कोकणचे अंतरंग भाग २दि.२८/०५/२०२६ गुरूवार सकाळी ९.०० वाजता आम्ही ' सी फॅन ' सोडलं.सकाळ असल्याने वाहतूकीची समस्या नव्हती. पहिल्यांदाभारतीय असंतोषाचे जनक ' लोकमान्य टिळकांच्या 'घराला भेट दिली.घराचा दरवाजा दहा वाजता उघडतो.पण ज्या अंगणात बाळ टिळक खेळले त्या अंगणात आम्ही प्रवेश केला.घराची एक खिडकी उघडी होती.त्यातून आतली खोली दिसली.लहानपणी" मी शेंगदाणे खाल्ले नाही मी टरफले उचलणार नाही." हे वाक्य भाषणात सगळ्यांनीच एकदा तरीम्हणालेले असणार. पण त्या वाक्यातील बाणेदारपणा म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तस होत. तिथून आम्ही सावरकरांनी स्थापन केलेल्या भारतमातेच्यामंदिरात पोहचलो.योगायोगाने सावरकरांची जयंती होती.काही संस्था सदस्य सावरकरांच्या पुतळ्याला हार घालायला आले होते. मुळात सावरकरांचा विषय आला की माझ्या नजरेसमोर सावरकरांची तिन रुपे उभी राहतात.एक साहित्यिक सावरकर,दुसरे समाज सुधारक आणि तिसरेक्रांतिकारक सावरकर.मी या तिन सावरकरांची सरमिसळ करत नाही.साहित्यिक सावरकर हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.समाजसुधारक म्हणून ते काळाच्या खूप पुढे होते.पतित पावन मंदिर हे त्याच ज्वलंत उदाहरण. मंदिराच्या बाजूला असलेल वस्तू संग्रहालय अजून उघडल नव्हतं. इथून पुन्हा मागे येत आम्ही रत्नदुर्ग या समुद्रकिनारी असलेल्या किल्ल्यावर गेलो.गाडी किल्ल्याच्या दारात जाते.किल्ल्याचे प्रवेशद्वार व तटबंदी उत्तम स्थितीत आहे.कान्होजी आंग्रे यांच्या काळातला हा किल्ला !समुद्री मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ला बांधला गेला होता. त्या काळात संपूर्ण अरबी समुद्रावर आंग्र्याचा दरारा होता.पोर्तुगीज, इंग्रज,सिद्दी,अश्या परकीय आरमारांवर त्यांनी वचक बसवला होता.पण पेशवाईत आंग्र्याना शह दिला गेला तो मराठ्यांकडूनच!त्यामुळेच इंग्रजांचा प्रभाव वाढला.कालाय तस्मै नमः!किल्ल्याच्या बुरुजावरून दिसणारा समोरचा अफाट दर्या आंग्र्याच्या इतिहासाची साक्ष देतो. किल्ल्याच्या पायथ्याशी 'शिवसृष्टी ' निर्माण केली आहे.( यांची संकल्पना उदय सामंत यांची आहे.) प्रवेश करताना बुलंद दरवाजा व चौफेर तटबंदी दिसते.दरवाज्यावर दोन मावळे तुतारी फुंकत असलेले तर बाजूला भालाईत पाहरेकरी उभे ठाकलेले दिसतात.प्रवेशद्वारावर प्रवेश फी घेतली जाते.(मुलांसाठी १५ व प्रौढांसाठी ३०रू.) चि-यांचे वळणावळणाचे छोटे मार्ग मध्ये मध्ये मोकळ्या जागेत दाट हिरवळ त्यात शिवशाही कालीन खेडेगावातील घरे ,माणसे,कारागीर यांच्या सुंदर प्रतिकृती दिसतात.या प्रतिकृती छोट्या स्वरूपात म्हणजे वाडे व घरे पाच ते सहा फूट उंचीची व त्या तुलनेत माणसे आहेत. उंचावर एक मोठ्या लढाऊ जहाजाची प्रतिकृती त्यातील बारकाव्यासह ठेवलेली आहे.छत्रपतींचा, बाजीप्रभू व आंग्रे यांचे पुतळे इथे दिसतात.कण्हेर..करंज ही फुलझाडे व सुरुची छोटी झाडे व्यवस्थित रचनात्मक रितीने लावली आहेत.इथे स्वच्छ वॉश रूम आहेत.