A Mystery of Oz in Marathi Short Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | ओझ एक गूढ

ओझ एक गूढ

मी रोज डोबींवली ते घाटकोपर असा प्रवास रेल्वेने प्रवास करतो.घाटकोपरच्या प्रगती हायस्कूलम्ध्ये मी सायन्स विषय शिकवितो.सराळी ९.३०ची लोकल ट्रेन पकडून मी नेहमी घाटकोपरला जातो.प्रवास मी मुध्दामहून लोकल ट्रेनने करतो.प्रवासा दरम्यान मला असंख्य प्रकारची माणस भेटतात----दिसतात.नाना गोष्टी कानावर पडतात.मुंबईचे बहुरंगी जीवन हे अस लोकल प्रवासा दरम्यानच अनुभवायला मिळत.वेगवेगळ्या प्रांताचे ,धर्माचे लोक---- विविध वेषातले लोक या प्रवासादरम्यान दिसतात.,,,नाना तर्हेच्या गोष्टी कानावर पडतात.
मुंबईचे बहुरंगी जीवन हे अस लोकल प्रवासा दरम्यांन अनुभवयला मिळते.सुखावलेले--दुःखी--खंतावलेले असे असंख्य चेहरे प्रवासा दरम्यान दिसतात .
डोळे व कान उघडे ठेवून निवांतपणे साराअनुभव घ्यावा हा माझा रोजचा छंद. खर म्हणजे लोकलचा प्रवास अत्यंत जिकीरीचा व पार दमवणारा असतो.पण माझ्यासाठी हे टॉनिक आहे .मला माणस व त्याचे चेहरे वाचणे आवडत.चेहऱ्यामागें दडलेल्या खऱ्या माणसंचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो .
मी संमोहन शिकलोय .मानससशास्त्राचा खोलवर अभ्यास केलाय मी संमोहनाच्या माध्यमातून माणसांच्या व्यथा व दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो .समाजाचे देणं फेडण्याचा माझा तो अल्प प्रयत्न आहे.डोंबिवलीत मी संमोहन क्लिनिक चालवितो .नाममात्र फी किंवा फी न घेताच मी माणसातला हरवलेला माणूस पुन्हा जगवण्याचा प्रयत्न करतो.माझ्या या अभ्यासा दरम्यान अनेक चमत्कारिक प्रसंग व अनाकलनीय कहाण्या मला अनुभवायला मिळाल्या .प्रत्येक माणूस वेगळा विचार करतो,त्यांच मन वेगळं असत हे माझ्या लक्षात आले.पण त्याच बरोबर स्वत: भोवताली कोष तयार करणे व त्यात स्वतःला गुरफटून घेणे हा मनोविकार सर्वात सारखाच आढळतो .
पण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांचा अर्थ---मानसशास्त्र व सायन्सच्या कसोटीवर लावताना माझी दमशाक होतेय .जे घडले व दिसले त्यावर विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही.त्या घटनांचा कार्यकारणभाव माझ्या लक्षात येत नाही. या घटनाचा हिस्सा मी माझ्या नकळत झालो की जाणीवपूर्वक मी यात ओढला गेलोय हेच कळत नाही.सहा दिवसापूर्वी मी नोकरीवर जाण्यासाठी बाहेर पडलो. पण फुटपाथवर चालताना माझा पाय अनवधानाने(की जाणीवपूर्वक) दुभाजकाला आदळला. अंगठा फुटून रक्तबंबाळ झाला. मी स्वतःवर वैतागलो . वेदना गिळत मी डॉक्टर रावांकडे गेलो .बॅडेज वैगेरे करून येईपर्यत पावणेधहा वाजले.नेहमीची लोकल चुकली. मी पावणेधहाची ट्रेन पकडली. खूप गर्दी होती .पण मी कसाबसा आत शिरलो .जखमी पाय संभाळत मी सीटच्या बारला टेकून राहिलो .थोडा स्थिर झाल्यावर मी नेहमी प्रमाणे आजूबाजूचे चेहरे निरखायला सुरुवात केली .समोरच्या डाव्या कोपर्यात बसलेल्या स्त्री कडे माझ लक्ष गेले. वरवर ती सहज व शांत होती.पण तिच्या चेहऱ्याआड विलक्षण खळबळ मला दिसली.तिच्या डोळ्याच्या बाहुल्या सतत स्फुरण पावत होत्या.ती कसल्यातरी गहन विचारात गडली होती.तिच्या चेहऱ्यावरचे रंग भरभरू पालटत होते.कुठचा तरी अप्रिय निर्णय घेण्याच्या तयारीत ती होती.एवढ्यात कळवा स्टेशन आले. गर्दीचा एक लोंढा आत घुसला.
