___
आई… स्वामी… आई… स्वामी.. आई… स्वामी…
मीनलची तीन वर्षाची मुलगी आऊ मीनलला चपाती करत असताना ओढून बाहेर नेत होती. आधीच मीनलला आज उशीर झाला होता. त्यात अजून राकेशचा डबा व्हायचा आहे.. तो तिकडे चिडचिड करत आहे.. आणि ही मुलगी घाई असतानाच का बरं त्रास देते… “आऊ थांब बाळा, पप्पांना उशीर होतोय, तू बाहेर खेळ बरं” असं म्हणत मीनलने आऊला थोडं हाताने दूर सरकवलं.
आता मात्र आऊ जोराने रडायला लागली.. आई.. स्वामी.. आई.. स्वामी.. तिचा आकांत बघून नाईलाजाने मीनलने आपल्या हातातील काम सोडत आऊला कडेवर उचलून घेतलं आणि हॉलमध्ये येऊन आऊला स्वामी समर्थांचा भिंतीवर टांगलेला फोटो काढून देत किचनमध्ये घेऊन आली. आणि तिला खाली ठेवत परत स्वयंपाकाला लागली.
आऊ अब स्वामी समर्थांच्या फोटोसोबत खेळू लागली. आऊ ही राकेश आणि मीनलला लग्नाच्या पाच वर्षानंतर झालेली मुलगी. आऊ ही जन्मापासूनच खूप वीक होती. शारीरिक व्यंगता नसली तरीही खूप नाजूक. कोणतेच वातावरण तिला एकदम सूट होत नसे. सतत आजारपणात वाढत असलेली आऊ तीन वर्षाची होऊनही फक्त आई आणि स्वामी या शब्दाशिवाय दुसरं काही बोलत नसे. आणि आई… स्वामी… आई… स्वामी.. म्हणतच ती हातवारे खुणा करून सगळं काही सांगायचा प्रयत्न करायची.
मीनल एक आई म्हणून आपल्या मुलीसाठी सतत चिंतेत असायची. अनेक डॉक्टरांना दाखवून पण तिच्यात काहीच सुधारणा दिसत नसल्यामुळे घरातले वातावरण थोडे उदास असायचे.
लगबगीने स्वयंपाक आवरून मीनलने राकेशचा डबा बांधून तयार केला तोच चिडलेल्या स्वरात राकेश, “अगं झालंच नाही का अजून !”
“हे घे!”, पदराने डोक्यावरचा घाम पुसत मीनलने राकेशच्या हाती डबा ठेवला. तोच राकेश मीनलला म्हणाला, “माझं सदानंद सरांशी बोलणं झालं होतं, त्यांच्या क्लिनिकला आऊला घेऊन जा.” मान डोलवतच मीनलने होकार दिला. राकेशने आपली बॅग उचलली आणि ऑफिसला निघून गेला.
इकडे थोडं रिलॅक्स होत मीनल सोफ्यावर बसली. इकडे आऊपण स्वामी महाराजांच्या फोटोसोबत खेळत मीनलजवळ आली. आणि आपल्या आईला, “आई.. आई.. स्वामी.. स्वामी” असे म्हणत महाराजांच्या फोटोवर पप्पी घेत आईला कौतुकाने दाखवू लागली.
तिचा तो निरागस चेहरा बघून मीनलचा थकवा निघून गेला. प्रेमाने आऊला जवळ घेत मीनल तिचा लाड करू लागली.
डॉक्टर सदानंद हे एक होमियोपॅथी डॉक्टर होते. आऊला बोलता यावं, तिच्या तोंडून शब्द फुटावेत म्हणून राकेशच्या मित्राने सदानंद सरांचे नाव सुचविले होते.
मीनलने आऊला उचलून किचनमध्ये नेत आधी पूर्ण किचन आवरून घेतलं आणि मग किचन-हॉलची सफाई करत आऊची अंघोळ करून दिली. मग स्वतः फ्रेश होऊन कपडे वगैरे धुवून घेत तयार झाली.
एका हातात आपली बॅग घेऊन आऊला कडेवर घेत बाहेर आली आणि दरवाज्याला लॉक करून जिन्याच्या पायऱ्या उतरत बिल्डिंग खाली आली आणि रिक्षा शोधू लागली.
रिक्षात बसल्यानंतर डॉक्टर सदानंदांच्या क्लिनिकमध्ये आली. तिथे २-३ पेशंट बसलेले असल्यामुळे ती पण वेट करत थांबली. तिचा नंबर आल्याबरोबर ती आत गेली.
परिचय झाल्यानंतर मीनलने आऊबद्दल डॉक्टरांना सांगायला सुरवात केली, “तीन-साडेतीन वर्षाची होऊन सुद्धा अजिबात काही बोलत नाही, खूप वीक आहे, अजिबात ॲक्टिव्ह नाही, आपण बोलल्यावरही लवकर प्रतिसाद देत नाही. बरेचदा चेंडू वगैरे उचलताना तिला तो योग्य दिसत नाही की काय माहित? तिला एकदम उचलता नाही येत. स्वतःच्या हाताने तिला खाता येत नाही काहीच, म्हणजे तिचा हात तोंडापर्यंत नेता येत नाही तिला. टॉयलेट किंवा लघवी लागल्याचे अजिबात कळत नाही तिला, सांगता पण येत नाही. कधी कधी वाटते माझी मुलगी नॉर्मल नाही” - असे भावूकतेने सांगत असताना मीनलचे डोळे डबडबायला लागले आणि डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत ती रडायला लागली.
