Alvani - 3 in Marathi Horror Stories by Aniket Samudra books and stories PDF | अलवणी - ३

अलवणी - ३

“आता कसं वाटतं आहे?”, शाल्मलीच्या डोक्यावरुन हात फिरवत आकाश म्हणाला

शाल्मलीने क्षीणपणे डोळे उघडले आणि कसनुसे हसत तिने आकाशकडे पाहीले व थोडीशी मान हलवली.

आकाशने शाल्मलीच्या कपाळावर हात ठेवला, तिचा अजुनही ताप उतरण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. शाल्मलीचं अंग अजुनही तापलेले होते.

“हे बघ शमु.. तुला वाटतं तसं काही नाहीये. तु उगाचच नाही तो विचार करते आहेस..”, आकाश शाल्मलीचा हात हातात घेउन म्हणाला..”मोहीत आणि त्याचे खेळ तुला माहीती आहे ना! एखादी गोष्ट बघीतली की तिच गोष्ट घेउन बसतो तो कित्तेक दिवस, हो कि नाही?”

“……………..”

“मी सांगतो तुला काय झालं असेल ते, तु सामान आवरत असताना तुला ते चित्र सापडलं त्यावेळेस मोहीत पण तिथेच होता बरोबर ना? मग मोहीतने तेच चित्र डोक्यात ठेवलं. हे काय आज पहिल्यांदा झालं का? एलियन्स चे पिश्चर बघीतले की पुढचे कित्तेक दिवस त्याचा खेळ एलियन्सना मारण्याचा असतो, राक्षसांचे कार्टुन पाहीले की त्याच्या खेळात सारखे राक्षसच येत असतात, तसाच हा प्रकार आहे, तु उगाच नको टेन्शन घेऊस, झोप आता, सकाळी उठलीस ना, की बरं वाटेल हं??”, असं म्हणुन आकाशने शाल्मलीचे पांघरुण निट केले आणि खोलीतला दिवा मालवुन तो बाहेर पडला.

मोहीत खाली कारमध्ये बसुन गाडी गाडी खेळत होता, आकाश बंगल्याचे दार उघडुन मोहीतशी खेळायला बाहेर आला आणि त्याने दार लावुन घेतले.

खालचे दार लावण्याचा आवाज आला तसे शाल्मली आपल्या बेडवरुन उठली आणि सावकाश चालत चालत खिडकीपाशी गेली. तिने खिडकीचा पडदा बाजुला करुन खाली बघीतले. गाडीपाशी मोहीत आणि आकाश आप-आपसात खेळण्यात मग्न होते.

शाल्मली सावकाश माघारी वळली तेंव्हा तिच्या चेहर्‍यावर एक क्रुर हास्य होते. तिच्या चेहर्‍यातला गोडवा केंव्हाच गायब झाला होता आणि त्या क्रुर हास्याने तिचा चेहरा अधीकच विद्रुप दिसत होता. तिची नजर कुठेतरी शुन्यात लागली होती, तरीही तिला समोरच्या वस्तु बरोबर दिसत होत्या.

हळु हळु चालत ती ड्रेसिंगच्या टेबलापाशी गेली. तिने खण उघडला आणि स्वतःचे लाल रंगाचे लिपस्टीक बाहेर काढले.

लिपस्टीकचा खालचा भाग गोल फिरवुन तिने लाल रंगाचे लिप्स्टीक बाहेर काढले. रक्तासारखा तो लालभडक रंग बघुन शाल्मलीचे डोळे आनंदाने चमकु लागले. मान डाव्या बाजुला कलवुन ती बर्‍याचवेळ त्या लाल रंगाकडे बघत बसली.

मग थोड्यावेळाने ती बेडशेजारील भिंतीपाशी गेली आणि एखाद्या यंत्रमानवासारखी मान वर करुन तिने भिंतीच्या वरच्या टोकाकडे पाहीले. पुन्हा एकदा तिच्या चेहर्‍यावर तेच विकृत हास्य पसरले. तिने आपली मान मागे लवंडवली, दोन्ही हातांचे तळवे वाकडे करुन हात मागे घेतले, पायाचे तळवे एखाद्या बॅले डान्सरने बोटांवर नाचण्यासाठी उचलावेत तसे उचलले आणि मग तिने आपले डोळे मिटुन घेतले.