मी आपोआप पुढे सरकलो.थोडा स्थिर झाल्यावर मी पुन्हा निरीक्षण करायला सुरुवात केली. एवढ्यात माझं लक्ष उजव्या कोपर्यात गेलं.भयाची एक लहर माझ्या नसानसात वीजेप्रमाने सळसळत गेली.समोर एक माणूस पाठमोरा बसला होता .त्याची मान खाली झुकली होती.त्याच्या मानेभोवती व दोन्ही खांद्यावर मांसाचा लिबलिबित गोळा पसरला होता .त्यावर निळसर-हिरव्या टचटचित शिरा स्पष्ट दिसत होत्या. तो ओंगळवाणा मांसल गोळा मानेवर वागवत हा इसम कसा जगत असेल ही कल्पनाच मला करता आली नाही. मला त्या मानसाबद्दल अपार करुणा वाटली.त्या ओझ्या मुळे त्याची मान। झुकलेली दिसत होती.मी डोळे मिटून घेतले. काही वेळाने मी पुन्हा डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले.मी प्रचंड दचकलो.त्या मांसल गोळ्याच्या वरच्या बाजूला दोन त्रिकोणी आकाराचे डोळ्यासारखे दिसणारे अवयव होते.होय ! ते डोळेच होते. हिरवट-जांभळ्या रंगानं लकलकणारे अत्यंत विखारी नजर होती ती.ते डोळे माझ्याकडे बघून कुत्सितपणे हसत असल्याचा मला भास झाला.ते नेमके काय होते ते मला समजत नव्हते. सुरवातीला मला वाटलं त्याला कसलीतरी शारीरिक व्याधी असावी.पण ते विखारी डोळे व सारख्या स्फुरण पावण्याऱ्या शिरा बघून मला जाणवले की हा कसलातरी विचित्र प्रकार आहे. मध्येच त्या माणसान मान वर केली व डोके झटकले तसा तो गोळा लटलट हलला व ते त्रिकोणी डोळे वर खाली होऊ लागले . मी संमोहित झाल्यासारखा त्या डोळ्यांकडे पाहू लागलो. आता ते डोळे माझ्या कडे बघून मिचकावले जात होते व त्यामुळे तो मांसल गोळा डुचमल्यासारखा हलत होता.माझी अवस्था भ्रमीष्टासारखी झाली. मला भास होतोय की समोर दिसणार दृश्य सत्य आहे ते मला समजेना. मी डोळे बंद करून मन एकाग्र केलं कोणत्याही अतर्क्य घटनेमुळे मी विचलित होणार नाही हे मी मनाला समजावलं.मनातल्या शंका दूर करून मी डोळे उघडून ठामपणे त्या हिरव्या नजरेकडे पाहू लागलो .पण ते डोळे सतत माझ्याकडे बघून विखारीपणे हसत होते. त्या इसमच्या माणेवरचे ते भलेमोठे धूड कंप पावल्याप्रमाणे हलत होते.
मी इतर प्रवाश्यांकडे पहिलं पण कुणाच्याही चेहऱ्यावर आपण काही वेगळे पाहत आहोत असा भाव नव्हता. एवढ्यात एका वृद्ध इसमाने आधारासाठी त्या व्यक्तिच्या खांद्यावर हात ठेवला .पण आपण एखाद्या जिवंत किळसवाण्या वस्तूवर(?) हात ठेवला अस त्याच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हते. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की फुग्यात पाणी भरल्यावर त्या वर दाब दिल्यावर ते पाणी इकडून-तिकडे डुचमल्यासारखं तो फुगवटा हलत होता.याचा अर्थ मला जे दिसत होतं किंवा जाणवत होते ते इतरांना जाणवत नव्हतं.पण ते तिथे होते.त्यामुळे तो इसम पार थकल्यासारखा दिसत होता----हरवल्यासारखा दिसत होता.अगदी मान टाकून बसला होता. पण हे फक्त मलाच का दिसत होते?यात नियतीचा एखादा खेळ तर नव्हता .तिथं पुन्हा बघायचं नाही असे ठरवूनही माझी नजर पुन्हा-पुन्हा तिथे जात होती.प्रत्येक वेळी ते विखारी डोळे मला चिडवतात अस मला वाटलं .जणू ते मला आव्हान देत आहेत असं मला वाटलं. मला घाम फुटला. हृदय धडधडू लागलं.घाटकोपर येताच तो इसम उठला व माझ्या समोरच उभा राहिला.आता तो अमानवीय आकार माझ्या अगदी जवळ होता .ते त्रिकोणी डोळे गरागरा फिरत होते व मला वाकुल्या दाखवायला सारख्या शिरा ताणल्या जात होत्या.माझ्या अंगावर गार शिरशिरी उठली. मी झटकन प्लॅटफॉर्मवर उतरलो व बेचैनपणे झपाट्याने पावले टाकत स्टेशनबाहेर पडलो.
