Those Three Women (Mystery Story) in Marathi Women Focused by Balkrishna Rane books and stories PDF | त्या तिघीजणी (गूढ कथा)

Featured Books
Categories
Share

त्या तिघीजणी (गूढ कथा)

त्या तिघीजणी - ( विलक्षण गूढ कथा)      मी माझ्या पुरातन वस्तूंच्या संग्रहालयात बसलो होतो.मी पुरातत्व विभागाची पदवी घेतली आहे.इतिहास संशोधनाची आवड मला कधीच स्वस्थ बसू देत नाही.मी वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळवलेल्या काही वस्तू  , लेख,  व चित्रे  या संग्रहालयात ठेवली आहेत. माफक फी घेऊन मी या  वस्तू  लोकांना बघायला देतो.खरं तर या वस्तू मिळवताना मला प्रचंड त्रास झालाय.पैसे खर्च झालेत.काही वेळा मी जीवावरच्या प्रसंगांतून वाचलोय. तर काही वेळा मला अगम्य , गूढ गोष्टींचा व शक्तींचा सामना करावा लागलाय. या वस्तू मला कशा मिळाल्या त्यांचं वय काय व त्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे हे मी तिथे लिहून ठेवले आहे. पण काही वस्तूंच्या बाबत मी ते लिहिले नाही कारण  एकतर ते  लिहिणे अशक्य होते तसेच ते कोणालाही पटले नसते.कधी कधी ते आठवले की माझ्या अंगावर काटा उभा राहतो...घसा कोरडा पडतो. मग मी माझं मन दुसरीकडे वळवतो.काही लोक मला त्याबाबत विचारतात पण मी काही उत्तर न देता हसून प्रश्न टाळतो. उदाहरणार्थ पांढऱ्या दगडातील विठ्ठल मूर्ती...छोटी तलवार...जिच्यावरचा लाल हिरा पूर्णपणे झाकलेला आहे अशी सुवर्ण अंगठी...सातविणाच्या पानाची डहाळी हाती घेतलेला यक्ष...वसुदेव प्याला इत्यादी.या वस्तूंशी निगडित घटना एवढ्या गूढ व भयावह आहेत की कोणासही त्या पटणार नाहीत.  त्या वस्तू पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या.    तेवढ्यातच  पोस्टमन एक मोठा लिफाफा घेऊन आला. लिफाफा माझ्या नावाचा होता. पण पाठिमागे तो कुणी पाठवलाय त्याच नाव नव्हत.मी तो लिफाफा सही करून घेतला.हातात लिफाफा पकडून मी अंदाज घेतला.आत बहुतेक आयातकृती आकाराचा एक जाड कागद होता.मी उत्सुकतेने तो लिफाफा उघडला. आत एक फोटो होता.  फोटोत तीन स्त्रिया उभ्या राहिलेल्या दिसत होत्या. फोटोच्या खाली शाईच्या पेनाने तारीख लिहिलेली दिसत होती.खूप बारीक अक्षर होते.तसेच अक्षर थोडे धूसर झाले होते.मी जवळचे भिंग उचलले." ३०/१०/१९७० सायंकाळी चार वाजता."म्हणजेच फोटो जवळपास पन्नास वर्षे जुना होता.पण अगदी उत्तम स्थितीत होता.घरच्या दिवाणखान्यात एका  लाकडी कपाटाच्या बाजूला फोटो काढलेला होता.मी सहज त्या स्त्रियांच्या चेहऱ्याकडे नजर टाकली आणि मी प्रचंड दचकलो.त्या स्त्रियांचा चेहरा चक्क कोरा होता.म्हणजे त्या चेहेऱ्यावर न डोळे होते न नाक ना तोंड होते.फक्त वर्क झालेल्या भुवया होत्या. सारा फोटो व्यवस्थित होता. अगदी साडीच्या सुरकुत्याही स्पष्ट दिसत होत्या.फक्त चेहरेच मोकळे ते सुध्दा तिघींचे! हे नेमके काय आहे?मी त्या फोटोसोबत असलेली चिठ्ठी वाचू लागलो...  " साहेब, मी एक चोर आहे. काही दिवसांपूर्वी मी कोकणातील एका गावात चोरी करण्यासाठी गेलो वेळ रात्रीची होती.