A moment of mine... a living experience in Marathi Human Science by Punam Bhagat books and stories PDF | माझा एक क्षण... एक जिवंत अनुभव

Featured Books
Categories
Share

माझा एक क्षण... एक जिवंत अनुभव

माझा एक क्षण... एक जिवंत अनुभव सकाळी लवकरच उठून फ्रेश होऊन, बाहेर पाऊस म्हटला की, माझी आवडणारी BLack कॉफीच... मग मी आणि माझी कॉफी... ती १५ मिनिटं फक्त कॉफीसोबत! त्यानंतर टिफिन वगैरे बनवणं आणि माझ्या चॅम्पला शाळेत सोडवायला जाणं, हे माझं अत्यंत आवडीचं काम. तो आता मोठा झालाय, पण मी स्वतः जेव्हा त्याला शाळेत सोडते, तेव्हा मनाला एक वेगळाच 'सुकून' आणि आनंद मिळतो.त्यानंतर आजकाल मला सुट्टी असल्यामुळे मी थोडं उशिराच वॉकिंगला जाते. मग सगळं कसं निवांत असतं. वरून कोसळणारा पाऊस, टेकडी आणि तिथे आमचं वॉकिंग... सगळंच एकदम आनंदमय! माझे मॉर्निंग वॉक म्हणजे अगदी लहानपणापासूनची माझी आवड... ते माझं श्वास घेण्याचं मंदिर आहे आणि माझी पूजाच आहे! पाऊस म्हटलं की मला तिथे आवार्जून बाहेर पडायचंच असतं. आज जरा जास्तच पाऊस होता, तरीही मी छत्री घेऊन गेलेच. टेकडीवर जास्त झाडं असल्यामुळे पाऊस तसा अंगावर कमीच लागत होता.मी पावसात जाते हे आईला माहिती असते, त्यामुळे ती अजूनही रागावते. जेव्हा ती विचारते, "काही पाऊस येतोय, तू कुठे आहेस?" तेव्हा मी काहीच बोलत नाही. कारण आईलाही चांगलं माहिती आहे की मी हे ऐकणार नाही, माझं हे श्वासाचं मंदिर आणि वॉक सोडणार नाही. मी अगदी शांत राहून म्हणते, "अगं, थोडाच पाऊस आहे..." आजच्या दिवशीही तसंच झालं. शेवटी काळजीपोटी ती म्हणाली, "पाऊस असेल जास्त... तू सांगत नाही... बघू... थांब मी तुला कॉल करून बघतेच... किती पाऊस आहे...!"वॉकिंग संपवून घरी येताना वाटेत मला एक आजी दिसल्या. वय वर्ष अंदाजे ७० ते ८० असेल. पण एवढ्या जोरदार पावसातही त्या बिचाऱ्या कामाला निघाल्या होत्या. मी गाडी थांबवून त्यांची विचारपूस केली, "आजी, सोडू का तुम्हाला?" असं विचारलं. त्यावर त्यांनी हो, नाही असं उत्तर दिलं, मी म्हटले चला आणि आम्ही निघालो. त्या दोन मिनिट त्यांच्याबद्दल बोलत होत्या. तेव्हा त्यांच्या कष्टाचे कौतुक करत मीच त्यांना म्हटलं, "आजी, खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही काम करता..., काम करता म्हणूनच तुमचे हात-पाय चालतात, तुम्ही मजबूत आहात. तुम्हाला फिट बघून, आणि ह्या वयात सुद्धा तुमची ही धावपळ बघून खूप आनंद झाला." माणसाने हात-पाय चालतात तोपर्यंत शरीराला कष्ट देत राहायचे असते, तेव्हा ते आपल्याला त्रास देत नाहीत. हे मला चांगलंच माहीत आहे...त्यांना बघून मला माझी मोठी आई आठवली; तिने जास्त आराम केल्यामुळे तिचे हात-पाय काम करणे बंद झालेले, आणि अजून बऱ्याच लेडीजला मी असं बघितलं आहे. अशाच काही ठिकाणी माझी भेट होते—कारण मी नेहमी नाही, पण महिन्यातून दोन महिन्यातून एकदा तरी वृद्धाश्रमाला आवार्जून भेट देते. तिथल्या बऱ्याच आजींची हीच वेदनादायी स्थिती मी खूप जवळून अनुभवली आहे. मी जेव्हा जेव्हा तिथे जाते, तेव्हा त्यांना आणि अगदी हेच मी माझ्या स्वतःच्या आईलाही नेहमी सांगते, "जोपर्यंत हात-पाय चालतात, तोपर्यंत जेवढं होईल तेवढं स्वतःच करायचं. कधीही 'कोणी आपली मदत करेल' हा विचार करायचा नाही. 