Parents can shape the future of their children. in Marathi Children Stories by Ankush Shingade books and stories PDF | आईवडील घडवू शकतात मुलांचं भविष्य

Featured Books
Categories
Share

आईवडील घडवू शकतात मुलांचं भविष्य

आईवडीलच घडवू शकतात आपल्या मुलांचं भविष्य?   

           *आईवडीलच घडवू शकतात आपल्या मुलांचं भविष्य. असं म्हटल्यास आतिशयोक्ती वाटणार नाही. कारण ते जसे वागतात. त्याचं अनुकरण त्यांची मुलं करीत असतात. जर ते दारु पित असतील तर मुलंही दारु पित असतात आणि ते जर व्याभिचार करीत असतील तर....... मुलंही व्याभिचारी निघतात. म्हणूनच खुद्द आईवडीलांनी चांगले वागण्याची गरज आहे. जेणेकरुन मुलांमध्येही चांगले संस्कार रुजतील व मुलांचं भविष्य उज्ज्वल बनेल.*   

     'झोपले का बाळांनो, उठा लवकर. आज शाळेत जायचंय.' एका अशिक्षित आईचे उद्गार. ती अशिक्षित होती. परंतु तिला आपल्या बाळाची काळजी होती. तिला वाटत होतं की ते बाळ. ते आपलं आहे व शिकायला हवं. तो शिकून मोठा व्हायला हवा. त्याला आपल्यासारखं उन्हात राबावं लागू नये.       ती आई अशिक्षित असली तरी तिला शिक्षणाचं महत्व कळलं होतं. आज त्याच आईनं आपल्या बाळाच्या मागं लागून लागून त्यांना उच्च शिक्षण शिकवलं होतं. तिला नोकरी लागतांना वशिला हवा वा ओळखपारख हवी हेही माहीत नव्हतं. आज तिची मुलं उच्चशिक्षित झाली होती व चांगल्या हुद्यावर नोकरीलाही लागली होती. 

      आईवडील...... सर्वांचेच आईवडील शिकवतात आपल्या बाळाला. आपल्या बाळाचं भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना उन्हातून सावलीत नेतात. त्यांच्या पुस्तकांची इच्छा पुरवतात. वाटतं की ते मुल उच्चशिक्षण शिकावं. परंतु सर्वच आईवडीलांची मुलं उच्चशिक्षित होतात का? याचं उत्तर नाही असंच येतं. काहींची मुलं उच्चशिक्षित होतात आणि काहींची. अजिबात शिकत नाहीत. त्याचं कारण काय?         मुलांचं उच्चशिक्षित होणं न होणं. यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. त्यातील मुख्य एक कारण असतात, त्या मुलांचेच आईवडील. मुलांच्या आईवडीलांच्या सवयी जर वाईट असतील, तर ती मुलं देखील वाईट मार्गाकडं नकळत जातच असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास आजच्या काळातील मोबाईलचं देता येईल. आजचे आईवडील मुलांकडून अपेक्षा करतात की त्यांनी जास्त मोबाईल पाहू नये आणि स्वतःच मुलांसमक्ष मोबाईल पाहात बसतात. तेच पाहातं मुल व तेही मोबाईल पाहायला बसतं आणि मोबाईल हिसकल्यास जोरजोरानं रडतं. मग ते मुल रडू नये म्हणून खुद्द आईवडील त्याला मोबाईल देतात व ते चूप बसतं. 

       मोबाईल पाहण्याची ही आईवडीलांची सवय. तीच सवय बाळांना लागते. आज अगदी लहान बाळ, मग ते एक वर्षाचं का असेना, ते आपल्याला त्रास देतं म्हणून वा त्यानं आपल्याला त्रास देवू नये म्हणून खौद्द आईवडीलच त्याच्या हातात मोबाईल देतात. तो चूप, मग आपलंही काम सुकर. अशी अपेक्षा. परंतु त्यातून आपलं मूल बिघडतं. याचा विचार कोणीच करीत नाही. ही झाली मोबाईलपुराणाची गोष्ट. दुसरी महत्वपुर्ण गोष्ट आहे, आईवडीलांच्या सवयी. त्या सवयीही वाईटच असतात आणि त्याच सवयी बाळांना अगदी ते एकदोन वर्षाचे असतात. तेव्हापासूनच लागत असतात.