क्षणार्धात तिचे शरीर पिसासारखे हलके झाले आणि तरंगत तरंगत भिंतीच्या छताला जाउन चिकटले. मग तिने लिपस्टीक धरलेला आपला हात पुढे केला आणि भिंतीवर काहीतरी लिहीले. आपल्याच अक्षरांकडे बघुन तिच्या डोळ्यात एक खुनशी भाव उमटुन गेले.

मग हळु हळु ती पुन्हा जमीनीवर आली आणि बेडवर आपल्या पांघरुणात शिरुन झोपुन गेली.

————————————————————————————————


रामुकाका नाहीसे होऊन दोन दिवस होऊन गेले होते, पण त्यांचा काहीच पत्ता लागलेला नव्हता. शाल्मलीची सुध्दा तब्येत ठिक नव्हती त्यामुळे आकाशनेच स्वयंपाकघरात थोडंफार काहीतरी स्वतः आणि मोहीतपुरतं खायला बनवलं.

बाहेर वारा पडलेला होता आणि त्यामुळे वातावरणात फारच उष्मा जाणवत होता. आकाशने खिडकीतुन एकदा बाहेर बघीतलं. चंद्राची किरण कशीबशी जमीनीपर्यंत पोहोचत होती. बाहेरचं दृष्य अतीशय स्तब्ध होते, कसलीच हालचाल नव्हती, जणु काही एखाद्या चित्रकाराने चितारलेले चित्रं. सुंदर पण तरीही निर्जीव.

आकाशने खिडकी लावुन घेतली. मोहीतसुध्दा दिवसभर खेळुन दमुन गेला होता, बाहेरच्या बैठकीवर पडल्या पडल्या तो झोपुन गेला.

आकाशने त्याला हळुवार कवेत घेतले आणि खोलीतला दिवा मालवुन तो आपल्या बेडरुममध्ये आला. बेडरुममध्ये आल्या-आल्या थंडगार वार्‍याची झुळुक त्याच्या अंगावरुन गेली.

वारा नसतानाही, खालच्या खोलीत इतका उकाडा असताना, वरच्या खोलीत, बेडरुममध्ये इतके थंड कसे ह्याचे आकाशला क्षणभर आश्चर्य वाटुन गेले. खोलीतला झिरोचा पिवळा दिवा खोलीत मळकट प्रकाश फेकत होता. त्याने सावकाश मोहीतला बिछान्यावर ठेवले, मग त्याने आपले बाहेरचे कपडे घड्याकरुन कपाटात ठेवले आणि रात्री घालायचे कपडे बाहेर काढुन कपाटाचे दार लावले. दार लावल्यावर त्याने सहज कपाटाच्या दारावरच्या आरश्यात बघीतले आणि विजेचा झटका बसावा तसा एक सणसणीत शॉक त्याला बसला. त्याच्या छातीतुन एक शार्प कळ निघुन सर्व शरीरभर पसरली. मागच्या भिंतीला टेकुन, गुडघे पोटाशी घेउन, लाल कपडे घातलेली एक आकृती त्याला आरश्यात दिसली. चेहरा निट दिसला नसला तरीही आकाशवर रोखलेले ते डोळे त्याला आरश्यात दिसले. संताप, द्वेश, आक्रोश, उद्वेग सर्व काही त्या नजरेत भरलेले होते.

आकाशने पटकन मागे वळुन पाहीले, परंतु मागे कोणीच नव्हते. आकाशने पुन्हा एकदा आरश्यात पाहीले, परंतु ह्यावेळेस त्याला कोणीच दिसले नाही.

आकाशने खोलीत सर्वत्र नजर टाकली, पण शाल्मली आणि मोहीत व्यतीरीक्त त्याच्या नजरेस कोणीच पडले नाही.

तो एक क्षण… आकाशच्या काळजाचा थरकाप उडवुन गेला. आकाश अजुनही दरवाज्याचे हॅन्डल घट्ट धरुन उभा होता. आपण जे पाहीलं तो एक नजरेचा धोका होता?, का खरंच तिथे कोणीतरी होतं ह्याबद्दल त्याचं मन सुध्दा संभ्रमावस्थेत होतं.

