Alvani - 9 in Marathi Horror Stories by Aniket Samudra books and stories PDF | अलवणी - ९

अलवणी - ९

…. “रामुकाका चला लवकर बाहेर..”, रामुकाकांना ओढत ओढतच जयंता पायर्‍यांवरुन तळघराच्या बाहेर यायला निघाला.

दोघांनीही मागे काय होते आहे, मागुन कुणी येते आहे का? हे पहाण्यासाठी एक क्षणही नाही दवडला. पण त्यांना माहीत होते मागुन कोणीतरी लडखडत, तडफडत, लंगडत त्यांच्या मागे मागे येत होते.

दोघेही तळघराच्या बाहेर आले. दाराबाहेर शाल्मली आणि आकाश वाट पहात उभेच होते. जयंता आणि रामुकाका बाहेर आल्यावर चौघांनीही मिळुन ते तळघराचे दार जोरात ढकलले आणि बाहेरुन त्याला ती भलीमोठ्ठी कडी घालुन टाकली.

त्यांच्यामागावर जे कोणी येत होते ते एव्हाना दरवाज्यापाशी येऊन थडकले होते.

जयंताने क्षणाचाही विलंब न करता त्या पुड्यातुन एक मुठभर मिठ घेतले आणि दरवाज्याबाहेर त्याची एक रेघ ओढली.

“किती काळ? किती दिवस? का किती तास? हे मिठ त्यांना रोखु शकेल ते माहीत नाही, पण निदान सध्यातरी आपण काही वेळापुरते सुरक्षीत आहोत.”, जयंता म्हणाला.

रामुकाका आणि जयंताच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले होते.

शाल्मलीने स्वयंपाकघरातुन पाण्याने भरलेला लोटा रामुकाकांच्या हातात दिला आणि म्हणाली, “तुम्हाला जाऊन बराच वेळ झाला, तुम्हाला आम्ही खुप हाका पण मारल्या, पण काहीच उत्तर आले नाही म्हणुन जयंता….”

रामुकाकांनी घटाघटा पित पाण्याचे घोट घश्याखाली उतरवले आणि मग ते म्हणाले, “चला तिकडच्या खोलीत चला, आपल्याला आता घाई करायला हवी” असं म्हणत भराभर चालत रामुकाका खोलीकडे निघाले आणि त्यांच्या पाठोपाठ जयंता, आकाश आणि शाल्मली सुध्दा.


“रामुकाका खाली, तळघरात काय झालं सांगा ना!”, नंतर जेंव्हा सर्वजण खोलीत बसले होते तेंव्हा शाल्मलीने विचारले. जयंता त्यावेळी खोलीच्या बाहेर तशीच एक मिठाची रेघ ओढण्यात मग्न होता.

तो काम संपवुन आतमध्ये आला तेंव्हा रामुकाकांनी खाली, तळघरात घडलेला वृत्तांत सांगायला सुरुवात केली.

“रामुकाका, तुम्ही उगाचच जिवावर बेतणारा धोका पत्करलात..”, रामुकाकंचे बोलणं झाल्यावर शाल्मली म्हणाली

“हम्म.. पण निदान आपल्याला काही उत्तरं तरी मिळाली. त्र्यंबकलालनेच नेत्राला जिवंत ठेवले, तिच्या आत्म्याला मुक्ती मिळु दिली नाही. कदाचीत हेच ते कारण असावं ज्यामुळे नेत्राने त्र्यिंबकलालला मारले नसावे. त्यानंतरच्या ह्या इतक्या काळात नेत्रा आता अधीक शक्तीमान झाली आहे, तिच्यावर झालेल्या अत्याचारांचा प्रत्येकावर बदला घेत सुटली आहे.”

रामुकाका पुढे काही बोलणार तोच दुरुन जोर जोरात ’खड्ड..खड्ड’ असा आवाज ऐकु आला. दारावर कोणीतरी जोरजोरात धडका मारतं होतं, जणू काही पिंजर्‍यात अडकलेले एखादं हिंस्त्र श्वापद…

“बरं आता काय करायचं? आपल्याला जे पहायचं होतं ते पाहीलं, आपण त्यांच्या विरोधात लढू शकत नाही हे ही अलिखीतपणे जाणलं. मग इथं थांबायचं कश्याला? चला इथुन निघुन जाउ यात, ते बाहेर यायच्या आत…”, आकाश म्हणाला.

“नाही, तसं केलं तर शाल्मलीच्या जिवाला धोका आहे..”, रामुकाका म्हणाले…

“शाल्मलीच्या?? पण का?”, जयंता आणि आकाश दोघंही एकदमचं म्हणाले.

रामुकाकांनी खोलीच्या कोपर्‍यात अंग चोरुन बसलेल्या आपल्या मांजराला जवळ बोलावले. मांजराला मांडीवर घेउन कुरुवाळले, त्याच्या पाठीवर थोपटले आणि मग ते मांजर त्यांनी जयंताकडे दिले.