एका आतल्या रस्त्यावर एक जुना वाडा दिसला.तो वाडा बाहेरून बंद होता....एक भल मोठ पितळी कूलूप त्याला होत.दरवाजा लाकडी होता.मी ते कूलूप माझ्या कौशल्याने उघडले.त्या बंद घरात मी शिरलो...आणि माझ्या दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले...त्या बंद घरात माझ्या शिवाय आणखी कुणीतरी होत...जे वावरताना जाणवत होतं पण दिसत नव्हतं.मी कोणत्याही वस्तूला हातही लावू शकलो नाही.मी तिथून पळण्याचा निर्णय घेतला.पण एकतरी वस्तू पळवल्याशिवाय बाहेर पडायचा नाही हा माझा नियम... त्यामुळे मी पळताना बाहेरच्या मुख्य खोलीत लावलेला एक फोटो पळवला.बहुधा ते गाव कोकणातील सावंतवाडी तालुक्यातील वीरपूर असावे.तो फोटो पाहिल्यानंतर माझी झोप उडाली.तुम्ही तो फोटो पाहिल्यानंतर तुमचही तसंच होईल.मध्ये मी तुमची यु ट्युबवर मुलाखत पाहिली त्यानुसार तुम्हाला अश्या गोष्टींची उकल करण्यात रस आहे हे समजलं म्हणून हा फोटो तुम्हाला पाठवतोय."      खरच त्या फोटोने  माझी सुध्दा झोप उडविली होती.पण त्या तिघींच्या फोटोच रहस्य उलगडण्याचा मी निश्चय केला.त्यासाठी मला कोकणात सावंतवाडीत विरपूरला जाव लागणार होतं.मी सावंतवाडीतील माझ्या एका परिचिताला फोन केला व विरपूर आणि तिथल्या बंद असलेल्या वाड्याबद्दल विचारले. तो म्हणाला ' हे गाव सावंतवाडीतून अठरा किलोमीटर आहे.तिथे एकच मोठा वाडा आहे तो म्हणजे ' खोतांचा वाडा'  साधारण दोनशे वर्षांपूर्वी बांधलेला आहे.सध्या तो बंद असतो कारण सध्याचे खोतांचे वंशज अमेरिकेत असतात.कधीतरी वर्ष दोन वर्षांनी येतात.''" पण त्याची व्यवस्था कोण बघतो?"" गावातले एक गृहस्थ आहेत. पण त्या वाड्याबद्दल काही अफवा आहेत."" मला त्या वाड्यावर संशोधन करायचे आहे .दोन दिवस लागतील.चावी मिळेल काय ते पाहा व मला कळवा."         चावी मिळाली.पण त्या माणसाने एक हजार रुपये सांगितले.मी ते मान्य केले.**************"""************""********दोन दिवसात मी विरपूर गाठल. मी माझे सगळे साहित्य सोबत घेतले होते.त्यात भिंग रोजनिशी, वस्तू साफ करण्यासाठी लागणारे छोटे मोठे ब्रश व अन्य साहित्य होते.सावंतवाडीच्या विसावा हॉटेलमध्ये नाष्टा करून मी माझी बुलेट सरळ विरपूरला वळवली. तोपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. खाडीच्या मुखाजवळ वसलेले हे गाव नारळी फोफळीच्या बागांनी गच्च भरलेलं होते.गारवा देणारा छान वारा  सुटला होता.मी तिठ्यावरच्या एका हॉटेल जवळ थांबलो.इथलाच पत्ता मला दिला होता.या ठिकाणी तो इसम चावी घेऊन येणार होता.मी चहा मागवला. एका मातीच्या कपात चहा घेऊन मालक आला.हॉटेल जुने होते वर पत्रे टाकले होते. दोन छोटी टेबले त्याभोवती सहा लाकडी खुर्च्या...त्यातल्या दोन खुर्च्याचे हात गायब झाले होते.मी चहा पिता पिता विचारले..." खोतांचा वाडा कुठे आहे?"हॉटेलवाला थोडा दचकला.त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं." खाजनात!पण तुमच तिथे काय काम?"" खूप जुना वाडा आहे ना तो ! बघायला आलोय. "" जरा जपून... तिथे काही भास वैगेरे होतात. पण तुम्हाला जायला कस कळणार? थोड आत आहे.""  