mahanti shaktipinthachi - 20 - last part books and stories free download online pdf in Marathi

महती शक्तीपिठांची भाग २० - अंतिम भाग

महती शक्तीपिठांची भाग २०

एका पौराणिक कथेनुसार भृगुऋषींच्या मनात विचार आला की त्रिदेवांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे .

हे जाणुन घेण्यासाठी भृगुऋषी सर्वप्रथम ब्रन्म्ह्देवांच्या गेले आणि त्यांच्यासोबत रागाने बोलु लागले .

ऋषींचा असा उद्धटपणा पाहून ब्रह्मदेवांना राग आला .

ते पाहील्यावर भृगुऋषिना समजले की ब्रह्मदेव आपला राग नियंत्रित करु शकत नाहीत .

तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांना शाप दिला की त्यांची पूजा कोणत्याही मंदिरात होणार नाही .

त्यानंतर भृगुऋषी शिवशंकरांचे दर्शन करण्यासाठी कैलासावर गेले .

परंतु दरवाजातच नंदीने त्यांना अडवले आणि सांगितले की शिवशंकर आणि देवी पार्वती एकांतात आहेत .

आत्ता त्यांना कोणी भेटू शकत नाही .

हे ऐकल्यावर भृगुऋषि क्रोधित झाले आणि त्यांनी शिवशंकरांना शाप दिला की त्यांची पूजा लिंगरूपात होईल .

शेवटी ते वैकुंठाला पोचले .

पाहतात तर काय भगवान विष्णु शेषनागावर डोळे बंद करून विश्रांती घेत आहेत आणि देवी लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहेत.

हे पाहील्यावर भृगुऋषी पुन्हा क्रोधित झाले आणि त्यांनी विष्णुच्या छातीवर जोरात एक लाथ मारली .

त्यामुळे भगवान् विष्णु जागे झाले त्यांनी ऋषींचे पाय पकडले आणि विचारले,

“ आपल्या पायाला लागले तर नाही ना?...

हे ऐकुन भृगुऋषींचा क्रोध एकदम शांत झाला आणि ते विष्णुची प्रशंसा करीत तेथुन निघून गेले .

हे सर्व पाहून देवी लक्ष्मी मात्र क्रोधित झाल्या, त्यांना हे ऋषींचे वागणे अजिबात आवडले नाही .

आपल्या पतीचा अपमान त्यांना सहन झाला नाही .

त्या विष्णुदेवांना म्हणाल्या की आपण त्या ऋषिंना शिक्षा द्यायला हवी होती .

तेव्हा देवांनी त्यांना शांत व्हायला सांगितले .

परन्तु माता लक्ष्मींनी त्यांचे न ऐकता वैकुंठ धामाचा त्याग केला,व त्या पृथ्वीवर आल्या .

त्या जिथे अवतरित झाल्या ती जागा कोल्हापुर नावाने ओळखली जाते .

देवींची समजुत काढायला भगवान विष्णुसुद्धा पृथ्वीवर वेंकटेश्वर या रूपात अवतरित झाले .

ज्यांचे मंदिर तिरुपति बालाजी या नावाने जगात प्रसिध्द आहे .

असे म्हणतात तिरुपति म्हणजेच भगवान विष्णु यांच्यावर रागावून त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापुरला आली .

या कारणाने तिरुपती देवस्थानातून त्यांना दरवर्षी शालू पाठवला जातो .

तो तिरुपति देवस्थानातून आलेला शालू देवीला नेसवला जातो .

या स्थानाविषयी म्हटले जाते की विष्णुच्या नाभितुन उत्पन्न झालेल्या ब्रह्माने तमोगुणानी युक्त अशा गय, लवण आणि कोल्ह अशा तीन मानस पुत्रांची इथे निर्मिती केली .

त्यांचा मोठा पुत्र गय याने ब्रह्माची उपासना करून वर मागितला की त्याचे शरीर देवपितरांच्या तीर्थापेक्षा अधिक शुद्ध होवो . ब्रह्माजीनी तथास्तु असे म्हणल्यावर गय आपल्या स्पर्शाने पापी लोकांचा उद्धार करू लागला .

नंतर यमाने तक्रार केल्यावर देवतांनी गयचे शरीर यज्ञकर्मा साठी मागून घेतले .

या स्थानाचे नाव कोल्हापूर कसे पडले हीसुद्द्धा एक कथा आहे .

केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर याच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या देवतांनी देवीची प्रार्थना केली .

श्री महालक्ष्मीने दुर्गाचे रूप घेतले,आणि ब्रह्मास्त्र फेकून त्याचे मुंडके उडवले .

तेंव्हा कोल्हासुराच्या तोंडातून दिव्य तेज निघून थेट श्री महालक्ष्मीच्या तोंडात प्रविष्ट झाले .

आणि त्याचे धड़ कोल्हा (भोपळा ) बनले .

अश्विन पंचमीला त्याचा वध झाला होता .

मृत्यू पूर्वी त्याने देवीकडे वर मागितला होता की या भागाचे नाव कोल्हासूर आणि करवीर असे असावे .

काळाच्या ओघात ते कोल्हासूर चे कोल्हापूर झाले परंतु करवीर तसेच कायम राहिले .

'करवीर क्षेत्र महात्म्य' आणि 'लक्ष्मी विजय' च्या मते कोल्हासूर राक्षसाला एका महिलेला ठार मारण्याचा आशीर्वाद मिळाला होता म्हणूनच विष्णू स्वत: महालक्ष्मीच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी राक्षसाला मारले ,आणि करवीरच्या युद्धातच त्यांचा पराभव केला.

मृत्यू होण्यापूर्वी त्या भागाला त्याचे नाव मिळावे अशी विनंती त्याने देवीला केली.

