Chandra aani Nilya betaverchi safar - 14 in Marathi Fiction Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 14

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 14

भाग -14 रेवतीनगरच्या दिशेने

ज्या रात्री चंद्रा व वाघ्या निघून गेले होटे त्याच्या दुसऱ्या दिवशी चंद्रा नाही हे बघून साऱ्यांचे धाबे दणाणले.आपली जुनी होडी नाही हे सरजूच्या लक्षात आले.चंद्रा होडी घेऊन समुद्रावर गेला होता हे निश्चित. चंदेलच्या किनाऱ्यावरून सात आठ होड्या वेगवेगळ्या दिशेने गेल्या.दिवसभर शोध घेऊनही त्यांना चंद्राचा माग लागला नाही.सतत दोन दिवस ते शोध घेत होते. सरजू चिंतेत पडला होता.या अफाट दर्यावर क्षणाक्षणाला नवीन संकटे समोर येत असतात.त्यांना चंद्रसारखा मुलगा तोंड देऊ शकेल का? हा प्रश्न सरजूला पडला होता.खर म्हणजे चंद्रा सरजूच्या तालिमीत तयार झाला होता व सहजासहजी डगमणारा नव्हता हे साऱ्यांना माहीत होते.पण तो नेमका कुठे व का गेला हे कळत नव्हते. चंद्राची आई तर खूप दुःखी झाली होती.सारखी किनाऱ्याकडे डोळे लावून बसायची. एकवीरेची प्राथना करायची.
पण आठ दिवसांपूर्वी चंदेलाला आलेल्या अरबांनी सांगितलं की इथल्या होड्यांसारखी चित्रे व खुणा असणारी होडी त्यांना येताना निळ्या बेटाच्या मार्गावर फुटलेल्या अवस्थेत दिसली. क्षणार्धात सरजूच्या लक्षात सारा प्रकार आला.निळ्या बेटाविषयी चंद्राला असलेली उत्सुकता त्याला माहीत होती.पण होडी फुटली तर चंद्रा व वाघ्याचे काय झाले असेल?...या विचाराने तो घाबरला.पण अरबांनी त्याला ठामपणे सांगितलं की त्या ठिकाणी मुलाचा किंवा कुत्र्याचा मृतदेह त्यांना दिसला नव्हता.अरबांनी सरजूला एक दूरदर्शी भेट दिला.त्यातून दूर अंतरापर्यंत लहान वस्तूही पाहता येत होती.चंद्राला शोधण्यासाठी त्याचा उपयोग होणार होता.सरजूने साऱ्या कोळ्यांना एकत्र केले.निळ्या बेटिविषयीचा कथा व दंतकथा यामुळे एका दोघांनी चंद्राला शोधण्यासाठी जाणे योग्य नव्हते....म्हणून चार होड्यातून तीस एक कोळी बाहेर पडले.ज्यावेळी समुद्रीडाकूंचे जहाज तराफ्याजवळ जात होते त्या वेळी सरजूने दूरदर्शीतून चंद्राचा तराफा..चंद्रा व त्याच्या बाजूला असलेल्या वाघ्याला पाहिले व सारे त्वरेने तिथे आले.
"होय आणि तूम्ही आलात म्हणून आम्ही वाचलो. " चंद्रा हसून म्हणाला.
चंद्राने त्या सर्वांना आपल्या समुद्र सफरी विषयी सांगितले. निळे बेट..त्यावरचे क्रूर शिंगाडे ...निसर्गप्रेमी मयूर..डुंगा याविषयी सांगितले. निळ्या बेटावरची झाडे,तिथले विचित्र प्राणी...त्यांच्यावर आलेली संकटे..वाघ्याचा पराक्रम...दंतवर्मांची भेट याविषयी सांगितले. हे ऐकता-ऐकता सारे भारावून गेले.निळ्या बेटाविषयी ऐकलेल्या गोष्टी किती खऱ्या आहेत हे त्यांना समजले.चंद्राने केलेली धाडसे एकूण साऱ्यांना त्याचा अभिमान वाटला.सरजूने पुन्हा एकदा त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटले.
