Friendship with Chipanzee in Marathi Adventure Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | दोस्ती चिपांझीशी

Featured Books
Categories
Share

दोस्ती चिपांझीशी

दोस्ती चिपांझीशी
(दि ग्रेट रॉयल सर्कस मधिल दिवंगत अ‍ॅनिमल ट्रेनर आणि रिंगमास्टर, कुडाळ तालुक्यातल्या वालावल गावचे प्रोफेसर अर्जुनमामा वालावलकर यांच्याशी ०९/०९/१९९२ रोजी सांगली मुक्कामी झालेल्या गप्पांवर आधारित )
सर्कस वर पुस्तक लेखनाचा माझा बेत ठरल्यावर वेळ मिळेल तेंव्हा सर्कस मुक्कामी असेल तिथे मी जात असे. माझी राहण्याची सोय तंबू नजिकच्या एखाद्या उत्तम हॉटेल मध्ये करण्यात येई. चहा, नाष्टा, नी दुवक्त भोजन मात्र मी सर्कस तंबूतच घेणे पसंत करी. सर्कसमधल्या कलाकारांपासून तो नोकर कामगारांपर्यंत सर्वांचे चहा, नाष्टा नी शाकाहारी/ नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे दर्जेदार जेवण सर्कसच्या रसोईतच बनवले जाई. तीन चार प्रकाराच्या भाज्या, कोशिंबीरी, चटण्या, लोणचे, भात, पुलाव, पुरी किंवा रोटी, नान आणि दुवक्त स्वीट डिश असा भरगच्च मेन्यू शाकाहारींसाठी असायचा. माझी तर लेखक म्हणून खास बडदास्त कूक मंडळी जातीनिशी राखित. सर्व्ह करणारे तर नको नको म्हटले तरी थाळी भरून आणित नी आग्राहाने वाढीत. अन्न वाया घालवणे मला बिलकूल आवडत नाही पण सर्कसमध्ये जेवताना दरवेळी पानात काहीना काही जिन्नस टाकावा लागे. सर्कसवाल्यांचे त्यावर स्पष्टिकरण असे असायचे कि, तुम्ही थाळीत जिन्नस टाकलेत की तुमचे भरपेट जेवण झाले असं आम्ही मानतो. सर्कस मालक प्रताप तर दहा प्रकार मागवून दोन चमचे मारून आख्खी डिश वाया घालवीत असे. अर्थात सर्कसचा शिकारखाना एवढा मोठा होता की टाकलेले अन्न कितीही असो, ते कारणी लागत असे.
या खेपेला अगदी प्रथमच अर्जुनमामा अनुभव कथन करणार असे पेंडुरकर बोलले. यापूर्वी झालेल्या दोन तीन खेपांमध्ये अर्जुन मामा जेवढ्यास तेवढे बोलणारे मितभाषी असे मी समजत होतो. पण मागच्या खेपेला प्रोफेसर मामा पेंडुरकरांवर लिहिलेला लेख अर्जुनमामानी दोन तीन वेळा वाचून काढला नी माझ्या लेखन कसबावर ते भलतेच लट्टू झाले. असं सर्कस शो अ‍ॅरेंजर प्रोफेसर अनंतकाका मला बोलले. आपले अनुभव, कार्य पुस्तक रुपाने शाश्वत रहाणार याचं त्याना भारी अप्रूप वाटलं. “ मामांची गोष्ट वाचताना ते अगदी प्रत्यक्ष बोलतं हत आसा वाटतां” अशी मनमोकळी प्रतिक्रिया त्यानी दिली. त्यामुळे आमच्या दरम्यानचं अंतर कमी झालं आणि एक शब्दही हातचा राखून न ठेवता त्यानी अत्यंत निर्मळ हेतूने नी मोकळ्या मनाने माझ्याशी प्रांजलपणे संवाद साधला. त्या नंतरही माझ्या ज्या ज्या वेळी खेपा झाल्या त्या त्या वेळी अर्जुनराव भरभरून बोलायचे.
१९४७ या वर्षाला माझ्या आयुष्यात अत्यंत महत्वाचे स्थान आहे.१५ऑगस्ट ला भारत स्वतंत्र झाला आणि दीड महिन्याने म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मी “ दि ग्रेट रॉयल सर्कस ” मध्ये कसरत शिकण्यासाठी शिकावू उमेदवार म्हणून दाखल झालो. माझे वडिल बंधू दिगंबर वालावलकर हे प्रोफेसर नारायणराव यांच्या ट्रॅपीझ च्या ट्रूप मध्ये पर्शुराम लायन सर्कस, जी. ए. सर्कस मध्ये काम करायचे. त्यावेळी मादुस्कर सर्कस (१९२० ते१९४६) ही प्रो. विश्वनाथ मादुस्कर आणि प्रो. सीतारामपंत वालावलकर यांच्या संयुक्त मालकीची होती. पुढे १९४६ मध्ये प्रो. मादुस्कर वारल्यानंतर सीताराम पंतानी नारायणरावाना मादुस्करांची भागिदारी घेण्याची गळ घातली आणि त्या दोघांच्या संयुक्त मालकी खाली मादुस्कर रॉयल सर्कसचे नामांतर “ दि ग्रेट रॉयल सर्कस” असे करण्यात आले. नारायणराव स्वत: नियमितपणे अ‍ॅक्ट्मध्ये सहभागी असायचे पण आता वाढत्या जबाबदारीमुळे त्यानी ट्रॅपीझ ट्रूप दिगंबरकडे सोपवला.त्याच दरम्याने सर्कस कलकत्ता मुक्कामी असताना त्यानी सर्कसच्या मालकीचा मृत्यूगोल तयार करून घेतला. ट्रॅपीझ ट्रूप मधले अनंतकाका बाहेर पडले नी मृत्यूगोलात रायडिंग करू लागले.