जयंताने प्रश्नार्थक नजरेने रामुकाकांकडे बघीतले. रामुकाकांनी नजरेनेच त्याला आपण जसे केले होते तसे करायला सांगीतले.

जयंताने रामुकाकांसारखेच त्या मांजराला गोंजारले आणि ते मांजर आकाशकडे दिले. आकाशने सुध्दा तसेच केले आणि मांजर शाल्मलीच्या समोर धरले. शाल्मली त्या मांजराला घेणार तोच त्या मांजराने आपले दात बाहेर काढले आणि “म्याऊ…” असा कर्णकर्कश्श आवाज काढला आणि फिस्सकारत तेथुन निघुन गेली.

सर्वांनी पुन्हा एकदा प्रश्नार्थक नजरेने रामुकाकांकडे पाहीले

“नेत्राचा काही अंश अजुनही शाल्मलीच्या शरीरात आहे.. जर आपण तिला इथुन न्हेण्याचा प्रयत्न केला तर…”, रामुकाका अचानक बोलायचे थांबले

“तर काय रामुकाका?”, आकाशने विचारले

परंतु रामुकाका शाल्मलीकडे निरखुन पहात होते.

शाल्मली एव्हाना स्वतःशीच गालातल्या गालात हसत होती. तिच्या नजरेत झालेला बदल रामुकाकांनी अचुक हेरला होता.

“साल्या.. म्हातार्‍या.. लै चालु आहे हा तु…”, शाल्मली म्हणाली.

जयंता आणि आकाश चमकुन शाल्मलीकडे बघु लागले.

शाल्मली उठुन उभी राहीली, मग तिने दोन्ही हात बाजुला करुन स्वतःभोवतीच एक आनंदाने गिरकी मारली आणि मग समोरच्या बेडवर जाऊन बसली.

बराच वेळ शाल्मली स्वतःची नख निरखून बघण्यात मग्न होती. मग सावकाशपणे तिच्या चेहर्‍यावरचे हास्य मावळले आणि त्या जागी एक छद्मी, क्रुर हास्य उमटले.

तिने मान मागे वळवुन कोपर्‍यात बसलेल्या मांजराकडे पाहीले. शाल्मलीच्या नजरेला एक विलक्षण धार आली होती. मांजराची अस्वस्थपणे चुळबुळ सुरु झाली. ते कोपर्‍यातुन दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु जणु काही त्याच्या जाण्यावर कोणीतरी मर्यादा घातल्या होत्या. ते मांजर कोपर्‍यातच जागच्या जागी फेर्‍या मारु लागले.

क्षणाक्षणाला त्याच्या चालण्याच्या कक्षा लहान होत गेल्या, ते मांजर भिंतीच्या एका कोपर्‍यात दबले गेले आणि मग सुरु झाली एक असहाय्य तडफड. चारही पाय झाडत ते मांजर सुटकेचा प्रयत्न करु लागले. ते ओरडण्याचा प्रयत्न करत होते, पण घश्यातुन आवाजच फुटत नव्हता, जणु काही त्याचा घसा कुणीतरी दाबुन धरला होता. मग हळु हळु त्या मांजराची तडफड बंद झाली आणि ते कोपर्‍यात हातपाय ताठ करुन मलुल होऊन पडले.

ते मांजर मृत्यु पावले आहे हे कोणी वेगळ सांगायची गरज नव्हती.

शाल्मलीने मान वाकडी करुन पुन्हा एकदा सर्वांकडे पाहीले आणि ती स्वतःशीच खदाखदा हसु लागली.


शाल्मली स्वतःशीच हसण्यात मग्न होती तेंव्हा जयंताने हळुच तो मिठाचा पुडा स्वतःकडे सरकवला आणि त्यातले मुठभर मिठ घेऊन शाल्मलिच्या अंगावर भिरकावले.

अंगावर गरम तप्त पाणी पडावं तसं शाल्मलीने क्षणभर अंग झटकले, तिचा क्रुर चेहरा अधीकच क्रुर झाला.

“अबे..साले.. ते मिठ बिठ मला नको घाबरवुस.. ते त्या लंगड्या त्र्यिंबकलालसाठी ठिक आहे..” असं म्हणुन शाल्मली जागेवरुन उठली, जयंताच्या जवळ आली आणि तिने खाड्कन जयंत्याच्या मुस्काटात लावुन दिली.

शाल्मली नाजुक असली तरीही त्या कानफाटात विलक्षण जोर होता. जयंताच्या हातातला मिठाचा पुडा दुर भिरकावला गेला आणि जयंता जागच्या जागी मागे पडला.

