Alvani - 2 in Marathi Horror Stories by Aniket Samudra books and stories PDF | अलवणी - २

अलवणी - २

रामुकाका स्वयंपाकघरातील भिंत आणि छत जिथे एकत्र होते त्या कोनापाशी एकटक बघत होते.. जणु काही तिथे काहीतरी होते… दबा धरुन बसलेले. कदाचीत मानवी डोळ्यांना ‘ते’ दिसत नव्हते, पण अथांग शक्ती असलेल्या मनाला ते जाणवत होते..

“रामुकाका?”, शाल्मलीने दारातुनच हाक मारली.

शाल्मलीच्या हाकेने रामुकाका एकदम भानावर आले.

“काय झालं रामुकाका? काय बघत होतात??”, शाल्मलीने विचारले.

रामुकाकांनी शाल्मलीचा एक हात त्यांच्या हातात घट्ट पकडला.. आणि नुसत्या डोळ्यांनी खुण करुन ते शाल्मलीला म्हणाले, “ते बघ.. तिथे कोपर्‍यात..काही दिसते आहे तुला???”

शाल्मलीने सर्वत्र निरखुन पाहीले.. “नाही.. नाही रामुकाका!! काही नाहीये तिथे.. काय दिसते आहे तुम्हाला?”

“नाही, मला पण काही दिसत नाहीये.. पण.. काही तरी नक्कीच आहे तिथे.. दिसत नसलं तरी जाणवतं आहे…”, रामुकाका

शाल्मलीचा चेहरा भितीने पांढराफटक पडला होता. भितीने तिने एक आवंढा गिळला..

“नका ना हो रामुकाका असं बोलु. कश्याला घाबरवता आहात, नाहीये तिथे काहीच.. तुम्ही नका बघु तिकडे, तुम्हाला स्वयंपाकात काही मदत हवी आहे का??”, शाल्मली.

“बेटा.. कोपरा.. खासकरुन भिंतीचा वरचा कोपरा.. तुला माहीती आहे काय विशेष असतं कोपर्‍याचं?”, रामुकाका

शाल्मलीने पुन्हा एकदा रामुकाका बघत होते तिकडे नजर टाकली आणि मानेनेच तिने नाही अशी खूण केली.

“भिंतीचा कोपरा.. नेहमी संगम असतो चांगल्या-वाईटाचा. परंतु वरचा कोपरा.. तिथे जमीन आणि अवकाश एकत्र मिळते.. एक शक्ती असते त्या कोपर्‍यात. कधी चांगली…. कधी………”, बोलता बोलता रामुकाका थांबले..

“मी.. मी जाते बाहेर.. तुम्हाला काही लागलं तर हाक मारा..”, असं म्हणुन शाल्मली बाहेर पळाली.


दिवाणखान्यात मोहीत आणि आकाशची उश्यांची मारामारी चालु होती.

शाल्मलीचा घामेजलेला आणि भितीने पांढराफटक पडलेला चेहरा बघुन आकाश म्हणाला, “काय गं? काय झालं???”

शाल्मलीने स्वयंपाकघरात घडलेला किस्सा आकाशला ऐकवला.

“च्यायला, त्या म्हातार्‍याच्या..”, असं म्हणुन आकाश तावातावाने उठला..

“च्चं.. जाउ देत ना अक्की.. त्यांना वाटलं ते त्यांनी सांगीतलं, विश्वास ठेवायचा की नाही ते आपण ठरवायचं ना?”, शाल्मली.

“अगं हो.. पण त्याला काय वाटतं ते त्याने स्वतःशीच ठेवावं ना.. आपल्याला कश्याला ऐकवतो आहे?”, आकाश..

“जाऊ देत.. तु नको तुझा मुड खराब करु….”, असं म्हणुन शाल्मली त्याच्या शेजारी येऊन बसली… “..चल आपण सामान अनपॅक करु आणि थोडं फ्रेश होऊ ओके??”

आकाशने मान हलवुन संमती दर्शवली आणि दोघंही सामानाची आवरा-आवर करायला उठले.


आकाश वॉश घेऊन, आवरुन पुन्हा दिवाणखान्यात आला तेंव्हा सुर्य अस्ताला जाऊन बराच वेळ झाला होता. दाट झाडीमुळे उरला सुरला उजेडसुध्दा नाहीसा झाला होता आणि मिट्ट काळोख पसरला होता. शाल्मली खिडकीचा पडदा सरकवुन बर्‍याच वेळ बाहेर बघत बसली होती..

