Alvani - 4 in Marathi Horror Stories by Aniket Samudra books and stories PDF | अलवणी - ४

अलवणी - ४

जयंत बंगल्यावर पोहोचला तेंव्हा घड्याळात ३ वाजुन गेले होते.

“वहिनी कश्या आहेत?”, जयंतने दारातुनच विचारले

“शाल्मली ठिक आहे. ताप उतरला आहे तिचा, पण अजुनही अशक्तपणा आहे तिच्या अंगात”, जयंताला आतमध्ये घेत आकाश म्हणाला.

जयंत आत आल्यावर आकाशने दार लावुन घेतले.

“कसा झाला प्रवास?”, जयंताच्या हातातली बॅग घेत आकाश म्हणाला.

“चल एकदा वहीनींना भेटुन घेतो, मग आपण सविस्तर बोलु”, आकाशचा प्रश्न टाळत जयंत म्हणाला.

“बरं, चल वरच्या खोलीत आहे शाल्मली”, असं म्हणुन आकाश जिन्याकडे गेला, जयंतसुध्दा त्याच्यामागोमाग वरच्या खोलीत गेला

शाल्मलीला नुकतीच झोप लागली होती. मोहीतला सुध्दा सकाळपासुन कुठेच बाहेर पडता आले नव्हते त्यामुळे तो सुध्दा कंटाळुन झोपुन गेला होता. दोघांना झोपलेले पाहुन जयंत माघारी फिरला. मग त्याला काहीतरी आठवले, तसे पुन्हा तो खोलीत आला आणि त्याने आकाशला खुणेनेच काहीतरी विचारले.

आकाशने त्याला भिंतीकडे बोट दाखवुन ती अक्षरं दाखवली. जयंताने काही क्षण तिकडे निरखुन पाहीले आणि मग काहीही न बोलता तो पुन्हा खोलीच्या बाहेर पडला. पाठोपठ आकाश सुध्दा बाहेर आला आणि त्याने खोलीचे दार लावुन घेतले.


जिन्यातुन खाली येताना दोघंही गप्पच होते. खाली आल्यावर जयंताने त्याच्या बॅगेतुन ’स्मर्नऑफ व्होडका’ ची बाटली काढली आणि आकाशला म्हणाला, “जा पाणी घेऊन ये.. आपण बाहेरच पायर्‍यांवर बसु..”

आकाश पाणी आणायला स्वयंपाकघरात गेला, तोवर जयंताने बॅगेतुन काही चिप्सची पाकीटं, एक खारावलेल्या दाण्यांच आणि एक खारावलेल्या काजुचे पाकीट जे त्याने कोकणातुन येताना घेतले होते ते बाहेर काढले आणि तो बंगल्याबाहेरच्या पायर्‍यावर येउन बसला. थोड्याच वेळात आकाशसुध्दा स्वयंपाकघरातुन पाणी आणि दोन थर्माकॉलचे ग्लास घेउन बाहेर आला.

“हे काय? असल्या ग्लासमधुन प्यायची?”, जयंत आकाशच्या हातातल्या त्या ग्लासकडे बघत म्हणाला.

“मग काय झालं? आता इथं थोडं नं आम्ही काचेचे सुबक नक्षीकाम केलेले ग्लास घेउन आलो होतो…”, आकाशने दोन्ही ग्लास जयंताच्या हातात दिले

जयंताने तोंड वेडीवाकडी करत दोन पतियाळा पेग बनवले, बरोबरच्या पिशव्या फोडल्या आणि भिंतीला टेकुन बसला. आकाशसुध्दा त्याच्याशेजारीच भिंतीला टेकुन बसला.

दोन-तिन घोट घश्यात गेल्यावर आकाश म्हणाला, “बोल काय म्हणतोस?? काय प्रकार आहे हा?”


“आकाश,………. तुझा भूत, आत्मा, वगैरे गोष्टीवर विश्वास आहे?”, सरळ आकाशच्या डोळ्यात बघत म्हणाला

“काय?? भूत????”, आकाश हसत म्हणाला..”अरे काही काय? आपण कुठल्या काळात रहातोय? विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे आणि तु…”

“हो? की नाही? तेवढं सांग, विज्ञान मी सुध्दा शिकलो आहे…”, आकाशला मध्येच थांबवत जयंत म्हणाला.

“नाही…..”, दोन क्षण विचार करुन आकाश म्हणाला.