ठाकूर  म्हणून आहेत ज्यांच्याकडे चावी आहे ते इथे येणार आहेत."" एक नंबरचा लोभी व डांबिस माणूस आहे.पैशांसाठी वाटेल ते करेल."हॉटेलवावल्याने सरळ सांगून टाकले.मी फक्त हसलो.तेवढ्यात ठाकूर आले.पन्नासीचा हा इसम पटट्यांची हाफ पॅन्ट व बनियनवर आला होता. चेहर्यावर दाढीचे खुंट...डोळ्यात स्पष्टपणे दिसणारी लबाडीची झाक... मध्ये मध्ये डोळे मिचकावण्याची लकब हे पाहून लक्षात आले की हा बेरकी इसम आहे." चहा घेणार?"" होय.अरे नाम्या एक प्लेट भजी पण आण.सायबांनी भजी खावक नाय ? नाम्याची भजी म्हणजे एक नंबर!"मी नाम्या,  म्हणजे हॉटेलवाला यांच्याकडे पाहून मान हलवली.त्याने एक प्लेट भजी व वाफाळणारा चहा त्याला दिला.मी न बोलता नाम्याकडे पैसे दिले. नाम्याला ही तो माणूस आवडत नसावा हे स्पष्ट दिसत होते. चहा झाल्यावर मी बाहेर पडलो.माझ्या मागोमाग ठाकूर आला.मी बुलेट चालू केली." चला बसा. खोतांच्या वाड्यावर जाऊया."तो पाठीमागे बसला.मार्ग दाखवू लागला.मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळून पुन्हा उजवीकडे वळल्यावर सरळ पाच मिनिटे गेल्यावर झाडातून डोकावणारी एक मंगलोरी कौलांच छप्पर दिसलं. " तो दिसता, तो खोतांचो वाडो..."गाडी पाच ते चार फूट रुंदीच्या रस्त्यावरून सरळ घराच्या अंगणात शिरली. चौकनी अंगण.... मध्यभागी चिर्यांनी बांधलेलीतुळस होती.... अंगणाच्या सुरूवातीला मांडवावर चढवलेलीजाईची वेल ... सभोवार अनेक फुलझाडे...शोभेची झाडे होती.पण ती अस्ताव्यस्त वाढलेली होती.देखभाल नसल्याने तसं घडलं होतं. घर एक मजली म्हणजे माळीचे होते. मुख्य दरवाजा मला मोठा होता...त्यांच्या चौकटीवर नक्षीकाम केलेले दिसत होते....वर काही आकृत्या कोरलेल्या दिसत होत्या.त्या बघताच माझ्यातला इतिहास संशोधक जागा झाला." ठाकूर, चावी देता ना?"" सायबांनू माझे पैसे देऊन टाका."मी गुपचूप पाचशेच्या दोन नोटा काढून दिल्या. त्याने एक जाडजूड पितळी चावी कमरेच्या  मुजीतून( रंगीत दोरा) काढली व मला दिली." तुम्ही येताय ना आत?"ठाकूर दचकले. त्यांचा चेहरा कावरा बावरा झाला." नाय बाबा, माका बरीच कामा आसत. जेवण नाम्याकडेच घ्या दोन वेळचा जेवाण आणि नाष्टा तो दितोलाहा. हो आणि हे पैसे फक्त दोनच दिवसांचे आसत."मी हसलो.माणूस किती लोभी असू शकतो.त्याच उत्तम उदाहरण माझ्या समोर उभं होतं. मी ते भल मोठ कुलूप उघडले.तो पर्यंत ठाकूर निघून गेले होते.मी आत शिरलो.दहा एक फुट रुंदीचा व सुमारे तीस  फूट लांबीचा व्हरांडा मला दिसला.आत जराही धूळ नव्हती.जणू आत्ता झाडलोट झालीय असे! मला वाटलं ठाकूर झाडलोट करत असावा. घरच्या भिंती मातीच्या असाव्यात पण त्या जवळ जवळ दोन फूट रुंद होत्या.भिंतीत मध्ये साग व सिसामाचे लाकडी खांब होते. आतला दरवाज्याला फक्त बाहेरून कडी घातली होती.दरवाज्यावर गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती कोरली होती. लाकडतले कोरीव काम जबरदस्त होते.मी मोबाईल कॅमेऱ्याने काही फोटो काढले. अचानक मला जाणवल की आत काहीतरी हालचाल झालीय.