अनंत काका आणि दिगंबर यानी कुडाळ वेंगुर्ला भागातून नाते संबंधातली, ओळखीतली काही होतकरू मुले कसरतीची कामे शिकण्यासाठी भरती करून घेतली. वर्षभरात सायक्लिंग़, ट्रपीझ आणि केज बॉईज अशा ब-याचश्या विभागात कोकणातून खूप मुलं दाखल करून घेण्यात आली.अशाच एका खेपेला दिगंबरने मलाही सर्कसमध्ये रुजु करून घेतले. माझे वय त्यावेळी जेमेतेम ११ आणि शिक्षण चौथी यत्ता. त्यावेळी सर्कसचा मुक्काम मुंबईला होता. वालावल सारख्या आडखेड्यातून आलेल्या माझ्यासारख्या बाळबोध गावंढळ मुलाला हे विश्वच नवलाईचे वाटले. हत्ती, घोडे, वाघ- सिंह यांच्या अद्भुत नगरीत मी पुरता चक्रावून गेलो. आम्ही सर्कस तंबूत गेलो त्याच दिवशी दिगुदादाने सहाच्या शोला मला प्रेक्षकांच्या गॅलरीत नेवून बसविले. “ हय चिप बसान -हव. त्ये वर छताक बांदलले दोरयांचे झोपाळे आसत ना तेच्यार माझा काम आसा. मी वाघळासारखो उलटो लटकान झोके घेतलय... तु भिया नुको माका काय्येक व्हतला नाय.खेळ संपलो काय मी तुका आत घेवन जायन तंवसर हयसून खय बाजूक जायाचा नाय... कळला?” दिगु दादा निघून गेला.
मी चितागती होवून चौफेर दिसणारा पहात राहिलो. प्रेक्षकानी गच्च भरलेला तो तंबू बघून मला धडकीच भरली. थोड्याच वेळात सर्कस बॅण्डवर मंजूळ संगीत वाजू लागले. मी लक्ष्मी नारायणाच्या देवळात दशावतारी धयकाला पाहिलेला होता. तसे पार्टी गणपती, देवीचे मुखवटे लावून येतिल नी गाणी म्हणत नाचकाम सुरु करतील असा आपला माझा अंदाज.... पण समोर जे दिसलं ते बघून मला अजाप वाटलं.... हातात झेंडे घेवून स्त्री पार्टी आले पण त्यानी काश्ट्याच्या साड्यांऐवजी तुमानी नी झंपर घातलेले.... असलं नेसण घालून आलेले ते स्त्री पार्टी बघून माका जाम हसो इलेलो. वाघ,सिंह, हत्ती, घोडे यांची कामे नी विदूषक मला भारीच आवडले. मग बायामाणसे सायकली फिरवीत आलेली. आता हळू हळू माझ्या लक्षात येवू लागले की ते पुरुष पार्टी नसून खरी बायल माणसेच होती ती. शेवटी गंजीफ्रॉकाच्या कापडासारखे घट्ट कपडे घातलेले नी कमरेला लंगोटा घातलेले बापये नी बायल माणसे यांचे दोरीच्या झुल्यावरचे खेळ सुरु झाले. त्यातले नारायणराव मी आदी वळकूकच नाय.
७/८ बापये, ४/५ बाईल माणसे नी दोन विदुषक दोरीच्या शिड्यांवरून झर झर चढून वर गेले. त्या घोळ्क्यात मला दिगंबर दिसेचना. झोके वरखाली हालायला लागले. लांब दोरीच्या झोक्यावरून आलेले मध्येच हात सोडून उलटे लटकणा-या माणसाचे हात पकडून एक झोका घेत नी पुन्हा हात सोडून लांब दोरीचा झोका पकडून माघारी जात. मग एक विदुषक आला. मी ओळखले, तो दिगूदादा होता.त्याने झोक्याचे हात हात न सोडता पाय पुढे केले. त्याचा लेंगा सुटून नारायणरावांच्या हातात आला. त्याने उडी मारलीच नाही. लोक हसले नी त्याची फजीती झालेली बघून मी खजील झालो.दुस‌-या खेपेला तर भलतीच गडबड झाली नी आमचा दिगंबर सरळ खाली जाळ्यात पडला. लोकानी टाळ्या वाजवून त्याची टर उडवली नी मला पण जाम कोप आला. खेळ संपल्यावर मी म्हटले, “ तुका झोपाळ्यावयला काम येयना नाय तर वगीच कशाक गेल्लस ?” त्यावर तो बोल्लो काय “लोकांक हसव साटी मुद्दान तसां करतंव आमी..... लोकांक हसवनां ह्यांच तर विदुषकाचा काम.”
लौकरच माझे ट्रेनिंग सुरु झाले. सकाळी अडीच तीन तास भरपूर व्यायाम, दोन वेळा चविष्ट जेवण नी दिवसभर पडेल ते काम करायचे हे सर्कसचे जीवन माझ्या आंगवळणी पडले, तीन चार महिन्यानी आमच्याच भागातला पेंडुरातला मनोहर पेंडूरकर सर्कशीत आला. त्याची माझी चांगलीच गट्टी जमली. आम्ही जोडीने रहायला लागलो. सुरुवातीला जिम्नस्टिक फ्लोअर एक्झरसाईजचा सराव झाल्यावर आम्ही ट्रपीझवर समरसॉल्ट, फिरवेट जंपिंग शिकलो. या बरोबरच रोप बॅलन्सिंग, हॉरीझोण्टल बार एक्झरसाईझ सुरु होत्या. आम्ही दोघेही अदलून बदलून आयटम्स करायला लागलो. काही वेळा तोंडाला रंग फासून नी ढगळ कपडे घालून मी विदूषक होई. विदुषकाचे काम करताना मी केलेल्या वांदर चेष्टाना पब्लिक हटकून टाळ्या वाजवी. बघता बघता ५/६ वर्षे कधी संपली कळलेच नाही. नारायणराव, सीतारामपंत आमची इतक्या प्रेमाने विचारपूस करीत की आम्ही मायेची माणसे सोडून इकडे दूर असूनही घरच्या आठवणीने कधी बेचैनी आली नाही. दिगंबर नी अनंत हे आम्हाला कितीतरी सिनियर..... दोघेही सर्कसचे मोठे आर्टिस्ट पण ते दोघेही कधी तशा तोयात वागत नसत. आम्ही सगळे कोकण्ये एका कुटूंबासारखे राहू नी संवाद कायम मालवणीतून करीत असू.
