Sukhi Bhav - A new definition of happiness books and stories free download online pdf in Marathi

सुखी भव - सुखाची नवीन परिभाषा

सुखाचा शोध एक वेगळ्या दशनबिंदु मधून घडविण्याचा आणि सुखाबद्दलचा बाह्य दृष्टिकोन बदलून नवमर्मदृष्टीची अनुभूती सर्वांना करून देण्याचा यत्न मी करीत आहे . तथापि वाचकांनी अन्याय, अत्याचार ,अनाचार यातही सकारात्मकता आणि सुख शोधावे , अशी माझी मुळीच ईच्छा नाही. फक्त दैनंदिन जीवनातील कुरबुरीच्या छोट्या - मोठ्या तडा , भेगा सांधण्याचा माझा हा प्रयत्न आहे . तसही सामान्य माणसाच्या जीवनाचं हे जरतारी वस्त्र विरून , शंभर दुःखांच्या धाग्यांना तडजोडीची ठिगळं ही लागलीत . मध्यम वर्गीयांच्या संसाराचा हा आंबट आवळा , नवमर्मदृष्टीच्या एकतारी पाकात मुरून मनातल्या पानाची रंगत वाढवेल यात शंका नाही.
प्राचीन काळ . तपस्वी ऋषींचा आश्रम. ब्रह्मचर्याश्रम संपवून , गृहस्थाश्रमी प्रवेश करण्यासाठी , ऋषीची आज्ञा आणि आशीर्वाद घेण्यास शिष्य आशेने उभे आहेत . मोठ्या अपेक्षेने उभ्या असणाऱ्या त्यांचा , दानी गुरूने दिलेले "सुखी भव" इतकेच आशिर्वचन ऐकून हिरमोड होतो.
काळ जातो. शिष्य संसारात रुळतात. वेगवेगळ्या कार्य क्षेत्रातले ते सहाध्यायी शिकवणुकीच्या आणि गुरू आज्ञेच्या एकाच समान धाग्याने जोडलेले आहेत . सहज भेटलेल्या त्यांच्यामध्ये एकेदिवशी गुरू भेटीची आणि आश्रमाची असीम ओढ दाटून येते . आश्रमात एकत्र जमायचे असे ठरवून, सारे पुन्हा एकाच विद्याछत्राखाली जमा होतात. प्रीती संमेलनासाठी आलेल्या , त्या विद्यार्थ्यांची ऋषी , राजाला सांगून मखमली आसने वगैरेंची उत्तम सुखसोय करून देतो .सर्वांनी वंदन केल्यावर आशीर्वादासाठी मुनी हात उंचावणार , तोच एक शिष्य नम्र होऊन वदतो , हे मुने आपण दुसरा कोणताही आशीर्वाद द्या . परंतु "सुखी भव " असा वर देऊ नका. दुःखाने आणि वेदनेने भरलेल्या या जगतात सुख नाही .
एका शिष्याचे ऐकून मग हळूहळू इतरही शिष्य तोच आलाप आळवू लागतात . दर्भासनावर सुखासनात बसलेला तो तपस्वी सर्वांना मन मोकळे करण्याची संधी देतो. प्रत्येक जण आपापल्या व्यथा, उपाय मिळण्याच्या आशेने सांगू लागतात.
पहिला शिष्य ,मुनिवर माझा स्वतःचा व्यवसाय आहे . अनेक धंदे बदलून पाहिले, पण अपयश पदरी पडतंय ,धन मिळत नाही. दुसरा शिष्य , माझ्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा अव्हेर करून ,मला पिढीजात दुसराच व्यवसाय करायला भाग पाडले. उत्तम धनार्जन होते . सुविधा आहेत ,पण तरी अस्वस्थता वाटते . आणखी एक शिष्य माझी पत्नी घर, संसार उत्तम सांभाळते . पण ती कुरुप आहे . बाहेर घेऊन जायला लाज वाटते . सारे तिच्या रूपावरून बोल लावतात ,मन दुःखी होते .आणखी एक बोलू लागला. मुनी श्रेष्ठ . माझे भले थोरले कुटुंब. वडील, चुलते ,थोरले भाऊ . व्यवस्थित घडी बसली आहे , घर आणि व्यवसायाची .पण मला कर्तृत्व दाखवायला संधीच नाही . थोरा मोठ्यांच्या आज्ञेने कारभार चालतो. ओहोळतला दगड झालोय . आणखी एक , मला धनाची चिंता नाही .पत्नी रुपवान आहे, पण घर जावई राहिलोय. कामात यश मिळते . पण श्रेय नाही . कर्तृत्व दाखवूनही मी नाकर्ता . मग आणखी एक दुःखी शिष्य पुढे होतो . देवा , तुमच्याकडून ज्ञान प्राप्ती करून निपुण झालो . संसार ,मुले , भावकी ,धंदा साऱ्याचा नीट जम बसवला. पण सारा भार ,जबाबदाऱ्या माझ्यावरच आल्या. मी थोरला ना ! गाढव झालंय माझं जणू . ओझ्याखाली जीव गुदमरतोय. सर्वांचे मनोगत संपल्यावर शेवटचा शिष्य विषादात बोलतो . निदान या सर्वांनी काहीतरी मजल मारली आहे . मी मागेच राहिलो. म्हणून या सर्वांची प्राप्ती पाहून , मला माझी लाज वाटते ,दुःख होते.
