Radha - Ranga - 1 in Marathi Love Stories by Ishwar Trimbak Agam books and stories PDF | राधा - रंगा - 1

Featured Books
Categories
Share

राधा - रंगा - 1

१.

दिवस बुडायला आला होता. सूर्याचा तांबूस केसरी गोळा हळूहळू डोंगराआड चालला होता. उसाच्या शेतातली हरभरा टोपायची कामं उरकली होती. कालच्याप्रमाणे आजही रंगाने आग्रहाने कामगार बायकांना बैलगाडीत बसायला सांगितलं. दुडक्या चालीनं बैलगाडी फाट्याच्या बाजू बाजूने चालली होती. एखादा खड्डा आलाच तर गाडी एकाबाजूला हिंदकळायची. दोन्ही चांकांच्यामधून गाडीच्या खाली रंगाचा बंड्या कुत्रा बैलांच्या वेगाबरोबर चालत होता. फाट्यातल्या पाण्यावर पाणपक्षी मासे पकडण्यासाठी घिरट्या घालत होते. छग्या बग्याच्या पाठीवर थाप मारत रंगा मजेत एखादी शीळ वाजवत होता. बायकांचं आपापसांत काहीबाही कुजबुजणं चालू होतं.

'हो. ती तसलीच आहे. पैशाचा माज दुसरं काय?'

'व्हय बया. एवढी शिकल्याली हाय पर बोलणं एकदम कुचक्यागत. लई श्यानी असल्यावानी बोलत आसती.'

'बाहेरच्यांचं काय घिऊन बसता. घरात बी ती तशीच.'

'एवढी शिकली पण आय बापानी काय संस्कार केल्यात का नाय काय जणू?'

'जेवढी शिकल्याली तेव्हडीच हूकल्याली.'

हौसाबाई असे म्हणताच सगळ्या बायका खिदळल्या. शेवटचं वाक्य कानावर पडताच रंगा अल्काबाईच्या शेजारी बसलेल्या राधाकडे बघत हसत म्हणाला,
"काय ग मावशे काय म्हणती मला??? आन एवढं काय झालं हसायला. मला बी कळू दे की."

"तुला रं कशाला काय म्हणू. ती आमच्या हिथली नंदाबायची सून. लई शिकली हाय म्हणत्यात. फाटक्या तोंडाची. वागण्या बोलण्याचं वळण ते काय बी नाय."

"खरंय मावशे. माणूस कितीही मोठा झाला. कितीही मोठ्या पदावर असला. शिकलेला असला काय किंवा कितीही श्रीमंत असला काय. त्याला चांगलं संस्कार हे पाहिजेतच. म्हणजे त्याचं बोलणं, त्याचं वागणं. नाहीतर माणूस किती का शिकेना, मोठा होईना. पण जर संस्कारच त्याच्या गावी नसतील तर त्याचा काय उपयोग. त्या माणसात माज, अहंकार शिरतोच. मग आपोआप इतरांना कमी लेखणं, तिरस्कार करणं, स्वतःला शहाणं समजणं हे आलंच. इतर लोक मग आपोआप अशा माणसापासून दूर व्हायला लागतात. खरं का नाय?"

"आक्षी बराबर बोलला बग रंगा.", अलका मावशी त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाली.

"रंगा. एवढं कसं पोक्त माणसावाणी बोलतुस? एवढंसं वय तुझं. किती जाण रं.", हौसाक्का कौतुकानं म्हणाली.

"आग. काय नाय ग हौसाक्का. आपल्या शाळेत ग्रंथालय हाय का नाय. तिथून पुस्तकं मिळतात वाचायला. त्यात मोठ मोठ्या लेखकांनी खूप काही लिहून ठेवलंय. वाचत असतो आपलं. त्यातून कळतं.", रंगा हसत म्हणाला.