आज शाळेत माझं लक्ष नव्हते. माझ्या सहकाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. पण मी जे बघितले ते त्यांना सांगू शकत नव्हतो. पण दिवसभर माझ्या डोळ्यासमोरून ते थरारक दृश्य हलत नव्हते.संध्याकाळी स्टेशनवर आल्यावरही माझी नजर सर्वत्र भिरभिरत होती. तो इसम न दिसल्याने मला हायस वाटलं.खर म्हणजे त्या ओझ्याचा विषय माझ्या डोक्यातून जात नव्हता.ते काय आहे याचा शोध घ्यावा असे मला वाटत होतं.पण नकोच त्या भानगडीत पडणे अस म्हणून मी तो विचार झटकला.दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीचि साडे नवची ट्रेन पकडली.पण तो इसम कुठंच नव्हता. नेहमी प्रमाणे मी प्रवाश्यांना निरखू लागलो.अधून-मधून माझ्या डोक्यात कालचा विचार चालू होता.मी
जे बघितले ते कुणाला सांगावं अस मला वाटत होते.पण त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही म्हणून मी ते टाळत होतो. त्या दिवशी संध्याकाळी मी क्लिनिक मध्ये लवकर गेलो.आज एका घटस्फोटित स्त्री तिसऱ्या मिटींग साठी येणार होती.घटस्फोटामुळे ती कोलमडली होती.पण दोन सिटिंग नंतर ती बऱ्यापैकी सावरली होती.
मी माझ्या खुर्चीवर रोजच्या प्रमाणे ध्यानमग्न अवस्थेत होतो. संमोहन करण्यापूर्वी अस मन एकाग्र करून स्वतः ची मानसिक शक्ती व ऊर्जा वाढविण्याची गरजचे असते. एवढ्यात दारावर टकटक झाली मला वाटलं त्या बाई आल्या असाव्यात.मी डोळे न उघडताच म्हणालो"या आत! बसा."एक दोन मिनिटांत मी डोळे उघडले.समोर बघताच मी आवक झालो.माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसेना.माझं गात्रन-गात्र गोठल्यासारखे झाले.माझ्या समोर तोच ट्रेन मधला मानेवर ओझं घेऊन फिरणारा इसम बसला होता. मानेवरचे ते ओझं मानेआडून सरकत उजव्या खांद्यावरन माझ्याकडे डोकावून पाहू लागले.आज तो विचित्र आकार अधिक गलेलठ्ठ झाला होता .मी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करून समोरच्या व्यक्तीला निरखू लागलो .हरवलेली नजर--- झुकलेली मान --विलक्षण थकलेला असा तो दिसत होता.
"बोला ---नाव काय तुमचं?"
"सतीश---सतिश परब?" त्याचे शब्द तुटक तुटक येत होते.
"वय काय तुमचं?"
"चाळीस-- ."
"इथं का आलात?"
" सर,तुमच्या बद्दल ऐकलय --संमोहन उपचार करता म्हणून;--"
"होय!पण तुमची नेमकी समस्या काय आहे?
"हे बघा माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजला आहे.---मनावर मणा-मणाच ओझं असल्यासारखं वाटतय--अगदी जगणं असह्य झालय..आत्महत्या करावीशी वाटते"
सतिश कसाबसा बोलला .त्याला धाप लागली होती.टेबलावरचा पाण्याचा ग्लास मी त्यांच्या समोर धरला. भरलेला पूर्ण ग्लास त्याने झटक्यात रिकामा केला.
"घाबरू नका आपण या वर उपाय करूया.तुम्ही निश्चित बरे व्हाल."
