प्रिय सोना... तुझे माझ्यावर खूप प्रेम होते पण ते कधी बोलून दाखवणे वगैरे प्रकार तुला फारसे जमायचे नाहीत मी दिवसातून किती वेळ आय लव यू म्हणायची आणि तुला पण म्हण असा आग्रह करायची पण तू फक्त हसून सोडून द्यायचा शब्दांच्या पिंजऱ्यात अडकणारे तुझे प्रेम नव्हतेच मुळी आपल लग्न ठरलं तेव्हा आपण एका संध्याकाळी पाणीपुरी खायला गेलो होतोपहिली पाणीपुरी खाल्ली आणि मला ठसका लागला नाका डोळ्यातून पाणी वाहू लागले (मला बऱ्याच वेळा गडबडीने खाताना ठसका लागत असे )तेव्हा सावकाश खात जा ग किती गडबड असते खाताना..(कधी कधी गमतीने मला तू ठसकेबाज म्हणायचास)त्या दिवशी माझी अवस्था पाहताच तू ताबडतोब हातातली प्लेट ठेवून माझ्या साठी ग्लास मधून पाणी घेऊन आलास तेव्हाच मी ओळखले आपल्या आयुष्याचा प्रवास सुखी होणार आहे आणि खरेच या संपूर्ण प्रवासात तू मला खूप सुखी केलेस माझ्या कोणत्याच गोष्टीला कधी नकार नाही माझे स्वातंत्र्य माझे विचार याचा कायम आदर केलास माझ्या कोणत्याच फॅशनला कधी नकार नाही दिलास किंबहुना मी फॅशन केलेले तुला खूप आवडायचे लग्नाआधी साडीत वावरणारी मी मला प्रथम पंजाबी ड्रेसचे कापड घेऊन तू शिवायला लावलास आणि हनिमून ला घालायला पण लावलासस्लीवलेस कपडे तुला कायमच आवडायचे नंतर देश परदेश फिरताना अनेक प्रकारचे फ्रॉक, स्कर्ट ,पॅन्ट , टी शर्ट तू मला घेत होतास कधी डी मार्टला खरेदीला गेले की तिथल्या पॅन्ट बघून माझ्याकडे कोणती नाही तो रंग पाहून तू मला तिथे ट्रायल सुद्धा घ्यायला लावायचा नवीन प्रकारचे ड्रेस मी ट्राय करायला हवे यासाठी तू आग्रही होतास मग त्यासाठी माझी आणि स्वतः ची सुद्धा तब्येत अपटुडेट ठेवणे यासाठी प्रयत्नशील असायचा रोजचे तासभर फिरणे चुकवायचे नाही आले की अंगाला स्ट्रेचिंग देणारे काही व्यायाम हलकी योगासने आपण दोघे करायचो मला खायचा नाद जास्त... त्यातल्या त्यात गोडखाऊ मी जास्त गोड खाऊ नका गोडोबा काका शुगर वाढते असे तू मला प्रेमाने समजवायचा मी पण हळूहळू अती गोड खाणे कमी केले तू मला म्हणायचा तुला बर्फी खायची पेढा खायचा लाडू खायचा खा पण एक किंवा अर्धा जिभेची चव तेवढीच असते त्यानंतर खाल्लेले शरीराला अपायकारक असते तुझे विचार कायमच संयमित असायचे मला कोणती गोष्ट कधी हवी आहे हे तुला बरोबर समजत असे अगदी मनकवडा होता तू बाजार करणे ताजी भाजी आणणे तुझा आवडीचा विषय कधी कधी अचानकच बाजारातून येताना फणस, खरवस, केक अथवा माझ्या आवडीची एखादी गोड गोष्ट आवर्जून आणायचा एकदम सगळी खाऊ नको बर का थोडी थोडी खा असे म्हणायचा मला खूप आनंद व्हायचा दर पंधरा दिवसांनी जेवणानंतर ची शुगर चेक करायचा तुझा शिरस्ता होता मी थोडीशी वाढीव साइडला असायचे पण तुझी कायम लोअर साइडला मेन्टेन असायची माझी वाढलेली असली की तू म्हणायचा आज रात्री गोळी घे आणि तिखट कितीही खा पण गोड खाऊ नकोस या सगळ्या प्रोसेस मध्ये माझी काळजी आणि प्रेम हेच दिसायचं मी थोडी चिडकी थोडी गरम डोक्याची होते नोकरीच्या ठिकाणी किंवा बाहेर काही वावगे घडले की मी तिथल्या तिथे भांडून वाद घालून वाजवून यायचे आणि आल्यावर सगळे तुला सांगून तण तण करायचे तेव्हा तू म्हणायचा कशाला चिडचिड करते त्यामुळे काही फरक पडणार आहे का ?