डॉक्टरांनी आऊला बघितलं - बहुदा त्यांच्या लक्षात आलं होतं पण ते या अवस्थेत मीनलला सांगू इच्छित नव्हते. तरीपण त्यांनी मीनलला हिम्मत देत, “ताई, अधीर होणं किंवा उदास होणं हा प्रत्येक गोष्टीवरचा उपाय कधीच नसतो. विश्वास आणि एक सकारात्मक विचार आपल्या जीवनात खूप मोठे बदल घडवतात.”
विषयांतर करत डॉक्टरांनी मीनलला विचारले, “हिच्या जन्माच्या वेळी नेमकं काय झालं होतं? हे तुम्ही मला सांगू शकाल का?”
कधीच कोणाला न सांगितलेली गोष्ट मीनल डॉक्टरांना सांगू लागली, “हिच्या जन्माच्या वेळी माझ्या सासूने मला टेस्ट करायला सांगितली होती. मुलगा असेल तर ठेव नाहीतर ॲबॉर्शन कर असं प्रेशर आणलं होतं, कारण त्यांना राकेशचं पहिलं मूल हे मुलगा म्हणूनच हवं होतं. पण मी या गोष्टीला कडाडून विरोध केला, प्रसंगी मारही खाल्ला कारण मला माझं मूल जन्माला घालायचं होतं. तेव्हापासून बदललेलं जीवन मी आजही अनुभवतेय!”
डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला, “ताई, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. पण आई म्हणून मी तुम्हाला अंधारात ठेवणार नाही. गर्भात असताना किंवा जन्माच्या वेळी बाळाच्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे किंवा त्या काळात झालेल्या मानसिक ताणामुळे मेंदूला दुखापत झाली असावी. तिच्या या लक्षणांवरून वैद्यकीय भाषेत याला सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) असण्याची दाट शक्यता वाटते. यामुळे शरीराचे स्नायू, जिभेची हालचाल आणि बौद्धिक विकासावर परिणाम होतो. पण ताई, आपण आधी एका चांगल्या Pediatrician कडून मेंदूचा MRI स्कॅन करून घेऊ, म्हणजे आपल्याला मूळ अडचण स्पष्ट कळेल.”
डॉक्टरांचे बोलणे ऐकून मीनलच्या पायाखालून जमीनच सरकली. “म्हणजे डॉक्टर? माझी आऊ कधीच नॉर्मल होणार नाही का?” पदर तोंडात खुपसून ती हुंदके देऊन रडू लागली.
डॉक्टरांनी स्वतःला सावरत तिला धीर दिला, “ताई, निराश होऊ नका! ही वैद्यकीय अडचण असली तरी योग्य होमियोपॅथी उपचार, फिजियोथेरपी आणि स्पीच थेरपीच्या मदतीने आपण तिच्या दैनंदिन आयुष्यात खूप मोठी सुधारणा घडवून आणू शकतो. फक्त तुमची साथ आणि सकारात्मकता हवी!”
मीनलने स्वतः बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm) शिक्षण घेतलेले असल्यामुळे ती या गोष्टही सहज समजू शकत होती आणि तिलाही कळून चुकले होते की, आऊ ही कधी नॉर्मल मुलांसारखी नाही होऊ शकत. जणू तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. आता तिचं डॉक्टरांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती गुंग होऊन दुःखात बुडाली होती.
क्लिनिकमधून निघाल्यावर मीनल आऊला कवटाळून हताशपणे रस्त्यावरून पायी जायला लागली. ती आपल्या मुलीच्या दुःखात एवढी बुडाली की तिला माहितच नाही ती कुठे जात आहे. बस पुढे पुढे चालत जात होती, लोकांच्या नजरा चुकवत हुंदके देत होती आणि आऊला वारंवार कवटाळत होती, तिला बघून रडत होती.
तोच एका ठिकाणी आऊने बोट दाखवत.. “आई… स्वामी… बाबा” हे शब्द तोंडातून बाहेर काढले!
तिचे शब्द ऐकताच मीनल सर्व दुःखातून बाहेर येत एकदम अवाक होऊन आऊकडे बघायला लागली. कारण आज पहिल्यांदा आऊने आई... स्वामी या शब्दांव्यतिरिक्त 'बाबा' हा शब्द उच्चारला होता.
आऊ एका बोर्डाकडे बोट दाखवत “आई.. स्वामी.. बाबा” असं वारंवार म्हणत होती. मीनलची नजर त्या बोर्डवर गेली, त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता आणि लिहिलेले होते - “श्री स्वामी समर्थ मठ”.
(क्रमशः)