रंगाचं बोलणं हौसक्का च्या बाजूला बसलेली राधा लक्ष देऊन ऐकत होती. त्याचं बोलणं, ज्ञान, विचारांमुळे राधाला त्याच्याबद्दल अजूनच आपुलकी वाढू लागली. त्याच्याबद्दल ओढ वाढू लागली. बैलगाडी ओढा पार करून वर आली. मरीआईच्या मंदिरासमोरच्या आंब्याच्या झाडाखाली थांबली. एक एक करत बायका रंगाला 'येतो रे' म्हणत निघून जाऊ लागल्या. राधा अजूनही गाडीतच होती. तिची दृष्टी दुसरीकडेच कुठेतरी खिळली होती. रंगा एकदोनदा खाकरला. राधाचं तिकडे लक्षच नव्हतं. शेवटी तो म्हणाला,

"ओ राधाबाई. घर आलं तुमचं. की येताय वाड्यावर?"

त्यासरशी राधा भानावर आली. चटकन खाली उतरली. काहीही न बोलता घराकडे चालू लागली. पाठोपाठ बंड्याही चालला. रंगाला वाटलं, ती काहीतरी बोलेल. पण एकही शब्द न बोलता चालली होती. रंगा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असताना, तिने अचानक मागे वळून पाहिलं. हलकंस स्मित केलं. तिच्या गालावर छोटीशी नाजूक खळी पडली. नकळत रंगानेही तिला हसून प्रत्युत्तर दिलं. तिच्या वागण्यात झालेला बदल रंगाच्या लक्षात आला. तोवर राधाला घरापर्यंत सोडून बंड्या माघारी आला. मनाशीच हसत रंगाने छग्याच्या पाठीवर थाप मारली. बैलगाडी खडखडाट करत वाड्याच्या दिशेने चालू लागली.

रंगा. बापूपाटलांचा मधला मुलगा. मोठा अण्णा आणि लहान तिमा. तिमा शाळेत होता. अण्णाचं लग्न झालं होतं. त्याला तिमा पेक्षा चार वर्षांनी लहान मुलगा होता. गुलब्या त्यांचं नाव. रंगाकडे बैलजोडी होती. शेतीची सगळी कामं रंगाच बघायचा. बैलजोडी असल्यामुळे तिमा, गुलब्या, चुलत्याचा मछिंदर आणि इजुआण्णा सगळे रंगाभोवती जमायचे. बी ए पर्यंत शिकला असल्यामुळे आणि वाचन असल्यामुळे रंगा तसा शांत आणि मनमिळावू होता. मैत्री झाली कि, भरभरून बोलायचा. जे जे वाचलं आहे ते ते तो तन्मयतेनं सांगायचा. समोरचाही रंगाचं बोलणं, वागणं, आणि ज्ञान यांच्यामुळे रंगांच्या जवळ यायचा. त्याच्याशी नकळत मैत्री करायचा. रंगाकडे एक रेडिओ होता. नेहमी त्याच्यासोबत. विविध भारतीवर गाणी वाजत असलेली. त्यामुळे बरीचशी लोकं, मुलं रंगाचा रेडिओ ऐकायला यायची. तो भला आणि त्याचं काम भलं. कसलीही कुरबुर नाही, तक्रार नाही कि वाद नाही. 

        तिमा आन गुलब्याबरोबर महिन्याभरापूर्वी उसाचं ब्येनं रानात लावलं होतं. शेतात गवत वाढू लागलं होतं. त्यामुळे आठवडाभर उसाच्या खुरपणीची कामं चालू होती. रोज सकाळी मरीआईच्या देवळाजवळ कामगार बायकांना बैलगाडीत घेऊन रंगा शेतात जायचा आणि संध्याकाळी पुन्हा सोडायचा. त्यात त्याच्याच वयाची राधाही होती. राधाला घरापर्यंत सोडून बंड्या माघारी आला, की रंगा बैलगाडी पुढे हाकायचा. या दिवसांमध्ये रंगा आणि राधा यांच्यामध्ये बोलणं वाढलं. एकमेकांबद्दल जवळीक निर्माण झाली. सहवास हवाहवासा वाटू लागला.

