That's what you say. in Marathi Letter by Shabdbhramar books and stories PDF | तेच तुझे सांगाती

Featured Books
Categories
Share

तेच तुझे सांगाती

टक टक टक टक टक...
डेस्कवर पेनाच टोपण एका हाताने आपटत.. त्याचा आवाज ऐकत.. सोबत माऊसची क्लिक क्लिक पण त्यात जमा करत बसलेला मी, दुपारच्या जेवणानंतर आळसावलेल्या वेळेत ऑफिसमध्ये काम करत होतो.

Ping .. mail notification पॉप झालं. 

"Nitin Sable to Me"

नितीन साबळे sss... उम्म्म.. सा... ब... ळे sss अरे हो batch no. 35!!  सिनियर माझा. मला का mail केलीये याने?
मनाची गती किती प्रचंड असते ना? तेवढ्या वेळात मी नितीनला पंधरा वीस वर्षे मागे जाऊन पाहून आलो. 

मी आमच्या हॉस्टेलच्या तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर एका तेलाच्या बाटलीच्या झाकनाणे बादली भरत होतो. रात्रीचे दहा वाजलेले. माझ्या विसेक फेऱ्या झाल्या होत्या. तंगड्या भरून गेल्या होत्या. रॅगिंग वाटेला न आलेल्याना हे आयुष्य माहीतच नसेल. ती बादली सिनिअरने मार्क केलेल्या लेव्हलपर्यंत भरणं हे माझं काम होतं. मी व्हरंड्यात बादलीत टोपण ओतताना नितीन चालतं आला. माझ्याकडे पाहून हसला. त्याच्या हातात मोगऱ्याची कळी होती. हा वास घेत घेत पुस्तक वाचत चालताना मी कितीतरी वेळा त्याला पाहिलेलं. त्याला तशी सवय होती. हॉस्टेलचे लांबडे व्हरांडे हा वाचताना फिरायचा. नाकाला कळी आणि हातात पुस्तक.

दुसऱ्यावेळी मी टोपण ओतायला आलो तेव्हा त्याने मला थांबवलं.
"कोणी सांगितलंय?" 

रॅगिंग टास्क सांगणाऱ्या सिनिअर चे नावं सांगणे म्हणजे "पिन मारणे" नावाचा गुन्हा होता. तो नोंदवला गेला तर ज्याने पिन मारली त्याला पुढे येणाऱ्या जुनिअर्स ची रॅगिंग करायला मिळणार नाही अशी त्याची शिक्षा असायची. शिवाय " पिनर " नावाचं लंच्छनास्पद लेबल लावलं जायचं. मास्तरला सांगितलं तर मग घोर पाप. अगदी स्वतःचे बॅचमेंट सुद्धा विटाळ असल्यागत दूर लोटायचे असल्या फितूराला. म्हणून मी गप्प उभा राहिलो.

" बरं. त्याला सांग की साबळेने काम लावलं दुसरं. " हा एक आणखी बंधूनियम होता हॉस्टेलचा. एका सिनिअरने दुसरं काम लावलं की आधीच्या सिनिअरला सोडावं लागायचं.

खाली सिनिअरला तसं सांगून आल्यावर ती शिक्षा गेली आणि दुसरी आली. 
"काय करायचंय? " व्हारांड्यात उभ्या नितीनला मी विचारलं.

"काही नाही relax. रूम मध्यें जा तुझ्या. " तो म्हणाला.

" उद्या त्याने विचारलं नितीन ने काय काम सांगितलं तर? " मला माझीच चिंता होती.

" पुस्तक वाच म्हणला म्हणावं माझ्यासाठी? " त्याने सुचवलं.

" कोणतं? " मी हुशारी दाखवत म्हणालो.

" हे!" 

"Ok." मी बोललो. आणि वळलो.

"काय ok?  कोणतं पुस्तक होतं विचारलं तर काय सांगशील?" तो बोलला.

" सनीला मला नाही वाटत पुस्तकाच्या नावात interest आहे." मी जरा अंगलट येणारे धाडस केलं बोलून ते नंतर कळलं मला. पण तो जोरात हसायला लागला.

" पिनर साल्या!! पळ इथला." तो बोलला.
मी जीभ चावत पळालो. त्याने तसं कधी कोणाला सांगितलं नाही की मी पिनर ठरलो होतो. 

नितीन दिसला की हसायचा. कधीतरी काही बोलायचा. एवढाच काय तो संबंध. त्याचं शेवटचं वर्ष होतं. तेवढं काढून तो हॉस्टेल वरून गेला. नंतर आमचा कधीही संपर्क आला नाही. आणि आता ही mail...घेतली वाचायला क्लिकून.

*****

"Hi Pinner, ( लक्षात आहे भाऊच्या 😁)

तुझा mail id मिळवायला मला तुझ्या तीन batchmates ला गाठावे लागले. फोन नंबर घेऊन पण बोलता आले असते. पण आपण बोललेले शब्द मनात उतरले तरच टिकतात, नाहीतर असमंतात विरतात. असं वाटून हा उपदव्याप केला.

