Hey, I am on Matrubharti!

आटपाट नावाचं गाव होतं, त्यात राहत होते एक राजा आणि राणी. बऱ्याच वर्षांनी त्यांनी छान अश्या गोंडस मुलाला जन्म दिला. खूप हुशार होता तो, शिक्षणाची फारच आवड होती त्याला. खूप शिकून खूप मोठं व्हावं अशी त्याची इच्छा होती.

ज्या प्रमाणे पाखरं मोठी झाल्यावर आपलं घरटं सोडून जातात त्याप्रमाणे त्याने भारतात शिक्षण घेऊन तो पुढील शिक्षणासाठी परदेशी उडून गेला. शिक्षण पूर्ण करून त्याने तिथेच भक्कम पगाराची नोकरी पकडली होती, इकडे आता राजा राणी परत एकटेच राहिले.

राजकुमार आई-वडिलांना विसरला नाही रोज न चूकता थोडा वेळ काढून फोन करी दोन वर्षांनी का होइना पण त्यांना भेटायला म्हणून भारतात येई. आता राजा देखिल सेवानिवृत्त झाला होता त्याने विचार केला आता जावं मुलाकडे आणि तिकडेच त्याच्या बरोबर सेटल व्हावं, खुप झाली पळापळ आता राजा-राणी आणि राजकुमारा सोबत निवांत आयुष्य जगावं.

पण नशिबाचे फासे कसे फिरले कोरोना नावाची साथ आली आणि राजकुमार परदेशी आणि राजा राणी मायदेशी अडकले.

परदेशी हालत खूपच खराब होती. त्याला देखील त्या भयानक रोगाची लागण झाली, तिकडच्या बऱ्याच लोकांना त्या रोगाची लागण झालेली असल्यामुळे तो देश त्यांच्याच नागरिकांना प्राधान्य देत होता, त्या मुळे राजकुमाराला योग्य असे उपचारच मिळाले नाहीत, नि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.

राजा आणि राणीच्या नशिबात त्याच शेवटचं दर्शन पण नव्हतं, जेव्हा त्यांना कळलं ते दोघेही तुटून गेले, त्यांना त्यांच्या जगण्यात काहीच अर्थ वाटला नाही, त्याच रात्री राजा राणीने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले.

ह्या वेड्या आशेने कदाचित इथे नाही तर देवाच्या दारी तरी आता राजा, राणी आणि राजकुमार एकत्र राहतील.

Read More