देवीने तसा वर दिला आणि तिने तेथेच वास्तव्य केले .

त्यानंतर त्याचे नाव 'करवीर क्षेत्र' पडले, जे नंतर 'कोल्हापूर' झाले.

आईला कोल्हासूर मर्दिनी म्हटले गेले.

कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते.

विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात.

असे म्हणतात सूर्यदेव स्वतः आईच्या चरणी लीन होतात .

याला “किरणोत्सव” म्हणले जाते .

ही किरणे पहील्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात.

हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो.

हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आली आहे की मंदिरातील आर्किटेक्चर मुळे वर्षात दोन वेळा म्हणजे नोव्हेंबर आणि जानेवारीत तीन दिवस गाभाऱ्यात सूर्याचे किरण महालक्ष्मी मूर्तीस स्पर्श करतात.

९,१०,आणि ११ नोव्हेंबर रोजी आणि ३१ जानेवारी १ आणि २ फेब्रुवारी हे ते दिवस आहेत .

पहिल्या दिवशी सूर्यकिरण महालक्ष्मीच्या पायाला स्पर्श करतात.

दुसर्‍या दिवशी ते कंबरेपर्यंत येतात आणि तिसर्‍या दिवशी ते देवीचा चेहरा प्रकाशित करतात .

गाभाऱ्यात असलेली ही मुर्ती आणि मंदिर परिसरातील पश्चिम दरवाजा २५० फूटांहून अधिक अंतरावर आहे.

किरणोत्सवाच्या वेळी सर्व दिवे विझवले जातात.

आणि भक्त या अद्भुत “किरणोत्सव “सोहळ्याची अनुभूती घेतात.
अशी ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीची महती आहे .

सती म्हटलं की पतीच्या चितेसह पत्नीने जिवंत जळण्याची अनिष्ट प्रथा आपल्यापैकी अनेकांना आठवेल.

आता आपल्या समाजातून हद्दपार झालेली ही परंपरा नेमकी कुठून सुरू झाली असावी याचा शोध घेतल्यास दाक्षायणीच्या कथेचा संदर्भ येतो .

दाक्षायणी म्हणजे “आई सती “,विश्वेश्वर महादेवाची पहिली पत्नी.

तिच्या पित्याकडे, प्रजापती दक्षाकडे असलेल्या यज्ञस्थळी सर्व उपस्थितांसमोर महादेवाचा झालेला अपमान असह्य झाल्याने तीने त्याच यज्ञकुंडात आत्माहूती दिली.

शिवनिंदा श्रवण करण्यालाही महापाप मानुन दाक्षायणीने स्वतःच स्वतःसाठी घेतलेलं हे प्रायश्चीत्त होतं.

यात तीने जी आत्माहूती दिली त्यानंतर तीला “सती” हे नामाभिधान मिळालं.

ती या सर्व विश्वाला आपल्या बालकाप्रमाणे मानत असल्याने तिला “आई सती “म्हणतात .

आपल्या पतीच्या सन्मानासाठी जीव देणे ही त्याच्याप्रती असलेल्या भक्ती वा प्रेमाची सर्वोच्च सिमा आहे असं मानुन त्या काळात सती हे नाव देऊन दाक्षायणीचा गौरव करण्यात आला असावा.

सन्मानासाठी जीव देणे ही गोष्ट आपल्या संस्कृतीत नेहमीच गौरविली गेली आहे.

मोगल आक्रमणांच्या काळात हजारो राजपुत स्त्रीयांनी सन्मानासाठी केलेले 'जोहर' आजही अभिमानानेच उल्लेखले जातात. त्याचप्रमाणे दाक्षायणीचा सती हा उल्लेख तिच्याप्रती, तिने केलेल्या कृत्याप्रती आदर म्हणुनच केला गेला असेल.

म्हणुनच आदीशक्ती जरी कुणालाच दिसणारी नसली, तरी तिची ही दर्शनी रूपं त्या मुळ रूपाच्या खुप जवळ नेऊन ठेवणारी आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

म्हणुनच देवीच्या नऊ रूपांपैकी पहिलं रूप निर्गुण आदीशक्ती आहे. आणि नंतर तिने स्वतः रचलेल्या या जगताच्या कल्याणासाठी निर्माण झालेली तिचीच ईतर रूपे आहेत .

आपल्या देशात असलेल्या शक्तीपिठांच्या आकड्याबाबत संभ्रम आहे.

ती चार आदीशक्तीपिठे, अठरा महाशक्तीपिठे, की एकावन्न शक्तीपिठे आहेत, एकशे आठ शक्तीपीठे आहेत की एकुण चौसष्ट मंदिरं आहेत,हे अजुनही नेमकं सांगता येत नाही.

यात जरी मतभिन्नता असली तरीही कुठल्याही शक्तीपिठाची मुळधारणा ही दाक्षायणीची म्हणजे सती आईची कथा आहे, हे मात्र नक्की.

यापैकी जवळपास प्रत्येकच मंदिरांस स्वतःची अशी उत्पत्तीकथा आहे, तसेच पुराणकालीन संदर्भ आणि विविध कथा सुद्द्धा आहेत.

शक्तीपिठे म्हणले की या ठीकाणी सतीच्या शरीराचा कोणता अवयव पडला होता? हा प्रश्न भक्तांना आधी पडतो

त्या अवयवांची ओळख देऊन आणि सतीच्या कथेचा संदर्भ देऊन करून दिलेली या शक्तीपिठाची ओळखच महत्त्वाची ठरते.

.

अशी ही सर्व शक्तीपिठांची माहिती आणि महती आहे .

समाप्त .....