" सरजू..
चंद्राने खरच कमाल केली...हा नसता तर मी त्या निळ्या बेटावरच्या गुहेत मरण पावलो असतो.... व माझ काय झालं ..हे शेवटपर्यंत कुणालाच समजले नसते." पायऱ्या उतरताना दंतवर्मा म्हणाले.
"तो सारा नियतीचा खेळ होता प्रधानजी !पण आता आम्ही चंद्राला घेऊन चंदेलाला जातो.आम्हाला परवानगी द्या."सरजू नम्रपणे म्हणाला.
" नाही ..सरजू .चंद्राच्या हातून अजुन एक महान काम व्हायचे आहे.त्यासाठी त्याला रेवतीनगराला यायचंच..."
दंतवर्मा सरजूला समजावत म्हणाले.
"पण..पण त्याच्यासाठी त्याची आई व बहीण व्याकूळ झाल्यात."
"होय मला माहीत आहे...पण पुढची दैवी कामगिरी पार पडण्यासाठी मला चंद्राची गरज आहे. तू आणि तुझी काही माणसंही रेवतिनगराला येतील...तू इतरांना चंदेलास पाठव.त्यांच्या सोबत चंद्रा सुखरूप असल्याचा निरोप पाठव."
"ठीक आहे." सरजू म्हणाला.
"सरजू आपल्याला रेवतींनगराला पोहचायला किती वेळ लागेल?"
" वाऱ्याची साथ मिळाल्यास व वाटेत कुठचाही अडथळा न आल्यास आपण येत्या दोन दिवसात निश्चितच पोहचू." सरजूने वाऱ्याचा व दिशेचा अंदाज घेत सांगितले.
" ठीक आहे. पौर्णिमेला अजून चार दिवस आहेत..मला वाटत ;मार्गात आपल्याला शंकू बेट लागेल.तिथे थांबून रुद्र्सेनाचा अंतिम संस्कार आपण करू...आपण संध्याकाळपर्यंत तिथे पोहचू."
" होय, प्रधानजी मी गलबत वळवतो." सरजू काही कोळ्यांना घेऊन गलबताच्या वरच्या भागात गेला. त्याने वाऱ्याचा रोख बघून झपाझप शिड ओडली. दर्याचा भन्नाट वारा शिडात भरला. गलबतांन वेग घेतला. सारे कोळी सरजूला मदत करू लागले.सारे खुशीत होते.हास्य विनोद करत होते. चंद्रा व दंतवर्मां पुढच्या प्रवासाविषयी बोलत होते.उद्या सायंकाळ पर्यंत त्यांना रेवतीनागरला पोहचायचे होते . एवढ्यात काही कोळ्यांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या.गलबताच्या बरोबरीने पोहता पोहता त्यानी पाण्यात विविध कसरती करायला सुरुवात केली.मधेच हे कोळी पाण्यात गडप होत व पुन्हा सारे एकाच वेळी पाण्यावर येत.लयबध्द रीतीने ते एकाचवेळी एकच कसरत करायचे.दंतवर्मां एकटक हा खेळ पाहत होते.कोळ्याचे पोहण्यातील कौशल्य पाहून ते थक्क झाले.
" चंद्रा..तुझे सहकारी पाण्यात छान कसरती करताहेत."
"होय, प्रधानजी , हा दर्या...हे फेसाळते पाणी आमच्यासाठी आईच्या कुशी सारखं आहे." चंद्रा हसून म्हणाला.
थोड्या वेळाने सारे पुन्हा गलबतावर आले.या वेळेपर्यंत उन्ह कलायला सुरुवात झाली होती.सरजू व त्याचे सहकारी झपाझप वाल्ही मारत होते.लवकरात लवकर त्यांना शंकू बेटावर पोहचायच होत.आकाशात समुद्र पक्षी घिरट्या घालत होते.याचा अर्थ ते शंकू बेटाजवळ पोहचले होते.थोडा वेळ गेल्यावर समोर एक बेट दिसले.सारे आनंदीत झाले.चंद्राने बेटाकडे निरखून पाहिले.ते बेट अगदी हुबेहूब शंखा सारखे दिसत होते.टोकाला निमुळते व मधे उंच होत गोलाकार व फुगीर होत गेलेला भाग यामुळे एखादा भला मोठा शंख पाण्यात पडल्यासारखं ते दृश्य होत.