'मीच मला सांभाळू शकते' ही समजूत मनाशी पक्की ठेवायची. मनात कोणाबद्दलही कटुता ठेवू नको. आजकाल प्रत्येक जण आपापल्या समस्यांतून जात असतो, त्यामुळे प्रत्येकाला आपली किंवा समोरच्याची परिस्थिति वेळेवर समजेलच असं नाही... पण आपण मात्र न थांबता चालत राहायचं..." त्या आजींशी मी खूप गप्पा मारल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो सुकून मी अनुभवला. निघताना मी त्यांना म्हटलं, "आता निघते आजी, माझं घर जवळच आहे... नक्की या घरी... आपण पुन्हा भेटू!" असं म्हणून मी तिथून त्यांचा निरोप घेतला.हॉस्पिटल आणि आश्रम ही माझी अत्यंत आवडीची ठिकाणं! पण वृद्धाश्रमात जाणं मला का आवडतं? कारण आजकाल मोठ्या शहरांमध्ये लोक स्वतःच्याच घरात राहून सुद्धा जणू आश्रमात असल्यासारखेच जगतात. तिथे घरात राहूनही कधी कोणी कोणाला स्वीकारत नाही. आई-वडील घरी गेले, तर त्यांना साधं पाणी सुद्धा विचारलं जात नाही. मी स्वतः डोळ्यांनी अशी खूप उदाहरणे बघितली आहेत, जिथे गावाकडून आई आली असेल आणि तिचं राहणीमान साधं असेल, तर पोटची मुलं तिची ओळख सुद्धा इतरांना करून देत नाहीत! खूप चीड येते अशा मानसिकतेची. जी आई आपल्यासाठी तिचं सर्वस्व देते, तिच्या वाट्याला अशी वागणूक? आज तिच्यामुळे आपण जे काही आहोत, ते तिच्याच त्यागामुळे आहोत. हे घर, कपडे, गाडी या साऱ्या गोष्टी तर खूप नंतर येतात. पण हे आजच्या जगाला समजणार नाही. माणूस खरंच खूप स्वार्थी होत चाललाय. स्वार्थ कशाचा? तर आम्हाला टापटीप कपडे घालणारे, 'साहेब'सारखे दिसणारे आई-वडील असतील तरच आम्ही त्यांना सोबत घेऊन जाऊ, नाहीतर नाही. खरंच अशा विचारांची कीव येते. माणसाने माणसाला आणि त्याच्या विचाराला महत्त्व द्यायला हवं. मी बऱ्याच ठिकाणी हे विदारक चित्र बघितलं आहे, काही ठिकाणी तर आईला आपल्या लेकीकडे (मुलीकडे) जाण्याची अनावर ओढ असते, पण तिथे गेल्यावर मुलींचं बदललेलं वागणूंकीचं रूप माणसाला चीड आणतं. पण, त्या आईसाठी जेवढं जमेल तेवढं सर्व काही करताना मी स्वतः कधीच थकणार नाही!म्हणूनच मी ठरवलं की, मैत्री करायचीच असेल तर या तथाकथित समाजात नंतर करू, आधी जिथे खरंच खऱ्या मैत्रीची आणि आधाराची गरज आहे, तिथेच... म्हणूनच माझं फ्रेंड सर्कल हे जास्त करून या आई आणि आजींचं आहे, मी जास्त वेळ त्यांच्याच सोबत घालवते. मैत्रिणी तर आहेत सर्वच, पण माझा जास्त वेळ आणि जीव तिकडेच असतो. हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या विषयावर मनात बरंच काही आहे, जे सतत सलत राहतं. पण मला विश्वास आहे की, या सलीला एक दिवस नक्की न्याय मिळणार. म्हणून मी नेहमी म्हणते, आपल्या डोळ्यांसमोर अन्याय फक्त बघायचाच नाही, तर तो कधी झालाच नाही पाहिजे, हेच मूल्य आपल्याला आपल्या मुलांना शिकवायचं आहे.