आकाश सावकाशपणे आपल्या पांघरुणात शिरला आणि डोळे घट्ट बंद करुन झोपण्याचा प्रयत्न करु लागला. त्याचे मानेचे, पाठीचे स्नायु आकुंचले होते. कधीही, कुठल्याही क्षणी पाठीला कुणाचातरी स्पर्श होईल की काय ह्या विचारांनी त्याच्या छातीची धडधड वाढली होती. घड्याळातला प्रत्येक क्षण स्लो-मोशन मध्ये असल्यासारखा पुढे सरकत होता. एखाद्या अवकाशात असावी तशी शांतता त्या खोलीत पसरली होती, अत्यंत गुढ, अथांग, छातीवर आणि मनावर दडपण आणणारी. घड्याळ्याच्या काट्यांचा ’टक-टक-टक-टक’ आवाज कानठाळ्या बसवत होता.

आकाश एका कुशीवरुन दुसर्‍या कुशीवर होत झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण काही केल्या त्याला झोप लागत नव्हती. सतत कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवुन आहे असा भास त्याला होत होता. शेवटी वैतागुन तो उठला आणि त्याने डोळे उघडले. पहिल्यांदा सर्वत्र अंधारच दिसत होता, पण थोड्याच वेळात त्याची नजर त्या मंद प्रकाशाला सरावली. त्याने नजर खोलीभर सर्वत्र फिरवली. तो कश्याचातरी शोध घेत होता, परंतु त्याला अपेक्षीत असलेले त्याला खोलीत काहीच दिसले नाही.

त्याने शाल्मलीकडे पाहीले. तिचा चेहरा अतीशय दमलेला, अशक्त, निस्तेज भासत होता. आकाशने हात लांब करुन तिच्या कपाळावर ठेवला. ताप एव्हाना थोडा कमी झाला होता.

आकाश बर्‍याच वेळ डोळे मिटुन बसुन राहीला. त्याचे कान कसल्याही प्रकारचा आवाज टिपण्यासाठी आसुसले होते, परंतु मगाचचीच ती शांतता अजुनही सर्वत्र पसरली होती.

आकाश शेवटी परत एकदा आपल्या पांघरुणात शिरला आणि डोळे मिटुन पडून राहीला. खुप उशीरा कधीतरी निद्राराणी त्याच्यावर मेहेरबान झाली आणि आकाश झोपी गेला.

—————————————————————————————————————–


सकाळच्या सोनेरी सुर्यकिरणांनी आदल्या रात्रीचा वातावरणातला तणाव निवळुन काढला होता. खिडकीच्या पडद्यांमधुन झिरपणार्‍या किरणांनी खोली लख्ख उजळुन निघाली होती. शाल्मलीचा ताप सुध्दा एव्हाना उतरला होता.

“कसं वाटतं आहे शोनु?”, आकाशने शाल्मलीला विचारले.

“ठिक आहे आता, थोडा अशक्तपणा वाटतो आहे पण..”, शाल्मली उठुन उशीला टेकून बसत म्हणाली… “एक छोटंसं काम करतोस का माझ?”

“हो.. सांग ना..”, आकाश

“त्या निळ्या बॅगेत ना, रेडी टु मिक्स टॉमेटो सुप्स ची दोन-तीन पाकीटं आहेत, प्लिज बनवुन देतोस? मोहीतला पण कर, तो पण घेईल…”, शाल्मली म्हणाली.

“अ‍ॅट युअर सर्व्हीस मॅम…”, असं म्हणुन आकाशने शाल्मलीला एक सॅल्युट ठोकला आणि तो तेथुन बाहेर पडला…


आकाशने स्वयंपाकघरात पाणी गॅसवर गरम करायला ठेवले आणि सुपचे एक पाकीट उघडुन तो पातेल्यात टाकतच होता तोच त्याच्या कानावर शाल्मलीची किंकाळी ऐकु आली.

आकाशने घाईअघाईत गॅस बंद केला आणि धावत धावतच तो बेडरुममध्ये गेला.

शाल्मली विस्फारलेल्या नजरेने आपल्या हातांकडे बघत होती.

“काय झालं?”, आकाशने आत येत दारातुनच विचारले.

“आकाश.. हे बघ.. हे काय झालं माझ्या हाताला???”, शाल्मली आपले हात पुढे करत म्हणाली.