जयंत काहीच बोलला नाही, हे पाहुन आकाश पुढे म्हणाला, “म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की हा सर्व भूताटकीचा प्रकार आहे?”

“मी खात्रीने तर नाही सांगू शकत तसं, पण एकुण परीस्थीती पाहुन माझा तरी तसाच समज झाला आहे…”, जयंत

“अरे पण.. आजच्या जमान्यात कुठं असतात भुत? ह्या सगळ्या जुन्या कल्पना झाल्या, आजकाल कोण मानतं असल्या गोष्टींना?”, आकाश


“का? काळ बदलला की भुत बदलतात का? पूर्वीच्या काळी मानल्या गेलेल्या काही गोष्टी ह्या अंधविश्वासातून मानल्या गेलेल्या होत्या हे ओघवत्या काळात सिध्द होत गेले. पण भूत ही संकल्पना खरी का खोटी हे खात्रीलायक रित्या अजुनपर्यंत तरी कोणीही सिध्द केलेले नाही. ज्यांनी अनुभवले त्यांनी मानले, ज्यांनी अनुभवले नाही, त्यांचा अर्थातच ह्या संकल्पनेवर विश्वास बसणार नाही.”, जयंत म्हणाला.

“पण तुला असं का वाटतं आहे, हा सर्व प्रकार..”, आकाश

“ह्या बंगल्याला स्वतःचा असा नक्कीच एखादा इतीहास असणार, इथं नक्कीच काहीतरी वाईट, कुणालातरी दुखावणारे घडलेले असणार… तुच विचार कर, इथं आल्यानंतर असं थोडंस वेगळं नाही वाटत??”
“………”

“थोडासा अस्वस्थपणा नाही जाणवतं”?
“……………….”

“इथं आपण दोन-चार लोकं सोडली तर आजुबाजुला एकही सजीव प्राणी पक्षी का नाही?”
“त्या खोलीत बांधलेल्या लसणाच्या माळा, आणि रामुकाकांनी त्याचा सांगीतलेला संबंध आणि भिंतीवर ती मोडीलिपीतली अक्षरं…”, जयंत

“हो, ती अक्षरं तर एक कोडचं आहे, कोणी जाऊन ती अक्षरं लिहिली असतील इतक्या उंचावर?”, आकाश

“वहिनींच्या हाताला लागलेल्या लिपस्टीकवरुन तु काहीच निष्कर्ष कसा नाही काढु शकत आकाश? मला तर वाटतं वहीनींनीच ती अक्षरं लिहिली असावीत, किंबहुना त्यांच्या हातुन ती अक्षरं लिहुन घेतली गेली असावीत…”, जयंत


“ओह स्टॉप इट जयंत.. तु आता काहीच्या काही बोलत आहेस.. तुला असं म्हणायचं आहे की शाल्मलीला भुताने पछाडले वगैरे आहे???”, आकाश वैतागुन म्हणाला

“हे बघ, मी खात्रीलायक रित्या तसं म्हणत नाही, आपल्याला ह्या प्रकरणाच्या मुळाशी जावंच लागणार आहे, पण परिस्थीती तसेच काहीसे सुचवती आहे. तु वहीनींना तीच अक्षरं पुन्हा एखाद्या पानावर लिहायला सांग, मला जवळ जवळ खात्री आहे, ते अक्षर आणि हे अक्षर नक्की जुळेल.. लावतोस पैज?”, जयंत हात पुढे करत म्हणाला.

आकाश काहीच बोलला नाही.

“त्या दिवशी रात्री, तुच म्हणालास, शाल्मलीचे एक नविनच रुप तु पाहीलेस, खरं का खोटं?”, जयंत

“म्हणजे? त्या दिवशी मी एका भुताबरोबर संभोग केला असं तुला म्हणायचे आहे?”,आकाश

जयंताने खांदे उडवले, मग कपात उरलेला पेग एका घोटात पिऊन टाकला आणि पुन्हा एक नविन पेग बनवला.

