ब्ल्यू बॉक्स घेऊन एक गाडी MS 2 मध्ये आली. MS 2 मध्ये त्याचे विश्लेषण करण्यात आले. उच्च तंत्रज्ञानाने त्यांनी सगळे विश्लेषण केले तर त्यांना असे आढळले की या तबकडीमध्ये चंद्रावरून त्याच्या पृष्ठभागावावरून आणलेली माती, दगड, खडक आहेत. तबकडी कोसळण्याच्या आधी ते सगळे घेऊन हे सर्वजण झीरो चेंबर मध्ये बसले होते.
तेवढ्यात MS 2 मध्ये संदेश आला की झीरो चेंबर सापडला आहे पण त्याचे तुकडे झाले आहेत आणि शास्त्रज्ञांचे शरीराचे अवशेष सापडले आहेत. त्यांनी लगेच लोकेशन पाठवले. उरलेल्या सर्व शोध घेणाऱ्या गाड्या त्या लोकेशनकडे वळवल्या गेल्या. इकडे मिळालेल्या ब्ल्यू बॉक्सचे विश्लेषण सुरू असताना एक गोष्ट कळली की झीरो चेंबरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजन झाल्याने तो बंद होत नव्हता. तशी त्याची सेटिंग होती. त्यामुळे झाले असे की emergency escape वेळी झीरो चेंबर तबकडीतून बाहेर आला खरा पण तो नीट बंद न झाल्याने त्याचे पॅराशूट उघडलेच नाहीत. ती तबकडी सोबतच खाली कोसळली. तबकडी खाली कोसळल्यावर खूप मोठा स्फोट झाला आणि तो इतका शक्तिशाली होता की तिथले दगड वितळले आणि त्या खड्ड्याभोवती त्याची एक कडा तयार झाली. झीरो चेंबर पूर्णपणे उध्वस्त नाही झाला. त्याचा काही भाग वितळलेल्या दगडात गेला आणि काही वरती राहिला.
अजून विश्लेषण करताना शास्त्रज्ञांना कळले की या तबकडीतील शास्त्रज्ञांनी मंगळावर सुद्धा खूप प्रयोग केले होते आणि तिथली माती सुद्धा त्यांच्यासोबत होती. अत्यंत हुशार असे ते शास्त्रज्ञ होते असे आता MS 2 मधल्या लोकांना वाटू लागले.
जिथे तबकडी पडली तिथे झालेला मोठा खड्डा कालांतराने हळूहळू पाण्याने भरू लागला. त्याच्याभोवती आधी असलेली परिसंस्था नाश पावली होती पण नंतर तिथे नवीन जीवसृष्टी जन्माला आली. अजून काही वर्षांनी तिकडे मानवी वस्ती वाढली. पण त्या सरोवरात जमा झालेले पाणी हे खारे होते आणि आजही ते खारेच आहे. त्या खाऱ्या पाण्यात आढळणारे जिवाणू पृथ्वीवर कुठेच आढळत नाहीत कारण ते त्या तबकडीच्या झीरो चेंबर मधून बाहेर पडले होते आणि त्यांनी कालांतराने तिथे आपली वेगळी परिसंस्था बनवली. त्या खड्ड्याला आपण आता लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखतो.
या सरोवराच्या आसपास असलेल्या मातीचे गुणधर्म हे पृथ्वीवरच्या कोणत्याही भागातील मातीशी जुळत नाहीत. तिथे काहीवर्षांपूर्वी काही पांढऱ्या रंगाचे स्फटिक सापडले होते जे इतरत्र कुठेच आढळत नाहीत. प्रयोगांती असे कळले की ते स्फटिक म्हणजे चंद्राची माती होती. इथल्या मातीत आणि पाण्यात अशी खनिजे आढळतात जी पृथ्वीवर कुठेच नाही आढळतात. ती मंगळ ग्रहावर आढळतात. आता या भागात चंद्राची आणि मंगळाची माती कुठून बरे आली असेल??????
बरोबर......... ती नाही एक तबकडी इथे पडली होती. त्यांचे झीरो चेंबर ज्यात चंद्राची आणि मंगळाची माती होती, तीच इथे विखुरली गेली होती.
आणखी एक गोष्ट, इथे सरोवराच्या काही ठिकाणी होकायंत्राची सुई खूप वेगाने गोलगोल फिरते. तबकडी कोसळली तेव्हा त्या तबकडीचे काही अवशेष वितळलेल्या दगडांसोबत मिक्स झाले, त्यामुळे इथल्या मातीत चुंबकीय शक्ती जास्त आहे आणि त्यामुळे होकायंत्र नीट चालत नाही.
आता आपण पुन्हा जुन्या काळात जाऊया. तर त्या खड्ड्याजवळ जेवढे मिळेल तेवढे सगळ घेऊन अगदी आजुबाजूला मिळालेल्या देहाचे तुकडे घेऊन MS 2 मंगळावर निघून गेली. उरलेल्या तीन तबकड्या शोधण्यासाठी MS 3 आणि MS 4 पृथ्वी भोवती घिरट्या मारत होते. MS 2 ने फ्रीक्वेन्सी सेट केलेली 3.13 Hz म्हणून MS 3 आणि 4 ने अनुक्रमे फिक्वेंसी सेट केली 3.12Hz आणि 3.14 Hz.
