Chandra aani Nilya betaverchi safar - 16 - Last Part in Marathi Fiction Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 16 - अंतिम भाग

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 16 - अंतिम भाग

भाग -१६
समारोह

आज रेवातीनगरमध्ये उत्साहाला उधाण आले होते.दिशा अजून उजळल्या नव्हत्या.पण रेवती देवीच्या मंदिराचा गाभारा,सभामंडप व त्यापुढील विस्तीर्ण मैदान प्रजाजनांनी भरून गेले होते. मंदिरासमोरील किनारा...तिथली सोनेरी वाळू ..त्यात विसावलेल्या असंख्य होड्या....दूरवर उभी असलेली गलबत अजूनही अस्पष्ट दिसत होती.समुद्रावरून येणारा गार वारा..लाटांचा खळखळाट व उच्चस्वरात चालू असलेले मंत्रोच्चार यामुळे सारे वातावरण भरून गेलं होते.आज रेवतीनगरचा शाप व मद्र देशावरच संकट संपणार होते.सारे रेवतीनगर सजवलेलं होत. गुड्या, तोरण, मंडप जागोजागी उभारले होते.प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या.चौकाचौकात सुंदर देखावे उभारले होते. मद्र देशातील व शेजारच्या देशातील लोक हा सोहळा पाहण्यासाठी ठाण मांडून होते.रेवतीनगरमधील धर्मशाळा...देवालये..यजमानांची घरे पाहुण्यांनी व प्रवाश्यानी भरून गेली होती....गजबजून गेली होती.रेवतिदेवीच्यामस्तकावर तो दैवी मुकूट बसविण्याचा क्षण याची देही याची डोळा बघण्यासाठी. .... अनुभवण्यासाठी सारेजण आतुर झाले होते. सूर्याची पहिली किरण या मुकूटावरील हिर्यावर पडली पाहिजेत असा मुहूर्त साधून मुकूट देवीच्या मस्तकावर चढविला जाणार होता.त्यानंतरच देवीच्या चेहऱ्यावरील लपलेलं हास्य पुन्हा फुलणार होते.शाप संपणार होता.
मुहूर्त साधण्यासाठी पुरोहितांची धावपळ सुरू होती.मुख्य पुरोहित आचार्य धर्मानंद यांच्या देखरेखीखाली शंभर पुरोहित मंत्र पठण करत होते. यावेळी महाराज व महाराणी रेवतिदेवीची विधिवत पूजा करत होते.बाहेर सनई चौघड्याच्या मधुर नाद सुरू होता.आज देवीला हिरवी साडी चोळी,विविध देशातील वस्त्रालंकार चढवले होते.पूजा संपेतोवर पूर्व दिशा गुलाबी नारिंगी रंगाने भरून गेली होती. सूर्य पूर्व क्षितिजावर यायला अजून थोडा वेळ होता. सभा मंडपात बसलेले चंद्रा, सरजू व त्यांचे चार साथीदार हा सारा सोहळा डोळे विस्फारून पाहत होते.चंदेल व समुद्र यापलीकडे त्यांना जग माहीत नव्हते.सारजूला तर आपला जन्म सफल झाला अस वाटत होत.चंद्रमुळे आपण हे सारं पाहू शकलो... प्रत्यक्ष महाराजांशी बोलू शकलो....म्हणूनच चंद्राचा त्याला अभिमान वाटला.या समारंभासाठी त्यांना विशेष पाहुण्यांचा सन्मान मिळाला होता व देवालयाच्या सभामंडपाच्या सुरुवातीलाच त्यांना बसण्यासाठी आसन मिळालं होत.पूजा संपन्न झाल्याबरोबर उपस्थितांनी देवीच्या नावाचा त्रिवार जयघोष सुरू केला.
प्रधान दंतवर्मां उठले.आचार्य धर्मानंद यांच्याशी थोड बोलून त्यांनी उच्च स्वरात बोलायला सुरुवात केली.सगळीकडे सुखद शांतता पसरली होती.