त्या आजींना सोडून आल्यावर मी रस्त्यातच मी नेहमी भेटायला जात असते ते हॉस्पिटल लागलं. ते बघून मनात म्हटलं—"आज हेही होईलच!" तिथं मी अगदी लहान बाळापासून ते पार आजींपर्यंत सर्वांना डोळ्यांनी बघून आणि भेटून आले. हे मी नेहमी करते... मला नेहमी वाटतं की, जेव्हा कोणी आजारी असतं तेव्हा त्याला औषधापेक्षा माणुसकीचे दोन बोल, प्रेमाचे शब्द हे सर्वात आधी बरे करतात. त्यामुळे जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ काढून मी तिथे भेट देते. तसं ते हॉस्पिटल बरंच मोठं आहे आणि आता तिथे मला बरेच जण ओळखतातसुद्धा. त्यांना भेटून माझ्या मनाला एक वेगळाच शांतता मिळते.तिथे आज मला एक नवीन छोटी फ्रेंड मिळाली... एकदम एखाद्या 'परी'सारखी! तिचं नाव कादंबरी; ती यू.के.जी. (UKG) ला होती. तिची आई आतमध्ये डॉक्टरांकडे गेली असल्यामुळे, तिने थोड्या वेळासाठी आपल्या मुलीला माझ्याजवळ सोपवलं. त्या कादंबरीने लगेच माझ्याशी मैत्री केली. तिला येत असणाऱ्या साऱ्या कविता ती मला ऐकवत होती. तिला असं वाटत होतं की, तिला जे जे काही माहिती आहे ते सगळं मी शांतपणे ऐकावं. मीही अगदी लहान होऊन तिचं सांगणं शांतपणे ऐकलं. तिला तिथे थोडं फिरवून आणलं, तिथे फिरताना आमची खूप छान मैत्री झाली.पण तितक्यात अचानक माझ्या मनात एक विचार आला—'अनोळखी असूनही या चिमुरडीने माझ्यावर किती लवकर भरोसा ठेवला! मी चल म्हटले तर ती लगेच माझ्यासोबत आली... हे तिच्या सुरक्षिततेसाठी किती डेंजर (धोकादायक) आहे! तिला काय माहित बाहेरचं जग कसं आहे.' म्हणून एक आई म्हणून माझ्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि मी तिला सुरक्षिततेचा एक खूप महत्त्वाचा धडा दिला. मी तिला समजावून सांगत म्हटलं, "कादंबरी, असं कोणाबरोबरही कोणी 'चल' म्हटलं, तर लगेच कधीच जायचं नाही. नेहमी आपल्या मम्मी-पप्पांसोबतच थांबायचं. आणि कधी कोणासोबत थांबायची वेळ आलीच, तर मम्मीला सोबत ठेवायचं."त्यानंतर तिच्या आई-बाबांकडे तिला सोपवले. ती माझ्यापासून दूर जायला नकोच म्हणत होती... इतकी आमची गट्टी जमली होती! मग मी तिची समजूत काढत तिचा नंबर घेतला आणि म्हटले, "तू कॉल कर मला..." हे ऐकल्यावर ती आनंदानं तिच्या पालकांकडे गेली.त्यानंतर मी माझ्या आवडत्या असणाऱ्या आजींना, काकूंना भेटायला गेले. चांगली विचारपूस केली. काही आजी आणि काकू स्वतःच्या आजारपणाच्या समस्या सांगत होत्या, तर काही जणी घरचे प्रश्न मांडत होत्या. आज जाताना मी त्यांच्यासाठी फक्त चॉकलेट्स घेऊन गेले होते. तिथल्या नर्स तर माझ्या आधीच्याच परिचयाच्या. त्याही दोन-दोन मिनिटं थांबून त्यांच्या बऱ्याच गोष्टी सांगत होत्या.असं नाही की मला इतर कामं नसतात... पण हे सर्व केल्याने त्यांना लवकर बरं होता येतं. बरेच जण फक्त मनसोक्तपणे बोलूनच बरे झालेले मी स्वतः खूप वेळा जवळून अनुभवले आहे. आणि हे मी आजच नाही, तर बऱ्याच वर्षांपासून करत आले आहे... अगदी माझा चॅम्प जेव्हा नर्सरीमध्ये होता तेव्हापासून! त्याला शाळेत सोडवायचे आणि माझा उर्वरित काही वेळ मी अशाच ठिकाणी द्यायला शिकले.वास्तविक पाहता, सुरुवातीला बाहेर जॉब करायला घरातून परवानगी नव्हतीच; कारण जॉब म्हटलं की घरातून बराच वेळ बाहेर जावा लागायचा. मला स्वतःला लग्नानंतर बाहेर अगदी लहान मुलांशी सुद्धा बोलू दिले जात नसे. स्वयंपाकघराच्या बाहेर साधं उभंही राहू देत नसत. बाहेर कोणाशी साधं बोलले, तर त्या समोरच्या बाहेरच्या लोकांनाही त्रास दिला जाई. आणि मग घरात तर मी जणू एका अंधाऱ्या खोलीत कैद...