Chandra aani Nilya betaverchi safar - 5 books and stories free download online pdf in Marathi

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 5

५. जंगलाची ओळख

डुंगा पिळदार शरीराचा, पण काळ्याकभिन्न वर्णाचा होता. त्याने कंबरेभोवती कुठच्या तरी झाडाचे पान गुंडाळले होते. ते थोडे जाड होते. सुती कपड्याप्रमाणे वाटत होते. अचानक चंद्राच्या लक्षात आलं की, त्याला मिळालेल्या बाटलीतील संदेश ज्या पानावर लिहिलेला होता ते पान अगदी याच प्रकारचे होते. म्हणजे तो नक्कीच निळ्या बेटावर पोहोचला होता. आता त्या अज्ञात माणसाचा शोध घ्यावा लागणार होता. डुंगाच्या डोक्यावर दोन मोरपिसे तिरकी खोवलेली दिसत होती. चंद्राच्या लक्षातआलं की डुंगाच्या उजव्या मनगटावर मोराची आकृती गोंदलेली दिसत होती. चंद्रा डुंगाचे निरीक्षण करत होता. त्या वेळी डुंगा हळूहळू मागे सरकत होता. त्याचं संपूर्ण लक्ष गुरगुरणाच्या वाघ्यावर होतं. बहुधा तो वाघ्याला घाबरत होता. चंद्रा हसला. त्याने वाघ्याच्या डोक्यावर थोपटले.

“वाघ्या... शांत हो ! हा आपला मित्र आहे बरं का?" वाघ्याला चंद्राचे बोलणे समजले. तो गुरगुरणे बंद करून चंद्राच्या पायावर अंग घासू लागला. ते पाहून डुंगाला थोडा धीर आला. चंद्राकडे बघून तो काहीतरी बोलला. त्याची भाषा काही चंद्राला कळली नाही. त्याने पुन्हा हाताने खुणा करून पुन्हा काय म्हणून विचारले. त्या वेळी चंद्राच्या कमरेला असलेल्या खंजीराकडे त्याने बोट दाखविले. त्याने तशा प्रकारचे हत्यार कदाचित कधीच बघितले नसावे. कदाचित ते त्याला बघायचे होते. चंद्राने त्याला आपल्याकडचा खंजीर बघायला दिला. डुंगा काळजीपूर्वक खंजीर निरखू लागला. तो लखलखता दुधारी खंजीर त्याला खूप आवडल्याचे दिसत होते. ते खंजीराच्या धारेवर सावधानतेने हात फिरवू लागला. थोड्या वेळाने त्याने खंजीर चंद्राजवळ दिला.

चंद्राने त्याला खुणेनेच आपल्याला त्या तीन दगडांजवळ जायचे असे सांगितले. डुंगा मान हलवत पुढे चालू लागला. चंद्रा व वाघ्या त्याच्या पाठोपाठ चालू लागले. डुंगा त्यांना घेऊन लवकरच नदीकिनारी पोहोचला. आता अंधारायला लागले होते. अगदी अंधूक दिसत होते. इथून ते तीन दगड अस्पष्ट दिसत होते. पुढची वाट चंद्राला माहीत होती. याच ठिकाणी चंद्रा तराफा तयार करण्याचे काम करत होता. त्यामुळे चंद्राने त्याला आपण जातो असे सांगितले. चंद्राने पुढे जाण्यासाठी पाय टाकला एवढ्यात डुंगाने झटकन त्याला मागे ओढले. चंद्रा थक्क होऊन डुंगाकडे पाहू लागला. डुंगाने काही न बोलता एका काठीने ज्यावर चंद्राचा पाय पडणार होता ती दगडासारखी दिसणारी वस्तू उचलली. अचानक त्या दगडाने हालचाल केली. त्या दगडासारख्या ओबडधोबड वस्तूच्या अंगावर टोकदार काटे फुलले. डुंगाने काठीने एक काटा चिरडला. त्यातून हिरवट द्रव बाहेर पडला. डुंगाने त्याला हातवारे करून समजावले की तो 'दगडी मासा' होता. त्याच्या काट्यात विष असते. या विषामुळे माणूस मरू शकतो. हे मासे इथल्या नदीत व समुद्रात सापडतात. काही वेळा ते किनाऱ्याच्या वाळूत येऊन गप्प पडतात. तेव्हा ते दगडासारखे दिसतात. हे बघून चंद्रा हादरला. त्याने डुंगाचे आभार मानले. डुंगा त्या संध्याकाळी त्यांना सोडायला अगदी त्यांच्या दगडी गुहेपर्यंत आला.

