं मग खोकला मलाच का झाला?

अनिलचे प्रश्न पण त्याच्या सारखेच संशयाने भरलेले असायचे, त्यावर सविता शांतपणे बोलली.

“आहो कधी मी आजारी पडते तेव्हा मी काय असे बोलते का, तुम्ही जे खाल्लं तेच मी खाल्लं, तेच पाणी मी पण पिले, तुम्ही राहता तिथेच मी राहते मग मी का आजारी पडले आणि तुम्ही का नाही, आहो सगळ्यांचं शरीर आणि रोग प्रतिकार शक्ती वेगळी वेगळी असती, नका लईडोकं चालवू, औषध खा गपचूप आणि जा कामाला”

अनिलने देखील पुढे काही न बोलता औषध खाल्ले आणि गॅरेजवर गेला.

तीन चार दिवस गेले पण अनिलचा खोकला काही बरा झाला नाही आणि नेहमी प्रमाणे अनिलने घाबरून मनातल्या मनात साधारण खोकल्याला मोठ्या मोठ्या आजारांचे नावे देण्यास सुरवात केली, त्याला वाटायला लागले की अडवाणी डॉक्टर पेक्षा एखाद्या छातीच्या तज्ज्ञ डॉक्टरकडे गेलं पाहिजेल, हे काही नवीन नव्हतं त्याला कुठलाही आजार लगेच बरा झालेला हवा असतो, आणि त्या साठी डॉक्टर वर डॉक्टर बदलणे अनिल साठी काही अप्रुक नाही, फक्त स्वतः बद्दल नाही तर मुले जरी आजारी पडले आणि लवकर नीट नाही झाले कि त्याचा मेंदू अशेच खेळ रचायला सुरवात करतो. मग गूगल वर जाणे आजाराची माहिती घेणे, स्पेशालिस्ट डॉक्टर शोधणे हा त्याचा नित्यक्रम.

अनिलने इंटरनेट वरून एका छातीच्या तज्ञ् डॉक्टरांचे नाव आणि पत्ता शोधला आणि त्याच दिवशी गॅरेज वरच काम आटपून संध्याकाळी त्यांच्या कडे गेला.

क्लिनिकमध्ये अनिलच्या पुढे दोन नंबर आणखी होते, अनिल बाकड्यावर बसून त्याचा नंबर येणायची वाट बघत होता आणि सारा दवाखाना न्याहाळत होता, दवाखान्यात छातीच्या आजारांबद्दल माहिती देणारे काही पोस्टर लटकवलेले होते, एका पोस्टर वर लिहलेले होते

‘दो हफ़्तो से ज्यादा खासी टी बी हो सकती है, आजहि अपने डॉक्टरकी सलाह ले’

जरी अनिलला तीन चार दिवसाचा खोकला होता तरी हे एक वाक्य खूप होत अनिलची टी बीची भीती जागृत करण्या साठी. त्याच्या मनात असंख्य शक्यता घर करायला लागल्या, विचारात मग्न झालेला अनिलचा चेहरा केविलवाणा आणि दया येण्यासारखा झाला होता.

अनिलचा नंबर आला आणि तो दचकून उठून आत गेला, डॉक्टरांना आपल्या खोकल्या बद्दल सांगितले.

“झोप तिथे”

डॉक्टरांनी पेशंट बेड कडे बोट केले आणि स्टेथोस्कोप लावून छाती तपासायला लागले, नंतर अनिलला एका कुशीवर करून पाठ तपासली आणि त्याला येऊन बसायला सांगितले.

“ताप येतो का, आणि भूक वैगेरे लागतेना?

डॉक्टरांनी विचारले.

“नाही ताप नाही येत आणि भूक पण ठीक ठाक आहे”

अनिलने कोमजल्या सारखे उत्तर दिले

“ठीक आहे हे औषध पाच दिवस घ्या नाही बर वाटलं तर पाच दिवसानी परत दाखवा”

डॉक्टर अनिलच्या हातात औषधांची चिट्ठी देत बोलले.

“पण डॉक्टर काही घाबरण्या सारखं तर नाही ना, म्हणजे टी बी वैगेरे सारखं काही?

“नाही तस काही वाटत तर नाही पण पाहिजेल तर मी चिट्ठी देऊन ठेवतो, नाही फरक पडला तर दोन दिवसांनी एक एक्सरे काढून दाखवा मला”