आकाशने शाल्मलीचे हात पाहीले… हाताला लाल रंगाचा काहीतरी चिकट पदार्थ लागला होता.

आकाशने तिचा हात स्वतःच्या नाकाजवळ आणला आणि वास घेऊन तो म्हणाला, “लिपस्टीक.. लिपस्टीकचा वास आहे हा…”

शाल्मलीने सुध्दा आपल्या हातांचा वास घेउन मान डोलावली.

“पण मी तर लिपस्टीक लावली नाही.. मग माझ्या हाताला लिपस्टीक कुठुन लागली???”, शाल्मली..

मोहीत हा सर्व प्रकार आपल्या किलकिल्या डोळ्यांनी पहात होता.

“मला माहीत आहे आईने लिपस्टीकचे काय केले ते!!”, मोहीत…

आकाश आणि शाल्मलीने प्रश्नार्थक नजरेने मोहीतकडे पाहीले.

“आई बॅड गर्ल आहे, ते बघ तिने भिंतींवर रेघोट्या मारुन ठेवल्या आहेत..”, असं म्हणुन मोहीतने भिंतींकडे बोट दाखवले.

आकाश आणि शाल्मलीने मोहीत दाखवत असलेल्या दिशेने पाहीले. दोघांचेही डोळे विस्फारले गेले. दोघंही आळीपाळीने कधी एकमेकांकडे तर कधी भिंतीवर उमटलेल्या त्या अगम्य भाषेतील अक्षरांकडे बघत राहीले.

भितीचा, आश्चर्याचा आवेग ओसरल्यानंतर आकाश म्हणाला, “काय आहे ते? जेवढं मला आठवतं आहे, आधी नव्हतं तिथे काही लिहीलेले…”

“मी.. मी नाही लिहीलं ते..”, शाल्मली आपल्या हातांकडे पुन्हा पुन्हा बघत म्हणाली.. “केवढं उंच आहे ते, माझा हात तरी पुरेल का तिथं पर्यंत…”

“आय नो शमु.. पण मग हे…?”, आकाश

“काय आहे ते लिहीलेलं?? संस्कृतमध्ये काही लिहीलं आहे का?”, शाल्मली…

“नाही, संस्कृत वाटत नाहीये, बहुदा मोडी लिपी आहे ती…”, आकाश

“पण इतक्या उंचावर जाऊन कोणी लिहीलं असेल? जुन्या काळचं बांधकाम आहे हे, किती उंची आहे इथल्या खोल्यांना..”, शाल्मली

“हो.. पण.. हे नविनच लिहीलेले दिसते आहे, जुनं असतं तर त्यावर जमलेली धुळ दिसली असती, आणि..”, आकाश

“आणि काय आकाश?”, शाल्मली

“आणि.. तुझ्या हाताला लागलेले हे लिपस्टीक!!”, आकाश

दोघंही विचारात बुडुन गेले. त्यांची तंद्री भंगली ती आकाशच्या मोबाईल वाजण्याने.

आकाश त्या आवाजाने एकदम दचकला. बर्‍याच वेळ तो मोबाईलकडे बघत राहीला आणि मग त्याने सावकाश मोबाईल उचलला..

“हॅलो.. आकाश साहेब…झोपला होतात की काय?”, पलिकडुन जयंताचा, आकाशच्या मित्राचा आवाज आला.

“अं..नाही नाही, जागाच आहे…”, आकाश

“अहो मग फोन एवढ्या उशीरा का उचललात???”, जयंत

“नाही.. कुठं.. ठिक आहे.. ठिक आहे सगळं…”, आकाश

“अरे पण मी कुठं विचारले, कसं चाललं आहे? असा भंजाळल्यासारखा का वागतो आहेस?”, जयंत.. “बरं ठिक आहे ना सगळं?”

“हो.. हो.. ठिक आहे सगळं..”, आकाश

“आकाश.. काय झालंय? तुझ्या आवाजावरुन वाटत नाहीये सर्व ठिक आहे.. जरा निट सांगशील का???”, जयंत

आकाश मोबाईल घेउन खोलीच्या बाहेर आला. आधीच घाबरलेल्या आणि आजारी शाल्मलीसमोर त्याला बोलायला नको वाटत होते. त्याने बेडरुमचे दार लावुन घेतले आणि तो खालच्या मजल्यावर आला व मग त्याने सावकाश घडलेला सर्व घटनाक्रम जयंतला सांगायला सुरुवात केली.