शिवसृष्टीत काही काळ रमून आम्ही त्याच मार्गाने मागे येत डावीकडे वळत आरे - वारेचा मार्ग पकडला.इद असल्याने वाटेत मुस्लिम बांधव दिसत होते.तसच बिर्याणी व शिरखुर्म्याचायेणारा वास चित्त विचलित करत होता.( गुरुवार होता व पुढे गणपतीपुळे इथे जायचे होते.) वाटेत आरे - वारेच्या सूरुच्या वनाजवळ थांबलो. खाली उतरून गेलो.पाण्यात असंख्य पर्यटक मौज करत होते.काहीजण जीपलाईन वरून शूटिंगचा आनंद लुटत होते.थोडा वेळ थांबून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो.डाव्या बाजूला समुद्र....फेसाळत्या पांढर्या लाटा...खारा वारा ..भर उन्हाळ्यातही सुखद जाणीव देत होता.ही संपूर्ण किनारपट्टी पाढंर्या शुभ्र फेसाच्या रेषेने सजलेली दिसते.इथल्या समुद्राला पांढरा समुद्र यासाठीच नाव दिलंय.चांदण्या रात्री हे दृश्य अधिकच मनोहर असेल यात शंकाच नाही. गणपतीपुळेच्या तिठ्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होती.ती गर्दी बघून मी धास्तावलो.पण हळूहळू वाट काढत पार्किंग जवळ पोहोचलो.सुदैवाने आमच्या दोन्ही कार सहजपणे पार्क करता आल्या.भाविकांच्या प्रचंड गर्दीतून आम्ही मंदिर गाठलं . दर्शनासाठी भलीमोठी रांग लागली होती.आम्ही बाहेरूनच नमस्कार केला.पण आमच्या बायकाजिद्दीला पेटल्या.त्यानी प्रदक्षिणा घालण्याचे ठरवलं.ऊन्ह मी म्हणत होतं.प्रदिक्षणा मार्ग तव्यासारखा तापला होता.विस मिनिटांचा हा अनवाणी प्रवास त्यांनी भक्तीभावाने पूर्ण केला.शिवाय दर्शन घेऊन आमच्यासाठी उकडीच्या मोदकाचा प्रसाद घेऊन आल्या.त्या येईपर्यंत आम्ही तीन वेळा वेगवेगळी सरबत घेतली.खरतर अंग घामाने निथळत होत.. त्यामुळे सरबताशिवाय पर्याय नव्हता.सगळ आटोपून गाड्या बाहेर काढेपर्यंत दोन वाजून गेले होते.पोटात कावळे ओरडत होते.भोजनाच्या शोधात मालगुंड पर्यंत पोहोचलो.जो तो जेवण स़ंपल असंच सांगत होता.आमच्या प्रवासाचा शेवट हा केशवसुत स्मारक इथे करायचा होता.पण ते जेवल्यानंतर! पण नाईलाजाने आम्ही सरळ केसवसुत स्मारक गाठले.इथेही प्रवेश फी आहे. समोर तुतारी फुंकणार्या माणसाची चकचकीत प्रतिमा दिसली.समोर केसवसुतांच कोकणी वळणाचा घर दिसले .दरवाजा...आत व्हरांडा... दोन्ही बाजूला मोकळ्या पडव्या...कोप-यात घरात यायला दरवाजे...भिंतींना लाल रंग...साधी जमीन...जिथे केसवसतांच जन्म झाला ती बाळंत खोली.देवघर ...न्हाणीघर स्वयंपाक खोली....मागे दरवाजा.अस देखणं घर आहे.घराच्या पाठीमागे वाचनालय...अभ्यासिका आहे.पण आमचं लक्ष वेधले ते कवितांच्या घराने. इथे मराठीतील सर्व नामवंत कवींच्या कविता कागदावर सुवाच्च हस्ताक्षरात त्यांच्यास्केच सहित मांडलेल्या आहेत. तसेच खोलीच्या सर्व बाजूंनी कवींच्या स्वहस्ताक्षरातल्या ...तारखांसहित कविता मांडलेल्या आहेत. हे सर्व पाहून इथे आल्याचं समाधान वाटले.अगदी मागच्या बाजूला ( जे मूळ स्मारक आहे.)इथे केशवसुतांच्या कविता सिमेंटच्या फलकांवर दोन्ही बाजूंनी कोरलेल्या आहेत.