        मरिआईच्या देवळा शेजारी आंब्याच्या मोठा झाडाखाली बांधलेल्या पारावर संध्याकाळी टवाळ पोरं बसत. तिथंच राहणारा संत्या राधावर नजर ठेऊन होता. संत्याबरोबर दोन तीन टाळकी सतत मागेपुढे करत असत. दाढीमिशा वाढलेल्या, एकमेकांना जोडलेल्या जाड भुवया. तोंडात नेहमी मावा-गुटक्याचा भरलेला तोबरा. त्यामुळे दातांवर आलेली लाल पिवळ्या रंगाची झाक. घारे डोळे आणि सतत येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रिया, पोरींकडे बघणारी वखवखलेली नजर. अकरा बारावीला कॉलेजमध्ये जाणाऱ्या पोरींची छेडछाड प्रकरणी दोन चारदा पोलिसांचा मारही खाल्ला होता. पण वठणीवर येईल तो संत्या कसला! बापासोबत भांडणं करून लाथा बुक्क्यांनी तुडवून त्याने बैलजोडी हिसकावून घेतली होती. शेतातली कामं जास्तीचे पैसे घेऊन करे. ते ही मन मानेल तसे. त्यामुळे आठवड्यातून एखाद दुसरं काम मिळालं तर मिळे, नाहीतर टवाळक्या करण्यात आणि ओढ्याकाठी पत्त्यांच्या अड्ड्यावर पडीक. घरातही त्याचाच हुकूम चाले. दर आठवड्याला दारूच्या गुत्त्यावरून दारू ढोसून फुल टाईट होऊन वस्तीत शिव्या देत फिरायचा. समोरून येणाऱ्या जाणाऱ्याला ठेवणीतल्या आयमाय वरून घाणघाण शिव्या हासडायचा. त्यामुळे तो रस्त्यावरून आलेला दिसला कि, लोकं वाट वाकडी करून निघून जात.

        राधा वयात आल्यापासून त्याचा तिच्यावर डोळा होता. पण राधा मात्र कधीच त्याला भाव देत नव्हती. संत्याने खूप वेळा तिच्या म्हातारीला राधाशी लग्नाबद्दल बोलला होता. पण राधाची म्हातारीसुद्धा अशी तशी नव्हती. बारा गावचं पाणी प्यायलेली होती. राधाचा हात असाच कुणा ऐऱ्या गैऱ्याच्या हातात देणारी नव्हती.
    
        एवढ्या दिवसांत रंगा आणि राधा मध्ये चाललेलं, संत्याच्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं. त्याने एक दोनदा तिला अडवून ह्या बद्दल विचारलं होतं. पण राधाने त्याला उडवून लावलं होतं. रंग्या पासून लांब राहण्याबद्दल राधाला दमही देऊन झालं होतं. पण त्याच्या असल्या धमक्यांना आणि अडवणुकीला घाबरणारी राधा नव्हती. संत्याचा मात्र रागाचा पारा वाढतच होता. एका रविवारी संध्याकाळी संत्या दारू ढोसून राधाच्या घरासमोर धिंगाणा घालत होता. 

"का गं ये म्हातारे? काय होतंय गं राधेचं लगीन माझ्यासंग करायला?"

"आरं मुडद्या. तुझी तिरडी उच्चाल्ली तुझी. तुला भरली रगात पेटी. साऱ्या गावाचा गु खाऊन झाला. आता माझ्या पोरीव बी डोळा व्हय रं तुझा?"

दारूच्या धुंदीत संत्या मोडकं तोडकं बोलत होता.

"ये म्हातारे... तुला... तुला... काय पायजे सांग... आत्ता आणून द्येतो. ह्ये बग...", खिशातून मंगळसूत्र काढत संत्या पुढे म्हणाला,

"ह्ये आत्ता बी राधेच्या गळ्यात घालायला तयार हाय म्या. बोल... बोल... आत्ता लगीन करतो म्या. तुझ्या मागची ब्याद तरी जाईल. हुंडा बी देव नगं मला. बोल... ये राधे... ये भाईर... ह्यो बघ... तुझा नवरा आलाय... नवरा... नवरा आला वेशीपाशी... आला वेशीपाशी... बोल तुला न्हेऊ कशी... अगं नेऊ कशी..."