" प्रजाजनहो! तुम्हाला माहीतच आहे की गेले काही महिने रेवतीनगर व आपला मद्र देश संकटाच्या कालखंडातून जात होता.दैवी शाप व कोप यामुळे आपण चिंताक्रांत झालो होतो.दुष्काळ..रोगराई...अस्मानी संकट यामुळे हतबल झालो होतो. देवीच्या परंपरागत मुकूटातील दैवी हिरा गायब झाल्यापासून हे सारे सुरू झाले होते.पण आज नवी पहाट आपल्यासाठी नवचैतन्य घेऊन येतेय...आज नव्हे! आता आपण तो हिरेजडित मुकूट देवीच्या मस्तकावर विराजमान करणार आहोत. तो दैवी हिरा परत मिळवणे अवघडच नव्हे तर अशक्य घटना वाटत होती. पण दैवी संकेत व रेवतिदेवीची कृपा यामुळे हे सारे शक्य झाले.या साऱ्यासाठी नियतीने ज्या शूर व कोवळ्या तरुणाची निवड केली होती त्यानेच हे सारे शक्य करून दाखविले.त्याने केलेली समुद्राची सफर...केलेली अचाट साहसे...झेललेली संकटे व त्यातून काढलेला मार्ग हे सार अतुलनीय आहे.ह्या साऱ्या घटना तुम्हाला व जगाला कळाव्यात म्हणून आम्ही त्या लिहून पुस्तक रूपाने तुमच्यासमोर आणणार आहोत.
आज कार्तिक पौर्णिमा...देवीच्या संकेतानुसार याच दिवशी जन्मलेल्या व ज्याच्या उजव्या हातावर पूर्ण चंद्राची खुणा आहे अश्या शूर, निष्पाप तरुणाच्या हस्ते तो मुकूट देवीच्या मस्तकावर विराजमान करणार आहोत.आणि तो शूरवीर दुसरा कुणी नसून आपला कथानायक चंद्रा आहे. ये चंद्रा..अगदी अल्प वेळ उरलाय.ये...तुझ्या पवित्र हाताने हा मुकूट देवीच्या मस्तकावर ठेव!"
चंद्रा आश्चर्यचकित..झाला..अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाने त्याचे हातपाय थरथरू लागले.अनेक संकटाना न घाबरता सामोरा जाणार चंद्रा आता मात्र धास्तावला...त्याने सरजूकडे पाहिले.सरजू पण गोंधळला होता.पण त्याने चंद्राला ऊठण्याची खूण केली.तेवढ्यात दंतवर्मां स्वतः चंद्राकडे आले त्याचा हात धरून त्याला मधल्या प्रशस्त मार्गाने देवीच्या मूर्ती जवळ घेऊन गेले.तिथे महाराज व महाराणी स्थानापन्न झाले होते. चंद्राने दोघांना झुकून नमस्कार केला. दोघांनी त्याला शुभाशीर्वाद दिले.
"चंद्रा, आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो." महाराज त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाले.
चंद्राने त्यानंतर आचार्य धर्मानंद व साऱ्या भक्तगणांना - प्रजेला अभिवादन केले. साऱ्यांच्या नजर चंद्राकडे लागल्या होत्या.
"चंद्रा चल आता..त्या शिडीवर चढ..असा चकित होऊ नकोस.तुझ्या खांद्यावरची ती चंद्रखूण निळ्या बेटावर पाहिली तेव्हाच मी निश्चिंत झालो होतो.नियतीने तुझी निवड या कार्यासाठी केली होती.चल हो पुढे..!"
रेवतीदेवीची मूर्ती दोन पुरुष उंची पेक्षाही उंच होती. एका पूर्ण घडीव काळया दगडात कोरलेली ती मूर्ती शिल्पकाराने आपले सर्वस्व ओतून तयार केली होती.प्रमाणबध्द, रेखीव व अत्यंत तेजस्वी अशी ती मूर्ती होती. रेवतीदेवीचा उजवा हात आशीर्वाद देण्यासाठी वर उचलला होता.तर डावा हात मांडीवर ठेवलेला होता व त्या हातात एक मोठा जलकुंभ धरलेला होता.आज देवीच्या अंगावर भरजरी हिरवी साडी - चोळी व मोरपंखी रंगाचा शालू असा साज चढविला होता. दंतवर्मांनी घडवून आणलेले सुवर्णजडीत दागिने देवीच्या अंगावर खुलून दिसत होते.देवीचे मखर रंगीत अश्या फुलांनी व वेलिंनी सजले होते .देवीचे वाहन समुद्री गरुड हा तीच्य उजव्या बाजूला उडण्याच्या तयारीत असलेला असा कोरला होता.त्या दगडी गरुडाच्या मानेत व दोन्ही पायात हिरेजडीत माळा घातलेल्या होत्या.