मी मुद्दाम त्या विचित्र ओझ्याकडे पाहिलं.ते माझ्याकडेच पाहत होते. मला त्याच्या हिरव्या डोळ्यात विखारीपणा बरोबर राग व द्वेष यांची चाहूल लागली.माझ्या आश्वासक बोलण्याने ते ओझं डीचवल गेलं होते. मी सतिशला बोलत केले .तो एका स्थानिक बॅकेत क्लार्क होता. पगार पुरेसा होता.
त्याची दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत होती. त्याची पत्नी खाजगी कंपनीत कामाला होती. त्याच्या बायकोच्या त्याचा कडून बऱ्याच अपेक्षा होत्या.ती सतत कश्या न कश्याची अपेक्षा करायची. पंचवीस लाखांचा फ्लॅट ,दोन टू व्हीलर ,मुलांच्या शिक्षणाची फी ,गावाकडच्या घरच्यांना मदत या मुळे झालेल्या कर्जाची परतफेड करताना त्याच्या नाकीनऊ येत होते. पती -पत्नी मद्ये साध्या साध्या घटनेवरून विसंवाद होत होता.पत्नी त्याला सतत घालून पाडून बोलायची. आजकाल त्याचं बोलणं कमी झालं होतं.परिणामी सतिश दबला होता.त्याच्या मनावरचा ताण वाढला होता.घुसमटल्यासारखी त्याची अवस्था झाली होती .
आता माझ्या मनात घटनांची सुसंगती तयार झाली होती. सततचा ताण मूर्त रूप घेऊन सतिशच्या मानेवर अमानवीय रूप घेऊन बसला होता. व तो दृश्य स्वरूपात मला दिसत होता.हा निश्चित योगायोग नव्हता तर ती नियतीची खेळी असावी.आता त्या माणेवरच्या ओझ्याची व त्या हिरव्या डोळ्यांची भीती बाळगायची नाही हे ठरवून मी त्यांच्याशी डोळे भिडवले. पण ते डोळे विलक्षण संतापलेले दिसत होते.तो मांसल गोळा सतत आकार बदलत मला वाकुल्या दाखवत होता.
आता मी निश्चय केला की सतिशला या मानेवरच्याओझ्या पासून मुक्ती द्यायची.गेले काही वर्षे हे ओझं मानेवर वागवून तो पार दमला होता.आत्महत्येचे विचार त्याचा मनात येत होते. त्याच वागणं चमत्कारिक झालं होतं.अकाली वृद्ध झाल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता.मानेवरच हे ओझं सतिशला जाणवत होतं व मला दिसत होतं. हे अमानवी आव्हान परतून लावणे कठीण होते पण अशक्य नव्हत. मी सतिशचा पत्ता व फोन नंबर घेतला .तसेच त्याच्या मिसेसचा पण मोबाईल नंबर घेतला. सतिशला रविवारी तर त्याच्या मिसेसला सोमवारी सुट्टी असते ही माहिती मी मिळवली. सतिशला मी मंगळवारी बोलावले कारण त्या पूर्वी मला त्याचा मिसेसला भेटायचं होत .
"हे बघा परब तुम्ही आतापासून आंनदी राहण्याचा व होकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. ताण-तणाव सर्वांनाच असतात .त्यात गुरफटून जाऊ नका.
तुम्ही मनावर घेतले तर या तणावातून नक्की सुटाल"
सतीशने चमकून माझ्याकडे पाहिलं. मी हसून त्याला धीर दिला.आपली व्यथा मोकळेपणाने माझ्या समोर मांडल्यामुळे तो रिलॅक्स झाला होता.
"पण---मला हे--जमेल?"
"होय निश्चितच जमेल!"
सतिश जाण्यासाठी वळला . तस त्याच्या माणेवरच धूड परतून माझ्याकडे पाहू लागले .ते हिरवे डोळे थोडे अस्वस्थ दिसत होते. पण त्यात नव्याने आलेली क्रुर आक्रमक झाक मला दिसली. अचानक माझ्या कानावर कुणीतरी गुणगुणल्याचा आवाज आला.
"तू--तू मला दूर करणार? पण कसा?मी याच्या नसानसात भिनलोय. याचा। अंत झाल्यावरच मी याला सोडिन --समजलं!"