खेळीमेळीचे वातारण असल्यामुळे ही सर्कस आमची आहे अशा ममत्वाने आम्ही अंग मोडून काम करू आणि दिसेल त्या कामाला डोई देत असू. सर्कस मोठी करण्यासाठी आम्ही झपाट्ल्यासारखे कामात झोकून देत असू. तंबूच्या कनाती थांगडणे, प्राण्यांचे खाणे पाणी यावर बारकाईने नजर ठेवणे या कामात आला दिवस कधी मावळला ते कळत नसे. मला जात्या गुराढोरांची आवड, मी हत्ती, उंट, घोडे, कुत्रे आणि वाघ – सिंह यांच्याशी कायम सलगी ठेवून असे म्हणून गरलेला प्राण्यांचे आयटम्स सादर करताना मी रिंग मास्टर गजानन शेलार यांच्या बरोबर एरिनात उतरत असे. सुप्रसिद्ध शेलार्स सर्कस मधले हे रिंग मास्तर आमच्याकडे हत्ती घोडे यांना यांचे आयटम्स सादर करीत आणि त्याना ट्रेनिंगही देत. ट्रेनिंग देताना त्या प्राण्यांशी माझी ओळख असल्यामुळे त्यांचा मदतनीस म्हणून मला अनायासे संधी मिळे. त्यामुळे प्राण्याना ट्रेनिंग देण्यातल्या खुब्या मला नकळतपणे अवगत झाल्या. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत मी रिंगमास्टर म्हणूनही काम करी. गजानन रावांच्या हाताखाली गिरवलेल्या या बाराखडीने भविष्यात माझे आयुष्य उजळून टाकले.
आमची ‘ दि ग्रेट रॉयल सर्कस’ दिवसे दिवस मोठी होत गेली आणि नशिब अजमावण्यासाठी १९६२ सर्कस परदेश दौ-यावर रवाना झाली. आता मी शिकारखाना सांभाळी आणि हत्ती, घोडे यांचे आयटम्स कंडक्ट करी.१९६३मध्ये सर्कस सुदान येथे खेळ करीत असताना तिथले प्रेसिडेंट शो पहायला आले. सर्कस बघून ते एवढे खूष झाले की, त्यानी एक चिपांझी सर्कसला भेट म्हणून दिला. त्याची देखभाल अर्थातच मी हौसेने गळ्यात घेतली. मी त्याचे नाव ठेवले राजा. प्राण्याची मर्जी संपादन करायची , जिव्हाळा निर्माण करायचा तर तुम्ही आरंभ काळी त्याच्या सतत नजरेसमोर राहिले पाहिजे. त्याच्या सवयी, लकबी, आवडी निवडी यांचे बारकाईने निरिक्षण केले पाहिजे हा गजाननरावांनी दिलेला धडा मी हृदयावर कोरूनच ठेवलेला....मी माझे बस्तान राजाच्या पिंज‌-या समोरच हालवले. तीन चार दिवसातच त्याची माझी गट्टी जमली. मी पिंज‌-यात हात घालून त्याला थोपटणे कुरवाळणे इथपर्यंत पल्ला गाठला. माकड हा माणसाचा पुर्वज मानतात. तो माणसा इतकाच हुषार आणि अनुकरणाने शिकणारा आहे. रामायणातल्या वाली, सुग्रीव, नळ, नीळ जांबुवंत यांच्या कथा आठवून मला एक विचार सुचला. मी त्याला वेडीवाकडी तोंडे नी हावभाव करून दाखवू लागलो. तसे तोही माझे अनुकरण करू लागला. येता जाता माझे लक्ष वेधून घेण्यासाठी तो मला अशा काही वाकुल्या दाखवायचा की ते पाहून बघणाराची हसून हसून मुरकुंडी वळायची.
याला रिंगणात उतरला तर प्रेक्षक याला डोक्यावर घेतील नी हा आमच्या सर्कसमधला एक आयट्म ठरेल हे ओळखून मी नारायणरावाना बोलावून त्याच्या करामती दाखवल्या नी याचा एखादा आयटम शो च्या वेळी सादर करायची परवानगी मागितली. नारायणराव गुणग्राहक होते आणि उपजत पशूशिक्षकही होते. राजा प्रौढ आहे, त्याची मजल मर्कट चेष्टांच्या पलिकडे फारशी जाणार नाही.“कसरत शिकवायची तर चिपांझीचे बच्चे पैदा करुया, माजो पल्लो लय मोटा आसा.... तुका जां सुचला तेच्यात तुजा सपान माका दिसता हा... तुजी जिद हा ना? मी पुरी करतय ” नारायणराव नुसते बोलुन स्वस्थ बसले नाहीत. सुदानला चिपांझीचे बच्चे विकत मिळायचे.आठवडा भरात सर्कससाठी पाच बच्चे खरेदी करून झाले. त्याना माझ्या हवाली करून ते बोलले, “ आता तुझा काम सुरू... तुका बाकीच्या कामात्सून सुटी.... ह्येंका शिकौन ह्येंचो कायतरी आयटम बसौन घी...”
दुसऱ्याच दिवशी मी सर्कस मॅनेजरला सोबत घेवून ज्या झू मधून हे बच्चे आणले होते तिथल्या व्यवस्थापकाची भेट घेतली. चिपांझीची देखभाल, खाणं पिणं, त्यांच्या सवयी, त्यांचे आजार आणि उपचार या संदर्भात दीड दोन तास सविस्तर चर्चा केली. चर्चा सुरू असताना सोबतच्या डायरीत महत्वाच्या नोंदी, प्रामुख्याने आजार नी औषधे यांची माहिती टिपून ठेवली. चर्चेतून काही महत्वाच्या गोष्टी मला उमगल्या. चिपांझी म्हणजे न बोलणारा माणूसच.... त्याची रहन सहन माणसासारखीच असते. मादीला स्त्रियांप्रमाणे मासिकधर्मही येतो. ही प्रजाती थोडिशी विक्षिप्तही असते आणि प्रसंगी माणसांवर जीवघेणा हल्ला करू शकते. त्यांच्या ओरडण्यावरून भय, राग-चीड या लहरी सरावाने ओळखता येतात. त्याना त्रास दिला, शिक्षा केली तर चिपांझी माणसा प्रमाणे डूख धरून राहातात नी प्रसंगी सूड उगवायलाही कमी करीत नाही. नर चिपांझी वयात येतात त्या काळात महिला दिसल्यावरही ते बिथरतात. त्यांची लहर सांभाळूनच त्यांचे खेळ सादर करायला लागतात.
नव्याने आलेल्या बच्चांमध्ये एक नर आणि चार माद्या होत्या. त्यांची नावे मी रामा, राणी, शांतु, गंगा आणि मीरा अशी ठेवली. त्याना स्वत:च्या नावाची ओळख पटावी म्हणून हातात चॉकोलेट धरून एकेकाचे नाव उच्चारून त्याना जवळ बोलावायचे आणि चॉकोलेट द्यायचे. त्याना कुरवाळताना त्यांच्या नावाचा उच्चार करीत रहायचा. माझी युक्ति फळाला आली आणि ८/१० दिवसात पाचही चिपांझीना आपापल्या नावाचा परिचय झाला. नाव घेवून टिचकी वाजवली की तो तो बच्चा जवळ येईच पण बाकीचे सवंगडीही ज्याचे नाव उच्चारले त्याच्याकडे पहात. माझा त्यांच्याशी होणारा संवाद कायम मालवणीतून व्हायचा. खेरिज ट्रेनिंग देताना सोईचे व्हावे म्हणून कम हिअर, सिट डावून, शेक हॅण्ड अशा ऑर्डर्सचा सराव मी त्याना योजनापूर्वक द्यायचो.