         मुख्यतः श्रीमंत असो की गरीब असो. आईवडीलांना खर्रा खाण्याची सवय असते. अशावेळेस ते आईवडील स्वतः दुकानात न जाता आपल्या मुलांना पाठवतात. ज्यातून खर्रा खाण्याची सवय मुलांमध्ये लागू शकते. काही घरी वडील हे आपल्याच मुलांसमोर दारु पितात. अशावेळेस मुलांना दारुची सवय लागू शकते. काही स्रिया आपली मुलं लहान असतांनाच आपल्या पतीला कामावर जावू देतात व परपुरुषांसोबत व्याभिचार करतात. अशावेळेस मुलांमध्ये व्याभिचाराची सवय लागू शकते. अशी मुलं लहानपणापासूनच त्यांचे आईवडील करीत असलेल्या काही वेगवेगळ्या अनैतिक गोष्टी पाहात असतात. ज्यातून वाईट सवयीचं बीजारोपण होतं. मग मुलं वाईट मार्गावर लागली आणि त्यांनी वाईट कृत्य केलं तर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. ही सत्य बाब आहे. परंतु पश्चाताप होण्यापुर्वी जर मुलांची घडणी चांगल्या स्वरुपाची व्हावी असं जर वाटत असेल पालकांना तर त्यांनी त्यांना आपल्या कोणत्याही वाईट सवयी न दाखवता जर चांगल्या गोष्टी सांगीतल्या तर मुलांमध्ये चांगल्या गोष्टी टाकता येतील. चांगल्या मुल्य वा संस्कारांचे त्यांच्यात बीजारोपण करता तरी येवू शकेल. यात आणखी एक उदाहरण. एक व्यक्ती दारु प्राशन करायचा. त्याला रोज सायंकाळी दारु प्यायल्याशिवाय झोपच येत नव्हती. परंतु एक दिवस त्यानं आपल्या तरुण व नुकत्याच वयात आलेल्या मुलाला पाहिलं. त्याला कळलं की दारु वाईट. आपण जशी पितो. तसा मुलगाही प्यायला लागला. ज्यातून मुलाचं भविष्य खराब होणारच. त्यानंतर त्यांना परमात्मा एक. ज्यात दारु अजिबात चालत नाही. हा धर्म घेतला. ज्यातून स्वतः दारु सोडली. ते पाहून मुलालाही नाईलाजास्तव दारु सोडावी लागली. कारण धर्माचं वलय देवून व त्याला संकटाची जोड देवून दारु पिवून घरी आल्यास संकट उद्भवतं. अशी आख्यायिका त्या धर्मात असल्यानं दारुला अजिबात तो मुलगा स्पर्श करीत नव्हता. अशानं त्या मुलात संस्कार वाढीस लागले. दुसरं उदाहरण बाबासाहेबांचं. त्यांचे वडील रामजी सपकाळ कसेही असोत. त्यांनी आपल्या मुलाला घडवीत असतांना चांगली वागणूक ठेवली. ज्यातून डॉ. बाबासाहेब घडले.           महत्वाचं सांगायचं झाल्यास आईवडील हेच आपल्या बाळांमध्ये जास्त प्रमाणात संस्कार रुजवू शकतात. जर त्यांनी चांगलं वर्तन घरी ठेवलं तर...... कारण आपल्याच वागण्यातून मुलं घडत असतात. आपण कसे वागतो? काय खातो? खाय पितो? हे पाहात असतात मुलं. ते पाहून एखाद्या दिवशी त्याचप्रमाणे करौ पाहतात. ज्यातून संस्कार बिघडतोच. याचाच अर्थ असा की आईवडीलांच्याच विकृत वागण्यातून मुलं बिघडतात. ते जर सुसंस्कारी असतील तर मुलंही सुसंस्कारी निघतात. त्यासाठी आईवडीलांनी खुद्द स्वतःला चांगल्या सवयी लावाव्यात. जेणेकरुन त्यांचंच अनूकरण करौन मुलंही चांगली संस्कारी निघतील. जे संस्कार त्यांच्या पश्चात मुलांच्याच कामात येतील. जसे थॉमस अल्वा एडीसन. त्यांच्या आईनं त्याला शास्रज्ञ बनवून दाखवलं. ज्याचं इवलसंही कसब थॉमसच्या आईमध्ये नव्हतं. दुसरं उदाहरण शिवाजी महाराजांचं देता येईल की ज्यांच्या आईनं बाल शिवबाला शिकवलं. ज्यातून स्वराज्याची नीव बांधली गेली. अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलांना घडवलं आहे. 

        मुखत्वे सांगायचं म्हणजे संस्कार हे मुल्य काही बाजारात मिळत नाहीत. ते घरातच मिळतात, आपल्या आईवडीलांच्या वागण्यातून. आईवडील हेच आपल्या बाळात संस्कार टाकू शकतात. परंतु ते टाकण्यासाठी खुद्द आईवडीलांना आपल्या वाईट सवयीवर बंधन घालावं लागतं. अशी बंधनं जे आईवडील घालू शकतात. त्यांचीच मुलं चांगली सुसंस्कारी बनू शकतात. इतरांची नाही. म्हणूनच खुद्द आईवडीलांनीच संस्कारी राहावे. दारुची सवय असेल तर दारु सोडून द्यावी किंवा मुलांसमोर पिवू नये. व्याभिचाराचक सवय असेल तर तिही गोष्ट सोडून द्यावी. कारण तशा वाईट सवयी या आनुवांशिकतेच्या तत्त्वानुसार गुणसुत्राच्या रुपाने तरी आपल्या येणाऱ्या पिढीत उतरत असतात. म्हणूनच आईवडीलांनी सावधानता बाळगावी. निदान संस्कारासाठी. जर आपली येणारी पिढी चांगली निपजावी, असं वाटत असेल तर...... 

        विशेष म्हणजे आईवडीलच घडवू शकतात आपल्या मुलांचं भविष्य. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण ते जसे वागतात. त्याचं अनुकरण त्यांची मुलं करीत असतात. जर ते दारु पित असतील तर मुलंही दारु पित असतात आणि ते व्याभिचार करीत असतील तर....... मुलंही व्याभिचारी निघतात. म्हणूनच खुद्द आईवडीलांनी चांगले वागण्याची गरज आहे. जेणेकरुन मुलांमध्येही चांगले संस्कार रुजतील व मुलांचं भविष्य उज्ज्वल बनेल. हे तेवढंच खरं.        


  अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०