दरवाज्यावर एक बीजागरीवर बसवलेला एक छोटा झरोखा होता.ज्याचा उपयोग आजच्या आयपिस सारखा होत असावा.तो झरोखा किंचित उघडल्यासारखा वाटला. कदाचित वाऱ्याने हलला असेल.मी कडी काढून आत गेलो.           आतल्या दिवाणखान्यात दोन तीन लाकडी खुर्च्या होत्या. मध्ये एक लाकडी टेबल होते. डाव्या बाजूला आणखी एक दरवाजा दिसला.समोर एक दरवाजा होता तर उजव्या बाजूला लाकडी जिना होता जो आजही उत्तम स्थितीत होता.मी जिना चढून वर गेलो.तिथे छोटा दिवाणखाना होता. मध्ये आयातकृती मोकळी जागा होती.तिथून खाली पाहता येत होत.इथे डावीकडे एक ,समोर दोन तर खोल्या होत्या तर उजवीकडे एक दरवाजा होता व त्या पलीकडे एक खोली होती. तेवढ्यात खाली कसलातरी आवाज आला.मी तिथून खाली उतरलो. मुख्य दरवाजा ओढून घेऊन मी अंगणात आलो." अलख निरंजन..." एक नाथपंथीय साधू चिमटा वाजवत ओरडला." इथ कुणी राहत नाही.पण ठीक आहे.हे घे" मी सुट्टे दहा रुपये त्याला दिले.पण तो माझ्या पाठीमागे दरवाज्या कडे पाहत होता." यहाँ कुछ चल रहा है |संभलके..." ते दहा रुपये घेऊन त़ो घराकडे विचित्र नजरेने बघत लगबगीने गेला.मी मागे परतलो .मला वाटले तो झरोका कुणीतरी उघडला होता.मी खांदे उडवत ती शक्यता नाकारली. कूलूप लावून मी नामदेव कडे जेवायला गेलो.******-------******-------*******------*****---*****------" नामदेव, खोतांचा इतिहास तुला थोडाफार माहित असेल नाही?" मी जेवता जेवता विचारलं." होय, माझे वडील सांगायचे त्याबद्दल , गावातल सर्वात श्रीमंत व वजनदार घराणे होते ते.तीन भाऊ त्यांच्या बायका...मुले तिथे रहायची.बरेच नोकर चाकर राबत असत. त्यांच्याकडे शेती - वाडी बागायती होती .आजही आहे. पण नवी पिढी परदेशात !  आज हे सर्व बघणार कोणी नाही .ठाकूर सगळ खातो...त्यांना फसवतो.त्याच्यावर विश्वास ठेऊ नका."मी हसलो." ते तीन भाऊ व त्यांच्या बायका काय करायच्या?"" मोठा भाऊ नामदेव हा प्रख्यात ज्योतिषी होता. मधला पांडुरंग हा सावंतवाडी संस्थानात पोलिस होता व नंतर  महाराष्ट्र पोलिसात कारकून होता.खूप तापट होता.तिसरा सर्वात लहान सुधाकर हा खूप शिकलेला पण नोकरी सोडून नाटकात काम करायचा. त्यांच्या बायका घरकाम करायच्या.त्यांना घरा बाहेर कधीच कोणी बघितलं नाही." नामदेव म्हणाला." काय, घराबाहेर कधीच दिसल्या नाहीत?" मी आश्चर्याने विचारले." होय, खानदानी घराणे व जुना काळ होता तो !"   " बर इथे बघण्यासारखं काय आहे?"" खोताच्या वाड्याच्या थोडं पुढे खाजन आहे.तिथे खाडी जवळून सूर्यास्त छान दिसतो."मी पुन्हा गाडी घेऊन वाड्यावर आलो. मधल्या दिवाण खाण्यातअसलेल्या टेबलावर मस्त पैकी झोप काढली.पाण्याच्या बाटलीतील पाण्याने तोंड धुतले. थोडा वेळ प्राणायाम केला.नंतर सर्व घर फिरून त्याचा नकाशा तयार केला. तिथल्या वस्तूंचे व कोरीव कामाचे फोटो काढले.साडेचारच्या सुमारास मी खाडी किनाऱ्यावर जायला बाहेर पडलो.  या दरम्यान मला सतत भास होत होता की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेऊन आहे.  मी खाडीजवळ पोहोचलो.तिथे भन्नाट वारा सुरू होता.