दहा पंधरा दिवस त्यांच्याशी पिंजऱ्याबाहेरून सलगी करून चांगली घनिष्ट सवगव झाल्यावर मी हळूच पिंज‌‌ऱ्यात शिरलो. मी आत शिरलेला पहाताच राणी धावतच माझ्या जवळ आली आणि टुण्णकन उडी मारून माझ्या खांद्यावर चढून बसली. रामा शांतू गंगा आणि मीरा बुजून पिंजऱ्याच्या कडेला अंग चोरुन राहिली होती. त्यांच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करून मी राणीशी दंगा मस्ती चालविली. तिचे हात धरून खांद्यावर उभी केली. अंतराळी झुलवीत कडेवर घेतले. चेहेरा गोंजारून लहान मुलाचे घेतात तसे मुके घेतले. तीही माज्या कृतींप्रमाणे प्रतिसाद देवू लागली. अशी दंगामस्ती सुरु असता धीर चेपून रामाही जवळ आला. त्याची अलाबला घेत मी त्याला उचलून खांद्यावर घेतले. त्याने प्रेमभराने माझ्या डोक्यावर थोपटीत माझ्या मानेवर तोंड घुसळले. तेवढ्यात अकस्मात माझा हात झिंजाडून रामा दूर झाला, राणी सुद्धा बाजुला पळाली. मी चमकून ईकडे तिकडे बघितले तर कामगार फळांची करंडी घेवून येताना दिसला. मी हळूच पिंजऱ्याबाहेर येत दार लावून घेतले.
कामगार जवळ आल्यावर त्याला पाहून बच्चे कसे बिथरले हे सांगून बच्चांकडे लक्ष न देता आम्ही दोन तीन मिनिटे बोलण्याचे नाटक करीत राहिलो. आता सारे काही आलबेल झाले. कामगाराने आणलेल्या करंडीचे झाकण बाजुला झाल्यावर आतला पिवळाजर्द केळ्याचा फणा बघून रामा आणि मीरा ख्यॅक्क ख्यॅक्क असे आनंदाचे चित्कार करू लागली. आता राणी शांतू गंगा यांच्याही नजरेला केळी पडताच चौघानी एकच गिल्ला सुरु केला. मी कामग़ाराला चार केळी तोडून पिंज‌-याच्या गजातून आत सरकवून उभे रहायला सांगितले. पण साताठ मिनिटं गेली तरी चौघांपैकी एकही बच्चा पुढे आला नाही. उलट त्यानी रागाने गुरगुरायला सुरुवात केली. मग मी त्याला केळी आता टाकून बाजुला जावून बसायला सांगितले.त्या दिवशी संध्याकाळ पासून त्याना खाणं देताना मी दोन्ही केजबॉयना बोलावून घेवून खाण्याच्या थाळ्या त्यांच्याकरवी देण्यास सुरुवात केली. आठवडाभरातच चिपांझींच्या बच्च्यांची केजबॉईजशी सवगव वाढली आणि ते त्यांच्याकडूनही कुरवाळून घेवू लागले.
नारायणराव हाडाचे पशू शिक्षक, ते कोटाचे खिसे भरभरून चॉकोलेट्स आणित अन रामा, शांतू, मीरा, राणी, गंगा याना हाकारित मुठी भरभरून त्यांच्या दिशेने फेकित अन नंतर त्यांच्याकडे पाठ वळवून माझ्याशी आठ दहा मिनिटे टाईमपास करत. मग पुन्हा मुठी भरभरून चॉकोलेट्स उधळून निघून जात. असे चार पाच वेळा झाले. मात्र नारायणरावानी एकदाही त्यांच्याशी सलगी साधायचा प्रयत्न मुद्दामच केला नाही. नंतरच्या खेपेला मात्र नारायणराव येताना दिसल्यावर पाचही बच्चे धावत गजांच्या कडेपर्यंत येवून आनंदाचे चित्कार टाकू लागले. त्यानी मुठी गजातून आत सरकवताच सगळ्यानीही मुठी उघडून चॉकोलेट्स हिसकावून घेतली. ते पिंज‌-याच्या गजाना खेटून रहिलेले. शांतू पुढे आली आणि गजाबाहेर हात घालून त्यांच्या कोटाच्या खिशातून चॉकोलेट्स खेचून घेतली. आता सगळी बच्चे कंपनीच गजाकडेला येत त्यांच्या खिशाशी झोंबू लागली. चॉकोलेट्स खाता खाता गजावर चढून त्यांचा चेहेरा कुरवाळू लागली. नंतर जवळसार कुठे नारायणरावांचा आवाज ऐकला तरी बच्चे नुसता उच्छाद करीत.
आता त्याना पिंज-याबाहेर काढून ट्रेनिंग द्यायची पूर्व तयारी मी सुरु केली. शो सादर करताना त्याना चड्डी,लंगोटा, सदरा घालून सजवायचा बेत मी योजला. कपड्याची सवय व्हावी म्हणून तीन चार चड्ड्या घेवून मी पिंज‌यात गेलो. मी चड्डी घालायची अ‍ॅक्शन केल्यावर शांतु पुढे आला नी एक चड्डी उचलून घालायचा प्रयत्न करू लागला. मी पुढे होवून त्याला चड्डी नेसवली. दोन तीन दिवस हा खेळ खेळल्यावर चारही बच्चे कपडे घालून घेवू लागले. आता सकाळी सर्कस वीरांचा सराव सुरु असताना चिपांझीचा पिंजरा मी तिथे नेवून ठेवी. तसेच त्यांचा सराव होताना बॅण्डवाल्याना धून वाजवायला सांगत असे आणि लाईट्चे झोतही टाकीत असू. हेतू हा होता की या सा‌-या गोष्टी चिपांझींच्या अंगवळणी पडाव्यात. माझा हेतू सफल झाला. कसरतपटू सराव करताना पाहून मध्येच लहर लागली की बच्चे त्यांचे अनुकरण करीत.मग मी सॅल्युट मारी, वेडे वाकडे अंगविक्षेप करी, ते बघून बच्चे माझे अनुकरण करीत.