थोड्याच वेळात 3.12 Hz वरून उत्तर यायला लागले. एका तबकडीचे लोकेशन त्यांना मिळाले होते आणि त्या ब्ल्यू बॉक्सने निळ्या रंगाची किरणे सोडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात MS 3 क्रैशिंग साईटवर उतरले. त्यातूनही ड्रोन आणि रोव्हर उतरले. एका रोव्हरने ब्ल्यू बॉक्स उकरून काढला आणि तो घेऊन ते MS 3 मध्ये गेले. त्याच्या विश्लेषणात जास्त माहिती नाही मिळाली पण झीरो चेंबर exit झाला होता ते कळले. लागलीच झीरो चेंबरचा शोध सुरू झाला.
तिकडे MS 4 ने सेट केलेल्या फ्रिकवेन्सीला उत्तर मिळाले आणि त्यांनी लवकरच तिसऱ्या तबकडीची क्रॅश साईट शोधली आणि उतरून ब्ल्यू बॉक्स शोधला. आता दोन्ही साईटवर झीरो चेंबरचा शोध सुरू झाला. या सुद्धा दोन्ही तबकड्या नष्ट झाल्या होत्या पण तरीही जमेल तेवढे मिळेल तितके तुकडे गोळा करून आणले. बराच खोलवर शोध घेतल्यावर त्यांना दोन्हींचे झीरो चेंबर क्रॅश साईटपासून शेकडो किलोमीटर दूरवर सापडले. दोघांचेही पॅराशूट उघडले होते त्यामुळे आतमध्ये शास्त्रज्ञ जिवंत असणार साहजिक होते आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना जिवंत पकडण्यात आले. त्यांना तातडीने मंगळावर नेण्यात आले. तिकडे त्यांना काही दिवस मेडिकल ऑब्सरवेशन मध्ये ठेवण्यात आणि मग त्यांच्या ग्रहावर त्यांना पाठवण्यात आले.
दुसरी आणि तिसरी तबकडी जिथे पडली होती ते ठिकाण म्हणजे आताचे युनायटेड स्टेटस मधल्या ऍरिझोना मधले बॅरिंजर क्रेटर आणि दुसरे म्हणजे पिंगुआलुइट क्रेटर लेक जे कॅनडा मध्ये आहे. यातल्या बॅरिंजर क्रेटर मध्ये पाणी नाही कारण ते वाळवंटी भागात आहे. तर पिंगुआलुइट क्रेटर लेक हे पाण्याने भरलेले आहे. जगातल्या सगळ्यात स्वच्छ पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे.
आता चौथ्या तबकड्या शोध सुरू होता. बराच वेळ तिचा शोध सुरू होता. MS 3 आणि 4 दोन्हीही फ्रीक्वेन्सी बदलून शोधकार्य करत होत्या. शेवटी MS 3 ला फ्रीक्वेन्सी मिळाली आणि त्यांनी चौथ्या तबकडी क्रॅश साईट शोधली. तिथे मात्र त्यांना झीरो चेंबर लगेच मिळाला. सगळ गोळा करून ते मंगळावर परतले. MS 4 मात्र अजूनही पृथ्वीभोवती फेऱ्या मारत होते. मंगळावरून चौथ्या तबकडीच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या मूळ ग्रहावर पाठवण्यात आले. ही चौथी क्रॅश साईट होती आताच्या आफ्रिकेमधल्या घाणामधल बॉसुमट्वी लेक. आता तिथे त्यात पाणी साचल्याने सुंदर सरोवर झाले आहे आणि तिथले लोक त्याला खूप पवित्र मानतात.
आता पुन्हा जुन्या काळात जाऊया.
MS 3 ने घिरट्या मारता मारता लँडिंगसाठी एक जागा निवडली. ते उतरले डायरेक्ट समुद्रात कारण त्यांच्या स्वतःच्या ग्रहावर ते पाण्याखाली राहत होते. त्यामुळे त्यांनी इथेही जागा अशीच निवडली. ते उतरले आताच्या फ्लोरिडच्या मियामीच्या समुद्रात. समुद्रावर तरंगत असताना त्यांनी मंगळावरील MS ला संदेश दिला. त्यात त्यांनी सांगितले की ते या ग्रहावर या या ठिकाणी द्रवरूप पदार्थाच्या (म्हणजे पाण्याच्या) आतमध्ये जात आहेत. सोबत लोकेशन पाठवले.
समुद्राच्या आतमध्ये त्यांना अनेक पोहणारे मासे, अनेक झुडपे दिसून आली. प्रत्येकाचे निरीक्षण नोंदवत ते खोलवर जात होते. खाली जाताना पाण्याचा दाब वाढत असल्याचे त्यांनी निरीक्षण नोंदवले आणि समुद्रतळाशी गेल्यावर त्यांनी शेवटचा संदेश पाठवला. इथे कोणीही बुद्धिमान प्राणी नाही आणि जमिनीवर राहणारे प्राणी किंवा समुद्रातले प्राणी प्राथमिक अवस्थेत आहेत. आकाशात उडणारे पक्षी आहेत. MS वरून संदेश आला की आपण आता तिकडे आपला बेस बनवायचा. सगळ साहित्य घेऊन आपल्या मूळ ग्रहावरून ३ तबकड्या येतील.
(क्रमशः)