संत्या गाणं म्हणत व्हिवळू लागला. त्याच्या अशा गोंधळामुळे बराच वेळ आतमध्ये बसलेली राधा तणतणतच बाहेर आली. तिला बघताच संत्या म्हणाला,

"आली गं. माझी बाय... चल... किती दिस ह्या म्हातारीसंग खोपटात राहणार हाईस. ये आशी फुड. धर हे मंगळसूत्र घालतू तुला. म्हणजे हिथच लगीन उरकून टाकू. कसं? तुला बंगल्यात ठुइन बंगल्यात. राणी बनवून."

"आरं. प्येताडा. धड उभं राहता येईना. म्हणं लगीन करणार. तुझ्या संग लगीन करण्यापरीस जीव दीन म्या. आईबापानी कुठल्या जन्माचं पाप क्येलं होतं काय माहित. तुझ्यासारखी अवलाद जन्माला आली.", राधा तावातावाने फाडफाड बोलू लागली.

ती च्याकडे बोट दाखवत संत्या ओरडला, "ये राधे. गप्प... गप्प... गप्प बसायचं. नवऱ्याम्होरं आवाज चढवून बोलायला लाज न्हाई वाटत. पुन्हा आवाज क्येला तर मुस्काड फुडीन. तुझ्या आईला तुझ्या."

"नवरा??? त्वांड बघितलंय का आरश्यात काळ्या.", राधा तिडकीनं म्हणाली.

संत्या आता घाणेरड्या शिव्या देत नाही नाही ते बरळू लागला. आता हे असह्य होऊ लागलं होतं. ते ऐकून राधाचं डोकंच फिरलं. बाहेरच्या पडवीत जळणासाठीची लाकडं ठेवली होती. तिनं त्यातलं एक सरळ सोट दांडकं काढलं नि अंगणात त्याला मारायला धावली. म्हातारीपण उसाचा कांडकं घेऊन आली. राधाने एक सणसणीत दांडक्याचा फटका त्याच्या ढुंगणावर ठेऊन दिला. फटका बसताच संत्या मोठ्यानं ओरडला. म्हातारीने त्याच्या पाठीत उसाचा फटका मारला. म्हातारीला अडवत त्याने तिच्या हातातलं कांडक धरलं आणि तिच्या हाताला धरून दूर ढकलून दिलं. राधाला आता राग अनावर झाला होता. तिने मागे सरून आणखी दोन फटके ठेऊन दिले. वेदनेने संत्या मोठं मोठ्याने बोंबलू लागला.

दारूच्या नशेत नको नको ते बोलणाऱ्या संत्याला दोघींनी बुकलून काढला. संत्या मोठमोठ्याने ओरडत शिव्या देतंच होता. आजूबाजूला बघ्या लोकांची गर्दी जमली होती. तोवर संत्याचे आईबापही आले. संत्याला धरून दोघंही घरी घेऊन जाऊ लागले. दोघांच्या पकडीतून स्वतः ला सोडवण्याचा प्रयत्न करत हात पाय झाडू लागला. नाही नाही त्या शिव्या देत बरळू लागला.

"संत्या. पुन्हा इथ येऊन धिंगाणा घातला तर न्हाय तुझं टक्कुरं फुटस्तोवर हाणला तर जनाबाई नाव नाय सांगणार. उकिरडंफुक्या. उंडग्या, तुझी लाकडं ग्येली मसनात.", राधाची म्हातारी मोठमोठ्याने संताच्या नावाने बोटं मोडत शिव्यांची लाखोटी वाहत होती.
-----

       सकाळची वेळ होती. म्हसोबाच्या डोंगराआडून सूर्यबिंब हळूहळू वर येत होतं. आंब्याच्या झाडावर नानाविध पक्ष्यांचा चिवचिवाट चालला होता. नेहमीप्रमाणे राधा मरीआईच्या मंदिरात पूजेसाठी चालली होती. ओढ्यावर असलेल्या घाटावरून पायऱ्या उतरून ती खाली आली. गडवा भरून पाणी घेतलं. सूर्याला अर्घ्य देऊन ती पुन्हा वर आली. मंदिराकडे चालू लागली तोच समोर वाट अडवून संत्या उभा होता. त्याला अचानक असं समोर आलेलं पाहताच ती जरा दचकलीच. म्हणाली,

"संत्या. वाट सोड."

