Navnath Mahatmay - 17 books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग १७

नवनाथ महात्म्य भाग १७

मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता जायचा नागनाथाने निश्चय केला.
कोणास न विचारता घरुन निघाला व मातापुरी, पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करु लागला.
परंतु तेथे पत्ता न लागल्यामुळें कोल्हापुरास गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयीं चौकशीं करु लागला .
तेव्हा लोक त्याला हसले व दत्तात्रेय येथे येतो पण कोणास दिसत नाही कोणत्या तरी रुपानें येऊन भिक्षा मागुन जातो असे त्यांनी सांगितले.
ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथाने विचारले .
या नाथाच्या प्रश्नावर लोकांनीं उत्तर दिले की तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करीत नाहीं.
येथें अन्न न मिळाले तर तो उपवास करील, पण अन्नासाठी दुसऱ्या गांवी जाणार नाही.
अन्य गावच्या पक्वांन्नास विटाळाप्रमाणें मानुन या गावात अन्न परम पवित्र असे तो मानतो .
मग वटसिद्ध नागनाथाने विचार केला की गावात कोठेही स्वयंपाक होऊ न देता सर्वांस येथेच भोजनास बोलवावे म्हणजे त्यास तिकडे कोठे अन्न मिळणार नाही व तो आपल्याकडे येईल.
परंतु आपल्याकडचे सिद्ध अन्न तो घेणार नाही.
ही गोष्ट लक्षात ठेवुन ओळख पटताच त्याचे पाय धरावे.
माझें नाव त्याला व त्याचे नाव मला ठाऊक आहे.
असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व पुजाऱ्यापासुन एक खोली मागून घेऊन तेथे राहिला.
काही दिवस गेल्यावर गावजेवण घालावे असे नाथाच्या मनात आले त्याने ही गोष्ट पुजाऱ्याच्यापाशीं काढून यासाठी मदत करण्यासाठी विनंती केली.
तेव्हा पुजारी म्हणाला साऱ्या गावाच्या जेवणावळीस पुरेल इतक्या अन्नाचा संग्रह तुझ्याजवळ कोठे आहे?
इतर वरची सर्व खटपट आम्ही करु पण सामान कोठून आणणार ?
त्यावर नाथाने सांगितले की सामग्री मी पुरवतो तुम्ही तयारी करु लागा.
ते त्याचे म्हणणे पुजाऱ्याने कबूल केले.
नाथाने द्रव्य, धान्ये, तेल, साखर वगैरे सर्व सामुग्री आपल्या सिद्धीच्या योगाने भरपूर भरुन ठेविली व पुजाऱ्यास बोलावून ती सर्व सामग्री दाखविली.
राजापासुन रंकापर्यंत व ब्राह्मणापासुन अत्यजापर्यंत सर्वास दोन्ही वेळचे सहकुंटूंब, सहपरिवार, पाहूण्यासुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले गेले .
गावात स्वयंपाकासाठीं कोणी चूल पेटवू नये, सकाळी व मधल्या वेळीही भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेत ठेवला असल्याचे आमंत्रणात सुचविले होते.
निरनिराळ्या जातीत भ्रष्टाकार होऊ नये म्हणुन बंदोबस्त ठेवुन कार्याची सुरुवात झाली.
यामुळे गावात कोणीच स्वयंपाकाकरिता चूल पेटवली नाही.
अन्न घरी घेऊन जाण्यादेखील मनाई नव्हती.
कोरडे किंवा शिजलेले अन्न, जसे हवे असेल तसे व लागेल तितके घेऊन जाण्याची मुभा होती.
यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते.
दिवा लावण्यासाठी मात्र लोकांना विस्तव पेटवावा लागे .
हा जेवणावळीस समारंभ सतत महिनाभर चालला होता.
त्यामुळें पहिल्याच दिवशी दत्तात्रेयास भिक्षेची मारामार पडली.
त्या दिवशीं तो कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता.
तो जेथे जाई तेथे लोक त्यास म्हणत , अरे भीक का मागतोस ?
आज गावात मोठे प्रयोजन आहे तिकडे जा, चांगले चुंगले जेवायला मिळेल.
असे उतम उत्तम पक्वान्नांचे भोजन सोडून कदान्नाकरिता गावात का भटकतोस ?
आम्हा सर्वांना जेवायला जायचे आहे, तुझ्यासाठी स्वयंपाक कोण करणार ?
मग प्रयोजनाचा कसा काय बेत आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रेयाचा विचार ठरला.
त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाकनिष्पत्ति कशी काय होते हें नीट लक्षात आणले.
सिद्धिच्या योगाने अन्नाच्या राशी तयार झाल्या हे तो पक्केपणी समजला.
मग ही मोठी जेवणावळ येथे कोण घालीत आहे ह्याची दत्तात्रेयाने विचारपूस केली.