मग एक दिवशी रामाला कपडे चढवून, त्याला आवरण्यासाठी गळपट्ट्याला दोरी बांधून मी त्याला पिंज‌-याबाहेर काढला. मंद स्वरात ‘मेरा जूता है जपानी’ ची धून वाजत होती आणि दोन बाजूनी प्रकाश झोत टाकले होते.आम्ही रिंगणात गेल्यावर मी सर्कसच्या शिरस्त्याप्रमाणे कमरेत झुकून सलाम केला. माझे बघून रामानेही सलाम केला. बघ्यानी टाळ्यांचा कडकडाट केला पण रामा मुळीच बिचकला नाही. उलट बघ्यांचे अनुकरण करीत त्यानेही टाळ्या वाजवल्या. मी कोलांटी उडी मारली तशी रामानेही मारली. मी दारुड्यासारखा तलमत तलमत रिंगणात फिरू लागताच रामाही माझ्यामागोमाग फिरू लागला. पुन्हा बघ्यानी टाळ्यांचा कडकडाट केला , तशी रामानेही टाळ्या वाजवल्या. माझा प्रयोग यशस्वी झाला होता. शो मध्ये एवढा आयटम सादर झाला तरी प्रेक्षक तंबू डोक्यावर घेतील असे अनंतकाका, दिगंबर यांचे मत पडले. कारण त्यावेळी कोणत्याही सर्कशीत चिपांझीचे काम ठेवल्याचे ऐकिवातही नव्हते. कपडे घातलेले चिपांझीचे ध्यान रिंगणात नुसती चक्कर घालून गेले तरी बच्चे कंपनी खेळाना गर्दी करील असे सगळ्यांचे म्हणणे होते.
सुदानमधला मुक्काम संपत आला होता नी पुढचा कॅम्प नैरोबीला ठरला होता. तिथे शो सुरु केल्यावर चिपांझींचा आयटम ठेवूया असे नारायणराव म्हणाले. त्यानंतर दोन दिवसानी सकाळी दहा वाजता अवचितपणे नारायणरावानी मला मॅनेजरच्या तंबूत बोलावले. मी तिथे गेलो तेंव्हा 35 mm. स्क्रीन वर चिपांझींच्या कामावर अमेरिकन सर्कसने बनवलेली फिल्म सुरु झाली. सुरुवातीची टायटल्स संपल्यावर चिपांझींची कामं सुरु झाली. हॉर्स रायडिंग, बॅलन्सिंग, सिंगल बार, डबल बार वरच्या कसरती, वेग वेगळ्या स्टाईलचे फ्लोअर जंपिंग असा अर्ध्या तासाचा शो पाहून आम्ही मंत्रमुग़्ध झालो. दुसऱ्यारिळ मध्येही स्विंगींग, रोलिंग ड्रम, फनी आयटम्स. अग्निचक्रातून उडी, वाघ सिंहा सोबतचे खेळ, टेबल स्केटिंग तर थक्क करून सोडणारे होते. ह्युमन आर्टिस्ट जे करू शकतात ते सर्व अ‍ॅक्ट चिपांझी करू शकतील ही खूण गाठ मी मनाशी बांधली आणि दुसऱ्या दिवसा पासून सराव करण्याचा कार्यक्रम मनात जुळवायला लागलो.
भारतात होणारे रामजी भागाबाईचे खेळ, रामायणाल्या वानर वीरांच्या वेशभूषा आठवून धोतर, सदरा, मुंडे, बाराबंदी कोल्हापुरी
पटका, पगड्या, स्त्रीवेशासाठी नऊवारी साडी, ख़णाची चोळी, घागरा,चुडिदार, सलवार कुडता, खणाचा परकर नी चोळी अशा वेगवेगळ्या पेहेरावांसाठी कापड खरेदी करून चिपांझींसाठी टेलरकडून कपड्यांचे सेट शिवून घेतले.शो सादर करताना अवघडायला होवू नये म्हणून कपडे घालूनच मी त्याना सराव देत असे. पंधरा दिवसांच्या ट्रेनिंग नंतर चारही बच्चे लीलया सायक्लिंग करू लागले. त्यांचा सराव पाहिल्यावर राजा प्रौढ असूनही बिन तक्रार काम शिकला.त्यांचे सराव सुरु असताना जाहिरातीसाठी खास फोटो सेशन अ‍ॅरेंज करून सुदानच्या प्रेसिडेंट साहेबानी सर्कसला भेट दिलेल्या चिपांझीचे आकर्षक खेळ, चिपांझींचे खेळ सादर करणारी आशियातली एकमेव सर्कस अशी तुफान जाहिरातबाजी सर्कसने केली. धोतर,बाराबंदी,, पगडी घातलेला रामा नी इरकली लुगडे नेसलेली राणी याना सर्कसच्या गाडीत बसवून शहरात राऊंड ही मारला.
प्रत्यक्ष खेळाच्या वेळी तंबू प्रेक्षकानी खच्चून भरला. प्रथम गवळ्याच्या वेषात राजा सायकलला दुधाच्या किटल्या रिंगणात अवतीर्ण होताच प्रेक्षकानी हशा टाळ्यानी तंबू अक्षरश: दणाणून सोडला. सायकल हातात धरून चालवीत तीन राउण्ड मारून तो माघारी आल्यावरही टाळ्या थांबल्या नव्हत्या. दीड तासानंतर रामा राणी बैलगाडीत बसून रिंगणात जाताच पुन:श्च शिट्ट्या टाळ्यानी तंबू दणाणून गेला. शो पूर्वी तिकिट विक्री सुरु झाल्यावरही मी अधून मधून सजवलेल्या चिपांझीला घेवून प्रवेश द्वारासमोरून चक्कर मारून येत असे. हळू हळू रोप बॅलन्सिंग, सिंगल बार वरच्या कसरती असे चिपांझींचे आयटम्स आकाराला येवू लागले. चिपांझींच्या शोमुळे सर्कस गर्दी खेचू लागली. प्रत्येक शो मध्ये चिपांझींचे दोन आयटम्स तरी सादर केले जात.
