Diwana Dil Kho Gaya - Part 14 books and stories free download online pdf in Marathi

दिवाना दिल खो गया (भाग १४)

मग अम्मा पुढे म्हणाली, “अग आजकालच्या तुम्हा मुलींना आमची ओल्ड फॅशन थोडी ना आवडणार म्हणून तुला खरेदीला नेत आहे. येशील ना? अम्मा हसू दाबत म्हणाली.

बिचारी मुग्धा अम्माला काय उत्तर द्यावे हा विचार करू लागली. तिने सिलूकडे पाहिले पण सिलू शॉक झाल्यासारखा मुग्धाकडे बघत होता. मग अम्माने परत विचारले, “येशील न मुग्धा?”

पण मुग्धाने खोटे खोटे हसत हो म्हटले आणि मला उशीर होतोय घरी जावे लागेल असे म्हणत कोणी काही बोलायच्या आत ती निघून पण गेली. सिलूसाठी सुद्धा हे अनपेक्षित होते. तो ही मुग्धाच्या मागे गेला. पण तो गेटच्या बाहेर येईपर्यंत मुग्धा ऑटोमध्ये बसून निघून गेली होती. सिलूने मुग्धाला फोन लावला पण मुग्धा तो सारखा कट करीत होती. काहीवेळाने तर मुग्धाचा फोन स्विच ऑफ यायला लागला. सिलूला अम्माचा खूप राग येत होता. त्याने विचार केला की, अम्माने तर मुग्धाला सून म्हणून स्वीकार केले होते मग हे काय झाले. मला अम्माशी बोलावेच लागेल. मी मुग्धाशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही. सिलू उदास मनाने घरी आला आणि बघतो तर अम्मा-अप्पा दोघेही मोठमोठ्याने हसत होते. सिलूला काहीच कळत नव्हते नक्की काय चाललाय ते.

सिलूला आलेले पाहाताच दोघेही गंभीर झाले. सिलूला थोडा रागच आला. त्याने सरळ त्या दोघांकडे दुर्लक्ष केले आणि तो त्याच्या खोलीत जाणारच होता की, अम्माचा मागून आवाज आला. ती सिलूला म्हणाली, “सिलू उद्या आपल्याला मुग्धाला बघायला तिच्या घरी जायचे आहे. सकाळी जरा लवकर उठून तयार रहा आणि ह्याबद्दल मुग्धाला काही सांगितलेस तर खबरदार.” असे म्हणून अम्मा आणि अप्पा दोघेही हसत त्यांच्या खोलीत झोपायला गेले.

सिलू अम्माने काढलेले उद्गार ऐकल्यावर चकित झाला आणि त्याचबरोबर खूप खूप आनंदी. तो मनात विचार करू लागला, “म्हणजे मगाशी अम्मा ज्या मुलीबद्दल बोलत होती ती मुग्धा आहे आणि मी समजलो की, दुसरी कोणीतरी अम्माने माझ्यासाठी पसंद केली. मी किती चुकीचे समजलो अम्माला. आय एम वेरी सॉरी अम्मा-अप्पा. आय लव यू सो मच.”

असे बोलून त्याने पुन्हा मुग्धाचा नंबर डायल केला पण तो परत स्विच ऑफ होता. त्याने ५-६ वेळ पुन्हा ट्राय केला पण प्रत्येक वेळी सेम मेसेज ऐकायला येत होता. सिलूला खूप टेंशन आले. त्याला जरी सगळे खरे माहीत असले तरी मुग्धाला अजून काहीही माहीत नव्हते. त्यामुळे ती मनापासून हर्ट झाली असणार हे सिलू जाणून होता. आता त्याच्याकडे सकाळची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.

