Chandra aani Nilya betaverchi safar - 13 books and stories free download online pdf in Marathi

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 13

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर भाग 13
भाग १३
गुलाबी हिऱ्याची प्राप्ती

तोपर्यंत बरचशे कोळी लोक व दंतवर्मा गलबतावर पोहचले होते.गलबतावर एकच हल्लाबोल सुरू होता. लपून बसलेल्या डाकूंवर दंतवर्मां व कोळी लोक तुटून पडले. दंतवर्मांसारख्या कसलेल्या सेनानीच्या युद्ध कौशल्यासमोर डाकूंचा आडदंडपणा चालेना. इकडे चंद्रा सावधगिरीने पुढे सरकत होता. आत सात ते आठ माणसे होती. गलबतवरची सारी कामे हेच लोक करायचे. बाहेर चाललेल्या गलक्याने व किंकाळ्यांनी सारे घाबरले होते.भीतीने थरथर कापत होते. सारी कामे टाकून कोपऱ्यात जमा झाले होते.
"कोणतीही गडबड न करता तिथेच उभे रहा...घाबरु नका....मी तुम्हाला कोणतीही इजा करणार नाही." चंद्रा शांतपणे म्हणाला. ते लोक खूष झाले. डाकूंच्या तावडीतून आपली आता सुटका होईल अशी त्यांना आशा वाटू लागली.
"इथे कुणी डाकू लपून बसले काय?...किंवा इथ आणखी कुणी आहे का? " सगळीकडे नजर फिरवत चंद्राने विचारले.
"नाही..इथे कुणी डाकू नाही...पण ..तिथे.." त्यांच्यापैकी एकाने समोर बोट दाखवले.तिथे एक अडगळीची खोली असावी तशी एक बंद खोली होती.
" कोण आहे तिथे?"
पण कुणीच काही बोलेना.सारेच तोंड मिटून गप्प राहिले.
" वाघ्या तू इथच थांब.मी बघतो आत काय आहे ते!" चंद्रा सावधपणे पुढे सरकला. दरवाज्याची कडी अलगद बाजूला करत त्याने दरवाजा उघडला. या वेळी चंद्रा कमालीचा सवाध होता.कोणत्याही संकटाला तोंड देण्याची त्याची तयारी होती.पण आत हालचाल दिसेना.आत फारसा प्रकाश शिरत नव्हता.पण कुणीतरी जमीनीवर पडलेले दिसत होते. चंद्राने निरखून पाहिले.हात - पाय बांधलेला व अत्यंत कृश झालेला असा एक इसम त्याला दिसला. चंद्राच्या चाहुलीने त्याने मान वर केली. दीनपणे त्याने चंद्राकडे पाहिले.त्याचा चेहरा पाहताच चंद्राच्या लक्षात आले की तो कुणीतरी उच्च कुळातील इसम आहे.चंद्राने त्याला उचलून बाहेर आणले. त्याने बाहेरच्या एका माणसाला पाणी आणण्यास सांगितले.चंद्राने त्या इसमाला पाणी पाजले.तो इसम एवढा कृश व अशक्त झाला होता की त्याचे शरीर थरथरत होते.
"कोण आहात तुम्ही?" चंद्राने त्यांना विचारले.
" पण..पण तू कोण आहेस?" त्या इसमाने हळू व अत्यंत खोल आवाजात विचारले. बोलताना त्याला खूप कष्ट पडत होते.
" मी चंदेलच्या कोळी वाड्यातला चंद्रा. मी मद्र देशाचे प्रधान दंतवर्मां सोबत मद्रदेशाला चाललोय."
"काय? मद्र देशाला?आणि सोबत प्रधानजी आहेत?" त्याचा चेहरा चमकला, डोळ्यांतून आसव ओघळू लागली.
" मी ..मी... रुद्रसेन ....राजाभद्रसेन याचा भाऊ...मीच तो पापी ज्याने साऱ्या रेवतिनगरला संकटात लोटले....माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे....सार सांगतो तुला."
चंद्राला दंतवर्मांनी सांगितलेली सारी कहाणी आठवली.देवीच्या मुकूटातील गुलाबी हिरा पळवणारा रुद्रसेन आपल्यासमोर मरणासन्न आवस्थेत पडलाय हे पाहून चंद्रा थक्क झाला. दैवाच्या या अजब खेळाने तो भारावला.त्याचवेळी तो अनमोल दैवी हिरा कुठे आहे हे समजेल अशी त्याला आशा वाटू लागली.