शिष्यांची दुःखावस्था पाहून अतरंगी द्रवलेला, तो स्थितःप्रज्ञ आपल्या शिष्यांना सुखाचे इप्सित सांगतो.
येथे विनीत होऊन मी वाचकांस सांगू इच्छिते की , कथेतला ऋषी (काल्पनिक पात्र) महाज्ञानी असला तरी, ऋषींचा बोलविता धनी असणारी मी सिद्ध हस्त व साधकही नाही . सुखाचा वा अन्य कुठला साक्षात्कारही मजला अद्यपि झालेला नाही . अनुभवांची पक्वता यावी इतके आयुर्मानहि नाही . सुख, आंनद याविषयीचा हा सर्वथा व्यक्तिगत दृष्टिकोन, मी वाचकांना वाङ्मयाच्या रसास्वादातून चित्त शांती, चिदानंद प्राप्ती व्हावी म्हणून मांडत आहे .
शिष्यानो , जे प्राप्त आहे त्यात सुख कसे पहायचे ते मी तुम्हास शिकवितो . सुख यशवंत होऊन मिरवण्यामध्ये आहे आणि अपयशातून मिळणाऱ्या धड्यामध्ये आहे . फलश्रुतीमध्ये ते आहेच ,पण कार्य सिद्धीच्या परिश्रमात देखील ते आहे. निरामय(निरोगी) जीवनात तर आहेच पण शेवटच्या श्वासापर्यंत जीवनासाठी धडपडण्याच्या जिद्दीत ते आहे . स्वीकृती मध्ये सुख आहेच , पण नकार पचवून पुढे जाण्यात ते आहे . अतुलनीय सामर्थ्यात , मोठेपणात जस ते आहे ,तसं लहान होऊन , "मुंगी साखरेचा रवा" खाण्यात ते आहे . जगतज्जेतेपणाच्या उन्मादात आहे आणि सर्वस्व गमावूनही उरलेल्या आत्मविश्वासात आहे . सौंदर्यातल्या अनुभूतीत सुख आहे आणि गुणांमधल्या दिव्यत्वात त्याची प्रचिती येते . अपरिवर्तनीयत्वाच्या स्थिरीकरणात ते आहे आणि अस्थिरतेमधल्या बदलात आहे . दानी होण्याच्या दातृत्व भावनेत सुख आहे आणि ' झाकल्या मुठीत सव्वा लाखाची' अब्रू राखण्यातही आहे . सत्कारमूर्ती होण्यातही सुख आहे , तसंच ते सभागृहातल्या शेवटच्या खुर्चीवर ,कधी पडलेल्या धसावर दाटीवाटीने बसून मोठया मनाने टाळ्या पिटण्यात आहे .
चुरशीची लढत देऊन खेळ पूर्ण करण्यात आहे. आणि मोडलेला डाव पुन्हा मांडण्याच्या जिद्दीत ते आहे . कळस होऊन उंचावर चमकण्यात ते आहे आणि आधारशिलेच्या अध्याहृत मौनात आहे . मखमली गालिच्यावर श्रीमंतीची दुलई पांघरून लोळत पडण्यात सुख असेल , तर श्रमानंतरच्या फाटक्या गोधडीवरच्या गाढ झोपेतही आहे. एककल्ली खांब होऊन भार पेलण्याच्या सामर्थ्यात सुख आहे आणि समूह घटक होऊन खारीचा वाटा उचलण्यात देखील सुख दडलंय. प्रसूतीवेणा सोसून आई होण्यात आहे आणि अनाथाच्या डोक्यावर वात्सल्याचा हात ठेवण्यात आहे. श्रीमंती ,समृद्धी मिरवण्यात सुख आहे आणि अब्रू झाकण्यासाठी वस्त्राला शिवलेल्या ठिगळातही ते आहे.
शिष्यानो, अज्ञाताच्या मागे धावण्यात ते नाही ,कल्पना रंजनांत किंवा वास्तवापासून पळण्यात ते नाही. सुखाचा अभिनय करूनही सुखाची अनुभूती घेता येत नाही. म्हणूनच सुख सामंजस्यात , समायोजनात आणि दुसऱ्याच्या सुखातसुद्धा आहे .
अशा प्रकारे , पुन्हा " सुखी भव" हाच आशीर्वाद घेऊन ,आणि यावेळी खरंच सुखी होऊन शिष्य आश्रमातून आनंदाने प्रस्थान करतात .आश्रमातल्या शिष्याना जसा ज्ञान रुपी सुखाचा ठेवा गवसला तसा हे स्तंभ लेखन वाचणाऱ्या आणि न वाचणाऱ्या साऱ्याना सुख प्राप्त होवो . पदरी पडेल ते स्वीकरणीय ,स्पृहणीय व्हावें यासाठी हा यत्न. लेखनांती ज्ञानियांचा राजा ,श्री ज्ञानेश्वर जे आवाहन श्रोतृवृंदास करतात " न्यून ते पुरते ,अधिकते सरते करावे " तोच अनुरोध मी अल्पमती , तुम्हा वाचकांस करत आहे.
# पूर्णा गंधर्व