आता मी त्याना सायक्लिंग चा सराव द्यायला सुरुवात केली. एकजण चिपांझीच्या गळ्यातली दोरी पकदून रिंगच्या मध्याभागी उभा राही. एक सायक्लिस्ट हळू हळू पॅडल मारीत निघाला की त्याच्या मागोमाग चिपांझीची सायकल पकडून त्याचे पाय पॅडलवर सेट करीत मी स्वत: असे. दोन तीन दिवसांच्या सरावानंतर चारही बच्चे नी प्रौढ राजा चिपांझीही लिलया सायकल चालवू लागले. मग त्यांच्या सायकलला दुधाच्या किटल्या लटकावून दुधवाल्या गवळ्याचा फनी आयट्म, उलट दिशेने सायकल चालवणे, डबल सीट असे प्रकार वाढत चालले. मग सिंगल बार दबल बार या वरच्या वेगवेगळ्या उड्या नी रोप वॉकिंग नी कसरती सुरु झाल्या. सायक्लिंग मध्ये बॅलन्सिंग चा झालेला सराव नवीन कसरती शिकताना उपयोगी पडला. डेमोन्सट्रेटर दाखवील त्याचे हुबेहुब नी बिनचूक अनुकरण करून माझे बच्चे सगळ्याना थक्क करून सोडित. नंतर आठ बाय आठ च्या गोल टेबलवर स्केटिंगचा थरारक सेट झाला. आता सलग दीड दोन तास चालतील एवढे प्रकार बसलेले होते.
चिपांझींचे आयटम्स सुरु झाले नी माझा कसरतींचा सराव कमी होत होत हळू हळू बंदच पडत चालला.मी पूर्ण वेळ चिपांझींसाठी वाहून घेतले. माझे आई, वडिल, बहिण, भाऊ, मुले असे एकूण भावविश्वच चिपांझीमय झाले. तुमका कदाचित खोटा वाटात पण मज्या आज पावतच्या पंचवीस वर्साच्या कारगतीत कमीच तरी १७ चिपांझीचे बच्चे ह्या ह्या तंबूत जलामले नी कसरती शिकान तयार झाल्ले. पण आयच्यान एकाव बच्चूक मी सादो फटको पन मारलेलो नाय. रिंगणात कारेक्रम देकवताना फकस धाक दाकवसाटी येताची छडी आसता माज्या हातीत. पन कदी चुकॉन सुदा आपुन तेचो फटको मारललो नाय. मी तेंका चोंबाळून,चुचकारून काम करून घेतय.
चिपांझी म्हणजे माणसाचंच दुसर रूप.त्यांचे देहधर्मही तुमच्या आमच्या सारखेच. ठराविक सीझनमध्ये मादी हिटवर येते. अशा वेळी रक्तस्त्राव सुरु होतो नी एक विचित्र परमळ येवू लागतो. अशावेळी मादी बेताल झालेली असते नी नर सुद्धा चळलेले असतात. तेंव्हा त्याना रिंग मध्ये ख़ेळवणे धोक्याचे असते. मादीच्या ऋतूचा परमळ आला की नराला वरचेवर इराकतीची (लघवीची) भावना होते. अशावेळी मादी दुस‌ऱ्या पिंज‌ऱ्यात असेल तर नर आपले मूत्र कुळच्यात घेवून ते मादीच्या दिशेने किंवा समोर कोण माणूस असेल तर त्याच्याही अंगावर उडवतो. मादी नी नर दोघेही स्युडो माऊंटिंग करतात. वेड्यावाकड्या उड्या मारतात. खाणं न खाता ते नुस्त चाबलून टाकतात. त्यांच्या भावना शमे पर्यंत संपर्कात कोण येईल त्याच्यावर ते हल्ला करतात.बच्चे सर्कसमध्ये आले तेंव्हाच त्यांचा वेलविस्तार वाढेल अशी त्यांची निगुती मी ठेवलेली.जाणकारांशी चर्चा करून ते तीन साडेतीन वर्षाचे झाल्यावर पहिला इश्श्यु घ्यायचा असा माझा बेत म्हणून त्यापूर्वी दोन तीन पावट् मीरा नी राणी हिटवर येण्याचा सिझन आला की मी त्यांचा ऋतूकाळ पुरा होईस्तोवर त्याना वेग़ळ्या पिंज‌-यात ठेवून नरांपासून दूर अंतरावर ठेवीत असे. नी त्या दरम्याने त्यांची कामेही थांबवीत असे.
या वेळी इश्श्यू घ्यायचा असल्यामुळे राणीचा ऋतूकाळ येण्याच्या सम्याला मी तिला नी राजाला एका पिंजऱ्यात ठेवून शांतू नी मीराच्या संपर्कापासून दूर हालवले. आझा अंदाज बरोबर ठरला नी ही कार्यवाही केल्यावर चारच दिवसात राणी हिटवर आली. निसर्गाने आपले काम चोख बजवले नी राणी पोटुशी राहिली. पुढच्या पाच महिन्यात मी तिची जातीनिशी देखभाल केली. पण दुर्दैव आड आले. अर्जुनमामाना कढ अनावर झाला. दु:खावेग ओसरल्यावर ते बोलू लागले. सर्कस पिनॅंगच्या दौ-यावर असताना पाचवा महिना संपता संपता राणीचे अ‍ॅबॉर्शन झाले. मी माझ्या या या हाताने सगळी उस्तवारी केली. मृतावस्थेत जन्मलेले अपत्य नर जातीचे होते. मला अतिशय दु:ख झाले. गोष्ट माझ्या इतकी जिव्हारी लागली. कधी नव्हे ते त्या दिवशीचे खेळ कंडक्ट करायची जबाबदारी मी मनोहर पेंडुरकरावर सोपवली. नारायणराव समक्ष माझे सांत्वन करायला आले. ते बोलले “तू जीवाक् लावन् घेव् नुको. आपुन वायटात् चांगला सोदायचा....बच्चू गमावलो पन आपल्या सर्कशीतही पैदास व्हव शकता ह्या सिद्द झाला. आज दैव फिरला पन दुसरी मादी पोटुशी व्हयत् नी आमका बच्चू मिळात...तू बगीत ‌-हव... माजी बत्तीशी खाली जानार नाय.... ”
तीन चार महिन्या नंतर सर्कस बाली बेटावर असताना गंगा हीट वर आली.या खेपी मी तिचा नी रामाचा जोडा जुळवला. बाली बेटावरच्या दौऱ्यातच गंगा सुखरूप प्रसुत झाली. सुदृढ पुत्ररत्न झाले. बाली बेटावर जलमलेला म्हणून त्याचे नाव मी ठेवले बळी. मी अर्जुन मामाची मुलाखत घेत असताना बळी सर्कसमध्ये काम करत होता. गंगाला पुढे आठ अपत्ये झाली नी सगळी सर्कसमध्ये काम करत होती. गंगा नी शांतु पासुन मीना, लक्ष्मी, शिवा, सुग्रीव, जांबुवंत, समीर, राजा नं.२ आणि रामा नं.२ अशी पैदास मिळाली. आमच्या सर्कशीत एकूण ३ राजा झाले. सुदृढ चिपांझी अर्भकाचे वजन दीड ते दोन किलो भरते. सहा महिन्यात बच्चा स्वयंपूर्ण होतो नी दीड ते दोन वर्ष वयाला कसरतीची कामे करू लागतो.