दुसऱ्या दिवशी चंद्रा सकाळी उठला त्या वेळी त्याला जाणवले की खाली कुणीतरी उभे आहे. त्याने दगडाच्या कडेला जाऊन पाहिले. खाली डुंगा उभा होता. चंद्रा हसला. त्याने डुंगाला वर बोलावले. क्षणार्धात डुंगा त्या दगडांवर घोरपडीसारखा चढला. कंबरेला बांधून आणलेली लालसर रंगाची फळे त्याने चंद्रासमोर ठेवली. चंद्राने खोबणीत ठेवलेल्या पाण्याने तोंड स्वच्छ धुतले व त्यातील एक फळ खाल्ले. अत्यंत मधुर व रुचकर असे ते फळ खाऊन चंद्राला खूप उत्साह वाटू लागला. चंद्राने आणखी दोन फळे खाल्ली. तेवढ्यात वाघ्या जो अंगाचं मुटकुळं करून बसला होता तो उठला. तसा डुंगा घाबरून थोडा मागे सरकला. पण चंद्राने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला. चंद्रा व डुंगाची आता चांगलीच मैत्री जमली होती. • डुंगाने यापूर्वी कुत्रा हा प्राणी कधीच बघितला नव्हता. ह्या बेटावर विविध व विचित्र प्रकारचे कितीतरी प्राणी होते, पण कुत्रा मात्र नव्हता, हे डुंगाच्या बोलण्यावरून चंद्राच्या लक्षात आले. आता चंद्राला डुंगाचे बोलणे थोडेफार कळू लागले होते.

डुंगाची जमात ही ‘मयूर’ जमात होती. मोर हे त्यांच्या जमातीचंप्रतीक होतं. मोराला ते अत्यंत पवित्र मानत. ही जमात नरभक्षी नव्हती. उत्सवाच्या वेळी किंवा विशिष्ट वेळी ते मयूर नृत्य करीत. त्याचे वडील ‘मंगा' हे त्या जमातीचे प्रमुख होते. शिंगाडे व मयूर जमात यांचे शत्रुत्व होते. शिंगाडे त्यांच्या देवाच्या उत्सवावेळी मयूर जमातीची माणसे पळवत व आपल्या देवासमोर बळी देत. क्रूर व संख्येने जास्त असलेल्या शिंगाड्यांसमोर मयुरांचं काहीच चालत नव्हतं. लवकरच शिंगाड्यांचा उत्सव असल्यामुळे सारे मयूर अस्वस्थ होते.

डुंगाकडून मिळालेल्या माहितीवरून 'शिंगाडे' बरेच धोकादायक असल्याचे त्याच्या लक्षात आले. चंद्राने डुंगाला आपल्याजवळील पानावरचा संदेश दाखवला, जो सतत त्याच्या पैरणीत असायचा. तो संदेश बघताच डुंगा थोडा विचारात पडला. त्याला वाचता येत नव्हतं, पण ते पान त्याच्याच बेटावरच्या झाडाचं होतं, हे त्याच्या लक्षात आलं. चंद्राने त्याला त्या पानावर काय लिहिलंय हे सांगितलं व तो त्या अज्ञात माणसाच्या शोधात बेटावर आल्याचं सांगितलं. त्यावर डुंगाने त्याला सांगितले की त्याच्या बाबाने ‘मंगाने’ काही दिवसांपूर्वी जंगलात एका अनोळखी माणसाला पाहिले होते. पण तो नंतर अचानक गायब झाला होता. डुंगाने त्याच्या बाबांनी केलेलं त्या माणसाचं वर्णन चंद्राला ऐकवलं. उंच... धिप्पाड शरीराचा... गौरवर्णी अशा एका प्रौढ माणसाचं वर्णन होतं ते. चंद्राला वाटलं आपल्याला पाहिजे तो माणूस हाच असणार! आता या क्षणी तो जंगलात नेमका कुठे असेल? की शिंगाड्यांच्या ताब्यात सापडून त्यांनी त्याचा बळी दिला असेल? की इथल्या भयंकर प्राण्यांचं तो भक्ष्य बनला असेल, असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात उभे राहिले. त्यानंतर चंद्रा,