जयंताने आकाशचे सर्व म्हणणे शांतपणे, मध्ये काहीही न बोलता, आकाशला न टोकता ऐकुन घेतले. आकाशचे बोलुन झाल्यावर तो म्हणाला, “मित्रा, एक काम करतोस का?”

“हम्म.. बोल ना!”, आकाश म्हणाला..

“तु ते जे काही भिंतीवर लिहीलेले म्हणतो आहेस, त्याचा एक मोबाईलमधुन फोटो काढुन एम.एम.एस करतोस का? मी बघतो त्याचं काही तरी. आमच्या इथे एक मेक-अप आर्टीस्ट आहेत, बरेच एजेड आहेत ते.. त्यांना मोडी लिपी वाचता येत असावी…”, जयंत म्हणाला..

आकाशने बरं म्हणुन फोन ठेवुन दिला आणि तो धावतच वरच्या खोलीत आला.

शाल्मली रुमालाला आपले हात पुसण्यात गुंग होती.

आकाशने भिंतीकडे मोबाइल धरला आणि ’ते’ जे काही लिहीलेले होते त्याचा एक फोटो काढुन जयंतला लगेच एम.एम.एस करुन टाकला.

“काय झालं?”, शाल्मलीने विचारले…

“काही नाही, जयंताच्या स्टाफ मध्ये एक जण आहेत, त्यांना बहुदा मोडी लिपी येत असावी. हे जर मोडी लिपीतच काही लिहीलेले असेल तर आपल्याला अर्थ कळेल त्याचा. मी ह्याचा एक फोटो जयंतला पाठवला आहे..”, आकाश म्हणाला.

दोघंही जणं विमनस्क अवस्थेत बेडवरच विचार करत बसले होते.

प्रत्येक क्षण युगायुगाचा वाटत होता. आकाश पुन्हा पुन्हा आपल्या मोबाईलवर रेंज आहे ना, बॅटरी आहे ना ह्याची चाचपणी करत होता.

थोड्याच वेळात जयंताचा फोन आला. आकाशने रिंग वाजल्या वाजल्या तो फोन उचलला..

“हा बोल जयंत.. काही कळालं?”, भिती मिश्रीत उत्सुकतेने आकाशने विचारले.

“आकाश….”, थोड्यावेळ थांबुन जयंत पुढे म्हणाला .. “तु मगाशी जे काही सांगीतलेस ते ऐकुन प्रकरण मला काही ठिक दिसत नाहीये.. तु एक काम कर, सर्वजण एकत्रच, एका खोलीतच थांबा, एकमेकांपासुन वेगळे होऊ नका, शक्यतो माहीत नसलेल्या गोष्टी हाताळू नका, मी ५-६ तासात पोहोचतो आहे तिकडे..”

“अरे हो.. पण काय झालं ते तर सांगशील??”, आकाश

“सांगतो, आल्यावर सविस्तर सांगतो. कदाचीत माझा अंदाज चुकीचासुध्दा असेल, तसे असेल तर सोन्याहुन पिवळे.. मी तिथे आल्यावर बोलु आपण…”, जयंत

“अरे पण ते काय लिहीले आहे ते तर सांगशील का???”, आकाश म्हणाला…

“रिव्हेंज.. बदला… एव्हढचं लिहीलं आहे ते आकाश, मी शक्य तितक्या लवकर येतोय तिकडे..” असं म्हणुन जयंताने फोन बंद केला.

आकाशने हळुवारपणे फोन बंद केला. त्याने मोहीत मग शाल्मलीकडे आणि नंतर भिंतीवरल्या त्या लिखाणाकडे नजर टाकली आणि तो म्हणाला… “जयंता येतोय इकडेच..”

मग तो बेडवरुन खाली उतरला आणि त्याने खोलीचे दार बंद करुन घेतले………………

[क्रमशः]

Rate & Review

Supriya Malusare

Supriya Malusare 3 weeks ago

İsha Girame

İsha Girame 1 month ago

atharv Wayal

atharv Wayal 2 months ago

Dilip Vasave

Dilip Vasave 2 months ago

Sanket

Sanket 5 months ago