चिपांझी मूलत: फलाहारी आहे. पण सर्व शाकाहारी जिन्नस तो आवडीने खातो. चहा, कॉफी शीत पेये ते आवडीने सेवन करतात. काही चिपांझी तर विडी, सिग्रेट, चिरूट ओढतात आणि मद्यपानही करतात. कडाक्याचे थंडी पडते तेंव्हा आम्हीही त्याना ब्रॅण्डी किंवा रम पाजतो. सुदानमध्ये आम्हाला भेट मिळालेला जॉर्ज उर्फ राजा पट्टीचा सिगारेट शौकीन होता. त्याला स्मोकिंग ची तल्लफ आली की तो आक्रस्ताळेपणा करायला लागे. तो जात्या तापट आणि आक्रमक होता. शिकार्खाना पहायला येणाऱ्या व्हिजीटर्सना आम्ही त्याच्या पिंजऱ्या जवळ जावू देत नसू. पण काही लोक आगावूपणे जायचे नी त्याच्या खोड्या काढायचे. मग तो चिडून त्याना प्रसाद द्यायचा. एकदा असेच एक गृह्स्थ आलेले. शिकारखाना पहाता पहाता त्याने सिग्रेट बाहेर काढली. केज बॉय ने त्याना वॉर्निंग दिली की, या चिपांझीला सिगारेट आवडते. तेव्हा तुम्ही पिंजऱ्या पासून जरा दूर रहा. हे ऐकल्यावर त्या गृहस्थाना जॉर्जची खोडी काढायची लहर आली. ते सिगारेट शिलगावीत मुद्दाम जवळ गेले. तशी जॉर्ज गजांकडेला आला आणि सिगारेट मागण्यासाठी हात पुढे केला. त्या गृहस्थानी सिगारेट द्यायला हात पुढे केला नी जॉर्जने हात पुढे केल्यावर आपला हात मागे घेतला. दोन तीन वेळा फसवल्यावर जॉर्ज चिडला नी गज पकडून त्याने फ्लोअरवर दणादणा पाय आदळले.
जॉर्जचा थयथयाट बघितल्यावर तर त्या गृहस्थाना भारीच चेव आला नी ते पुन्हा पुन्हा सिगारेट पुढे करून जॉर्जला हुलकावण्या देवू लागले. एका बेसावध क्षणी त्यांचा हात टप्प्यात आल्यावर जॉर्जने त्यांचा हात पकडून त्याना गजांकडे खेचले. सिगारेट काढून घेतली आणि त्यांचा पंजा गजांच्या आत खेचून त्यांच्या करंगळीचा खाट्कन तुकडा पाडला. त्या गृहस्थानी जोराने किंकाळी फोडली. केजबॉय पिंजऱ्याकडे धावले. जॉर्ज महाशय मात्र आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात शांतपणे धूर सोडताना दिसले. येणाऱ्या विजिटर्सना शिकारखाना पहात असताना कोणत्याही प्राण्याला काहीही पदार्थ, फळ देवू नका, त्यांची खोडी काढू नका तसेच पिंज-या पासून सहाफूट अंतराच्या बाहेर रहा अशा सक्त सूचना कर्मचारी देत असत पण लोक आमची नजर चुकवून काही तरी आगावू पणा करीतच. जॉर्जची कळ काढणाऱ्या चार-पाच जणांच्या बोटांचे त्याने तुकडे पाडले. इराणच्या दौऱ्यावर असताना असेच काहीतरी बिनसले अन् मला कल्पनाही नव्ह्ती तो त्याने माझ्या हाताचा घेतला.जखम एवढी मोठी की सहा टाके पडले. मात्र अन्य कोणत्याही चिपांझीने माझ्यावर कधिही हल्ला केलेला नाही.
सर्दी-पडसे, खोकला, ताप, न्युमोनिया, डिसेंट्री, बध्दकोष्टता असे माणसाना होणारे आजार चिपांझीनाही होतात. अती उष्णता, उकाडा, थंडी, वारा यांचा त्रासही त्याना होतो. म्हणून थंडीत आम्ही त्याना ब्लॅंकेट्स पांघरायला देतो. उन्हाळ्यात पिंज‌-यात फ़ॅन, कूलर लावतो. कोठा साफ़ होण्यासाठी आठवड्यातून दोन तीन वेळा सकाळी अनश्या पोटी कोरी कॉफी त्यात अर्धा कप लिंबू रस मिसळून पाजतो. आजाफ्री पडल्यावर चिपांझी मलूल आणि चिडचिडा होतो. अशावेळी अपरिचिताला आणि व्हेटर्नरी डॉक्टरलाही तो जवळ जावू देत नाही. मला ब‌ऱ्याचशा आजारांवरची औषधे माहिती आहेत. इंजेक्शन देणे, सलाईन लावणे तसेच अगदी डिलिव्हरी कंडक्ट करीपर्यंत वैद्यकीय सेवा मी त्याना पुरवतो. गेल्या २५/३० वर्षात न्युमोनिया, डांग्या खोकला, हार्टफेल आणि डिसेण्ट्री यामुळे आमचे चार पाच चिपांझी दगावलेले आहेत.
ज्या ज्या वेळी माझी सर्कसवारी व्हायची त्या पूर्वी मी आगावू कळवून ठेवीत असे. मग या खेपेला लेखकाना कोणत्या गोष्टी सांगायच्या त्याची टिप्पणी अर्जुन मामा, अनंत काका नी मनोहर पेंडुरकर करून ठेवीत नी गप्पा मारताना त्या अनुषंगाने चर्चा रंगत असे. अर्जुन मामांचा स्वतंत्र तंबू असला तरी चिपांझींच्या पिंजऱ्याजवळ कॉट टाकून अर्जुन मामा कायम तिथेच असतात. मी सांगली मुक्कामी असताना आठ दहा दिवसापूर्वीचा किस्सा अनंत काकानी सांगितला. पुणा दौरा उरकून सर्कस सांगलीला हलवली त्या ट्रॅंझिट्मध्ये मामा रजा घेवून मुंबईला घरी गेले. तेंव्हा मीना नावाची चिपांझी मादी प्रेग्नंट होती. तिला डोहाळे लागलेले होते नी ती काही खाईनाशी झाली. द्याल ते फळ, खाणेवस्तू उलटीसुलटी करून निरखल्यावर किच् SSS किच् आवाज करून मीना ती वस्तू सरळ फेकून द्यायची. तिला अर्जुनमामाची आठवण येत असावी नी त्यांचा हायरा घेवून तिने खाणेपिणे बंद केलेले असावे. दोन दिवस गेले की ती आपसूक खायला लागेल असे सगळ्याना वाटले. पण आठवडाभर उलटला तरी ती काही खाईना म्हटल्यावर अनंतकाका , मामा पेंडुरकर घाबरले नी त्यानी सरळ अर्जुन मामाला फोन करून ही गोष्ट त्यांच्या कानी घातली.