" मी माझ्या पापाची शिक्षा याच जन्मी भोगलिय.मी रेवतीदेवीच्या मुकूटातील हिरा व देवीच्या अंगावरचे दागिने व पैसे घेऊन पलायन केले.जवळचे पैसे खर्च करून मी छोटे गलबत विकत घेतले व एका बंदरावरून दुसऱ्या बंदरावर व्यापार करत फिरू लागलो.खर म्हणजे मला तो गुलाबी हिरा विकायचा होता.पण त्या हिऱ्याची माहिती कर्णोपकर्णी सगळीकडे पसरली होती.लाखोंचा असा तो हिरा भीतीपोटी मी विकू शकलो नाही.कारण मद्र देशाचे नावाजलेले हेर त्याचा शोध घेत होते.एकदा वादळामुळे गलबत एका छोट्या बेटावर लावले.पण तिथे दबा धरून बसलेल्या समुद्री डाकू नागराज व त्याच्या साथीदारांनी आमच्यावर हल्ला केला.प्रतिकार करणाऱ्या माझ्या सेवकांना ठार मारले तर शरण अलेल्यांना याच गलबतावर गुलाम बनविले. होय ! ही समोरची माझीच माणसे आहेत व हे गलबत माझे आहे.नागराजने मला कैद केले.मी कोण आहे हे समजल्यावर त्याने रेवतीदेवीच्या मुकूटातील हिऱ्यासाठी माझा प्रचंड छळ केला.मला तो दररोज मारझोड करायचा...उपाशी ठेवायचा...तापलेल्या लोखंडी सळईने चटके द्यायचा.हा क्रूर नागराज गुलाबी हिर्यासाठी वेडापिसा झाला होता.पण मी त्याला काहीच सांगितले नाही.पण आता माझ्या जवळ वेळ कमी आहे.... रेवतीदेविच्या मुकूटातिल तो दिव्य हिरा पुन्हा तिथे बसविणे गरजेचे आहे. त्यानेच रेवतिनगरचे संकट म्हणजे शाप संपणार आहे....मला माझीच लाज वाटतेय. हव्यासापोटी मी साऱ्या मद्र देशाला संकटात लोटले. ये असा जवळ ये.मला तुझ्या कानात तो हिरा कुठे आहे ते सांगायचय.
चंद्रा त्वरित खाली वाकला. त्याने आपला कान रुद्र्सेनाच्या ओठांजवळ नेला.
"ऐक, याच गलबतावर पुढच्या बाजूला जिथे सध्या या नागराजाचा झेंडा फडकतोय , त्या झेंड्याखाली पोकळ जागेत एक कळ आहे.ही कळ डावीकडे फिरविल्यास तिथे एक कप्पा उघडेल.त्यात एक छोटी लाकडी पेटी दिसेल.त्या पेटीचा तळाकडच्या पृष्ठभागावर एक छोटं वर्तुळ आरेखीत केलेले दिसेल.ते वर्तुळ आतील दिशेने दाबल्यास पेटी उघडेल.त्यात मखमलीचा कपड्यात तो हिरा आहे."
रुद्रसेन दमल्यामुळे थांबला. धाप लागल्याने त्याची छाती वेगाने वरखाली होत होती.चंद्राने ओळखले की तो आता काही क्षणांचा सोबती आहे.पण आता त्याच्या डोळ्यात समाधानाची भावना होती.एवढ्यात दंतवर्मां ,सरजू व इतर कोळी खाली आले.दंतवर्मानी नागराजाच्या मुसक्या आवळल्या होत्या.जखमी अवस्थेतला डाकू नागराजला हातपाय बांधून आणले होते.दंतवर्मना बघताच रुद्र्सनाने खुणेने त्यांना आपल्याजवळ बलवले. जेव्हा दंतवर्मांनी रुद्र्सेनाला ओळखले तेव्हा ते आश्चर्याने थक्क झाले.तो या ठिकाणी व अशा अवस्थेत दिसेल अस त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.ज्याला शोधण्यासाठी जंग- जंग पछाडले होते तो असा मरणासन्न अवस्थेत त्यांच्यासमोर पडला होता.रुद्रसेनानी केलेल्या कृत्यामुळे प्रधानजीना त्याची घृणा वाटत होती.पण ते रुद्रसेनाजवळ गेले व त्याच्यासमोर गुडघ्यावर खाली बसले.
"प्रधानजी...माझ्या बंधुला सांगा,मी माझ्या कृत्याबद्दल शरमिंदा आहे.मी माफीही मागू शकत नाही.पण मी माझ्या गुन्हाची शिक्षा भोगली आहे.मी या मुलाला सारं सांगितलय...येतो मी.रुद्रसेनाचा आवाज खोल होत गेला.डोळे मिटत गेले.मघापासून रोखून धरलेला प्राण त्याच्या शरीरातून निघून गेला.दंतवर्मना त्या क्षणी वाईट वाटल.त्यांनी रुद्रसेनाला अखेरचा मुजरा केला.जड अंतकरणाने ते उठले.चंद्राने रुद्रसेनांच्या हातापायाला जखडलेले साखळदंड काढले.
"प्रधानजी, रेवातीनगरच्या गुलाबी हिऱ्याची शोध लागलंय.पण त्यापूर्वी या नराधम नागराजला याच खोलीत साखळदंडांनी बंदिस्त करूया."
"खर म्हणजे हा नागराज मद्र देशाचा गुन्हेगार आहे
त्याने आमची काही जहाज लुटलियत...त्यामुळे त्याला शिक्षा महाराजच करतील." प्रधानजी म्हणाले.