मी स्तब्ध झालो .ते ओझं नुसते दिसत नव्हते तर माझ्याशी संवाद साधू शकत होते.मी थोडा गोंधळलो.परत एकदा भयाची गार शिरशिरी माझ्या अंगावर उठली. मी स्वतःला सावरलं. नजरेत सारी ताकत लावत मी त्या डोळ्यात रोखून बघत म्हणालो
"परब,---अस्वस्थ वाटलं---भलतेच विचार मनात आले तर मला त्वरित फोन करा."
सतिशने मागे परतून बघितले व मान हलवली. तसा तो आकार लुटुलुटू हलू लागला व संतापाने खदखदा हसला . सतीश गेल्यावर मी विचार करू लागलो.जे काही करायचं ते लवकर करावं लागणार होते. त्या मानेवरच्या ओझ्याला बाहेरून मिळणारी रसद बंद करावी लागणार होती. त्या साठी मला मिसेस परबांना भेटायच होते .कारण सतिशच्या बोलण्यावरून सर्वात जास्त रसद तिच्याकडून त्या खांद्यावरच्या ओझ्याला मिळत होती.सोमवारी मी सतिशच्या घरी गेलो. दारावरची बेल वाजवली. थोड्या वेळाने दरवाजा थोडा किलकीला झाला.दरवाज्याला सेफ्टी साखळी बसवलेली होती.
"काय आहे?" एक रुक्ष आवाज आला.दरवाज्या पलीकडे त्रासिक चेहऱ्याची पण नीटनेटकी असलेली स्त्री होती.
"मला मिसेस परबांना भेटायच."
"तुम्ही कोण? व का भेटायचं त्यांना?"
समोरची स्त्री मिसेस परब असणार याची मला खात्री झाली.
"हे बघा, मला मिस्टर परबांच्या संदर्भात तुमच्याही बोलायचं"."
"ठीक आहे .थोडा वेळ मिळेल. मला खूप काम आहे."
पुन्हा तोच रुक्ष व त्रयस्थ आवाज.
दरवाजा उघडल्यावर मी आत गेलो.मी निसेस परबांच निरीक्षण केले . रुंद कपाळपट्टी --भुवया ताणलेल्या, समान्या स्त्रियांपेक्षा थोडे जाड ओठ---भुवया ताणलेल्या मला त्या शीघ्रकोपी वाटल्या.एकाच गोष्टी वर अडून राहणाऱ्या पण आतून हळव्या वाटल्या.मी कोच वर बसलो. आजूबाजूच्या वस्तू योग्य त्या ठिकाणी व व्यवस्तीत होत्या.म्हणजे योग्य पध्दतीने गेल्यास त्यांचे सहकार्य मिळण्याची श्यक्यता होती.
"हे बघा मी मानोसपोचर करतो .मी शिक्षकही आहे"
"बोला सर."
"हे बघा तुमचे मिस्टर माझ्याकडे उपचारासाठी आले होते.ते प्रचंड तणावाखाली आहेत."
"पण मी काय करू शकते?" त्यांनी प्रतिप्रश्न केला."
"हे बघा त्यांच्या सभोवतालचे वातावरण थोडे उत्साही ठेवणे गरजेचे आहे."
तुम्हाला काय म्हणायचे ,मी त्यांना त्रास देतेय."
"तस नाही ,पण ते घरी आले की त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोला."
"कोणत्या?"
"त्यांच्या कामाबद्दल, मुलांच्या शिक्षणा बद्दल---त्यांना बोलत करा .संवाद करा."
"हे बघा काही गोष्टी मनापासून याव्या लागतात.ओडून- ताणून नको."
"मी एवढेच सांगेन परबांची मानसिक स्थिती पार ढासळली आहे.आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात येताहेत .माझ्यासाठी ही केस गुंतागुंतीची आहे .किमान यापुढे चार ते पाच दिवस त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत."
मिसेस परब गप्प राहिल्या.माझ्या बोलण्याच्या प्रभाव पडतोय हे पाहून मला आशा वाटू लागली .
"मॅडम ,---तुमच्या मुलांसाठी तरी मिस्टर परब बरे होणे गरजेचे आहे."