"राधे. तुझं आन रंग्याचं काय चालू हाय त्ये मला काय माहीत नाय काय?"

"आन तुला रं का नको त्या चौकशा? तू तुझं काम बघ कि."

"म्हातारीला सांगू का?"

"चल दोघं जाऊन सांगू आजीला. जाऊदे मीच सांगत्ये घरी गेले की."

" त्वांड लई चुरू चुरु चालायला लागलंय तुझं"

"तुझ्या बापाचं खात न्हाई. कष्ट करून खाते."

"राधे ssss."

"ये. आवाज कुणावं चढावतुय. तुझी बायको न्हाय म्या. चल वाट सोड. तुझ्यासंग वाद घालत बसाय मला टाइम न्हाय. लई कामं पडल्यात मला."

तोंड वाकडं करत राधा निघून गेली. संत्याची नजर तिच्या पाठमोऱ्या शरीरावर फिरत होती. मनातल्या मनात तिच्याबद्दल नाही नाही ते विचार करत संत्या पायऱ्या उतरून गुडघाभर ओढ्याच्या पाण्यात शिरला. ' नाय हिला माझा हिसका दावला तर नावाचा संत्या नाय.' म्हणत सपासप तोंडावर पाणी मारत राहिला.

-----

        आमावस्या असल्यामुळे रंगा नैवद्य आणि नारळ घेऊन संध्याकाळी मरीआईच्या देवळात आला होता. बरोबर बंड्याही होता. लोकांची तुरळक गर्दी होती. लोकं जायची वाट बघत काही वेळ बाहेरच थांबला. तोवर बंड्या राधाच्या घरी गेलाही. म्हातारी त्याला हाकलून देऊ लागली.

"कुठला उतारा आलाय कुणाश्ठोक. हाड मुडद्या. सारा गाव सोडून हिथच बरं आलाय."
म्हातारी बाहेर काय बडबड करतेय म्हणून राधा बाहेर आली. बंड्याला पाहून आनंदली. 
"आज्जे. मी आल्ये देवळात पणती लाऊन."

"हम. जा. पर लवकर ये बया. जेवायची थांबली हाय म्या तुझ्यासाठी."

"हो गं आज्जे. येते मी आणि उशीर झालाच तर जेऊन घे तू."

"हं."

बंड्या पाठोपाठ राधा मंदिरासमोर आली. रंगाला पाहून सुंदर हसली. तिच्या गालावरची खळी पाहताच रंगाही मंद हसला. त्याच्या शेजारी जाऊन थांबली. किंचित चेष्टेच्या स्वरात टोमणा मारत ती म्हणाली,

"काय पाटील? आमावसेला चंद्र हिकड कुणीकडं उगवला."

"चंद्र नसेलही दिसत. पण चंद्रकोर मात्र दर आमावस्येला इथंच तर दिसते. आजच्या दिवस तिचं दर्शन घेतलं कि, पुण्य मिळतं म्हणतात."

त्याच्या अशा बोलण्याने राधा जराशी लाजली. पण चेहऱ्यावर काहीही न दाखवता ती म्हणाली,

"आणि असं कोण म्हणतं?"

तिच्याकडे पाहत रंगा उत्तराला, "मी."

गालावरचं हसू दाबत ती मंदिराच्या कळसाकडे पाहत राहिली. तरीही तिच्या चेहेऱ्यावरचे हसरे भाव रंगाने जाणलेच. गर्दी ओसरली होती. मंदिरात कुणीही नाही असं पाहून दोघेही गाभाऱ्यात गेले. रंगाने समोरच्या ताटात नैवैद्य ठेवला. राधाने देवीसमोरच्या समईत तेल ओतलं नि वाती पेटवल्या. वातींच्या मंद प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला. रंगा तिला पाहण्यात दंग झाला होता. तिने हळूच त्याला कोपरा मारला. भानावर येत रंगाने देवीसमोर हात जोडले. दोघांनीही एकत्रच देवीला नमस्कार केला.

क्रमशः