चंद्रा लाकडी शिडीवर चढला. मुख्य पुरोहितांनी सुवर्ण तबकात ठेवलेला तो पवित्र मुकूट उचलला व चंद्राच्या हाती दिला.चंद्राने पूर्ण श्रध्देने तो मुकूट देवीच्या मस्तकावर ठेवला. त्या क्षणी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.पुरोहितांचे मंगल मंत्रोच्चार ...सनई चौघड्याचे वादन व रेवतीदेवीचा जयघोष एकाचवेळी सुरु झला. सारा परिसर भावभक्तिने फुलून गेला.साऱ्यांच्या नजरा रेवती देवीच्या मुकूटावर व चेहऱ्यावर खिळल्या होत्या.चंद्रा शिडीवरून उतरतो न उतोरतो तोच पूर्वेकडच्या गवाक्षातून सूर्याची सोनेरी किरणे थेट देवीच्या मुकूटावर पडली. तो विलक्षण देखावा, तो क्षण सारेजण डोळ्यात प्राण आणून पाहू लागले.पानाची सळसळ सुद्धा ऐकु येईल एवढी शांतता पसरली होती.पहिल्या सूर्यकिरणाबरोबर देवीचा चेहरा उजळला.त्यांचं लोपलेल ते मधुर हास्य..ते बोलके डोळे सर्वच सजीव झाल्यासारखे दिसू लागले.
मुकूटावरचा तो हिरा सूर्यकिरण पडताच विलक्षण तेजाने तळपू लागला.बघताबघता इंद्रधनुषी रंगाचे कवडसे गाभारा व सभागृहात चक्राकार फिरू लागले.अहाहा!...काय वर्णन करावे त्या क्षणाचे, त्या दृश्याचे !डोळ्यांचे पारणे फिटावे असे ते
दृश्य होते.सूर्य जसजसा वर सरकला तसतसे सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीवर पूर्णपणे पडली.सारी मूर्ती झगमगीत प्रकाशाने...तेजाने तळपू लागली..अगदी दूरवरून मूर्ती स्पष्ट दिसू लागली.कारण यावेळी सोनेरी सूर्यकिरण फक्त आणि फक्त मूर्तीच्या अगावरच पडली होती.बघता बघता आणखी एक आश्चर्य घडल.देवीच्या डाव्या हातातला पंचगंगेच्या पवित्र पाण्याने भरलेला तो जलकुंभ आपोआप थोडा कलंडला.त्यातील पवित्र पाणी खाली ओघळले व पाण्याचा प्रवाह पुढे सरकत जमिनीत गडप झाला व त्याक्षणी मुकूटावरच्या गुलाबी हिऱ्यातून सप्तरंगी प्रकाश बाहेर पडून समोरच्या पुष्करणीच्या मध्यावर असलेल्या चांदीच्या माश्याच्या मुखातून स्वच्छ पाण्याची धार उसळू लागली. बघता बघता पाण्याचा जोर वाढला व पुष्करनीतील जलसाठा भरून वाहू लागला.याच जलसाठ्यातून फरसबंदी पाटांद्वारे साऱ्या रेवतिनगरात पाणी फिरविले होते.पुष्करणीतील जलसाठा भरलेला पाहून साऱ्या प्रजेच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.महाराज भद्रसेन, महाराणी सारेच आंनंदित झाले.एवढा वेळ एकाद्या पुतळ्यासारखी स्तब्ध व मुकपणें बसलेली राजकन्या चंद्रकलेच्या चेहऱ्यावर हास्य उमटल.राजकन्या चंद्रकला अचानक उठली व धावतच जात तिने रेवतिदेवीच्या पायावर मस्तक ठेवले.तिच्या डोळ्यातून एकसारख्या पाण्याच्या धारा वाहू लागल्या.
" रेवतीदेवीचा जयजयकार असो" राजकन्येने जयघोष केला.
राजकुमारी चंद्रकलेचा मधुर आवाज कानी पडताच सारेचजन चमकले.
वाचा गेलेली राजकन्या बोलू लागली होती.महाराणी नीलमदेवीनी धावत जाऊन राजकन्येला कुशीत घेतले.
"रेवतीदेवीचा जयजयकार असो!" एकसाथ सारेजण गरजले.
"प्रधानजी, सारे दुष्टचक्र संपले...प्रजेवरचे संकट टळले...पवित्र पुष्करणी पाण्याने भरून गेली.राजकन्या पूर्वीसारखी झाली...आमच्यासार्या चिंता मिटल्या.ही सारी रेवतीदेवीची कृपा आणि ह्या शूर मुलाची जिद्द व साहस यामुळेच हे शक्य झाले." महाराज म्हणाले.