“शाल्मली??”, आकाशने हाक मारली तशी ती एकदम दचकुन जागी झाली.

“काय गं? आता काय झालं दचकायला? का तो म्हातारा पुन्हा काही बोलुन गेला?”, शर्टाच्या बाह्या फोल्ड करत आकाश म्हणाला..

“नाही .. काही नाही…”, शाल्मली आपली भिती दाबत म्हणाली..

“अगं काय झालं? सांगशील का जरा???”, आकाश वैतागुन म्हणाला..

“अरे.. मला असं.. म्हणजे.. बाहेरुन कसलातरी आवाज येत होता, म्हणुन बघत होते बाहेर..”, शाल्मली

“कसला आवाज?”, आकाश..

“पालापाचोळ्याचा.. काहीतरी.. म्हणजे.. कुणीतरी घसटत घसटत चालण्याचा..”, शाल्मली..

“इथे?? इथे कोण येणार आहे चालत चालत?”, आकाश जागेवरुन उठत म्हणाला…

“कुठे चालला आहेस??”, शाल्मलीने परत घाबरुन विचारले..

“बघतो बाहेर कोण आले आहे… उगाच तुझी भिती आहे ती तरी जाईल ना…”, असं म्हणुन आकाशने दार उघडले त्याचबरोबर अतीथंड हवेचा एक मोठ्ठा झोत आतमध्ये आला. आकाशसुध्दा क्षणभर दचकला आणि मग म्हणाला…”बघ.. तुच बघ.. कोणीसुध्दा नाही बाहेर.. अगं वार्‍याने झाडं पानं हलत असतील त्याचा आवाज ऐकला असशील तु…” आणि त्याने दार लावुन घेतले.

“चला.. जेवायला वाढले आहे…”, रामुकाका स्वयंपाकघरातुन बाहेर आले होते आणि व्हरांड्यातुनच त्यांनी बाहेर आवाज दिला.

लगोलग आकाश, शाल्मली आणि मोहीत स्वयंपाकघरात पळाले.


साधारणपणे ३ तासांनंतर सर्वजण आप-आपल्या पांघरुणात गुरगुटुन झोपले होते.

घड्याळात साधारणपणे १२-१२.३० वाजुन गेले असतील. पालीच्या सतत चुकचुकण्याने आकाशची झोप चाळवली गेली. शेवटी वैतागुन त्याने डोळे उघडले.

समोरच्या खिडकीतुन चंद्राचा मंद प्रकाश खोलीत येउन स्थिरावला होता. खिडक्यांचे पडदे चंद्राच्या प्रकाशाने उजळुन निघाले होते. त्या प्रकाशात आकाशला एक आकृती त्याच्याकडे रोखुन पहाताना दिसली.

कोण होती ती आकृती? इतक्या रात्री आकाशच्या बेडरुममध्ये ती काय करत होती?

आकाशने शेजारी बघीतले, शाल्मली जागेवर नव्हती.

आकाश दचकुन उठुन बसला आणि त्याने निरखुन त्या आकृतीच्या चेहर्‍याकडे बघीतले.

“माय गॉड.. शाल्मली.. यु स्केअर्ड मी…”, उशीला टेकत तो म्हणाला.

शाल्मली काहीच बोलली नाही. तिच्या चेहर्‍यावर एक मंद हास्य तरळुन गेले.

“काय करते आहेस तु?”, आकाश म्हणाला.

शाल्मलीने हळुवार आपल्या हाताचे बोट तिच्या ओठांवर नेले आणि अस्पष्ट आवाजात ती म्हणाली.. “श्शुsssss”.

थोड्यावेळ ती आकाशकडे रोखुन पहात राहीली आणि मग तिने हळुवारपणे स्वतःचे कपडे उतरवायला सुरुवात केली.

“यु ओके???”, आकाश स्तिमीत होत तिच्याकडे पहात म्हणाला.

सर्व कपडे उतरवल्यावर ती सावकाश चालत आकाशच्या जवळ आली. घामाने तिचे शरीर ओलेचिंब झाले होते तर आकाश मात्र हुडहुडी भरल्यासारखा पांघरुणात बुडुन गेला होता.

तिने आपले ओठ आकाशच्या ओठांवर ठेवले. एखाद्या गरम इस्त्रीचा स्पर्श व्हावा तसा चटका आकाशच्या ओठांना बसला. त्याने स्वतःला तिच्यापासुन बाजुला करण्याचा प्रयत्न केला, पण शाल्मलीच्या घट्ट मिठीतुन त्याला निसटणे अशक्य झाले होते.