“दुसर्‍या दिवसापासुन वहीनींना अचानक आलेला ताप माझ्या म्हणण्याला एक प्रकारची पुष्टीच देतो..”, जयंत

“ताप? त्याचा काय संबंध? ती केवळ मोहीतच्या प्रकरणामुळे घाबरली होती, कदाचीत टेन्शन आल्याने सुध्दा तिला ताप आला असेल..”, आकाश


“आपण आत्ताच आत्मा ह्या प्रकाराबद्दल बोललो. आपले मानवी शरीर हेच मुळी आपल्या आत्मावर निर्भर असते. सर्व शक्ती आत्मा रुपाने एकवटलेली असते. जेंव्हा दुसरा आत्मा आपल्या शरीराचा ताबा घेऊ पाहील तेंव्हा प्रतिकार होणारच. शाल्मलीच्या बाबतीतही तोच प्रकार झालेला असणार. तिला आलेला थकवा हे एक त्याचेच द्योतक असू शकते..”, जयंत

आकाश शुन्यात एकटक नजर लावुन विचार करण्यात मग्न झाला होता..


“हे बघ.. आपल्याला आत्ता काहीच कल्पना नाहीये की हा सगळा प्रकार काय आहे. आपल्याला शोध घ्यायला काहीतरी एक दिशा हवी आहे.. आपण हिच दिशा पकडुन चालुयात. कदाचीत पुढे गेल्यावर आपल्याला काही पुरावे मिळतील, कदाचीत हे सिध्द होईल की हा भूताटकीचा प्रकार नाही, मग तेंव्हा आपण दिशा बदलु हवी तर. पण सध्या असा विचार करुन पुढे जाण्यात काय चुक आहे?”, जयंत बोलत होता.

आकाश त्या प्रणयाच्या रात्रीचा शाल्मलीचा चेहरा, तिचे वागणे आठवण्याचा प्रयत्न करत होता.

“आकाश?? काय म्हणतो आहे मी?”, आकाशच्या पायाला हलवुन जयंत म्हणाला.

“हम्म.. ठिक आहे. मला खात्री आहे, तसा काहीच प्रकार नसणार, पण तुझा गैरसमज दुर होण्यासाठी आणि कुठुन तरी एक सुरुवात म्हणुन हवं तर, आपण ही दिशा पकडु”, आकाश

जयंताने मान हलवुन त्याला संमती दर्शवली.

“बरं आता मला सांग, कुठून आणि कशी सुरुवात करायची?”, आकाश

“सांगतो. इकडे येत असतानाच मी त्याचा विचार केला आहे…”, असं म्हणुन जयंत उठला आणि तो आपल्या गाडीपाशी गेला. गाडीचे दार उघडुन त्याने एक मोठी काळी बॅग बाहेर काढली आणि तो आकाशपाशी येऊन बसला.

“काय आहे ह्या बॅगेत?”, आकाशने विचारले.

“कॅमेरा.. व्हिडीओ कॅमेरा…”, जयंत म्हणाला..

“आणि काय करायचं ह्याचं? ह्याने तु भूत बित शुट करणार आहेस की काय? आम्हाला तर बाबा गेल्या ५-६ दिवसात काळं कुत्र सुध्दा नाही दिसलं आणि तुला भूत कुठुन दिसणार?”, आकाश म्हणाला

“हा थर्मल कॅमेरा आहे आकाश.. हा आपल्या भोवतालची उर्जा, अंधारात मनुष्याची आकृती त्याच्या शारीरीक तापमानामुळे रेकॉर्ड करु शकतो..”, जयंता ती बॅग उघडत म्हणाला.

“म्हणजे.. मला नाही कळालं!, ह्यात भुत-बित काही असेलच तर ते कसं काय बुवा रेकॉर्ड होईल?”, आकाश

“सांगतो, पण त्याआधी मला सांग भूत म्हणजे काय? म्हणजे.. तुझ्या दृष्टीने भूताची व्याख्या ती काय?”, जयंत म्हणाला.

“भूत म्हणजे.. आता तसं कसं सांगता येईल? पण साधारणपणे एखादी व्यक्ती मरण पावली आणि तिच्या काही इच्छा अपुर्ण राहील्या असतील तर तिच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. मग तिचा आत्मा इतरत्र भटकत रहातो.. कदाचीत तेच भूत असावं!”, आकाश

“बरोबर.. आता आत्मा म्हणजे काय?”, जयंत

आकाशने आपले ओठ वाकडे केले आणि खांदे उडवुन म्हणाला…”माहीत नाही…”


“आत्मा म्हणजे एक प्रकारची उर्जाच असते नाही का! जी आपल्याला डोळ्यांनी दिसु शकत नाही कदाचीत, पण त्याचं अस्तीत्व सुध्दा आपण नाकारु शकत नाही. हा थर्मल कॅमेरा आत्मा.. जसा आपण समजतो आहे तसाच, आणि जर ’ती’ गोष्ट म्हणजे खरंच एखादी अदृष्य शक्ती, उर्जा असेल तर तो नक्की चित्रीत करु शकेल.