मी त्यांना मानेवरच्या ओझ्याबद्दल सांगू शकत नव्हतो.पण प्रकरणाचे गांभीर्य त्यांना कळाव म्हणून म्हणालो . त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा --- काहीही घडू शकत. शंका आली तर तत्काळ मला फोन करा . त्या काही बोलल्या नाहीत .पण विचारमग्न झाल्या.मी त्यांचा निरोप घेतला. त्या दिवशी मी परबांच्या मानेवरच ओझं कमी करण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन करत होतो. मानसिक पातळीवर मला खूप तयारी करावी लागणार होती .त्यासाठी मी ध्यानधारनेची वेळ वाढवली. मंगळवारी मी वेळेआधीच क्लिनिकमध्ये गेलो.एका अमानवी शक्तीशी माझी झुंज होती. मी सारी तयारी केली .सहा वाजता सतिश आला. मी त्यांना रिलॅक्स स्थितीत बेडवर बसविले.मी त्या ओझ्याकडे पाहिले .
सर्पसारखा फुत्कार टाकत ते माझ्याकडे पाहत होते .पण मांसल गोळ्यावरच्या हिरवट-जांभळ्या रेषा फिकट झाल्या होत्या.याचा अर्थ मिसेस परबांनी माझ्या सूचना पाळल्या होत्या. माणेवरच्या ओझ्याचा घरगुती खुराक कमी झाला होता.
"माझ्या सूचनांचे तंतोतंत पालन करा" मी म्हणालो.
"प्रयत्न करतो सर"
मी हसलो. ते माणेवरचे ओझं सतिशला मन एकाग्र करू देणार नव्हते. माझ्या प्रयत्नात सतत खो घालणार होत. मी मंद संगीत सुरू केलं .सतिशला सर्व अंग रिलॅक्स करण्याची मी सूचना दिली .
"हे बघा--तुम्हाला----रिलॅक्स वाटतय----मनावरचा ताण हळूहळू कमी होतोय.--डोळ्यांच्या पापण्या हळूहळू जड होतायत."
माझ्या धीर गंभीर आवाजाचा व मंद संगीताचा परिणाम सतिशवर होत होता. त्याचे डोळे हळूहळू बंद झाले.माझ्या सुचनेबरोबर तो बेडवर रिलॅक्स अवस्थेत झोपला .सूचना देता देता माझं लक्ष त्या ओझ्याकडे गेलं.अचानक तो मांसल गोळा दोन्ही बाजूंनी लांब होत कमरेपर्यंत आला व सतीशला कमरेला गुदगुदल्या करू लागला.मी अचंबित झालो.सतिशला स्वतःला सावरणे अवघड झाले. तो इकडून तिकडे हलत हसू लागला.
"सर ,--मला गुदगुदल्या होतायत --कुणीतरी मला गुदगुदल्या करतय."
माझ्याकडे बघणाऱ्या त्या विखारी त्रिकोणी डोळ्याकडे बघत मी म्हणालो--"डोळे उघडू नका-- मीच गुदगुदल्या करून तुमची एकाग्रता पाहतोय.तुम्हाला अन्य कुणाच्या स्पर्शाची जाणीव होणार नाही--- तुमची एकाग्रता वाढेल"
मी पासेस टाकत.शब्दांचे सामर्थ्य वाढवत होतो .सुमारे तासभर अथक प्रयत्न केला.तो अमानवीय आकार सतत अडथळे आणत होता.पण मी तोल न ढळता सतिशला संमोहनाच्या दुसऱ्या अवस्थेत नेत सूचना दिल्या.संमोहनातून बाहेर आल्यावर सतिशचा चेहरा उजळलेला दिसला.
"सर , आज खूप बरं वाटतय .डोकं हलक झाल्यासारख वाटतय "
"परब, उद्याच्या सिटिंग नंतर तुम्ही पूर्ण बरे व्हाल" मी त्यांना धीर देत म्हणालो .
"नाही,---मी अस होऊ देणार नाही" माझ्या कानी जळफळाट व द्वेषपूर्ण शब्द पडले .
ते हिरवे डोळे संतापले होते. पण त्यांचा जोश कमी झाला होता.
सतिश गेल्यावर मी स्वतःला खुर्चीवर झोकून दिले. खूप दमल्यासारख वाटत होतं .अचानक माझ्या डोक्यात विचार आला जर मी मानवावर संमोहन करू शकतो तर त्या ताणाच दृश्य रूप घेतलेल्या व फक्त माझ्याशी संवाद साधू शकणारया त्या हिरव्या डोळ्यांवर संमोहन करू शकतो. त्याद्वारे मी त्याचा आत्मविश्वास व आक्रमकता कमी करू शकतो.हे जमलं तर सतिशच्या माणेवरच ओझं सहज दूर करता येईल .