डुंगा व वाघ्या जंगलात फेरफटका मारायला गेले. या वेळी त्यांच्यासोबत डुंगा असल्याने नेमके कुठे व कसे जावे हे तोचठरवत होता. ते नदीकिनाऱ्याच्या काठाने वर सरकत घनदाट जंगलात शिरले. प्रचंड उंचीचे विविध वृक्ष व त्यांना बिलगलेल्या जाडजूड वेली ... वेलींवर विविध रंगाची फुललेली फुले... फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.. किलबिलणारे पक्षी असं रमणीय दृश्य होतं ते. एवढ्यात कुणीतरी आनंदाने मंजूळ आवाजात हसत असल्याचा आवाज चंद्राच्या कानी आला. हा आवाज हळूहळू वाढत होता. चंद्रा दचकला. कोण हसत असेल बरे ? एखादी चेटकीण की भुताटकीची माया ? चंद्रा जागीच थांबला. जंगलातल्या चेटकिणींच्या अनेक गोष्टी त्याने लहानपणी आजीकडून ऐकल्या होत्या. पण डुंगा मात्र चंद्राकडे बघून हसत होता.

“हे हसणारं झाड आहे! याला 'सकाळचं झाड' म्हणतात. दुपारपर्यंत त्याच्या पानांतून हसण्याचे आवाज येतात तर रात्री काळोख पडल्यावर रडण्याचे सूर ऐकू येतात." डुंगा त्याला समजावत बोलला. पण चंद्राचा यावर विश्वासच बसेना. एखादे झाड चक्क माणसासारखं हसतं व रडतं हे न पटणारे होते. त्याने डुंगाकडे अविश्वासाने पाहिले. डुंगाने त्याचा हात पकडला व आपल्यासोबत ओढत नेलं. ते जसजसे पुढे पुढे जात होते तसतसा हसण्याचा आवाज अधिकाधिक जवळ ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने ते एका उंच जागी पोहोचले. त्यापुढे ते जाऊ शकत नव्हते. कारण त्या पुढील भागात दलदल होती व पाय टाकल्यास त्यात रुतून बसण्याची शक्यता होती. डुंगाने समोर बोट केले. दलदलीच्या पलीकडे एक डेरेदार वृक्ष होता. त्याची पाने गोलाकार पण छोटी होती. ती पाने सतत हलत होती व एकमेकांवर घासली जात होती. त्यामुळे हसण्याचा आवाज येत होता. मंजूळ आवाजाच्या अनेक स्त्रिया एकाच वेळी हसत असल्याचा ते आवाज होता. पण ह्याच पानांचा आवाज रात्रीच्या वेळी रडल्यासारखा का येत असावा ? सारंच अजब होतं. जंगलातल्या इतर झाडांप्रमाणे या झाडाची शेंड्याची कोवळी पाने चमकदार निळ्या रंगाची होती.

एवढ्यात स्वर्गीय नर्तकपक्ष्यांची एक जोडी त्या झाडावर आली. चंद्राने हे पक्षी चंदेलमध्ये काही वेळा पाहिले होते. हिवाळ्याच्या दिवसांत महिनाभर ते दिसत. पांढरा रंग कशास म्हणतात ते या स्वर्गीय नर्तकांकडे बघून कळत होते. या पक्ष्यांची शेपटी त्याच्या शरीराच्या चार ते पाच पट मोठी होती व डोक्यावर एक डौलदार 'काळा तुरा' होता. पांढऱ्या शुभ्र डोक्यावर काळा तुरा विलक्षण शोभून दिसत होता. ही सारी निसर्गाची किमया होती. पक्ष्यांच्या त्या जोडीने त्या मंजूळ हसण्याच्या साथीने एका आडव्या फांदीवर सुंदर नृत्य सुरू केलं. त्यांचे ते गिरकी घेत नाचणे बघून चंद्रा देहभान विसरला. नाचताना लांब शेपटीची व डोक्यावरील काळ्या तुऱ्याची लयदार हालचाल व्हायची; ज्यामुळे डोळ्यांचे पारणे फिटत होते. डुंगाने हलवल्यावर चंद्रा भानावर आला. डुंगाने त्याला सांगितले की या पक्ष्याचं दर्शन शुभ मानलं जातं व त्यांचा तो स्वर्गीय नाच बघणे म्हणजे अत्याधिक भाग्याचं लक्षण आदिवासींमध्ये मानलं जातं. “माझ्यासाठी हा दिवस खूपच भाग्याचा आहे,” डुंगा आनंदाने म्हणाला. निळ्या

बेटावरच्या त्या जादुई वातावरणामुळे चंद्रा भारावला. त्यानंतर दुपारपर्यंत त्यांनी रानात फेरफटका मारला व नंतर वाघ्यासह चंद्रा आपल्या वसतीस्थानी परतला.

--------*----- भाग५ समाप्त --------*------