एवढं काय खास सांगायचे mail करुन असं वाटत असेल ना तुला? तू  जॉईन झालास त्यानंतर तिनेक महिण्यानी हॉस्टेलच्या लायब्रेरीचा मेम्बर झालास ना? हे आठवायचं कारण हे की माझ्या लायब्रेरितून पुस्तक नेण्याच्या entry असायच्या त्याच्या मागे पुढे असेच randomly मुलांची नावे असायची ती पण दोनेक महिन्यांनी repeat व्हायची. पण तुझं नावं माझ्या एवढंच असायचं. जितकं मी वाचायचो तितकंच तू पण वाचायचा.

माझ्या हे खासच लक्षात राहिलं. तुझी पुस्तकांची आवड पण युनिक होती रे. म्हणजे मी पाहिलं की तू दोन्ही माडगूळकरांच्या, पू लं. आणि व.पु ह्यांच्या नादाला पण लागला होतास आणि नामदेव ढसाळाच्या जबरी कविता पण वाचत होतास. 70-80 मधले जुने दिवाळी अंक वाचायची माझी सवय तुलाही होती. छोट्या पॉकेट कादंबऱ्यांचे संच पण तू वाचलेत. नाझी वादाचा उदयास्त मी सरांच्या मागे लागून मागवलं आणि तू पळवलंस. मी तुझं होईपर्यंत वाट पाहिली. आनंद वाटला रे! कोणीतरी आहे आपल्यागत दिवाणं. तुझा नाद मला नेमका कळत नव्हता. कारण तू आत्मचरित्र पण वाचलीस, कादंबऱ्या पण, छावा वाचली का? असं छाती पुढं आणून विचारणाऱ्या पोरांमध्ये मृण्मयी पण वाचणारा होता, आणि माझी भ्रमणगाथा पचवणारा पण होता. तुझा व्यासंग नेमका कळत नव्हता मला. जाम कुतूहल दिलस तू मला तुझ्याबद्दल.

मला कधी वाटायचं तुझं वाचलेलं किती लक्षात आहे हे जोखण्यासाठी तुझ्याशी चर्चा करावी पण जमलं नाही. असो मी हॉस्टेल सोडून निघालो त्याला आता बरीच वर्षे झाली तू स्मरणात होतास. तुला मला एकच गोष्ट सांगायची आहे. तू जे जोपासत आलायस त्यात खंड पडू देऊ नकोस. तू जे काही ग्रहण करत चाललायस त्याला कुठेतरी मांडायला सुरुवात कर. सोशल साईटवर तुझ्या अकाउंटला तुझं छोटं लिहणं वाचलंय मी. त्यातून एक कळलं. तुझ्या पुस्तकात राहायच्या सवयीमुळे तुझ्यात लिखाणाचा अंकुर फुटू पाहतोय. तो विस्तारू दे. व्यवहारिक गोष्टी करच.. पण मनही मोकळं करत रहा. जितका व्यक्त होशील तितका सुखी राहशील. तुझं वाचन, लिखाण तुला पुरतील आयुष्यभर. त्यांना जप. तेच तुझे सांगाती असतील. एकटेपणा तुला कधीच शिवणार नाही. 

जास्तच झालं नाही? एवढुश्या आपल्या ओळखीत इतकं काही लिहीत बसलोय तुला, आणि तुझा वेळ खातोय. सॉरी अरे! पण बरेच असे लोकं भेटलेत आयुष्याच्या प्रवासात ज्यांच्याबद्दल काही वाटलेलं त्यांना सांगता नाही आलं. अशा लोकांना ते ते कळवावं अशी माझी एक शेवटची इच्छा मी पूर्ण करतोय. हा शेवटचीच. हृदयाच्या volve चा लोचा झालाय रे! बरं न होणारं दुखणं आहे. आपण व्यासंग जोपसणारे बरेच जण व्यावहारिक नसतो. तसं असल्यामुळे थोडी आर्थिक बाजू नाजूकच असते. त्यामुळं खूप खर्च बिर्च करुन इलाज नाही शक्य झाला. नवं हृदय तर नाही मिळालं पण हा.. हे नवं भावनिक उफाळून आलं. त्याला न्याय द्यायला या mails करतोय सगळ्यांना. 

ह्या mail चं पोस्टिंग मी scheduld केलं होतं एक महिन्यांनी तुला ही mail येईल. बहिणीला मी गेल्यावर ह्या mails पोस्ट करायला लावल्या आहेत . तू वाचत असशील तर तिला आशीर्वाद दे. 

- नितीन. 

****

उष्ण अश्रू थंड होऊन डोळ्याच्या कडेवर स्थिर होता. तो ओघळला आणि मी डोळे मिटले. मला काहीच काळ पाहून माझ्यातूनही जीवनरसाचे अमोघ थेंब माझ्या ओंजळीत देणारा नितीन कालवश होऊन महिना लोटला होता.

मी रिप्लाय वर क्लिक केलं आणि... तोंड ओंजळीत लपवलं. 😔


- शब्दभ्रमर