दुसऱ्या दिवशी सतिश आला तेंव्हा मी त्या मांसल गोळ्याकडे पाहिलं . त्याचा आकार कमी झाला होता .तो थोडा मलूल दिसत होता.पण त्या त्रिकोणी डोळ्यातील विखरीपणा मला आव्हान देत होता. निश्चितच मला त्याचकडून प्रतिकार होणार होता.
मी पुन्हा सतिशला पहिल्या अवस्थेत नेत स्वतः सूचना घ्यायला सांगितले. आता मी सरळ त्या हिरव्या डोळ्याशी नजर भिडवली .त्यांच्या अधिक जवळ जात खोल गहिऱ्या आवाजात सूचना देऊ लागलो.
"तुझा आकार कमी होतोय ,तुझी शक्ती शीण होतेय. हळूहळू तुझा विसर्ग होतोय."
भेदरलेले ते डोळे गरागरा फिरले.
"नाही मी याला सोडणार नाही हा संपल्यावर मी आपोआप जाईन."
मी हलक्या व भेदक आवाजात म्हणालो "या पुढे तुझं काहीच चालणार नाही ,तू संपत आलास आहे ."
खरोखरच त्याचा आकार कमी होत होता.ते भलंमोठं धूड कमी होत होत फुग्या प्रमाणे होत हलू लागले .
अगदी पाण्याने भरलेल्या फुग्यासारखे .
"किती जणांना वाचवशील तू?याच्या सारख्या लाखो मानवांच्या मानेवर आमची पिलावळ बसलीय.उद्या तुझ्याही मानेवर----"
मी क्षणभर शहरलो---दचकलो.पण त्वरित सावरता झालो.ही शब्दांची लढाई होती व ती मला जिंकायची होती.मी हसून म्हणालो--"तू हरलास --- हरणाराच असा विलाप करतो."
ऐवड्यात माझं लक्ष खिडकीतून बाहेर ग्राऊंडवर गेलं.काही मुलं तिथ खेळत होती.एका मुलाने उडवलेला फुगा गुलाबाच्या झुडपात घुसला. एक काटा टचकन फुग्यात घुसला व क्षणात फुगा फुटला.त्यातील हवा आवाज करीत बाहेर पडली.फुगा अस्तित्व विहिन झाला .अगदी त्याच क्षणी संमोहीत झाल्याप्रमाणे मी टेबलावरची टाचणी उचलली व यंत्रवत त्या मानेवरच्या फुगवट्याजवळ नेली.ते हिरवे डोळे भेदरले.स्वतःला आक्रसून घेत माझी विनवणी करू लागले .माझं लक्ष विचलित करण्यासाठी ते आकार बदलू लागले . मी निश्चयाने टाचणी त्या मांसल फुग्यात घुसवली. एक आर्त आवाज माझ्या कानी आला .दुसऱ्याच क्षणी हिरवट-जांभळा द्रव पिचकरीसारखा वर उडाला. माझ्या अंगावर,बेडशीटवर शिंतोडे उडाले.एक विरत जाणारा आवाज कानी घुमला .
"मी---मी संपलो नाही ,दुसऱ्या कुणाच्या मानेवर बसेन ."
आवाजाबरोबर तो आकारही पूर्णपणे विरत गेला. आता सतिशच्या मानेवर काहीच नव्हतं. मी कपड्यांवरचे व बेडशी ट वरचे डाग साफ केले. सतिशचा चेहरा कमालीचा उजळला होता.मी रिव्हर्स पास देत संमोहनातून त्याला बाहेर काढले. तो एवढा रिलॅक्स झाला होता की तो चक्क माझ्या पाया पडला.
"सर,तुम्ही जादू केलीत--- काळझोपेतून उठल्यासारखं वाटतय."
एवढ्यात त्याच लक्ष बेडशीटवर चुकून राहिलेल्या हिरवट डागावाकडे गेलं.
"सर,हे काय आहे?"
मी झटकन हातातला रुमाल त्यावर टाकला.
"शाई पडलीय--- हे बघा परब आठवडाभर रजा टाका व कुटुंबा समवेत मस्त फिरून या."
सतिश गेल्यावर मी रुमाल उचलला.त्या एकमेव उरलेल्या हिरवट डागा कडे बघता-बघता हात नकळत मानेकडे गेला.भयाची एक लहर सळसळत अंगातून गेली.

समाप्त