आपले डोळे त्याच गोष्टी बघु शकतात ज्यावरुन लाईट परावर्तीत होतो, पण ह्याचा अर्थ असा नाही की सर्व प्रकारचा लाईट आपण बघु शकतो. आपले डोळे कदाचीत सर्व गोष्टी पाहु शकत नाहीत. आत्मा, त्यातुन निर्माण होणारी उर्जा, त्यातुन परावर्तीत होणारा लाईट त्याच प्रकारातला. त्याला वैज्ञानीक भाषेत म्हणतात ’इक्टोप्लासमीक स्पेक्ट्रल लाईट’ आणि हा कॅमेरा तो लाईट टिपू शकतो.”

“पण.. पण तु म्हणतोस तसं सगळं खरंच असेल तर शाल्मलीच्या, मोहीतच्या, आपल्या दोघांच्या जिवाला धोका आहे. त्यापेक्षा आपण इथं थांबूयातच नको, आत्ताच सामान भरु आणि निघुयात इथुन. काय म्हणतोस?”, आकाश जागेवरुन उठत म्हणाला.

“नाही आकाश, तसं करणं कदाचीत योग्य ठरणार नाही. वहीनींची तब्येत आत्ता ठिक नाहीये. आपला अंदाज.. देव नं करो, जर बरोबर असेल तर वहीनींच शरीर, त्यांची मानसीकता अतीशय क्षीण झालेली आहे. इथं असलेल्या त्या अघोरी शक्तीने चवताळुन जाऊन वहीनींच काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर? त्यापेक्षा आपण एक-दोन दिवस थांबुन काय प्रकरणं आहे ह्याचा छडा लावायचा प्रयत्न करुयात असं मला वाटतं..”, जयंत म्हणाला.

“ठिक आहे.. पण तो पर्यंत?? सुरक्षितेसाठी काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे नाही का??”, आकाश

“मला वाटतं आपण इतक्या सगळ्या गोष्टी मानलेल्या आहेतच, त्यावर सध्यातरी डोळे झाकुन विश्वास ठेवलेला आहेच, तर मग आपण रामुकाकांनी सांगीतलेले पण ऐकले तर?”, जयंत म्हणाला

“रामुकाका? काय म्हणाले होते ते..?”, आकाश आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

“ते.. खालच्या खोलीत बांधलेल्या लसणांच्या माळांबद्दल म्हणाले होते असं तु म्हणाला होतास ना? कदाचीत आपण त्या खोलीत सुरक्षीत राहु. आजची रात्र तिथे काढायला काय हरकत आहे?”, जयंत म्हणाला

आकाशने विरोध दर्शवायला तोंड उघडले, पण त्याला माहीत होते की दुसरा काही पर्याय पण नाहीये.

दोघांच्या गप्पा संपेपर्यंत सुर्यास्त होऊन गेला होता आणि बाहेर अंधारायला लागले होते.

“चल तर मग, लागु यात पटापट कामाला..”, असं म्हणुन जयंत उठला, पाठोपाठ आकाशही उठला आणि ते आतमध्ये आले.

“मी इथं खोलीच्या बाहेर कॅमेरा लावुन ठेवतो, तो पर्यंत तु वहीनी आणि मोहीतला घेउन ह्या खोलीत ये.. आणि आवश्यक काही असेल, खाण्याचे काही असेल, पाणि तर ते पण खोलीतच आणुन ठेव. आपण आज रात्री काहीही झालं तरीही खोलीच्या बाहेर पडणार नाही आहोत..”, जयंत म्हणाला.

काही क्षण दोघांनीही एकमेकांकडे पाहीले आणि मग आकाश वरच्या खोलीत शाल्मली आणि मोहीतला आणायला पळाला तर जयंत ट्रायपॉड सेट करुन त्यावर कॅमेरा लावण्यात गुंग होऊन गेला.

[क्रमशः]

Rate & Review

Supriya Malusare

Supriya Malusare 3 weeks ago

Vibhor Borkar

Vibhor Borkar 2 months ago

Snehlata

Snehlata 3 months ago

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 5 months ago

sumit

sumit 5 months ago

mast