Chandra aani Nilya betaverchi safar - 6 in Marathi Fiction Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 6

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 6

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर ६
६. मयुरांच्या वस्तीमध्ये

दुसऱ्या दिवशीही डुंगा अगदी कालच्याच वेळेवर आला. चंद्रा त्याला

घेऊन नदीकिनारी गेला. तिथे त्याने तराफा तयार करण्यासाठी जमा केलेले मोठ्या बांबूचे तुकडे... वळलेल्या दोर्या दाखवल्या. डुंगाला त्या दोर्या पाहून आश्चर्य वाटले. त्याची जमात आणि शिंगाडे बांधण्यासाठी वेली वापरत. त्या वेलींपेक्षा वेलींपासून पीळ देऊन बनविलेल्या दोऱ्या अतिशय मजबूत व टिकाऊ होत्या. चंद्राने त्याला मासे पकडण्यासाठी बनविलेलं जाळं व छोट्या प्राण्यांना पकडण्यासाठी बनवलेली
फासकी दाखवली. हे सारं पाहून डुंगा खूश झाला. चंद्राकडून त्याला हे शिकायचं होतं. खरे म्हणजे निळ्या बेटावरचे हे आदिवासी इतर जगापेक्षा खूपच मागास होते. बाहेरच्या जगाशी त्यांचा कधी संबंध आला नव्हता. भीतीमुळे व निळ्या बेटाविषयीच्या अनेक दंतकथांमुळे व्यापारी जहाजेसुद्धा या बाजूला कधी फिरकलीच नव्हती. चंद्राने आपण तराफा कसा बनविणार, हे मातीवर आकृती काढून डुंगाला समजावलं. तराफ्याचा वापर करून नदीतून कसा प्रवास करता येईल ते सांगितलं. पाण्यावर विनासायास तरंगत जायचं ही कल्पना डुंगाला मजेशीर वाटली.

निळ्या बेटावरचे आदिवासी नदीतून पोहत जायचे किंवा ओंडक्यांचा व काठीचा वापर करून नदी पार करायचे. होडी किंवा जहाज तयार करण्याचं कसब अजून त्यांच्यात आलं नव्हतं.

नदीतील मासे ते भाल्यासारख्या टोकदार काठीने किंवा 'रामेठा' या वनस्पतीच्या रसाने डोहातील मासे मारायचे. रामेठ्याच्या पानांचा रस पाण्यात टाकला की काही वेळाने मासे मरून पाण्यावर तरंगत. याच रामेठ्याचा रस अंगावर चोळल्यास तो भाग सुजल्यासारखा गरगरीत व लालसर होतो, असं डुंगाने चंद्राला सांगितले. डुंगामुळे चंद्राला निळ्या बेटाविषयी बरीच माहिती मिळाली होती.

“अरे, खरं तर तुला मी आज आमच्या वस्तीत येण्याचे आमंत्रण द्यायला आलोय." डुंगा हसून म्हणाला.

“कशासाठी? काय विशेष आहे ?” चंद्राने विचारले.

'आज आमच्या देवाच्या झाडा'चा उत्सव आहे व माझ्या बाबांनी " खास तुला बोलाविले आहे.

देवाचे झाड ! आणि तुझ्या बाबांना तू माझ्याबद्दल सांगितलंस?"
"होय, कालच सांगितलंय... बाबांना तुला त्या अनोळखी माणसाबद्दल सांगायचंय.' "

“ठीक आहे, तू संध्याकाळी ये. आम्ही दोघे तयारच आहोत. " चंद्रा म्हणाला.

त्याला त्या 'मद्र' देशाच्या माणसाविषयी माहिती ऐकायला निश्चितच आवडलं असतं.

त्यानंतर चंद्रा व डुंगा तराफ्यासाठी बांबूचे तुकडे दोरांनी एकत्र जोडू लागले. बांबूची कोणती बाजू वर, कोणती बाजू खाली असावी? कुठचं टोक कुठच्या बाजूला घ्यावं? दोरीने हे तुकडे एकत्र कसे बांधावेत? हे चंद्रा डुंगाला सांगू लागला. डुंगाही मनापासून मदत करू लागला. दोन ते तीन माणसे तराफ्यावरून प्रवास करू शकतील एवढा तराफा लांबी-रुंदीला असला पाहिजे... शिवाय नदीतून जाताना वेगवान प्रवाह.. वाटेतील खडक... धबधबा असेल तर त्याला सामोरे जाण्याएवढा तराफा मजबूत असला पाहिजे, याकडे चंद्रा लक्ष देत होता. तसा नदीचा प्रवाह संथ वाटत होता. पण तरीही खात्री देता येत नव्हती. काही वेळ काम करून दोघेही थांबले. अजून दोन दिवस तरी तराफा तयार व्हायला लागणार होते.