पण या भीषण कैदेतून आणि छळातूनही मी एक गोष्ट शिकले—की जर आपलं असं या जगात कोणी नसेल, तर आपण इतरांना आपला वेळ आणि आपलेपणा देऊन पुढे जायचं! हळूहळू कधी ही माझी सवय बनली, हे माझं मलाच कळलं नाही. पण आज जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा मला स्वतःचा अभिमान वाटतो. असं वाटतं की, मी खूप सुंदर पद्धतीने माझे आयुष्य जगत आले आहे. हेच सर्वात चांगले आहे... चार भिंतींच्या आत बंदिस्त करूनही, कोणीच कधीच माझ्या विचारांना आणि माझ्या मनाला कैद करू शकलं नाही!की दुःख आणि वेदना फक्त आपल्यालाच असतात का? तर नाही... या जगात प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे. आपण फक्त स्वतःचा थोडासा वेळ समोरच्या माणसाला द्यायचा... हेच मी माझ्या मनात पक्कं ठरवलं आहे. आणि बघता बघता आज या गोष्टीला पूर्ण दहा वर्षं झाली! त्यातूनच एकदा मनात आलं होतं की एखाद्या अनाथ मुलीला दत्तक घ्यावं... पण नंतर वाटलं, तिच्या आईपासून तिलाच दूर का करायचं? ते माझ्याने होणं शक्य नव्हतं, म्हणून मी तो विचार तिथेच थांबवला.... आणि मग मी ठरवलं, जे आहे, तिथूनच देणं सुरू करायचं! तेव्हापासून मी एक नियम केला—आपला प्रत्येक उत्सव तिथे हॉस्पिटल आणि आश्रमांमध्ये जाऊन साजरा करायचा. अनाथ आश्रमाशी जोडली जाऊन तिथे सण साजरे करायला आता पूर्ण सात वर्षं झाली आहेत. तसं आम्ही घरात कोणतेही पारंपरिक सण (दिवाळी, दसरा, होळी) मानत नाही आणि साजरेही करत नाही. माझ्या मुलालाही मी हे सण कधी शिकवले नाहीत. पण घरात कोणाचाही वाढदिवस असेल, जयंती असेल, किंवा ओळखीच्या कोणाचाही विशेष दिवस असेल; की आम्ही थेट हॉस्पिटल, वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रमात पोहोचतो. जास्त काही नाही, पण एक छानसा केक घेऊन जातो, कधी घरचे पदार्थ बनवून घेऊन जातो. हेच आमचे सण आणि हेच आमचे खरे उत्सव!आज लोकांना वाटेल की या 'इन्स्टंट' श्रीमंत होण्याच्या काळात मी असं का करतेय? बरेच जण मला विचारतीलही. पण ही इन्स्टंट श्रीमंती म्हणजे नेमकी कोणती? खरं सांगू, पैसा, प्रॉपर्टी हे प्रत्येकालाच पाहिजे असतं, पण ते टिकतं का? आणि त्या पैशातच सर्व सुख असतं का? नोकरी, पैसा, करिअर आणि त्यासोबत मिळणारी 'पूनम'ची ओळख... या सर्व माझ्या अत्यंत जवळच्या गोष्टी मी स्वतःहून मागे सोडल्या. लग्नानंतर झालेलं माझंच सरकारी नोकरीचे (हवालदार) सिलेक्शन मी बाजूला ठेवले, कारण जेव्हा 'माझी फॅमिली की माझी नोकरी' असा प्रश्न समोर आला, तेव्हा एक आई म्हणून मी माझ्या कुटुंबाची, माझ्या चॅम्पची निवड केली. "त्यांना हवालदार सून नको होती..." म्हणत माझा तो रस्ता अडवला गेला. तेव्हा ही स्वाभिमानी, प्रगल्भ 'पूनम' बनायला खूप वेळ बाकी होता... पण मला आज त्याचा कोणताही पश्चात्ताप (पस्तावा) नाही. कारण मी त्या बंधनांसाठी बनलेच नाही, असंच वाटतं आता मला! पण असो... या काही फक्त गोष्टी नाहीत, या माझ्यासोबत घडलेल्या खऱ्या घटना आहेत; आणि या सगळ्यातूनच जन्म झाला तो फक्त आणि फक्त आजच्या या खऱ्या 'पूनम'चा!