मीना खातपित नाही म्हटल्यावर अर्जुनमामा टाकोटाक सांगलीला आले. ते आली नी तसेच मीनाच्या पिंजऱ्यात शिरले. ‘‘ बाय..... काय होता तुका? माजी याद इली?” असे म्हणत त्यानी मीनाला जवळ घेवून थोपटले. केज बॉजने दिलेले सफरचंद त्यानी पुढे केले ते उलटसुलट करून निरखल्यावर किच् SSS किच् आवाज करून मीना ने ते सरळ फेकून दिले. अनंतकाका म्हणाले , ‘‘ह्यां बगलस ना ? कायव दिला तरी असांच करता. ” मग अर्जुनमामानी मीराची आवडती कॅडबरी आणायला सांगितली. पण पुन्हा कॅडबरी उलटसुलट करून निरखल्यावर किच् SSS किच् आवाज करून मीराने ती सरळ फेकून दिली. आता अर्जुनमामानी ओळखले, “अग्ये बाय माझ्ये..... ह्येका डाळिंब व्ह्याया झाला.... तां डाळिंब मागताहा...” ताबडतोब सर्कसची गाडी घेवून मामा पेंडुरकर जातीनिशी रवाना झाले. तो डळिंबाचा सिझन नव्हता तरी मिरजेपर्यंत धुंडाळल्यावर डाळिंबं मिळाली. डाळिंब मिळताच मीराने ख्यॅक ख्यॅक असे आनंदाचे चित्कार काढीत दहा बारा डाळिंबांचा फन्ना उडवला. त्यानंतर ती नीट खावूपिऊ लागली. पुढे तीला पुत्र रत्न झाले . त्याचे नाव गुरु. तीन-चार वर्षानी सर्कस रत्नगिरी दौरा करून नारायण रावांची ईच्छा पुरी करायला सर्कस कुडाळला आली. (रत्नागिरी मुक्कामी सर्कसमधील सिंहीणीला दोन बच्चे झाले.) त्यावेळी गुरु चिपांझी कसरतीची कामे करू लागला होता. या गुरुचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा रंग भुरकट पांढुरका होता. अशा रंगाचा चिपांझी फार रेअर असतो.
बोलता हातातल्या टिपणावर नजर टाकताच अर्जुनमामांचा कंठ दाटून आला. घसा खाकरून डोळ्यांच्या कडा टिपून अर्जुनमामा पुढे सांगू लागले. त्यावेळी रात्री ९ ते १२ चा शो सुरु होता. साधारण १० वाजता ट्रुप मधला राजा क्रमांक 3 रिव्हॉल्विंग बार वर कसरती करीत होता. तो प्रयोग झाला नी राजा बारवरून खाली उतरताना त्याच्या गळपट्ट्यात अडकवलेल्या दोरीचा हूक सुटला. मोकळा झालेला राजा छलांग मारून रिंगणा बाहेर पडला आणि गॅलरीजवळची कनात वर करून अंधारात गुल झाला. शो सादर करतो तंबूबाहेर ओपन पॅसेज पत्रे लावून बंद केलेला असतो त्यामुळे राजा सर्कस तंबूतच कुठेतरी दडी मारून लपला असेल असा आमचा अंदाज होता. आम्ही सर्च लाईट घेवून सगळा तंबू फिरून सांदी कोपरे पिंजून काढले पण राजा दिसला नाही. दरम्याने शो सुटला. मग तंबू बाहेरच्या एरियात शोध घेतला.साधारण अर्ध्यातासाने कुणीतरी सांगत आला की तुमचा चिपांझी अमुक ठिकाणी आहे. आम्ही चार पाच लोक खब‌ऱ्यासोबत निघालो. सुमारे 35 मिनीटा नंतर आम्ही ठिकाण गाठले. मृतावस्थेत पडलेला राजा सापडला. मग काही माणसे सांगू लागली. वीस पंचवीस टोळ भैरवानी दगड धोंडे मारीत त्याचा ताणपट्टा काढला. घाबरलेला राजा मग रस्त्या कडेच्या एलेक्ट्रिक पोलवर चढला. पोलच्या शेंड्यावर गेल्यानंतर त्याने सर्विस केबल पकडली आणि शॉक लागून तो खाली कोसळला.त्याच्या अंगभर दगड धोंड्यांच्या जखमा झालेल्या होत्या.
१९६५ मध्ये सर्कस इजिप्तच्या दौऱ्यावर होती. कैरोला कॅँप असताना कैरोचे प्रेसिडेंट नास्सेर यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसा निमित्त समुद्रकिनारी लहान मुलांसाठी एंटरटेनमेंट शो अ‍ॅरेंज केला होता. मी आमच्या चिंपांझी ट्रूपचा सुमारे ४० मिनिटांचा कार्यक्रम सादर केला. मुलाना कार्यक्रम खूपच आवडले. नास्सेर यांच्या मुलाने दोन आयटम्स पुन्हा करायला लावले.नास्सेर यानी खुश होवून सर्व ट्रूप सह माझा खास सत्कार केला. असे कितीतरी सन्मान आणि ट्रॉफीज माझ्या ट्रूपला मिळाल्या. चिपांझीचं टेबल स्केटिंग तर सर्कसचे खास वैशिष्ट्य मानले जाते. चिपांझीच्या या गोतावळ्यात मी एवढा एकरूप झालेलो आहे की, महिनाभर सुट्टी घेवून घरी गेल्यावर आठवडाभरातच मला चिपांझींच्या आठवणीनी बेचैन वाटू लागते आणि सुट्ट्टी संपण्याआधीच माझे पाय सर्कसकडे वळतात. माझा मुलगा तर म्हणतो की, मी आणि चिपांझीचा बच्चा यातून एकाची निवड करायची असेल तर पप्पा नक्की चिपांझीचा बच्चा निवडतील !
000000000