त्यानंतर दोघांनी पाण्यात उतरून अंघोळ केली. वाघ्याही पाण्यात डुंबला. थोड्या वेळाने वाघ्या व चंद्रा आपल्या राहण्याच्या ठिकाणी आले. दुपारी छानपैकी विश्रांती घ्यावी लागणार होती, कारण रात्री मयुरांच्या वस्तीत जायचं होतं. खरं म्हणजे चंद्रा थोडा चलबिचल झाला होता. कारण अनोळखी आदिवासींच्या वस्तीत थेट जाणे म्हणजे धाडसाचं होतं. या आधीच्या शिंगाड्यांचा अनुभव थरकाप उडविणारा होता. पण बाटलीतील संदेश पाठविणाऱ्या माणसाचा थांगपत्ता लागत असेल तर तिथे जावेच लागणार होते.

संध्याकाळी काळोख पडल्यावर डुंगा त्यांना न्यायला आला. अजून चांदणं पडलं नव्हतं. चंद्राने दोन पलिते तयार करून ठेवले होते. चकमकीच्या मदतीने त्याने जाळ केला व पलिते पेटविले. पलित्यांच्या टोकांना झाडांच्या साली गोलाकार गुंडाळल्या होत्या. चंद्राने व डुंगाने एकएक पलिता घेतला व ते नदीकिनाऱ्यावर येऊन पोहोचले. आता त्यांना नदी ओलांडून जायचे होते. डुंगा त्यांना नदीच्या काठाने थोडं उताराच्या दिशेने घेऊन गेला. पाणी कुठे उथळ आहे, हे डुंगाला माहीत होतं. साधारण कंबरेएवढे पाणी असलेल्या ठिकाणी तो चंद्रा व वाघ्याला घेऊन आला. ते पाण्यात उतरणार एवढ्यात डुंगा चंद्राला थांबवत म्हणाला,

“थांब, इथून नको... आणखी थोडं खाली जाऊ या. "पण का?"

“इथे ते झटका देणारे मासे आलेत.” डुंगा म्हणाला. डुंगाने चंद्राला सांगितले की लांब शेपटीवाले थोडेसे पाणसर्पांसारखे दिसणारे हे मासे ज्या वेळी मोठ्या संख्येने पाण्यात असतात त्या वेळी त्या पाण्यात माणसाने किंवा प्राण्यांनी पाय ठेवला तरी त्यांना प्रचंड झटका बसतो... आकडी आल्याप्रमाणे शरीर आखडतं व मरण येऊ शकतं. त्यावेळी तेथील पाणी मोठ्या प्रमाणात गरम होतं. पण हे मासे विशिष्ट वेळी नदीत येतात व आदिवासी परंपरागत ज्ञानाने त्यांचे अस्तित्व टाळून पाण्यातून प्रवास करतात. हे ऐकून चंद्राला थोडी भीती वाटली.

