Krantiveerangana - Hausatai More Patil books and stories free download online pdf in Marathi

क्रांतिवीरांगणा - हौसाताई मोरे पाटील

*क्रांतिकन्या, क्रांतिवीरांगणा हौसाताई मोरे पाटील.*

१८५७ हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील दुसरे पर्व. या पर्वात सातारा येथे काही क्रांतिकारकांनी बापू रंगोजी गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याची मोहीम आखली, पण ऐनवेळी ही मोहीम उघडकीस आली आणि या मोहिमेत सहभागी असणाऱ्या १७ क्रांतिकारकांना ८ सप्टेंबर १८५८ रोजी इंग्रजांनी क्रुर सजा सुनावली गेली. त्यात काहींना फाशी, काहींना तोफेच्या तोंडी आणि काहींवर गोळ्या झाडल्या गेल्या. याच उठावातील १७ क्रांतिकारकांपैकी एक थोर क्रांतिकारक नाना रामोशी यांच्या अस्थी त्यावेळी कुंडल या गावी आणल्या गेल्या. त्यांची समाधी एका झाडाखाली कट्ट्याच्या स्वरूपात आहे, पण काळाच्या ओघात लोकांना त्यावेळी केलेल्या महान क्रांतिकार्याचा विसर पडलेला दिसतो, 'क्रांतिकारकांचे क्रांतिकार्य विस्मृतीत जाणे, म्हणजे भावी पिढ्यांची प्रेरणा खंडीत करण्यासारखे आहे.' हे ओळखून वेळीच काही उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने कार्य सुरू आहे.

मागिल वर्षी इतिहास व संशोधन विभागाच्या माध्यमातून काम करत असताना क्रांतिकारकांच्या अनुषंगाने इतिहासाची पाने चाळत असताना काही क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा हाती लागत गेल्या.
त्यात कुंडल येथील तब्बल साठ क्रांतिकारकांची माहिती समोर आली.

कुंडल आणि कुंडल परिसरात वावर असणारे, सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे आमचे साथी, वाझरचे शिक्षक श्री. मारुती शिरतोडे सर यांची ओळख आणि पुढे २०२०च्या डिसेंबरमध्ये भेट झाली. त्यांनी कुंडल परिसरात राहणाऱ्या आणि भारताच्या क्रांतिकार्यात सहभाग असणाऱ्या अनेक लोकांच्या भेटी घडवून आणल्या.
त्यात क्रांती शाहिर नामदेव सोळवंडे, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या तुफान सेनेचे कॅप्टन श्री. रामचंद्र(भाऊ) लाड यांची भेट घडवून आणली. त्यावेळी भाऊ यांनी वयाची ९९ वर्षे पार केली होती. वयोमानाने त्यांना तो काळ सविस्तर सांगता येत नव्हता, पण तरीही तो विषय ते मांडत होते आणि शिरतोडे सर तो काळ आणि त्यावेळची परिस्थिती हुबेहूब आमच्या नजरेसमोर उभी करत होते.

त्यावेळी माझ्या गावातील क्रांतिसिंहांच्या कन्या, क्रांतिविरांगणा हौसाताई मोरे आणि भगवानराव (बाप्पा) मोरे यांच्या संदर्भातीलही काही आठवणी सांगितल्या. क्रांतिकन्या हौसाताई मोरे या भुमिगत कार्यकर्त्यांना रात्री बेरात्री कधीही जेवण बनवून द्यायच्या. या कामात कधीही परकेपणा किंवा आळस केला नाही.
पुढच्या काळात, या पती पत्नीच्या जोडीच्या कामगिरीने आणि आपूलकीने परिसरातील अनेक लोक आमदारकीसाठी दोघांनीही अर्ज भरावा असा आग्रह धरत होते, पण मोठ्या मनाच्या हौसाताईंनी इतरांनाही संधी मिळावी म्हणून स्वत:ला मिळत असलेले तिकिट नाकारले.
अशा अनेक गोष्टी माझ्या समोर नव्याने आल्या.
हणमंत वडीये या माझ्या गावातील आमदार राहिलेल्या कै. भगवानराव (बाप्पा) मोरे आणि हौसाताई मोरे यांनी क्रांतिकार्यासाठी घर, सुखी संसाराचा त्याग आणि अनेक चळवळींमधील सहभाग लोक दुरपर्यंत लक्षात, मनात ठेवून आहेत. ही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि अनेक चळवळींमध्ये झोकून देऊन केलेल्या कामाची पोचपावती आहे.