इतक्या वर्षात प्रथमच शाल्मलीने प्रणयक्रिडेमध्ये स्वतःहुन पुढाकार घेतला होता. आकाशने फारसा प्रतिकार न करता स्वतःला तिच्या स्वाधिन करुन टाकले.

साधारणपणे तासाभरानंतर आकाश तृप्त चित्ताने पहुडला होता. इतक्या वर्षात प्रथमच त्याने शाल्मलीबरोबरचा शृंगार इतक्या उत्कटतेने अनुभवला होता. नेहमी अ‍ॅट्रॅक्टीव्ह भासणारी शाल्मलि आज नुसतीच अ‍ॅट्रॅक्टीव्ह नाही तर सिडक्टीव्ह पण भासली होती. शारीरीक प्रणय-क्रिडा प्रकार जे त्याने आजपर्यंत फक्त पुस्तकात वाचले होते, जे फक्त त्याने ’तसल्या’ चित्रपटांमध्ये पाहीले होते ते आज त्याने शाल्मलीसोबत अनुभवले होते.

“शमु…. यु आर टु..गुड…”, स्वतःशीच हसत आकाश म्हणाला.. “दॅट वॉज अ ग्रेट सरप्राईज…”, असं म्हणत त्याने शाल्मलीकडे पाहीले.

पण शाल्मली केंव्हाच झोपी गेली होती………………..
————————————————————————————————————–


“आकाश… ए आकाश.. अरे उठ ना!”, शाल्मली आकाशला गदागदा हलवत होती..

आकाशच्या चेहर्‍यावर आदल्या दिवशीच्या रात्रीच्या आठवणींनी अजुनही मंद हास्य पसरले होते.

“बाबा… उठा ना बाबा…”, आकाश उठत नाही म्हणल्यावर मोहीतही शाल्मलीबरोबर आकाशला उठवण्यात सामील झाला..

“काय आहे रे.. झोपु द्या ना जरा…”, वैतागुन डोळे उघडत आकाश म्हणाला.

“आकाश अरे.. रामुकाका कुठे दिसत नाहीयेत…”, शाल्मली त्रासीक चेहरा करत म्हणाली..

“अगं गेले असतील बाहेर कुठे तरी… येतील परत…”, आकाश चेहर्‍यावर पांघरुण ओढत म्हणाला..

“अरे नाही, सकाळपासुन नाहीयेत.. घड्याळात बघ जरा, ११.३० वाजुन गेलेत, असं न सांगता कसे कुठे जातील??”, शाल्मली..

“च्यायला.. म्हातारा घाबरुन गेला का काय पळुन?”, आकाश बेडमधुन उठत म्हणाला

“आकाश.. अरे निदान मोहीतसमोर तरी नको बोलुस असं वेडं वाकडं.. तो पण बोलु लागेल तसाच.. आणि रामुकाकांचे सामान आहे इथेच, तेच दिसत नाहीयेत. तु उठ आणि जरा शोधुन ये बरं त्यांना…”, शाल्मली.

“जाऊ देत ना, गेला तर गेला, मी नाही त्याला शोधायला जाणार.. डोक्यात गेला तो म्हातारा माझ्या.. जा तुच बनव काहीतरी ब्रेकफास्ट, येईल तो, कुठे जाणारे?”, आकाश म्हणाला..

कंटाळुन शेवटी शाल्मली स्वयंपाकघरात जायला उठली, तसा आकाशने तिचा हात धरुन तिला जवळ ओढले..

“आकाश..ssss, मोहीत बघतोय..”, शाल्मली म्हणाली..

“शमु.. यु वेअर ऑसम यस्टरडे…”, आकाश म्हणाला..

“कश्याबद्दल?”, गोंधळुन मोहीतकडे पहात शाल्मली म्हणाली..

“ओके. ओके.. नाही बोलत काही मोहीत समोर बास्स??.. सॉरी.. जा.. तुच मस्त बनव काही तरी खायला…”, असं म्हणुन आकाशने शाल्मलीचा हात सोडला.

शाल्मली स्वयंपाकघरात गेली. आकाशने मग आपला मोर्चा मोहीतकडे वळवला..

“सो.. हिरो.. आज काय प्लॅन??”

“बाबा आपण बाहेर झाडांमागे लपाछपी खेळायचे?”, मोहीत म्हणाला..

“ओके.. डन.. मी आंघोळ करुन मस्त फ्रेश होऊन येतो, मग आपण खेळु .. चालेल??”, आकाश

“येssss. मी बाबांबरोबर लपाछपी खेळणार!, मी बाबांबरोबर लपाछपी खेळणार!!”, असं म्हणत बागडत मोहीत बाहेर पळाला.