डुंगासहित ते थोडे खाली गेले. कमी पाणी असलेल्या नदी पात्रात उतरले. या ठिकाणी पाणी छातीएवढे होते. तिरकं चालत व घट्ट पाय रोवत ते दोघे चालत होते. त्यांनी पलिते पाण्यावर धरले होते. दोघांच्या मध्येवाघ्या पोहत होता. काही वेळातच त्यांनी ती नदी पार केली व दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले. इथून पुढे 'मयुरांची वस्ती' असल्याने डुंगा निर्धास्तपणे चालत होता. काही वेळाने चंद्राला माणसांचे आवाज ऐकू येऊ लागले. एका छोट्या टेकडीच्या पायथ्याशी झाडांच्या गर्दीत काही झोपड्या त्यांना दिसल्या. दहा-पंधरा झोपड्या असाव्यात तिथे. तिथेही काही मशाली पेटवून ठेवलेल्या दिसत होत्या. त्या प्रकाशात खांब व बांबू वापरून गोलाकार आकाराच्या बनविलेल्या झोपड्या दिसल्या. त्यावर झाडांची पाने व रानगवत टाकून शाकारले होते. चंद्रा, वाघ्या व डुंगा तिथे पोहोचल्यावर बाहेर बसलेली मुले, बायका व म्हातारे कुतुहलाने उठून उभे राहिले. ते जिथे उभे होते त्या ठिकाणी कंदमुळांचा ढीग रचलेला होता. सारे एकत्र गोळा झाले. बाहेरच्या जगातील एका मुलाला बघण्यासाठी सारेच उत्सुक होते. पण वाघ्याला बघताच सारी मुले घाबरून मागे सरकली. चंद्राने वाघ्याच्या पाठीवरून हात फिरवला व घाबरू नका असे सांगितले. खरे म्हणजे डुंगाने यापूर्वीच आपल्या माणसांना चंद्रा व वाघ्याबद्दल सांगितले होते.

या वेळी तरुण पुरुष मंडळी दिसत नव्हती. कदाचित ते जंगलात शिकारीला गेले असावेत. चंद्रा आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करत होता. तिथे काही खोलगट दगड पाणी साठविण्यासाठी ठेवलेले दिसत होते. कच्च्या मातीची ओबडधोबड भांडीही त्याला दिसली. वस्तीच्या मध्यभागी एक चार हात लांबी रुंदीचा खड्डा खणून त्यात अग्नी प्रज्वलित करून ठेवला होता. थंडी व रानटी प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी तो उपयोगी पडत असावा. परंतु याच अग्नीचा वापर करून मातीची भांडी पक्की व टिकाऊ करता येतात. मांस-मासे व कंदमुळे भाजून खाता येतात, हे त्यांना माहीत नसावे. चंद्राने ठरविले की आपण या बेटावर असेपर्यंत त्यांना यागोष्टी शिकवायच्या. या साऱ्या माहितीमुळे त्यांच्यात सुधारणा होत जाईल. रानटी प्राण्यांना माणसाळवणे... दुधासाठी.. वाहतुकीसाठी त्यांचा उपयोग करणे या गोष्टी त्यांना जमतील. त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क वाढेल व

या गूढ.. भयावह बेटाविषयीच्या वदंता कमी होतील असे चंद्राला वाटले. डुंगाने चंद्राला एका उंचवट्यावर बसवले. तिथल्या स्त्रियांनी त्याच्यासमोर विविध फळे व कच्च्या मातीच्या भांड्यातून पाणी आणून दिले. चंद्राने त्या रुचकर फळांचा स्वाद घेतला. निळ्या बेटावरचे रुचकर पाणी त्यावर पिऊन त्याने तृप्तीचा ढेकर दिला. चंद्राने डुंगाला उत्सवाविषयी विचारले. त्या वेळी डुंगाने त्याला सांगितले की लवकरच सारी पुरुष मंडळी शिकार घेऊन त्या देवाच्या प्रकाशणाऱ्या झाडाकडे पोहोचतील. मग वस्तीवरचे सारेच जण तिथेच जातील व उत्सव सुरू होईल. चंद्राला उत्सवापेक्षा डुंगाच्या बाबांकडून 'मंगा' कडून संदेश पाठवणाऱ्या राजा भद्रसेनाच्या माणसाबद्दल जाणून घ्यायचे होते. एवढ्या कोकिळेच्या सुरेल आवाजासारखे अनेक लयबद्ध आवाज व विविध वाद्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. चंद्राने डुंगाला याविषयी विचारले. डुंगाने त्याला सांगितले की वेगवेगळ्या जातींच्या बाबूंना वेगवेगळ्या आकाराची भोके पाडून त्यातून फुंकून वेगवेगळे आवाज काढले जातात. शिकारीच्या वेळी व उत्सवाच्या वेळी ह्या संगीताच्या तालावर छान नृत्ये केली जातात. आता सारी मंडळी त्या प्रकाश देणाऱ्या देवाच्या झाडाकडेच चालली होती. डुंगाने चंद्राला तिथे आता जाऊ या असे सांगितले. डुंगाने विशिष्ट आवाजात सर्वांना हाक दिली. त्याबरोबर साऱ्या झोपड्यांतून स्त्रिया व म्हातारे व मुले झपाझप बाहेर पडली. चंद्रा बघतच राहिला. साऱ्या बायकांनी अंगाभोवती मोरपिसे खोवली होती. डोक्याभोवती टपोऱ्या रानफुलांच्या माळा गुंडाळल्या होत्या. दोन्ही हातात व पायातहीफुले व वेलींचे हार घातले होते. सारं दृश्य सुंदर व उत्साहवर्धक होतं. सान्य बायका व मुले आनंदाने ओरडत व नाचतच देवाच्या झाडाकडे निघाली डुंगा, चंद्रा, वाघ्या व इतर वृद्ध मंडळी चालतच देवाच्या झाडाकडे निघाली सारे आनंदाने गात चालले होते. चंद्रा व वाघ्या सुद्धा उत्साहाने त्यात सामील झाले.

