प्रिय सोना तुझा आपल्या लग्नातला टाय अगदी टाय पिन सकट तिथेच आहे..मुलाच्या लग्नातला कोट मुंबईत स्ट्रीट वर घेतलेले जीन जाकीट दोन मोदी जाकीट हे पण तू परत त्यांना घालायला येशील अशी वाट बघत आहेत रेएकदा हौस म्हणून पुण्यात घेतलेले फुला फुलांचे जाकीट आपण दोघेही वापरायचो तेही आहे बाकी तुझ्या कपड्याच्या कपाटातला तुझा वरचा कप्पा हँगर सकट तसाच आहे काही जूने कपडे दिले आहेत पण बाकी इस्त्रीच्या घड्या तशाच आहेत तुझे शर्ट वूलन पॅन्ट ,जीन पँट आहेत मला त्या वापरता नाही येणार पण पुढे मागे कोणी सामोरे आले तर गरजू व्यक्तीला त्यातील थोडे कपडे देऊन टाकेन सध्यातरी ते कपडे तसेच आहेत तुझे बरेच टी शर्ट जाकीट वगैरे मला बसत होते ते मी घातले की तुला आवडायचे पण तू तुझे टी शर्ट घालते आणि माझे पण ढापते असे खोट्या रागाने तेव्हा तू म्हणायचा आता तर सगळेच कपडे माझे झालेत थोडे ऍडजस्ट करून मी ते वापरते आणि तुझ्या बाहुपाशात असण्याचा अनुभव घेते रात्री बेड वर मी तुझ्या जागेवर झोपते तिथे असलेले तुझे अमृतांजन, तू गुडघ्याला लावायचे ते मलम , कुर्ग मधून आणलेला मालिश करायचा हॅण्ड मसाजर पाण्याची बाटली,तुला झोपताना लागणारी कानपट्टी ठेवलेली आहे मी गमतीने त्याला तुझी बाळलेणी म्हणायचे मी झोपेत असताना जर कधी तू आलास तर तुझ्या सगळ्या गोष्टी जागेवर हव्यात तुझ्या जागेवर झोपल्यावर नेहेमी तुझ्या अंगाचा स्पर्श जाणवतो मला तुझेच पांघरुण अंगावर घेते जणू मी तुझ्या कुशीत निवांत आहे असे वाटतेजेवणाच्या टेबल वर तुझ्या राखीव खुर्चीवर बसते आणि तुझ्या सोबत जेवते आहे असे फिलिंग येते व्हरांड्यात असलेल्या खुर्चीवर तू रोज पेपर वाचत बसायचा मी पण पाच दहा मिनिटे तिथे बसून तू असल्याचा अनुभव घेते बागेतल्या झुल्यावर मात्र माझ्या जागेवर बसून हळू हळू झोका घेते आणि शेजारी तू बसला आहेस असे समजते तुला थोडा सुद्धा जास्त झोका चालायचा नाही तुझे चप्पल बूट थोडे मोठे असले तरी मला ते येतात तुझ्या घरातल्या सपाता आता मी वापरते घरभर फिरून मनसोक्त तुझ्या अस्तित्वाचा भास घेते तुझे चप्पल घालून बाहेर सगळीकडे फिरते तेव्हा तुझ्या सोबत जग फिरत असल्या सारख वाटते तुझे मोजे आणि बूट घालून मॉर्निंग वॉक ला जाते त्या मोजे बुटाला तुझ्या पायाचा सहवास लाभला आहे माझ्या पायाला सुद्धा तो जाणवतो तुझ्यासाठी मी आग्रहाने घ्यायला लावलेली तुझी आवडती फिरायला घालायची पांढरी चड्डी पण कपाटात तशीच आहे तू बरा झाला की ती वापरणार होतास तशीच घडी करून ठेवली आहे तू कधीतरी शौक म्हणून घेत असलेल्या बिअर च्या बाटल्यांची आता expiry झाली आहे पण तू वापरत असलेला बियर मग मी रोज सरबत प्यायला घेते आणि त्याच्या काठावर असलेला तुझ्या ओठांचा स्पर्श अनुभवत असते तुला आठवत का ..स्पोर्ट्स घड्याळ मागवले होतेस तू ऍमेझॉन वरून माझ्याच आग्रह खातर नंतर म्हणाला उगाच मागवले इतक्या महागाच घड्याळ मी म्हणलं असू दे रे आता वापर ते घड्याळ आता मी माझ्या मोबाईल वर सेट करून घेतले आणि वापरते रोज घालताना तुझी आठवण काढून.आपण ऋषिकेश ला गेलो होतो तेव्हा एक पंचरत्न माळ घेतली होती ती तू कायम वापरत होतास ती माळ पण जपून ठेवली आहे तू नवीन आणलेला स्वयंपाक घरातला हँडी मॅशर मला वाटते एकदाही वापरला नाहीस मी मात्र वापरत असते जमेल तेव्हा फ्रीज मधे असलेल्या त्या इसेन्स बाटल्या मात्र तू कशासाठीआणल्या होत्या ते लक्षात नाही आले बहुधा लस्सी साठी असावे आता एकटी साठी किती लस्सी करणार मी...तरी देखील तुझ्या पद्धतीने मँगो लस्सी मी करणार आहे तू हौसेन आणलेल्या लस्सी किंवा कोल्ड ड्रिंक प्यायच्या दोन काचेच्या स्ट्रॉ असलेल्या बरण्या मी एकटीच वापरते कधीतरी आलटून पालटून ज्यूस करून ...आणि हो सांगायच राहिले तू गाडी चालवताना वापरत होतास तो चष्मा त्याच्या गॉगल लेन्सेस सुद्धा गाडीत ठेवल्या आहेत एक साखर असलेली छोटी डबी, आपल्या घरच्या आवळा सुपारीची डबी या पण आहेत तुझ्या गाडीत अशा या तुझ्या वस्तू मला घरातला तुझा वावर जाणवून देत असतातआणि त्यांच्या बरोबर वावरताना मी दिवस रात्र तुझी सोबत अनुभवत असतेजरी माझ्यापासून दूर असलास तरी माझ्या सोबत असतोस हा खूप मोठा आधार आहे मला