त्या वाचण्यासाठी एकदा बाहेरून व नंतर आतून गोलाकार फेरी मारावी लागते.मराठी कवितेला एका नव्या वळणावर घेऊन जाणाऱ्या हा कवी सावंतवाडीत नोकरीसाठी काही काळ होता. आम्हा वाडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.अवघ्या ३९ वर्षांच पण लखलखत आयुष्य त्यांच्या वाट्याला आल.त्यांची 'संध्याकाळ' ही कविता मोती तलावाकाठी ते सायंकाळच्या वेळी बसलेले असताना सुचली असेल.शिवाय आणखी काही कवितांचं बीज त्यांच्या मनी सावंतवाडीतच रूजल असेल. पुन्हा केशवसुतांच्या घराच्या मागच्या दरवाजाने आत शिरत आम्ही पुन्हा अंगणात आलो.माझ्या ' सुंदरवाडी - मधाळ स्वप्नांचं गाव." या पुस्ताकाचा गठ्ठा २५मे ला मिळाला होता. त्यात केशवसुत व तुतारी यांचा उल्लेख आहे.मी हा धागा पकडत प्रकाशन पूर्व पहिली प्रत तिथल्या ऑफिस मध्ये भेट दिली. तसेच माझ्या सहकाऱ्यांना एक - एक प्रत भेट दिली.माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता.पुन्हा गणपतीपुळे इथे आल्यावर अखेर एका खानावळीत आम्हाला चविष्ट शाकाहारी जेवण मिळालं.खर तर आमच्या सहलीचे अखेरच ठिकाण पाहून झालं होतं.पण जेवल्यानंतर अजून वेळ असल्याने एक अधिकच ठिकाण म्हणून सौ. सुखदा पेडणेकर हिने सुचवलेले जयगडच्या अलिकडे असलेलंजिंदाल समुहाने बांधलेले गणपती मंदिर पाहण्यासाठी गेलो.गणपतीपुळे पासून पंधरा किलोमीटरवर असलेले हे मंदिर एका विस्तीर्ण जागेवर आहे.संपूर्ण परीसर हिरवागार आहे.मधल्या वाटा व मंदिर परिसर चि-यांचा आहे. उजव्या बाजूला मोठा तलाव आहे.तिथून येणारा गार वारा सतत वाहताना जाणवतो.मंदिरात गणरायांची भव्य मूर्ती दिसते.दर्शन घेऊन व थोडा वेळ तिथे घालवून आम्ही थोडं मागे येत डावीकडे वळत तासाभरात ' हातखंबा' गाठलं तिथे कॉफी व चहा घेऊन आम्ही सावंतवाडीच्या दिशेने रवाना झालो. या सहलीचा कार्यक्रम व तारखा आम्ही दिड महिने आधीच ठरवल्या होत्या.त्यावेळी अधिक मास आहे व या कालात ' देवदर्शन ' करणे चांगले असते हे आमच्या गावीही नव्हते.या संपूर्ण प्रवासात आम्हाला एकही अडचण आली नाही.तसेच काही सहकार्य करणारी माणसेही भेटली.दोन दिवसांत राजापूर व रत्नागिरी येथे खास कोकणी ( मासे व चिकण)थाळ्यांचा आस्वाद घेतला.तसेच शाकाहारी जेवण...आमरस याचीही चव घेतली. घरगुती किनार असलेली पेये उदा. कोकम,आवळा ,लिंबू सरबत, पन्हं यांची सुध्दा चव घेतली.संपूर्ण सहलीचे नियोजन ,आखणी व अकाऊंट ची जबाबदारी विनय सौदागर व हेमंत झांट्ये यांनी सांभाळली.हेमंत झांट्ये व प्रदिप पेडणेकर यांनी स्वतः ची वाहन वापरून प्रवास सोपा व सुखद केला.या प्रवासात सौ.झांट्ये,सौ.पेडणेकर,सौ.सौदागर व सौ.राणे यांची साथ लाभली. पक्ष्याप्रमाणे या दोन दिवसांत आम्ही नदी - नाले,डोंगर - द-या, खाड्या -समुद्र,गाव खेडी आणि शहर भटकलो.रत्नागिरीचा परिसर नारळी - पोफळीच्या बागा, हापूस आंब्याच्या राया , प्रसन्न विस्तिर्ण किनारे,साधी सरळव परंपरा जपणारी माणसे यांनी भरलेला आहे.समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026