आकाशही मग अंथरुणातुन उठला आणि ब्रश करायला बाथरुममध्ये गेला.

आकाश गेल्यावर थोड्यावेळाने समोरच्या कपाटावर कसलीशी हालचाल झाली. कपाटावरुन हळुवारपणे घरंगळत, ओघळत काहीतरी खाली जमीनीवर उतरलं आणि बेडरुममधुन बाहेर गेलं. ते काय होतं ह्याचं वर्णन करणं अवघड, पण थोडक्यात सांगायचं झालं तर आपणं जेंव्हा घट्ट डोळे मिटुन घेतो तेंव्हा लाल-चॉकलेटी-काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर आपल्याला काळपट रंगाचे जे विचीत्र आकार तरंगताना दिसतात, त्या आकारांचा एखादा लोळ जसा दिसेल तसंच ते काहीसं होतं

——————————————————————————————————-


दोन तासांनंतर, आकाश आणि मोहीतचा लपाछपीचा खेळ चांगलाच रंगात आला होता. पळायला आणि लपायलाही भरपुर जागा असल्याने बाप-लेक अगदी पळुन पळुन दमुन गेले होते.

शेवटी आकाश दमुन बंगल्याबाहेरच्या बाकावर येऊन बसला..

“चला ना बाबा.. अजुन थोडं खेळुयात…”, मोहीतला अजुनही खेळायचेच होते.

“बास रे बाबा.. दमलो मी.. तु खेळ जरा वेळ एकटा, आपण नंतर खेळु ओके??”, मोहीतला समजावत आकाश म्हणाला.

“काय ओ बाबा… जा मी कट्टी..” असं म्हणुन आकाश एकटाच खेळण्यात मग्न झाला..

आकाशने एक मॅगझीन उघडले आणि तो सुध्दा वाचनात गुंग झाला.

“झुssssssम.. आय एम.. सुपरमॅन…”, मोहीतचा मधुनच आवाज आकाशला ऐकु येत होता…जसं जसा मोहीत लांब, जवळ येत होता तसं तसा त्याचा आवाज कमी जास्त होत होता.

पण काही वेळानंतर, बराच वेळ होऊनही मोहीतचा काहीच आवाज येईना तसा आकाश जागेवरुन उठला..

“मोहीतsss”, आकाशने एक हाक मारली.

पण मोहीतचा काहिच आवाज आला नाही.

“मोहीतsss”, आकाशने पुन्हा एक हाक मारली आणि तो झाडीत मोहीतला शोधायला पळाला.

सर्वत्र जिवघेणी शांतता होती. मोहीतला इतक्यावेळ उगाच एकट्याला सोडले ह्याचा आकाशला पश्चाताप होऊ लागला होता.

“मोहीतsss”, पुन्हा एक हाक, ज्याला मोहीतकडुन काहीच उत्तर येऊना.

बरेच अंतर आत गेल्यावर एका झाडापाशी आकाशला मोहीत दिसला. तो भेदरुन झाडाला टेकुन बसला होता.

“मोहीत?? काय झालं? इथं काय करतो आहेस तु…??”, काळजीने आकाशने विचारले

मोहीत झाडीत दुरवर कुठेतरी नजर लावुन बसला होता.

आकाशने सभोवती सर्वत्र पाहीले पण त्याला कोणीच दिसेना.

“काय झालं बेटा?”, आकाशने पुन्हा विचारले.

“बाबा.. मला भिती वाटतेय…”, मोहीत म्हणाला.
“भिती? कसली भिती वाटते आहे सोनुला? काय झालं सांग मला, मी आहे ना तुझ्याबरोबर?”, आकाश मोहीतच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाला..

“तिकडे एक ताई होती…”, झाडीत बोट दाखवत मोहीत म्हणाला
“ताई? तिकडे तर कोणीच नाही बेटा..”, आकाशने बोट दाखवलेल्या जागेकडे बघत आकाश म्हणाला..

“आत्ता नाहीये, मगाशी होती..”, आकाशला चिकटत मोहीत म्हणाला.
“काही म्हणाली का ती ताई तुला??”, आकाश

“ती मगाशी ना तिथे, झाडाला टेकुन रडत बसली होती. मी तिला म्हणलं.. आय एम सुपरमॅन, तुला मदत करु का? तर तिने खूप रागाने बघीतलं माझ्याकडे..”, मोहीतला त्या आठवणीने परत भरुन आलं…

“हो.. अश्श झालं.. परत दिसु देत ती ताई मला.. मी बघतोच तिच्याकडे…”, आकाश म्हणाला… “चल जाऊ आपण घरी, भुकू लागली असेल ना मोहीतला..” असं म्हणुन तो मोहीतला घेऊन परत जाऊ लागला..