डाकू नागाराजला साखळदंडांनी बंदिस्त करून त्या कोठडीत बंदिस्त केले.गलबतावर गुलाम म्हणून वावरणाऱ्या रुद्रसेनाच्या माणसांना प्रधानजीनी " तुम्ही आजपासून मुक्त आहात " असे सांगताच ते आनंदाने रडू लागले...नाचू लागले.
चंद्रा लगबगीने दंतवर्मांना घेऊन वर गेला. गलबताच्या समोरच्या बाजूला एका उंच गोलाकार लाकडी ठोकळ्यावर डाकू नागराजचा काळा झेंडा फडकत होता.चंद्राने रागाने तो ध्वज खली उतरवला.त्याचे तुकडे तुकडे करत तो पाण्यात फेकला. दहा ते बारा हात उंच असा तो ध्वजस्तंभ त्याने काढला.मुळाशी असलेल्या पोकळ जागेत त्याने हात घातला.तिथे त्याच्या हाताला एक छोटी कळ लागली.रुदूरसेनाने सांगितल्याप्रमाणे त्याने ती कळ डाव्या बाजूस फिरवली. खट्ट असा आवाज होत तिथे पोकळी तयार झाली व छोटी लाकडी पेटी त्याच्या हाती लागली. चंद्राने पेटी बाहेर काढलीं. ती पेटी एवढी एकसंघ दिसत होती की उघडायची कशी हा प्रश्न कुणालाही पडला असता.त्या पेटीचा खालील बाजूस एक अस्पष्ट अस वर्तुळ दिसत होत.चंद्राने त्यावर दाब दिला....त्या क्षणी ती पेटी उघडली व आत मलमलीच्या कपड्यात गुंडाळलेला हिरा दृष्टीस पडला.चंद्राने तो कपडा उलगडला....त्याचे डोळे दिपून गेले.
पेरूच्या आकाराचा अत्यंत तेजस्वी असा तो हिरा बघताच चंद्रा देहभान विसरला.त्या दैवी हिर्यचा स्पर्श अत्यंत सुखद व शरीरात शक्तीचा संचार निर्माण करणारा होता.दिवशाही त्या हिर्यातून गुलाबी प्रकाश बाहेर पडत होता.
" प्रधानजी...घ्या...रेवतीदेवींचा हा हिरा घ्या!"
प्रधानजी डोळ्यात आनंदाअश्रू ओघळू लागले. ज्या कामगिरीवर ते बाहेर पडले होते ते आज पूर्ण झाले होते.आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे त्यांना वाटले.त्यांनी चंद्राला भान हरपून मिठी मारली.त्याच्या खांद्यावर थोपटत ते भावणापूर्ण आवाजात म्हणाले.
" चंद्रा हे सारे तुझ्यामुळे व वाघ्यामुळे शक्य झाले.."
" मी फक्त साहस करण्यासाठी बाहेर पडलो होतो. मी निमित्तमात्र आहे." चंद्रा विनयाने म्हणाला.
प्रधानजीनी तो हिरा पुन्हा व्यवस्थित कपड्यात गुंडाळला व पुन्हा पेटीत ठेवला व पेटीच्या आतल्या बाजूला असलेल्या वर्तुळावर दाब दिला.ती पेटी आपोआप बंद झाली.
" चंद्रा... सरजू व इतर कोळ्याना तुला भेटायचे....त्यांना तुझ्याशी खूप बोलायचं..तोपर्यंत तराफ्यावरची खजिन्याची पेटी व इतर वस्तू मी गलबतावर् घेतो."
दंतवर्मां अतिशय उत्साहात होते.त्यांनी तो हिरा पूर्वीच्याच ठिकाणी व्यवस्थित टेवला.या वेळी आसपास कुणीच नव्हते.चंद्राला घेऊन ते पुन्हा खाली आले .आपल्यासोबत आणखी दोघांना घेऊन ते तराफ्यावरच्या वस्तू आणण्यासाठी गेले. चंद्राला मोकळा वेळ मिळाला.तो धावतच सरजूजवळ गेला.त्याच्या पायाना मिठी मारत तो हळव्या सुरात म्हणाला,
"बाबा, मी तुम्हाला न सांगताच वेड साहस केलं...आई कशी आहे...गौरी कशी आहे?"
सरजूने त्याला उठवले.त्याला मिठीत घेत म्हणाला
" चंद्रा, तू चुकलास हे नक्की पण प्रधानजीनी संगित्याप्रमाने तू अतीशय धाडसीपणे त्यांची सुटका केलीस.ते एकूण मला तुझा अभिमान वाटतो.तू गेल्यापासून तुझी आई व गौरी अतिशय चिंतेत आहेत."
" पण बाबा ,तुम्ही अगदी योग्य वेळी इथे कसे पोहचलात?"
"सार सांगतो! आम्हालाही तुझ्याकडून निळ्या बेटाबद्दल ऐकायचय."
सरजू ,चंद्रा व सारेजण तिथेच बसले. वाघ्या सुस्तावत चंद्राच्या पायाजवळ बसला. सरजूने आपण इथपर्यंत कसे आलो ते सांगण्यास सुरुवात केली.
-----------*------------*-------------*----------------*------
भाग - १४
रेवतीनगारच्या दिशेने
सरजूची गोष्ट....पुन्हा नव संकट....