थोड्याच वेळात सारेजण त्या झाडाजवळ आले. समोर एक भलं मोठ उंच झाड होतं. काळ्याकुट्ट अंधारात त्या झाडाचं खोड हिरवटपिवळ्या रंगाने चमकत होतं. त्या झाडाच्या खोडातून झिरपणाऱ्या प्रकाशामुळे याला देवाचं झाड किंवा प्रकाशाचं झाड म्हणत होते. पण त्याहीपेक्षा अद्भुत दृश्य होतं ते म्हणजे झाडाच्या फांद्या असंख्य काजव्यामुळे लखलखत होत्या तर क्षणभर अंधार होत होता. एकाचवेळी चमकणाऱ्या काजव्यांमुळे ते झाड झगमगून जात होतं. ते दृश्य विलक्षण रोमांचकारी होतं. खरोखरच ते झाड दैवी वाटत होतं. सारे मयूर त्या झाडाभोवती जमा झाले. यावेळी एक सुद्धा मशाल पेटत नव्हती. डुंगाच्या बाबांनी पूजाविधी सुरू केला. त्यांनी त्या झाडाची पूजा केली. त्याला विविध फुलं वाहिली. फळ अर्पण केली. यावेळी सारे मयूर लोक त्यांची पारंपरिक गीते लयीत गात होती. पूजाविधी आटोपल्यावर नृत्ये सुरू झाली. झगमगणाऱ्या काजव्यांच्या प्रकाशात स्त्रिया व पुरुषांनी सुंदर मयूर नृत्य सुरू केलं. चंद्रा एका दगडावर बसून ते मनोहर दृश्य पाहात होता. वाघ्या तर ते दृश्य बघून नाचायला लागला. क्षणा-क्षणाला नृत्य व त्यासोबतच्या संगीताची लय वाढत गेली. सारे बेभान होऊन नाचत होते.

नृत्य संपल्यावर आणलेली शिकार म्हणजेच भल्यामोठ्या डुकराचं मांस साऱ्यांना वाटण्यात आले. अर्थात, चंद्रा असलं कच्चं मांस खातनसल्याने त्याने ते विनयपूर्वक नाकारले. प्रसादाच्या फळांचा त्याने समाचार घेतला. या लोकांना मांस कसं भाजतात व त्यामुळे ते कसं रुचकर लागतं, हे नंतर दाखवायचे असे त्याने ठरवले. चंद्राला डुंगाच्या बाबांशी त्या 'संदेश' पाठवणाऱ्या माणसाबाबत बोलायचे होते. सारे विधी आटोपल्यावर रात्री उशिरा सारेजण वस्तीवर परतले. चंद्राने डुंगाला त्याच्या बाबांशी बोलायचं आहे असे सांगितले. पण डुंगाने त्याला उद्या सकाळी त्याचे बाबा याविषयी बोलतील असे सांगितले. चंद्राला खरं म्हणजे खूपच उत्सुकता होती, पण त्याने सकाळपर्यंत वाट बघायचं ठरवलं. त्या दिवशी चंद्रा व डुंगा झोपडीबाहेर अंगणात झोपले. वर ताऱ्यांनी झगमगणारं आकाश... थंड वारं व बाजूला पेटणारा उबदार जाळ... चंद्राला कधी झोप लागली ते कळलेच नाही.

-----------भाग ६ समाप्त-----------------

Rate & Review

Kapil Jagtap

Kapil Jagtap 10 months ago

Tejas Lalka

Tejas Lalka 11 months ago

Share