“बाबा तुम्हाला गंम्मत सांगू, ती ताई ना… टकलू होती, तिने किनई लाल रंगाची साडी घातली होती आणि टक्कल दिसु नये म्हणुन ना तिने डोक्याला साडी गुंडाळली होती…”, मोहीत म्हणाला..

“श्शी.. काहीतरी बडबडु नको मोहीत.. कोणी नव्हतं तिथं…”, आकाश वैतागुन म्हणाला..
“हो.. होती ती ताई.. आणि तिच्या तोंडाला आणि हाताला किनई खुप बाऊ झाला होता…”, मोहीत सांगत होता..

आकाशने त्याच्या पाठीत एक धपाटा घातला.. “बास झालं तुझं काल्पनीक पुराण चल आता घरी…” असं म्हणत तो मोहीतला ओढत बंगल्यात घेऊन आला..

पाठीत धपाटा बसताच मोहीतने पुन्हा भोकाड पसरलं.. त्याचा आवाज ऐकुन शाल्मली बाहेर आली..

“अरे काय झालं रडायला..???”, मोहीतला जवळ घेत ती म्हणाली.

“काही नाही, नेहमीचेच.. ह्याचे काल्पनीक विश्व जरा जास्तच विस्तारच चाललं आहे.. आवरा जरा.. हा सुपरमॅन झाला कि कधी एलीयन येतात, तर कधी डायनॉसॉर तर कधी अजुन कोण…”, आकाश मोहीतकडे रागाने बघत म्हणाला.

“अरे त्याचे खेळच आहेत ते.. कश्याला ओरडतोस उगाच त्याला?… आज काय केलं आता?…”, शाल्मली म्हणाली..

“विचार त्यालाच.. काहीतरी बोलत असतो.. म्हणे कोणतरी टकलू ताई होती जंगलात…”, आकाश

शाल्मलीने एकदम दचकुन आधी मोहीतकडे आणि मग आकाशकडे पाहीले…

“टकलू ताई?.. कशी होती दिसायला…?”, शाल्मलीने मोहीतला विचारले.

मोहीतने आकाशला सांगीतलेले सर्व वर्णन शाल्मलीला सांगीतले.

मोहीत बोलत असताना शाल्मलीच्या चेहर्‍यावरचे रंग भराभर बदलत होते. तिच्या कपाळावर घामाचे बिंदु जमा व्हायला लागले.

“शमु.. यु ऑलराईट?? काय झालं…?”, शाल्मलिच्या चेहर्‍याकडे बघुन आकाश म्हणाला..

शाल्मली काही न बोलता बंगल्यात पळाली, पाठोपाठ मोहीत आणि आकाश.

शाल्मली धावत एका अडगळीच्या खोलीत पोहोचली.

“शाल्मली काय झालं..? जरा सांगशील का???”, आकाश संभ्रमावस्थेत म्हणाला..

शाल्मलीने कोनाड्यातुन एक जुनाट चित्र बाहेर काढले आणि ते मोहीतसमोर धरुन म्हणाली..”अशीच होती ती ताई?”

“हो.. अश्शीच होती.. अश्शीच होती..”, मोहीत त्या चित्रावर बोट ठेवत म्हणाला…

शाल्मलीचे डोळे विस्फारले होते. थरथरत्या हाताने तिने ते चित्र आकाशच्या समोर धरले..आज सकाळी आवरताना आम्हाला सापडलं हे चित्र…

“नेत्रा गोसावी”, रंग उडलेल्या शाईने लिहीलेले नाव असलेले आणि मोहीतने जसे वर्णन केले होते तश्याच एका स्त्रीचे चित्र त्या कागदावर होते, पण आकाशला हलवुन सोडणारी मुख्य गोष्ट तिथे होती आणि ते म्हणजे त्याच कागदावर खालच्या बाजुला कंसात लिहीलेले आकडे –

(जन्म १२ मार्च १९२७ – मृत्यु २१ मे १९५७)

मृत्यु – २१ मे १९५७!!!!

Rate & Review

priya Yesade

priya Yesade 1 week ago

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 4 months ago

Deepali More

Deepali More 8 months ago

Swapna

Swapna 9 months ago

A B

A B 1 year ago