Fathers Day Bhajicha Bet Aani Haravleli Angthi books and stories free download online pdf in Marathi

फादर्स डे, भजीचा बेत आणि हरवलेली अंगठी....

फादर्स डे, भजीचा बेत आणि हरवलेली अंगठी....

दरवर्षी पाऊस पडायला लागला कि कांदा भजीचा बेत नित्यनेमानी चालू आहे. आधी आज्जी कांदा भजी करायची पण आता दोन तीन वर्ष ती जबाबदारी मी घेतलीये. ह्या वर्षी फादर्स डे च्या निम्मितानी भजीचा बेत ठरला... भजी मस्त झाली पण नंतर गम्मतच झाली.

पाऊसाळा चालू झाला.. ह्यावेळी पाऊस जरा लेट चालू झाला पण जोरात पडला!! पहिला मोठा पाऊस पडला आणि मला भजी करायचे वेध लागले.. बरेच कांदे कापले.. कांदे कापता कापता बरेच अश्रूहि ढाळून झाले.. सगळी तयारी झाली! भरपूर तेल घेऊन भज्या तळायला सुरु केल.. सगळ्या भज्या तळून झाल्या.. सगळ्यांच्या भज्या खाऊनही झाल्या. भज्यांच बरच कौतुकही झाल...फक्त बाबा बाहेर गेले होते म्हणून त्यांच्या भज्या आईनी वेगळ्या ठेवल्या होत्या. बाबांच्या भज्या सोडल्या तर सगळ्या भज्या संपल्या होत्या. भज्या खाऊन मी पण माझ काम करायला लागले... काम करता करता एकदम हाताकडे लक्ष गेल आणि मी पाहिलं करंगळी मध्ये घातलेली मोत्याची अंगठी करंगळी मध्ये न्हवती! अंगठी हातात नाहीये हे बघितल्यावर माझ्या तोंडातून बाहेर पडल. “ओह माय गॉड!” भज्या करतांना मी अंगठी पाहिली होती पण नंतर अंगठी गेली तर कुठे? माझ्या पोटात गोळा आला.. अंगठी कुठेतरी पडली असेल अस वाटल. इथेच कुठेतरी पडली असेल मिळेल ह्या विचारांनी मी शोधाशोध चालू केली. हात धुतांना पडली असेल अशी शंका आली...मग धावत जाऊन बेसिन मध्ये अंगठी पडलीये का ते पाहिलं.. पण अंगठी तिथे न्हवती... मग वाटल टॉवेल नी हात पुसतांना पडली असेल किंवा टॉवेल मध्ये अडकली असेल अस वाटल.. मग पटकन टॉवेल मध्ये अडकली आहे का किंवा तिथे खाली पडली आहे का ते पाहिलं.. तिथेही अंगठी मिळाली नाही. मी जिथे जिथे जाऊन आले तिथे सगळीकडे अंगठी पडली आहे का ते शोधल.. अगदी बागेत जाऊन पण अंगठी शोधून आले...पण कुठेच अंगठी मिळाली नाही! जश्या जश्या अंगठी मिळायच्या आशा संपायला लागल्या तशी तशी मी अस्वस्थ व्हायला लागले.. नंतर मला शंका आली भज्या करतांना अंगठी भजीच्या पिठात पडली असेल.. आणि अंगठी भजी मध्ये गेली असेल.. पण भज्या तर सगळ्यांनी खाल्ल्या होत्या. तेव्हा बाबांच्या भज्या ठेऊन दिल्या आहेत हे मी पूर्ण विसरूनच गेले होते... माझ्या मनात विचार आला, कोणी न चावता खाल्लं असेल तर भज्यांबरोबर अंगठीही पोटात जाऊ शकते! माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली,अंगठी खरच कोणी गिळली असेल तर? आणि ती मी असण्याची शक्यता होती! ती अंगठी मीच गिळली असेल तर? मी घाबरले.. तव्हा च छातीत कळ पण आल्यासारखी वाटली.. मीच अंगठी गिळली ह्याची खात्री वाटून तर मला टेन्शनच आल.. मनात नको नको ते विचार यायला लागले... मी भयंकर अस्वस्थ झाले.. शेवटी जे होईल ते बघू. झालेलं कोणी बदलू तर शकत नाही असा विचार करत एका ठिकाणी शांत बसून राहायचं ठरवल.. मी शांत झाले... आणि टीव्ही पाहायला लागले.. तितक्यात ताईनी हाक मारली.. मी धावत गेले.. ती म्हणाली अंगठी मिळाली! बाबा तिथेच भजी खात होते. अंगठी मिळाली आणि ती कोणी किंवा मीच गिळली नाहीये हे कळल्यावर माझ टेन्शन गेल...जीव भांड्यात पडला.. मी आईला विचारलं कुठे मिळाली अंगठी? तिनी लगेच सांगितलं... “बाबांच्या भजी मध्ये...” बाबा बाहेर गेले होते त्यामुळे झालेला प्रकार त्यांना माहीतच न्हवता!! आणि बाबांना अंगठी हरवली आहे ह्या गोष्टीचा पत्ता देखील न्हवता.. ते भाजी खायला लागले पण भाजी खाता खाता त्यांना अंगठी दिसली! भजीत अंगठी पाहून ते हसायला लागले... आई पुढे म्हणाली, “बाबांनी हातात भजी घेतली आणि त्यांना काहीतरी चमकल्यासारख वाटल...त्यांनी भजी हातानी उघडून पहिली आणि त्यात तुझी अंगठी दिसली!!”.... आईनी मला हे सांगितलं आणि मी इतकी हसायला लागले... माझ्याबरोबर सगळे हसण्यात सामील झाले. सगळीकडे शोधली होती अंगठी पण शेवटी हरवलेली अंगठी बाबांच्या भजीत मिळाली... आणि ह्यावर्षीचा फादर्स डे ला केलेला भजीचा बेत माझ्यासाठी अविस्मरणीय झाला.

अनुजा कुलकर्णी.