पिवळसर सोनेरी किरणांनी बेटाचा किनारा चमकत होता.बेटावर फारसी झाडे दिसत नव्हती. पण किनाऱ्यालगत माडांची गर्दी दिसत होती. बेटाचा पुढे रुंदावत गेलेला गोल भाग पिवळ्या दगडांनी बनलेला दिसत होता. त्यावर एखाद दुसर झाड असावं अस वाटत होत.बघता बघता गलबत किनाऱ्यावर पोहचले. नांगर टाकून सारेजण चंदेलच्या होड्यांनी किनाऱ्यावर उतरले.पिवळसर सोनेरी वाळूच्या स्पर्शाने सारे सुखावले.दंतवर्मांनी होडीतून आणलेला रुद्र्सेंनाचा मृतदेह कोळ्यांच्या मदतीने किनाऱ्यालगत एका सपाट कातळावर ठेवला. किनाऱ्यावर पडलेली झावळे गोळा केली. व्यवस्थित रचून चिता तयार केली व त्यावर रुद्र्सेनाचा देह ठेवला. दंतवर्मनी चकमकीने आग पेटवून चीतेला पेटविले.दंतवर्मांच्या चेहेऱ्यावर क्षणभर खेद व विषादाची भावना उमटली.
सारेजण पुन्हा किनाऱ्यावर आले.निळ्याशार पाण्यात डुंबत त्यांनी आंघोळ केली. मन व शरीरावरचा बराचसा ताण कमी झाला होता पाणी शोधण्यासाठी सारेजण बेटाच्या अंतर्भागात शिरले.वाटेत त्यांना असंख्य शंख दिसले.त्यांचे रंग व आकार एवढे विलक्षण होते की चंद्राने त्यातील दोन शंख उचलले त्याला ते फारच आवडले.त्याला एक गुलाबी पांढऱ्या रंगाचा होता तर दुसरा निळसर पिवळ्या रंगाचा होता. निळ्या शंखाला नैसर्गिकरीत्या मुखाजवळ गोलाकार छिद्र होत.अजून काळोख पडला नव्हता.एके ठिकाणी त्यांना निळसर स्वच्छ पाण्याचा झरा दगडाच्या कपारीतून हिरव्यागार गवतावर उड्या घेताना दिसला.सर्वानी मनोसोक्त पाणी पिऊन घेतले.सोबत आणलेल्या लाकडी भांड्यात पाणी भरून घेतले.
"चला निघुया" सरजू म्हणाला
" खरच, घाई करायला हवी" दंतवर्मांनी साऱ्यांना वेळेची आठवण करून दिली.अचानक वाघ्या कावरा बावरा झालेला दिसला.समोरच्या छोट्या पिवळ्या टेकडीकडे बघून तो भुंकू लागला.
"चला लवकर, वाघ्याला कसल्यातरी संकटाची चाहूल लागलीय." चंद्रा काळजीच्या सुरात म्हणाला. सारे घाई करत वळले.एवढ्यात कसलातरी प्रचंड आवाज आला.एखादी गर्जना किंवा हुंकार असावा तो! त्या पाठोपाठ जमीन हलल्यासरखा आवाज येऊ लागला.एक किंवा अधिक असे भले मोठे प्राणी टेकडी पलीकडून धावत येत असावे असे वाटले.कदाचित ते तोंडाने भेदक असा आवाज काढत असावेत. कुठचे प्राणी असतील ते? वाघ, सिंह की हत्ती..पण छे, हा आवाज त्यापैकी कुणाचाच नव्हता.खूपच वेगळा व भयानक असा तो आवाज होता.छातीत धडकी भरावी तशी ती कानठळ्या बसवणारी गर्जना होती.
" लवकर होड्यांजवळ पळा, चला..." दंतवर्मां तलवार म्यानातून खेचत ओरडले. दंतवर्मांजवळ तलवार होती तर चंद्राजवळ तिरकामठा व त्याचा आवडता रुंद पात्याचा खंजीर होता
फक्त दोघांजवळ शस्त्र होती. धावता धावता अचानक सरजूने पाठी वळून पाहिले तसा तो भेदरलाच.
"ते...ते..काय आहे..? त्याच्या घश्याला कोरड पडली.
सारे थबकले