जवळच झापांची एक झोपडी होती.ती अक्षरशः हिंव भरल्यासारखी हलत होती.दोन माणसे खाडीत जाळ फेकत होती.दूरवर एक होडी मासेमारी करण्यासाठी समुद्राच्या दिशेने जात होती. सायंकाळचे पिवळे किरण पाण्याला सुवर्णझळाळी देत होते.वातावरण मस्तच होते.मी सूर्यास्त होईपर्यंत तिथे एका माडाखाली बसून होतो.वाऱ्यामुळे गारवा जाणवत होता. थोड अंधारू लागलं . मी तिथून पुन्हा वाड्यावर येईपर्यंत काळोख झाला होता.  मी बाहेरचा दरवाजा उघडून आत शिरलो.बाहेरच्या खुर्चीवर मी क्षणभर  टेकलो. "  एकटेच आहात ना?"मी प्रचंड दचकलो.बाहेरून कुलूप आहे तर मग आत कस कोण आलं? की मागचा दरवाजा उघडा आहे? मी गोंधळलो.तिथे झरोख्यामागे कुणीतरी उभ होत.भयाची एक लहर माझ्या अंगावरून सरसरत गेली.या पूर्वी अनेकवेळा मी अशा प्रसंगात गेलो होता.तरीही माझ्या अंगावर काटा उभा राहिला." आत या , चहा घ्या."मी भारावल्यासारखा दरवाज्याची कडी काढून आत गेलो.आत अंधार होता .मी लाईट लावली. तिथल्या खुर्चीत झोकून दिलं. " चहा !" कोणीतरी माझ्या हातात चहा ठेवला.हिरव्या बांगड्यांनी भरलेला हात व लांबसडक बोट मला दिसली.मी मान वर करून पाहिलं.एक स्त्री समोर उभी होती.हिरवी नऊवारी साडी....वर हिरवा ब्लाऊज...डोक्यावर पदर...कपाळावर मोठ गोल कुंकू...रंग गोरा... चेहेर्यावर सात्विक भाव ...सुंदरतेसह एक खानदानी बाज तिच्या उभ्या राहण्यात होता.कोण होती ती स्त्री... आणि रात्रीच्या वेळी इथे काय करतेय?"आ...आपण कोण?" मी थरथरत्या  आवाजात विचारले.ती हसली.अनेक छोट्या घंटा मंजूळ आवाजात किणकिण करत असल्याचा भास मला झाला." तुम्ही जो फोटो बघून इथे आलात... ....खरं सांगायचं तर तुम्हाला इथे आणलं गेलंय...त्या  फोटोत मध्ये उभी आहे ती मीच..या घराची मधली सून ...! "माझी बोलतीच बंद झाली.काही क्षण मी तसाच राहिलो. स्वतःला सावरेपर्यंत ती तिथून जाण्यासाठी वळली." रुक्मिणी पाहुण्यांना विचार त्यांना जेवायला काय आवडेल?"आतून आणखी एक आवाज आला." धाकट्या जाऊबाई विचारात आहेत की जेवण कसलं चालेल?म्हणजे शाकाहारी की मासे चालतील?तिने पाठमोर राहूनच विचारले. ज्याचं आस्तिवच नाही त्या मला जेवण देणार आहेत.हे काय चाललंय? मी डोक दोन्ही हातानी गच्च पकडलं." मी दुपारी भरपेट जेवलोय... आणि आता येताना खाऊनच आलोय."" पाहुणा उपाशी राहिला तर आम्हाला सुध्दा उपाशी राहावे लागते...या घरचा तसा नियम आहे."थंडीतही मला दरदरून घाम फुटला होता.धाडस करून मी विचारले..." त्या पेक्षा तुम्हा तिघिंशी बोलायला मला आवडेल...चालेल?"" हो.!"मी चहाचा कप बाजूच्या टेबलावर ठेवला. खूप दुध घातलेला..वाफाळणारा ... ज्याला एक सुंदर वासही येत होता असा चहा त्या कपात होता. माझ्या समोरच्या त्या चहाला...त्या कप बशीला तरी या दृश्य जगात अस्तित्व होत का? मी तो चहा पिण्याच धाडस केले नाही." सुधा..." त्या स्त्रीने स्वयंपाक घराकडे बघून हाक दिली." मोठ्या जाऊबाई... खाली या . पाहुण्यांना आपल्याशी बोलायचं आहे."  नंतर तिने माडीकडे बघत हाक दिली.पहिल्याने स्वयंपाक घरातून एक मध्यम उंचीची स्री आली.