हे सगळ असच चालतंकशाला आपल्या जीवाला त्रास करून घ्यायचा शांत रहा माझं काय चुकलं असेल तर मला मार पाहिजे तर त्यांचा राग माझ्यावर काढ हे घे असे म्हणून माझा हात उचलायचा तुला मारायला तेव्हा मला खूप हसू येत असे मी म्हणत असे आम्ही आपली मातीतली माणसे आम्हाला राग लोभ आहे तुम्ही संत लोक आहे संत प्रदीपकुमार असे मी तुला म्हणायची आणि खरेच तुझा स्वभाव शांत आणि सात्विक होता कधी कुणी तुला रागावलेले पाहिले नाही ना इतक्या वर्षाच्या संसारात तुझा आवाज कधी चढला भांडण तर आपली कधी होतच नसत कुठ किरकोळ तात्पुरते तात्विक वाद झाले तर ते तेथेच मिटत माझ्या प्रत्येक पावलाला तुझी काळजी दिसायची रस्त्यावर चालायला लागले की कधी कधी ठेच लागत असे तेव्हा माझ्या शेजारीच असणारा तू मला पकडत असे खाली बघून चाल जरा आईसारखे पडायचे आहे का तुला कुठे खड्डे, कुठे घाण आहे हे बघत जा की बावळट सारखे नको वागू असे मला रागावायचा.जेवताना पाणी पिताना मला कधी ठसका लागला की नीट जेवत जा की, शांत पणे पाणी प्यावे एवढी कसली गडबड असते ग तुला असे ओरडायचा जेवण पण शांतपणे सावकाश करीत जा मला कधीच काही होऊ नये असे तुला वाटायचे अगदी रस्ता ओलांडताना सुद्धा मला डावीकडे घेऊन तू चालायचा घरात, बाहेर, खाताना, पिताना सतत तुला माझी काळजी असे माझ्याभोवती एक संरक्षक कडेच होते जणू तुझे माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशन वेळी तू दिवसभर माझ्या सोबत होतास वेळोवेळी चेकप साठी घेऊन जाणे ही प्रोसेस महिना भर चालली होती पण हे सगळ तू अगदी प्रेमाने करायचामाझ्या ऑपरेशन नंतर आपल्या घरून काहीच मदत मिळाली नाही थोडे दिवस स्वयंपाक साठी बाई ठेवूया असे वाटले पण तुला स्वयंपाकी बाईच्या हातचा स्वयंपाक मंजूर नव्हता मग दीड दोन महिने माझे आजारपण तुच काढलेस तू मला फक्त पोळी लाटून दे बाकी सर्व मी करीन असे म्हणून तू ते स्वयंपाक काम करून दाखवलेस मला तेव्हा वाचन ,मोबाईल बंदी होती तुच तेव्हा मला मोबाईल वर गाणी नाटके ऐकवायचा कधी कधी वाचुन दाखवायचानॉर्थ ईस्ट टूर मधे सतत तुझ्या सोबत चालणारी मी शेवटी डिपार्चर च्या वेळी एकदम पुढे निघाले आणि कशी कोण जाणे पडले ती पण डोक्यावर काही वेळ मी बेशुद्ध होते तू ओ आर एस दिल्यावर मी भानावर आले होते पण मला उलट्या झाल्याने आपल्याला त्या दिवशी परत जाता आले नाही तिथे एक दिवस थांबून तिथल्या डॉक्टर चे ओके सर्टिफिकेट घेतल्या वर मगच आपल्याला डिपार्चर ला परवानगी होती मला पाठीला खूप लागले होते त्या दिवशी एका हॉटेल मध्ये आपण उतरलो होतो मी थोडी अस्वस्थ होते संध्याकाळी आपण तिथल्या डॉक्टर कडे दाखवून आलो माझे रिपोर्ट ओके होते ते घेऊन आपण परत हॉटेल वर आलो तू मला पेन किलर देऊन रात्रभर माझ्यापाशी बसून जागला होतास सकाळी मला उठता येत नव्हतं तू हळूच उठवून मला गरम पाण्यानं शेकून अंघोळ घातली कसेतरी चार घास मी खाल्ले त्यानंतर घरी आल्यावर सुद्धा मला त्रास जाणवत होता डोके खूप दुखायचे अचानक भूक लागायची अंग दुखायचे तीन एक आठवडे दुखणं चालू होते त्या काळात तू कायम सतर्क असायचा रात्री माझ्या सोबत माझ्याबरोबर जागा असायचा मी बरी होईपर्यंत तुझ्या डोळ्यात माझी काळजी दिसायची त्यानंतर सहज एकदा बोलता बोलता मी मृत्यूला शिवून कशी परत आले हे तू मला सांगितले होतेस जे मला त्यापूर्वी माहितच नव्हते मी तुला विचारले तू मला हे आधी का नाही सांगितले तेव्हा तू म्हणालास हे तुला सांगायचे धाडस मला होत नव्हते इतका तू माझ्या बाबतीत हळवा होतास...आणि त्यानंतर तू मला म्हणाला होता त्या दिवशी तू जो ड्रेस घातला होतास तो जरी नवीन असला तरी परत घालू नकोस टाकून दे तो ड्रेस तू घातलास की तू निपचित पडलेली माझ्या डोळ्या समोर येतेस मी मरण पाहिले त्या दिवशी तुझं. ..माझं मरण ही कल्पना तुला सहन झाली नव्हती मला काय माहिती काही महिन्यांनी मीच तुझ मरण प्रत्यक्ष पाहणार आहे ते...मला बारीक सारीक काही झाले तरी तुला आवडायचे नाही तुला बरे वाटत नसते तर लगेच सांगत जा आपल्याकडे गोळ्या आहेत ना कोणतेच आजारपण अंगावर कशाला काढतेस अशा रागावण्यात सुद्धा तुझे प्रेमच दिसत असे मला बाहेरचे कोणतेही काम ना सांगणे, कोणतीही तोशीस पडू न देणेशक्यतो सगळी कामे स्वतःच करणे इकडे तुझा कल असायचा पाच लिटर पाण्याचा भरलेला कॅन असो बाजारातून आणलेली भाजी असो दोन लिटर दुधाची पिशवी असो अथवा इस्त्रीचे कपडे असोत सगळ तू स्वतः हातात घ्यायचाघराची कुलुपे लावणे दारे बंद करणे गॅस रेग्युलेटर लावणे हे सगळं तुच बघायचा बागेत पाणी सोडले त्याची पाईप इकडे तिकडे हलवायची ते सुद्धा तू म्हणायचा तू नको जाऊ उन्हात.... मी पेपर वाचत बसलो आहे इथे व्हरांड्यात अधूनमधून उठून बघेन मी जर कुठ काही इतर कामासाठी निघाले आणि तुला मी रिक्षाने जाते अथवा स्कूटर घेऊन जाते असे सांगितले तरतू लगेच नको उन्हातान्हात जाऊ मी येतो सोडायला तुला काम झालं की फोन कर आणायला पण येतोय असे म्हणायचा बँकेच्या नोकरीत बदली होऊन मी अनेक ठिकाणी गेले प्रत्येक ठिकाणी तू सोबत होतास आणि गाडी घेऊन मला सोडायला आणायला येत होतास या सगळ्या गोष्टी ज्या तू मला करू देत नव्हतास त्यामागे फक्त प्रेम होते संपूर्ण वैवाहिक आयुष्यात सतत तू माझी सावली सारखी सोबत केलीस माझ्या वडिलांची जशी मी खूप लाडकी होते तशीच तुझीही लाडाची होते त्यांच्या सारखेच तू मला आयुष्यभर एखाद्या राजकन्येसारखे जपलेस सांभाळलेसमी तर तुला कोहिनूर हिरा म्हणायचे जो फक्त माझ्याकडे होता आपल्या वैवाहिक जीवनात प्रथमपासून तू मला प्रेमाने पुरेपूर भिजवून टाकले होतेस मी तर आजही तुझ्यावर प्रेम करते आणि करत राहीन तुझे प्रेम तू जाताना घेऊन गेलास असे मला वाटते...पण तसे नाहीये कारण अजूनही मला प्रत्येक गोष्टीत तू जवळ नसला तरी तुझी साथ जाणवते तुझ्या प्रेमाचे एक अदृश्य संरक्षक कुंपण तू माझ्या भोवती घालून गेला आहेस..You were Gem 💎 of persons...