सिलू बेडवर आडवा झाला आणि त्याने अंगावर पांघरून घेतले आणि मोबाइल वर मुग्धाचे फोटो पाहत त्याचे आवडते गाणे गुणगुणू लागला.
♬दीवाना दिल खो गया, बेगाना दिल हो गया
दीवाना दिल खो गया, बेगाना दिल हो गया
मुझे चैन नहीं बेचैन हूं मैं, बस ये मेरा दिल खो गया
दीवाना दिल खो गया, बेगाना दिल हो गया♬

इथे मुग्धा घरी आली. तर आज हॉलमध्ये आई-बाबा तिची वाट पाहत बसलेले. मुग्धाला पाहून ते तिला काही बोलणार होते पण मुग्धाने त्यांच्याकडे लक्ष न देता ती तडक तिच्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला व बेडवर पालथी पडून रडू लागली. काहीवेळाने मुग्धाच्या आईने मुग्धाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. पण तो उघडा होता. तिच्या आईने आत जाऊन पहिले तर मुग्धा डोक्यावर पांघरून घेऊन झोपली होती. मुग्धाला झोपलेले पाहून तिची आई झोपायला स्वत:च्या खोलीत गेली.

पण मुग्धा झोपली कुठे होती. ती तर सिलूचा विचार करत होती. तिला माहीत होते की, सिलू कधीही त्याच्या अम्माच्या शब्दाबाहेर जाणार नाही. जर सिलूने तिला सोडून दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले तर.. हा विचार ही आता तिला असह्य होत होता. ती सिलूचा फोटो घट्ट छातीशी कवटाळून एकसारखी रडत होती आणि म्हणत होती की, “आय लव यू सिलू. आय कांट लिव्ह विदाऊट यू.”

रडत रडत मुग्धा कधी झोपली तिला कळले सुद्धा नाही. सकाळी तिची आई लगबगीने तिला उठायला आली.
“मुग्धा बाळा, उठ आणि फ्रेश हो. आज मी सगळा नाश्ता तुझ्या आवडीचा केला आहे. आज आपल्या घरी पाहुणे सुद्धा येणार आहेत. त्यामुळे खुर्चीवर ठेवलेला ड्रेस घालून तयार होऊनच बाहेर ये.”
“आई प्लीज मला काही नको खायला. तसे पण ऑफिसला जायला उशीर होतोय” असे म्हणत ती उठली आणि वॉशरूम मध्ये जात असताना तिची आई म्हणाली, “अगं पण आज रविवार आहे. आज कसले ऑफिस? मला काही माहीत नाही. तू आधी तयार होऊन बाहेर ये. नाश्ता कर मग तुला काय करायचे ते कर. पाहुणे येतच असतील आता.” असे म्हणून मुग्धाची आई मुग्धाच्या खोली बाहेर गेली.

कोण पाहुणे? आणि माझ्या आवडीचा नाश्ता पण का? मुग्धाला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करण्यामध्ये काहीच इंटेरेस्ट नव्हता. तिला राहुन राहुन अम्माने सिलूला मुलगी बघितली आहे तेच आठवत होते. तिने शॉवर चालू केला आणि ती मोठमोठ्याने रडायला लागली.
इथे सिलूला रात्रभर झोप नव्हती. कधी एकदा सकाळ होते आणि मुग्धाचा आनंदी चेहरा बघतोय असे झाले होते त्याला. सकाळी सिलू लवकरच तयार झाला आणि नाश्ता करायला खोली बाहेर येऊन बसला. अम्माला सिलू इतक्या लवकर तयार होऊन आलेला पाहून हसू आले. पण मुग्धाचा विचार येताच अम्मा थोडी उदास झाली. नाही म्हणता या दोन दिवसात अम्माने मुग्धाला खूप त्रास दिला होता.