अबोली रंगाची साडी साधारण तसाच ब्लाऊज ... नाकी डोळी नीटस् ... कपाळावर कुंकू.... डोक्यावर पदर... डोळ्यात उदास पणाची झाक स्पष्ट दिसत होती.तेवढ्यात माडीवर पावलं वाजू लागली.एक स्थूल स्त्री हळूहळू माडी उतरू लागली. ती खाली उतरली.मोरपंखी रंगाची नऊवारी साडी.....निळा ब्लाऊज...डोईवर पदर...तिचा चेहरा गोल होता.डोळे निळे गहिरे होते. अंगभर दागिने दिसत होते." तुम्ही तिघी बसून घ्या..""आम्ही बसलो काय ...न बसलो काय? त्याला काही अर्थ नाही.विचारा ...जे तुम्हाला विचारायचे आहे ते!"मधली स्री म्हणजे रूक्मिणी म्हणाली.मी माझ्या बॅगेतून फोटो बाहेर काढला." हा बहुतेक तुमचा फोटो असावा पण यात तुमचे चेहेरेच नाहिसे झालेत असं कां?"" रुक्मिणी तूच सांग ना...!"धाकटी स्री म्हणजे सुधा म्हणाली.तिचा आवाज खूपच गोड होता.रूक्मिणीने सांगायला सुरुवात केली.   "ऐका...आम्ही तिघी खोतांच्या सूना...आम्हा तिघांचीही लग्न चौदा ते पंधराव्या वर्षी झालीत.खेळण्या बागडण्याच्या वयातच आमच बालपण संपल.... संसार....धुणी भांडी...जेवण.. यात अडकलो आम्ही! तस खूप श्रीमंत घर आम्हाला लाभले होते.इथे आमचा छळही होत नव्हता. पण आम्ही आमचं अस्तित्वच हरवून बसलो होतो.आयुष्यभर आमचा कोंडमारा होत होता. उंबरठ्याच्या आतच आमच जग सामावलेले होते.माझ काम झरोका उघडून बाहेर किती पाहुणे आलेत ते पाहायचे व तेवढा चहा नोकरा हाती बाहेर पाठवायचा. बस्स एवढंच! दिवसभर फक्त चहा करायचा.नवरा एवढा तापट त्यांच्याशी बोलायला सुध्दा भिती वाटायची.तसा आम्हा तिघिंचा आमच्या नवर्यांशी फारसा संवाद नसायचा...प्रेमाच सोडून द्या...साध संसारा संदर्भात सुध्दा बोलणं व्हायचं नाही.  ही सुधा हिच काम सगळ्यांच जेवण करायचं.. तिच्या हाताला विलक्षण चव...पण कोणीच कधीही तिच्या जेवणाची तारिफ केली नाही.उलट चांगलं जेवण झाले की आम्हाला शेवटी अर्धपोटी राहावे लागे. दिवसभर विस पंचवीस माणसांचं ती जेवण करते."मला एक जाणवलं ते म्हणजे ती मध्ये  मध्ये सगळं वर्तमानकाळात असल्यासारखी सांगत होती. मी कान देऊन ऐकू लागलो खरं तर मी मोबाईलचा साऊंड रेकॉर्डिंग सुरू केला होता.पण मला खात्री होती त्यात काही रेकॉर्ड होणार नव्हते." तिचा आवाज गोड आहे .ती  गाणही शिकलीय...पण इथे गाणं म्हणायला बंदी आहे.आम्ही तिघी एकत्र आलो की तिला आग्रह करतो मग ती हलकेच गुणगुणते..तेवढाच विरंगुळा.  ही सर्वात मोठी जाऊबाई जानकी.. हिच एकच काम सगळं घर साफ ठेवायचं. तिला कितीतरी ओव्या पाठ आहेत,सुंदर कशीदा काढते.  रांगोळी तर बघत राहावी अशी काढते.पण काय उपयोग?"" म्हणजे?" मी विचारले." तुळसी समोर कधीतरी ती रांगोळी काढते.पण तिला गावातल्या देवीच्या देवळासमोर पटांगणात एकदा तरी रांगोळी काढायची होती. पण आम्हाला बाहेर पडायला बंदी होती.या अंगणाबाहेरचे आकाश व जग आम्ही लग्नानंतर पाहिलच नाही."" लहानपणी चंद्र तारे खुणावत.दिवसा शेतात जायचं...