मला हे माझ्या बालपणापासूनच माहीत होतं की, आईने दिवस-रात्र बाहेर राहून लाखो रुपये कमावण्यापेक्षा, मुलासोबत राहून त्याला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करणे जास्त महत्त्वाचे आहे. घरामध्ये दरमहा २ लाख रुपये देऊन सुद्धा बाहेरची कोणतीही व्यक्ती मुलाला आईसारखे सांभाळू शकत नाही. ती आईची मजुरी, जे संस्कार ती देते, तिची ती माया कधीच पैशाने विकत घेता येत नाही. माझी लाईफ, माझा चॅम्प हीच माझी खरी संपत्ती आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचं एकच सूत्र होतं—आईने फक्त स्वतः पैसे कमावण्यापेक्षा उद्या आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे घडवून, जेव्हा ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहत असतील, तेव्हा त्यांना फक्त कौतुकानं बघत राहायचं... आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक रोलमध्ये, प्रत्येक परिस्थितीत 'मी आहे' हा खंबीर आधार द्यायाचा... हेच माझं ध्येय आहे!आज हे सर्व अनुभव घेऊन, आणि मनामध्ये एक खूप मोठी खुशी घेऊन मी हॉस्पिटलच्या बाहेर पडले. बघता बघता आज तिथं थोडा जास्तच वेळ झाला होता. तेवढ्यात बाहेर पाऊस उघडला, पण मग गारवा वाढल्यामुळे मलाच अचानक थंडी भरून आली. मग मी घाईघाईने घरी आले, मस्त गरमागरम पाण्याने अंघोळ केली आणि एक कप छान कडक चहा घेतला... माझ्या आजच्या या धावपळीच्या आणि सुंदर दिवसातील हा एक नवा आणि अत्यंत फ्रेश क्षण!असं बरंच काही घडत असतं माझ्या (आज फ्रायडे) Day मध्ये.  मी हे सर्व आता सांगायला सुरुवात केली आहे, कारण जेव्हा मी माझी ही जीवन जगण्याची जी अनोखी कला आहे, त्यावर पूर्वीपेक्षा खूप जास्त खुश असते. इनफॅक्ट (Infact) फक्त मीच नाही, तर माझ्या संपर्कात येणाऱ्या बऱ्याच स्त्रियांनासुद्धा या जीवनशैलीमुळे स्वतःमध्ये सकारात्मकरीत्या बदलताना मी रोज जवळून अनुभवते आहे. हे माझ्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही, कारण मला माझं स्वतःचं चांगलं माहीत आहे; उथळ बढाया मारणं मला कधीच आवडत नाही. मी जे काही करते, ते अगदी मनापासून करते. कारण मी फक्त माझ्या मनाचं ऐकते. म्हणूनच मी म्हणते, माणसाने असं जगावं की पुन्हा पुन्हा आपलाच आपल्याला हेवा वाटला पाहिजे!मी हे सगळं कोणावरही उपकार म्हणून करत नाही. मला ते करून मनापासून निखळ आनंद मिळतो. मैं माझ्या स्वतःच्या आंतरिक आनंदासाठी, माझ्या स्वतःच्या 'सुकून' आणि खुशीसाठी तिथे जाते. तिथल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा तो क्षणिक आनंद पाहणं, हेच माझ्यासाठी सर्व काही आहे. आता मला या गोष्टीची एक सुंदर आणि गोड सवय झाली आहे. आणि खरं सांगू? यातूनच मला नेहमी नव्याने खंबीरपणे जगण्याची ताकद मिळते. कितीही कठीण प्रसंग आले, तरी मला यातूनच पुढचा मार्ग सापडतो."चालत रहा... बस... असंच निस्वार्थपणे चालत रहा... आज लिहून अस वाटत बरच आहे ..जे जीवन आपण माणूस म्हणून जगतच नाही...जेव्हढी कैद असेल मार्ग निघतोच....फक्त विचार तेव्हढे वाढवायचे ... ..बरेच आहे जे जगता येतं..फक्त चालता बोलता....