तेव्हा वटसिद्ध नागनाथाचे नाव त्यास लोकांनीं सांगितले.
आपण वीस वर्षापूर्वी ज्यास सिद्धि दिली तो हाच असुन आपल्या दर्शनाच्याच इच्छेने त्याने या गावी येऊन हे प्रयोजन करण्याचें ठरवले आहे , असे दत्तात्रेयाच्या लक्षात आले.
त्याने त्या दिवशी उपवास केला.
तो तेथून तसाच परत जाऊ लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला.
पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे न जेवता तसाच तेथून निघून गेला.
तो दररोज गावात येऊन सुकी भिक्षा मागे.
कोणी जास्त चौकशी करून विचारले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाहीं, असे सांगे व काशीस जाऊन भोजन करी.याप्रमाणें एक महिना लोटला.
नागनाथानें विचार केला अजुन स्वामींचें दर्शन होत नाही असे का बरे ?
मग त्याने ग्रामस्थ मंडळींस विचारले की गावात भिक्षा मागणारा कोणी अतिथी येत नाही काय ?
लोकांनी सांगितले की एकजण नियमितपणे येतो परंतु त्याच्या भिक्षान्न सेवन करण्याचा नियम असल्यामुळें तो तुमचे अन्न घेत नाही.
इतर शिजलेले अन्न त्याला मिळत नाही म्हणून कोरान्न मागतो.
तो भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगा म्हणजे मी स्वतः जाऊन त्याची विनवणी करीन व त्यास आणुन भोजन घालीन असे नाथाने त्या लोकांना सांगुन ठेवले.
त्या वेळी अशीही सूचना केली होती की त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये.
येथल्याच अन्नाची त्यास सांगुन सवरून भिक्षा घालावी व ती जर त्याने न घेतली तर मला लागलीच कळवा.
असे सांगून त्यांना भिक्षेसाठी सिद्धिचे पुष्कळ अन्न दिलें.
दत्तात्रेय भिक्षेस आला असता हे नाथाकडचे अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले.
तेव्हा ती तो घेईना.
मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागले.
पण संशयावरून ती सुद्धा तो घेईना.
इतक्यांत कोणीतरी जाऊन ही गोष्ट नाथास कळविली.
तो लगबगीने तेथे आला.
त्यास लोकांनी लांबुनच तो भिक्षेकरी दाखविला.
त्याबरोबर नाथाने त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायांवर मस्तक ठेवले.
बरेच दिवस तुम्ही मला न भेटल्याने मी बेचैन झालो आहे.
तरी आता मजवर कृपा करावी, अशी हात जोडून विनंती केली.
त्याची तीव्र भक्ति पाहून दत्तात्रेयाने त्यास उठवून हृदयी धरले.
आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून त्याच्या कानात एक मंत्र सांगितला.
ती आत्मखुण समजताच तो ब्रह्मापरायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समुळ नाश झाला.
त्या समयीं तो दत्तात्रेयाच्या पाया पडला.
त्यास स्वामीने त्याची पूर्वजन्मकथा सांगितली व तु ऐरहोत्र नारायाणाचा अवतार आहेस, ह्यामुळें मी तुला सिद्धि दिली होती, असे बोलून दाखविलें.
तुझी भेट घेण्याचे फार दिवस मनात होतें, पण प्रारब्धानुसार तो योग मात्र आत्ता घडुन आला, असे दत्तात्रेयाने सांगितले.
मग ते उभयता तेथून काशीस गेले.
तेथे नित्यनेम उरकून त्यानंतर ते बदरीकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली.
दत्ताने हा नागनाथ ऐरहोत्र नारायणाचा अवतार आहे असे शंकराला सांगितल्यावर शंकरानें त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सुचना केली.
मग नागनाथासह दत्तात्रेय तेथे राहीले व त्यांनी नाथास सर्व विद्यात आणि चौसष्ट कलात निपुण केले.
मग दत्ताने त्यास पुन्हा बदरिकाश्रमास नेऊन तपश्चर्येस बसविले व नाथदीक्षा दीली.
तेथे त्याने बारा वर्षें तपश्चर्या केली.
त्यास सर्व देवांनी अनेक वर दिले नागनाथानेही देव, ऋषि आदिकरून सर्वांस संतुष्ट केले.
पुढे दत्तात्रेयाने नाथास तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा केली.
त्यानुसार दत्ताच्या पाया पडून नागनाथ तीर्थयात्रा करावयास निघाला व दत्तात्रेय निरिनार पर्वतावर गेला.
नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला.
तेथें अरण्यात राहिला असता गावोगावचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले.
एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता वडगाव या गावात आले.