महाराज भद्रसेन व प्रधान दंतवर्मां रेवतीदेवीच्या समोर गेले.दोघांनीही हात जोडले.
" माते तू सर्व जाणतेस. आमच्या हातून घडलेल्या अपराधाची शिक्षाही तू दिलीस आणि तूच त्यातून सुटकाही केलीस...यापुढेही तू आम्हा लेकरांवर कृपा ठेव... मद्र देशातील सर्व प्रजेला सुखी व संपन्न ठेव. तुझ्या सेवेत कधीही खंड पडणार नाही..या देवालयाच्या पावित्र्य यापुढे अखंड जपल जाईल.तुझ्या कृपेमुळे आम्ही धन्य झालो आहोत."
महाराज व प्रधानजींचे डोळे भक्ती भावाने भरून गेले.ते काही काळ तसेच देवीसमोर डोळे मिटून गप्प राहिले.सगळीकडे आनंदाचे उधाण आले होते.दर्यावरून येणारा गार वारा..पक्ष्यांचा चिवचिवाट सनाईचा मंद स्वर..यामुळे सारेजण भावसमाधित मग्न होते.घडलेला अद्भुत चमत्कार पाहून प्रत्येकाला आपला जन्म सफल झाला अस वाटत होत.थोड्या वेळाने महाराज वळले.त्यांनी बोलायला सुरुवात केली.
"प्रजाजनहो,आजचा दिवस हा सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.कठीण काळ संपला आहे...नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.यापुढे आपल्या हातून कोणतीही चूक होता उपयोगी नाहीय .ञउत्सव आणखी पाच दिवस चालणार आहे.तर दरवर्षी या दिवसाची आठवण म्हणून याच तिथीला इथेच आपण सारे जमून उत्सव साजरा करणार आहोत.
आज या शुभदिनी मला आणखी एक गोष्ट जाहीर करायची आहे.ती म्हणजे...या शूर मुलाने...चंद्राने निळ्या बेटावर जाण्याचे धाडस केले म्हणुच हे सारे घडू शकले..त्याच्या धाडसाला तोंड नाही.त्याच्या या अचाट कामगिरीचे कौतुक म्हणून आम्ही त्याला चंदेल व आजूबाजूच्या दहा गावांची जहागिरी देत आहोत.तसेच सगराबद्दलची त्याची ओढ व ज्ञान लक्षात घेऊन आमच्या आरमाराचे प्रमुख संग्रामसिंह यांच्या हाताखाली आरमाराचे उपप्रमुख म्हणून नेमणूक करत आहोत.आज सायंकाळी पूर्ण चंद्राची किरणे रेवती मूर्तीवर अभिषेक करतील त्या सोहल्यावेली आम्ही त्याला उंची वस्त्रे, नेमणूकीची सनद देऊन गौरविणार आहोत.
टाळ्यांच्या कडकडात सारा आसमंत गर्जून गेला.चंद्राला उगाचच लाजल्यासारख वाटले.सरजूचा ऊर अभिमानाने भरून आला.साऱ्यांच्या नजरा चंद्राकडे लागल्या होत्या.या शूर, तरुण सरदाराकडे सारेजण कौतुकाने बघत होते.चंद्राला वाटले, या क्षणी आई , गौरी व त्याचा निळ्या बेटावरच्या मित्र डुंगा असला पाहिजे होता.अर्थात, चंद्राला ' वाघ्या ' चीही आठवण झाली होती....जो देवालयाच्या बाहेर मैदानात चंदेलच्या कोळी लोकांसोबत हा सोहळा पाहत होता.वाघ्या शिवाय निळ्या बेटाची सफर यशस्वी झालीच नसती. चंद्राने त्या क्षणी मनोमन वाघ्याचे आभार मानले.
--------*-------*------------*------------*------------*-----
समाप्त
ह्या कादंबरीत उल्लेख असलेले प्राणी व वनस्पती या पृथ्वीवर आढळणारे आहेत.मुलांपासून -थोरांपर्यत सर्वांना आवडेल अशी ही कादंबरी आहे.आपण सर्वांनी छान प्रतीसाद दिलात त्याबद्दल आभार.

Rate & Review

Reena

Reena 5 days ago

Kapil Jagtap

Kapil Jagtap 10 months ago

shubham deshmukh

shubham deshmukh 11 months ago

Geetanjali Kavitake

Geetanjali Kavitake 11 months ago

Tejas Lalka

Tejas Lalka 11 months ago

Share