माझा कुंडल परिसरातील भेटीचा तो डिसेंबरमधील शेवटचा शनिवारचा दिवस होता. कुंडल आणि क्रांतिकार्याशी संबंधित अनेक ठिकाणी भेटी दिल्या. अनेक लोकांना भेटलो. यासाठी शिरतोडे सर, शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब खेडकर, सामाजिक संघटनेचे महासचिव हिम्मतराव मलमे सर यांनी खूप मोलाची साथ, मार्गदर्शन केले.
त्या मला दिवशी घरी परतण्यासाठी खूप उशीर झालेला. पण थोर क्रांतिकारकांपैकी एक थोर व्यक्तीमत्व आपल्या गावातच आहे आणि मी त्यांच्याशी क्रांतिकार्याविषयी कधीच चर्चा केली नाही, याचं वाईट वाटत होतं. कधी सकाळ होतेय आणि भाई सुभाष (बापू)‌ मोरे आणि आज्जी यांना भेटतोय असं झालं होतं.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. मी आणि माझी मिसेस सकाळीच त्यांना भेटायला गेलो. बापू काही कामानिमित्त बाहेर गेले होते, पण बापूंचा मुलगा इंद्रजित आणि आज्जी यांची भेट घेतली. चहा पाणी झाले, घरच्यांशी खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. मी जास्त कधी पाहण्यात नसल्याने आज्जींनी माझी कुणाचा, काय करतो, कुठे असतो, अशी सगळी आपुलकीने विचारपूस केली.
"मी बाबू नाईकांचा नातू. क्रांतिसिंहांच्या पत्री (प्रती) सरकारमध्येही त्यांचं योगदान होते.", असे सांगितले तेव्हा ओळख पटली आणि आज्जींनी माझ्या डोक्यावर हात ठेवून, "शिकायचं, खूप मोठं व्हायचं", असं सांगितलं. हे आपुलकीचे शब्द ऐकून माझं मन भरून आलं.

आदल्या दिवशी कुंडल परिसरातील हयात असणाऱ्या क्रांतिकारकांच्या भेटीबद्दल मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनीही क्रांतिकार्यासंबंधी आणि चळवळींबद्दल अनेक घटना सांगितल्या. त्यात सुरली घाटातील मोहीम, वांगीतील डाक बंगला याची थोडी माहिती सांगितली.
"या घटनांच्या तारखा किंवा साल आपल्याला इतिहास संशोधनासाठी कुठून मिळेल?" , असे मी त्यांना विचारताच, त्यांनी, "बापू (भाई सुभाष मोरे) यांनी अनेक घटनांच्या तारखा, साल आपल्या वहीत नोंद करून ठेवल्या आहेत. तुला पाहिजे तेव्हा बिनधास्त ये आणि त्यांना भेट'. तुला पाहिजे ते त्या नोंदीत मिळेल."

माझ्यासाठी त्यांची क्षणभराची भेट आणि भेटीतील सहवासच मला क्रांतिकारकांचे कार्य मांडण्यासाठी प्रेरणादायी होता, पण त्यांनी अगदी आपलेपणाने सांगितलेल्या गोष्टींनी मी भारावून गेलो.
असे खूप वेळपर्यंत त्यांच्याशी बोलून झाल्यावर समोरच असलेल्या ग्रंथालयाची देखभाल करणारे लखन गुरव हे माझ्याकडे आले आणि आम्ही आज्जींसोबत चालू असलेल्या गप्पा आवरत्या घेतल्या आणि ग्रंथालयात गेलो.

त्यावेळी लखन गुरव यांनी मला अजून एक नवीन माहिती पुरवली, की आज्जींच्या क्रांतिकार्यावर त्यांची नात दमयंती पाटील आणि इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रस्तावना असलेले शोभा शिरढोणकर यांचे पुस्तक आहे.

*हौसाताई मोरे यांनी क्रांतिकार्यासाठी आणि सामाजिक चळवळींसाठी वयाची नव्वदी पार केलेली असतानाही दिलेले योगदान अनंत काळापर्यंत टिकून राहिल. मुलींना, स्त्रीयांना उर्मी, प्रेरणा देत राहील.
अशा थोर कर्तृत्व सिद्ध केलेल्या क्रांतिकन्या, क्रांतिवीरांगणा हौसाताई मोरे यांना,
शतशः प्रणाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली.
🙏🙏🙏💐💐💐


_श्री. सुभाष आनंदा मंडले.
(9923124251)
गाव- हणमंत वडीये,
ता. कडेगांव जिल्हा-सांगली