झाडाला टांगलेल्या झोपाळ्यावर झोके घ्यायचो... मैत्रिणींसोबत खेळायचे पण हे सारं नंतर आमच्या  कक्षेबाहेरच झालं एका सुंदर सोनेरी पिंजऱ्यात आम्ही कैद झालो." सर्वात मोठी सून जानकी पहिल्यांदाच बोलली." पण तुम्ही कधी माहेराला गेला नाहीत?" मी हळूच विचारले." वर्षा किंवा दोन वर्षांतून एकदा ते सुद्धा बंद गाडीतून. फक्त एका दिवसाठी.वर्षातून एकदा गावच्या देवीच्या उत्सवाला रात्री बाहेर जाण एवढंच .घराच्या कुठच्याही निर्णयात आमचा सल्ला घेतला जात नव्हत."  सुधा म्हणाली" बापरे. मग कसं आयुष्य काढलात तुम्ही? " आमच आयुष्य एका परीघात बंदिस्त असलेले होते . खूपदा वाटायचं सगळं झुगारून अंगणात नाचावं...पावसात भिजाव... चांदण्यात न्हाऊन जाव...इथला किनारा सुंदर आहे म्हणे तिथे जाऊन गाणी गावी...उफाणलेला वारा अंगावर घ्यावा.सगळ्या इच्छा अपुर्या राहिल्या. फोटोत आमचा चेहरा कोरा दिसतो तो यामुळेच आम्ही तिघी बिन चेहर्याच्या...आमची अशी काही ओळखच नाही." रूक्मिणी म्हणाली." तुम्ही यांतून कधी व कसे सुटणार?" मी विचारले." त्यासाठीच तुम्हाला इथं बोलावलं आहे... तुम्ही स्वतः आला नाहीत...त्या चोराला इथून फोटो पळवून नेण्याची प्रेरणा आम्ही दिली व तो फोटो तुम्हाला पाठवेल यांची पण आम्हीच योजना केली.आम्हाला या बंद घरातून बाहेर जायचंय.तुम्ही आम्हाला बाहेर नेणार आहात... आम्हाला खाडीचा किनारा हा गाव...देऊळ सगळं तुम्ही दाखवणार आहात.?"रुक्मिणी म्हणाली.म्हणजे माझं वीरपूरला येण सहज नव्हतं तर ती योजना होती." पण..पण हे कसं शक्य आहे? तसं तुम्ही सहज या बंद घरातून बाहेर पडू शकला असता.तुम्हाला अडवण्याचा प्रश्नच येत नाही." मी विचारले."   नाही आम्ही आमची मर्यादा स्वतः ओलांडू शकत नाही.पण आम्ही कुणा दुसऱ्याच्या शरीरातून बाहेर पडू शकतो.यासाठीच तूझी योजना केलीय आम्ही.रात्र संपण्यापूर्वी,तू उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प कर व पाणी प्राशन कर मग आम्ही तूझ्या शरीरात प्रवेश करू.उद्या तूझ्या सोबत आम्ही बाहेर पडू.घाबरू नकोस.आम्ही जास्त काळ तूझ्या शरीरात राहणार नाही.आम्हाला वाटेल तेव्हा बाहेर पडू."रुक्मिणी म्हणाली.मी आवक झालो. त्या तिघी आपला चेहरा शोधू पाहताहेत.त्यांना कित्येक दिवसांनी बाहेरच जग पहायचे आहे.त्यासाठी त्या मला माध्यम बनवताहेत.सगळच अजब होत.  मी उठलो बाटलीतील पाणी ओंजळीत घेतलं व  संकल्प केला..."मी तुम्हाला खुल्या जगात नेईन.मी ..मी त्यासाठी स्व इच्छेने माध्यम बनेन." मी ओंजळीतील पाण्याचे आचमन केले.त्या क्षणी त्यातिघी मनापासून हसल्या.का कोण जाणे पण मला झोप अनावर झाली.मी तिथेच टेबलावर कलंडलो." ऊठ , आपल्याला बाहेर जायचे आहे."रुक्मिणी मला उठवत होती.मी डोळे चोळीत उठलो  माझ्या मनगटी घड्याळात पहाटेचे चार वाजले होते." एवढ्या लवकर?"" हो, आम्ही तिघी खूप उत्सुक आहोत.रात्रभर इथेच बसून होतो."मी झटपट उठलो.तोंड धुतले. चेहरा ठिकठाक केला.त्या तिघी प्रचंड आनंदित दिसत होत्या." चला."अचानक त्या तिघी नाहिश्या झाल्या.मी दचकलो." आम्ही ,तुझ्या शरीरात शिरलोत. तू बाहेर पड."हा आवाज माझ्या आतून म्हणजे अंतरातून आला होता.त्या तिघिंनी माझ्या शरीराचा ताबा घेतला होता. आता माझ्या हाती काहीच नव्हते.