त्यांनी मागे वळून पाहिले आणि..दगडासारखे खिळून सारे एकच जागी स्तब्ध ऊभे राहिले.समोर टेकडीवर दोन अवाढव्य प्राणी उभे होते.साधारण अर्ध्या माड एवढे उंच होते ते! दगडी खांबासारखे जाडजूड शक्तिशाली हात- पाय व भलंमोठं डोकं, अंगावर राठ केस असा अवतार होता त्यांचा. आपल भलंमोठं तोंड वेंगाडून ते चंद्रा व इतरांकडे बघून ओरडत होते.त्यांच्या आवाजात संताप व द्वेष होता.
"अरे...देवा आता आपली धडगत नाही." काही कोळी तिथेच मातीत लोळण घेत रडू लागले.खरे म्हणजे हे कोळी शूर व धाडसी होते.पण समोरचे प्राणी बघून त्यांची बुद्दीच कुंठित झाली होती.एखादा प्राणी एवढा मोठा असू शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.साक्षात मृत्यूच त्यांच्या रूपाने आपल्यासमोर ठाकलाय असे त्यांना वाटले.त्या भयंकर प्राण्यांना त्यांच्या जवळ पोहचायला फार वेळ लागणार नव्हता.एका पावलातच ते पंधरा वीस हातांच अंतर सहज कापू शकत होते.बस आता काही क्षणच चंद्रा व इतरांजवळ होते. कुंठित झालेला चंद्रा बेभान झाला.कमरेला बांधलेला निळा शंख त्याने काढला. सर्व शक्ती एकवटून त्याने तो फुंकला.एक गिरक्या घेत जाणारा आवाज...हवा कापीत जाणारा आवाज आसमंतात घुमला. युध्दभूमिवर फुंकलेल्या शंखाप्रमानेच तो आवाज हृदयात धडकी भरवणारा होता.पाऊल उचलण्याचा तयारीत असलेले ते प्राणी दचकून थांबले.ह्या नव्या आवाजाने ते गोंधळले. चंद्राच्या शरीरात वीरश्री संचारली.
शंख एका कोळ्यांच्या हाती देत त्याने क्षणार्धात तीर कामठयावर चढवला .उपयोगी पडतील म्हणून कमरेला खोवून आणलेल्या निळ्या बेटावरची आग निर्माण करणाऱ्या मातीच्या गोळ्यांपैकी एक गोळा त्याने तीराच्या टोकाला अडकवला. चंद्राने दात ओठ खात तीर सोडला तो तीर त्या अवाढव्य प्राण्यांपर्यंत पोहचला नाही पण त्यांच्या थोडा अलीकडे पडला. कानठळ्या बसविणाऱ्या आवाज झाला.आजूबाजूची माती व दगड वर उडाले.तिथल्या वाळलेल्या गवताने आग पकडली.ते प्राणी आग बघताच प्रचंड गोंधळले.... घाबरले.तोपर्यंत चंद्राने दुसरा तीर सोडला.आग...धूर व आवाज यामुळे घाबरलेले ते प्राणी क्षणात वळले व टेकडीवरून खाली उतरून दिसेनासे झाले
सरजू व इतर कोळी आनंदाने नाचू व ओरडू लागले.काहींनी चंद्राला उचलून घेतले.
"आपण एका भयावह संकटातून वाचलो..पण आपल्याला हे बेट लवकर सोडावे लागणार आहे.चला लवकर.." दंतवर्मां म्हणाले.
दंतवर्मांना चंद्राच्या प्रसंगावधानाचे व धाडसाचे कौतुक वाटले.क्षणभर दंतवर्मांना वाटले होते की खेळ संपला...एवढ्या मेहनतीने जुळवून आणलेला योग फुकट जाणार होता.पण चंद्राच्या धाडसाने व रेवतीदेविच्या कृपेने सारे निभावले होते. जवळपास धावतच सारी मंडळी किनाऱ्यावर धावत आली.
---------×-------×--------×---------×---------×--------------
भाग-'15 --रेवतीनगरात स्वागत
भाग-16- समारोप( उत्कंठावर्धक व विलक्षण)

Rate & Review

Kapil Jagtap

Kapil Jagtap 10 months ago

Geetanjali Kavitake

Geetanjali Kavitake 11 months ago

Share