तेथे नागनाथाची कीर्ति त्याच्या ऐकण्यात आली.मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असता दाराशीं असलेल्या शिष्यांनी अडवले व सांगितले ,नागनाथांच्या त्याच्या परवानगीवाचुन आत जाण्याची मनाई आहे.
शिष्याचे हे भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकताच त्यास मोठा क्रोध आला.
देवाच्या किंवा साधुच्या दर्शनास जाण्यासाठी कोणाचीही आडकाठी नसावी, अशी पद्धत असता येथे हा काय दांभिक प्रकार चालु आहे ?
असे मनात आणुन मच्छिंद्रनाथाने त्या शिष्यास मारले .
ते पाहून नागनाथाचे दुसरे सातशे शिष्य धावले त्या सर्वांना त्यांनीं स्पर्शास्त्राच्या योगाने जमिनीस खिळवुन टाकले.
मठामध्यें नागनाथ ध्यानस्थ बसला होता.
आरडा ओरडा ऐकून तो ध्यानातुन बाहेर आला.
ध्यानात बाधा आल्याने नागनाथास राग आला.
त्याने शिष्याची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथाना त्यांना मारताना पण पाहिले.
तेव्हा त्याने प्रथम गरुडबंधनविद्या जपून स्थर्गी गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले.
ते मुक्त होताच नागनाथाच्या पाठीशी लपले .
त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाने विचार केला व पर्वतास्त्राची योजना केली .
तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे, असें पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप करताच इंद्रानें वज्र सोडून दिले.
तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला .
दोघेही एकमेकांचा पाडाव करण्याकरिता मोठ्या शौर्याने लढत होते.
शेवटी नागनाथाने सर्पास्त्र पेरून मोठमोठाले सर्प उप्तन्न केले.
ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करु लागले.
तेव्हा मच्छिंद्रनाथानें गरुडास्त्राची योजना केली, परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास्त्राने गरुडास बांधुन टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेनासा झाला.
सर्पांनी मच्छिंद्रनाथास फारच इजा केली त्यामुळे तो मरणोन्मुख झाला.
त्याने त्या वेळी गुरुचे स्मरण केले की, देवा दत्तात्रेया या वेळेस विलंब न करता धाव.
मच्छिंद्रनाथाने दत्तात्रेयाचे नाव घेतल्याचे पाहून नागनाथ बुचकळ्यात पडला.
आपल्या गुरूंचे स्मरण करत असल्यामुळे हा कोण व कोणाचा शिष्य हे समजण्यासाठी नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास नावगाव विचारू लागला.
मच्छिंद्रनाथाने आपले नाव सांगुन म्हटले, माझा गुरु दत्तात्रेय, त्याचा मी शिष्य आहे.
माझ्यामागून जालंदर, नंतर भर्तृहरी, त्याच्यामागुन रेवण आहे .
या नाथपथांत सर्वात पहिला मीच आहे.
म्हणुन मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे.
हे ऐकून नागनाथास पश्चात्ताप झाला .
त्याने लागलीच गरुडांचे बंधन सोडुन गरुडाचा जप केला तेव्हा गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन अदृश्य झाले. गरुडाचे काम होताच तो दोघा नाथांना नमस्कार करून स्वर्गास गेला.
नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला, वडील बंधू पित्यासमान असतात , म्हणुन तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात.
मग त्यास तो आपल्यासोबत आपल्या मठात घेऊन गेला.
मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू दाराशी सेवक ठेवुन लोकांना आत जाण्यास प्रतिबंध करतोस ह्यातील हेतु काय?
इतके भाविक लोक आशेने तुझ्या दर्शनास येतात.
तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते.
आपला दोघांचा तंटा होण्याचे मुळ कारण हेच आहे .
नागनाथ म्हणाला मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने ध्यानभंग होतो,म्हणुन दाराशी रक्षक ठेवले.
त्यावर मच्छिंद्रनाथानें त्यास सांगितले की असे करणे योग्य नाहीं.
लोक पावन व्हावयास आपल्या कडे येतात तरी आतापासुन त्यांना मुक्तद्वार ठेव.
असे सांगुन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले.
त्यानंतर मात्र दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली.
त्या नाथाच्या शिष्यांतच गुलसंत म्हणुन एक शिष्य होता.
त्याची स्त्री मठात मृत्यु पावली तिला नाथाने आपल्या किमयेने उठवले.
यानंतर कोणी मेले म्हणजे प्रेत मठात नेत व नागनाथ त्यास जिवंत करुन घरी पाठवुन देई.
यामुळे यमधर्म मात्र संकटात पडला.
त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळवले.
मग ब्रह्मदेवाने स्वतः वडवाळेस येऊन नाथांना विनंती करून ते अद्‌भुत कर्म बंद करण्यास सांगितले .
नाथांनी पण ती अडचण समजुन घेतली .

क्रमशः