मी त्यांनां नव्हे तर त्या मला घेऊन जात होत्या.मी बाहेर पडलो.ते भल मोठ कूलूप दरवाजाला लावलं." सुधे... रूक्मिणी आपलं घर अखेरचं बघून घ्या.आपण पुन्हा इथे येणार नाही आहोत. हो पण या घराचा वारसदार लवकरच इथे राहायला येईल."हे जानकी बोलत होती.मृत्यूनंतरही  या घरात त्यांचा आत्मा अडकून पडला होता.तरीही घर सोडताना त्यांना वाईट वाटत होते.मी गाडी खाडीच्या दिशेने वळवली. आपोआप मी गाणी व ओव्या म्हणायला लागलो. आवाज माझा नव्हता तर सुधा व जानकीचा होता.तेवड्यात एक मच्छीमार जाताना भेटला तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता.गाडी खाडीजवळ पोहोचली.गाडी बंद करून मी खाली उतरलो.अचानक मला हलकं वाटू लागले.त्या तिघी माझ्या शरीरातून बाहेर पडल्या होत्या.त्या धावतच गेल्या.वाळूत नाचू लागल्या.ऐकमेकींच्या अंगावर पाणी उडवून लागल्या.अगदी लहान मुली झाल्या होत्या त्या! मला खात्री होती की त्या फक्त मलाच दिसत होत्या.त्यांची पावलं वाळूत उमटत होती .त्या पावलांनी त्यांच्या खर्या आयुष्यात कित्येक वर्षे मातीला स्पर्श केला नव्हता.नकळत माझ्या डोळ्यातून आसव ओघळली. दिवसभर त्यांनी मला सारं गाव फिरवलं.देऊळ,शाळा, प्रत्येक रस्ता सगळं सगळं फिरवलं.त्या गात होत्या ...एकमेकींची फिरकी घेत होत्या.शाळेतल्या झोपाळ्यावर त्यांनी झोका घेतला.  बाहेरच्या व्हरांड्यात नाचल्या.तिथला प्रत्येक बोर्ड त्यांनी वाचला. वर्गात शिरून त्या बेंचवर लहान मुलांसारख्या बसल्या.त्या दिवशी पहाटे सर्वांनी देवळा समोर एक सुंदर  रांगोळी पाहिली जी कोणी काढली ते कोणालाही माहिती नव्हते.(मी सोडून) माझ्यासाठी तो दिवस अलौकिक होता.सायंकाळी जाता जाता त्या म्हणाल्या..." मुला तू नसतास तर आम्ही आणखी किती काळ भरकटत राहिलो असतो कोण जाणे? तू आम्हाला या अवस्थेत आमची ओळख दिलीस."त्या माझ्या शरीरातून बाहेर पडल्या तीन घूसर रेघा आसमंतात विलीन झाल्या.मी एकटक त्यांचं या ज्ञात जगातून  अज्ञात जगात जाण पाहत होतो.आणि हो ठाकूर त्याच दिवशी ठार वेडा झाला होता.  स्वतः शी बडबडत होता...चुकलो - चुकलो म्हणत आपल्याच थोबाडीत मारून घेत होता.सायंकाळी जाताना मी नामदेवरावांना भेटलो तेव्हा त्याने मला हे सांगितले.( त्यांनी(तिघिंनी )हे कधी व कसे केलं ते मलाही माहित नव्हते.)  मी घराची चावी नामदेव कडे दिली . त्याला सांगितले की खोल्यांचे वारसदार लवकरच येतील त्यांच्याकडे ही चावी दे.पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कोकणात स्रीयांची अशी अवस्था असावी ह्यांचे मला वाईट वाटले.मी माझ्या घरी पोहचल्यावर बॅगेतून तो फोटो बाहेर काढला व क्षणभर दचकलो पण मला ते अपेक्षीतच होते.  होय, त्यांचे चेहरे आता अगदी ठळकपणे दिसत होते.त्या तिघी जानकी, रूक्मिणी व सुधा यांना त्यांचे चेहरे मिळाले होते.जसे मी बघितले होते तसेच! आता तो फोटो व दरवाज्यावरच्या नक्षीकामांचे फोटो  माझ्या वस्तू संग्रहालयात राहणार आहेत.*****------*****-----****-------******-----***----****----बाळकृष्ण सखाराम राणे