अम्माने साहीलच्या आणि उमाच्या मदतीने मुग्धाच्या आई-वडिलांची भेट आधीच घेतली होती. सिलूच्या आणि मुग्धाच्या नकळत हे सर्व घडले होते.
तर झाले असे की, अम्मा मुग्धा घरी नसताना मुग्धाच्या घरी गेली. तेव्हा उमा सुद्धा अम्माबरोबर होती. त्यावेळी सुदैवाने मुग्धाचे आई वडील दोघेही घरी होते. अम्माने त्यांना स्वत:ची ओळख सांगितली आणि तिने सिलूसाठी मुग्धाला मागणी घातली. घरात त्यावेळेला आजी आजोबा आणि मुग्धाचे आई वडीलच घरात होते. एकतर सिलू कास्ट मधला नाही आणि आपण त्या मुलाला ओळखत सुद्धा नाही. मुग्धाच्या तोंडूनही ह्या मुलाचे नाव ऐकलेले त्यांना आठवत नव्हते. मुग्धाच्या आई वडिलांचा झालेला गोंधळ लक्षात घेऊन अम्माने ती येत्या रविवारी रीतसर सिलूला घेऊन मुग्धाला बघायला येईल आणि जर मुग्धा नाही म्हणाली तर ती पुन्हा कधीही या विषयावर चकार शब्द काढणार नाही असे म्हणाली. तरीही लगेच होकार देणे मुग्धाच्या आई वडिलांना पटत नव्हते. पण उमा त्यांच्याबरोबर आली म्हणजे नक्कीच मुग्धा सिलूला ओळखत असेल. असे गृहीत धरून मुग्धाचे आईवडील तयार झाले. मग त्यांनी मिळून आजचा प्रोग्राम ठरविला होता. पण याबद्दल सिलू आणि मुग्धाला काहीही न सांगण्याचे त्यांनी ठरविले.

काल खर तर मुग्धाचे आई वडील मुग्धाला सिलूबद्दल विचारणार होते पण मुग्धा लगेच झोपून गेली. त्यामुळे आज त्यांचा नाईलाज झाला होता.
इथे आज मुग्धा एकसारखी रडत होती. तेवढ्यात तिच्या आईची हाक तिला ऐकू आली. मग तिने स्वत:ला कसेबसे सावरले आणि ती बाथरूमच्या बाहेर आली. अन् पहिले तर आई रूममध्ये बसून तिची वाट बघत होती. मुग्धाचे डोळे रडून रडून लाल झाले होते. आईने मुग्धाला घालायला नवीन ड्रेस आणून दिला आणि तो मुग्धाला घालायला लावला. मुग्धाला तर खोली बाहेर जायचे मन नव्हते. तिला थोडावेळ एकटे राहायचे होते. पण उगाच आई बाबा टेंशनमध्ये येतील म्हणून ती तयार होऊन काहीवेळात बाहेर आली.

आणि पाहते तर काय?

अम्मा-अप्पा आणि सिलू तिघेही बसून चहा पित होते आणि सिलूचे आई वडील त्यांच्याशी गप्पा मारत बसले होते. मुग्धासाठी हे सगळे अनपेक्षित होते. तेवढ्यात सिलूची नजर मुग्धाकडे गेली. मुग्धाला पाहताच सगळे शांत झाले. मग अम्माने उठून मुग्धाला जवळ घेतले आणि ती मुग्धाला म्हणाली, “मुग्धा मी तुला म्हणाले होते ना की, मी सिलूसाठी मुलगी बघितली आहे. आज त्याच मुलीला मी रीतसर मागणी घालायला तिच्या घरी आली आहे आणि बाळा ती तू आहेस. मला माहीत आहे मी तुला गेले दोन दिवस भरपूर त्रास दिला. यासाठी मला माफ कर. मग माझ्या सिलूची बायको होशील ना?”
हे सर्व ऐकून खरे तर मुग्धाला काय बोलावे तेच कळत नव्हते. पण तिच्या अश्रूंचा बांध तुटला आणि ती अम्माला मिठी मारून रडू लागली. अम्माने तिला शांत केले आणि ती मुग्धाच्या आई वडिलांना म्हणाली, “तुमची मुलगी फार गुणी आणि संस्कारी आहे. मी शोधून पण इतकी चांगली बायको सिलूसाठी शोधू शकले नसते. आमच्याकडून ह्या नात्याला होकार आहे. मी आशा करेन की, तुम्ही या दोघांच्या प्रेमाला समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्याल. मी सकारात्मक उत्तराची वाट पाहीन. धन्यवाद”, असे बोलून अम्मा, सिलू आणि आप्पांना घेऊन तिथून निघाली.

क्रमश:
(मुग्धाचे घरातले काय म्हणतील. सिलू आणि मुग्धाच्या प्रेमकथेत पुढे काय होईल हे जाणण्यासाठी ही कथामालिका वाचत रहा आणि ती आवडल्यास तिला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.)
@preetisawantdalvi

Share

NEW REALESED