शाल्मलीच्या हातावर, तोंडावर त्या मिठाने भाजल्यासारखे काळे डाग पडले होते, केस विजेचा धक्का बसावा तसे कडक होऊन विखुरले गेले होते आणि तिची ती भेसूर नजर तिचा चेहरा अजूनच विद्रूप बनवत होती.

शाल्मली पुन्हा बेड वर जाऊन बसली तिने पाय गुडघ्यात वाकवून पोटाशी ओढून घेतले आणि त्यावर दोन्ही हातांची घडी घालून ती सर्वांकडे बघत होती. रामुकाका, जयंता, आकाश ह्यांना काय करावे तेच सुचत नव्हते.

शाल्मालीने एक हात आपल्या केसांतून फिरवला आणि म्हणाली, “कित्ती छान वाटते आहे, बर्याच दिवसांनी असे केस, नाहीतर इतके दिवस तेच ते आपल टक्कल…..” मग अचानक बोलता बोलता थांबली आणि तिने रागाने सर्वांकडे पहिले व पुढे म्हणाली..”तुम्ही सगळे मरणार…. कुत्र्याच्या मौतीने मरणार.”

शाल्मली पुन्हा बेडवरून खाली उतरली आणि त्या मेलेल्या मांजराजवळ गेली. खाली वाकून तिने ते मांजर एका हातांनी उचलले आणि सावकाश त्याला आपल्या गालावरून, कपाळावरून, डोक्यावरून घासत फिरवले जणू ते एखादे सौफ्ट-टोय होते. मग तिने ते मांजर तळहातावर ठेवले आणि अचानक त्याच्या पोटाचा एक दाताने लचका तोडला. रक्ताची एक चीळकांडी तिच्या चेहर्‍यावर उडाली. पण शाल्मालीला त्याची परवा नव्हती. तिने तो तुकडा चावून चावून खाल्ला, मग अजून एक, आणि मग अजून एक तुकडा.

आकाशाने मोहिताचे डोळे झाकून त्याला जवळ घेतले.

अचानक शाल्मालीचे खाणे बंद झाले आणि ती तोंड वाकडे करून क्षणभर थांबली आणि मग तिला उलटी झाली.

“साल्या.. कधी कोंबडी, बकरा खायला घातला नाही कारे हिला? सगळे ओकून काढले बाहेर??”, अंगावर सांडलेली ओकारी हाताने झटकत शाल्मली आकाशला म्हणाली..

“नेत्रा, पण आम्ही काय पाप केले आहे? तुझ्यावर झालेल्या अन्यायाची शिक्षा आम्हाला का? शाल्मलीने तूझ काय बिघडवले होते? तिला हा त्रास का?”

रामुकाकानी पहिल्यांदाच शाल्मालीचा उल्लेख नेत्रा असा केला.

“तुमी सगळी मानव जात नाय का? कुणाला पण सोडणार नाय, मला फकस्त इथून बाहेर पडायचे होते, अडकून पडले होते इथ. तुमी आलात आणि मला बाहेर जायचा मार्ग मिळाला..”, नेत्रा म्हणाली

“पण मग शाल्मालीच का? आमच्यापैकी कोणी का नाही?”, आकाशाने विचारले

“तिच्या आत्म्याने मला तिच्या शरीरात प्रवेश करू दिला, तुमच्या नाही…”, नेत्रा म्हणाली

“पण का?”, आकाश

“कदाचित.. तिला मी अश्या गोष्टीचे आमिष दाखवले जे तिच्याकडे नवते. माझ्या प्रलोभनाला ती फसली..”, नेत्रा हसत म्हणाली..

“कसले आमिष?”, आकाश

“त्या दिशी नी का आपण मज्जा मारली बेड मध्ये.. तिला जमत नसेल तस.. म्या म्हणल मी तुला तो आनंद मिळवून द्येईन मग घुसले तिच्या शरीरात…”, नेत्रा सांगत होती.. “मला एक माध्यम हवे होते इथून बाहेर पडायला, ते मिळाले, आता एकेकाला संपवणार, जो भेटेल त्याला मारणार, सोडणार नाय कुणाला..” अस म्हणून तिने एक विजयी चित्कार केला.

तिच्या त्या आवाजाने रामुकाका, जयंता आणि आकाशाच्या अंगाचा थरकाप उडाला.

“मग वाट कसली बघते आहेस.. आम्ही तुझ्या समोरच आहोत.. ये मार आम्हाला आणि मोकळे कर एकदाचे..”, रामुकाका म्हणाले.

“थोड दिस थांब रे म्हातारड्या..पूर्णिमा तर येउन्द्ये कि…त्या रात्री आपल्याला लई शक्ती असते माहीती आहे नवं?.. चंद्रमा झाकोळला नी जात ना ह्या अवनी मुळे.. चारच दिस.. आन मग ती रात्र येणार…” असं म्हणून पुन्हा एकदा नेत्रा भेसूर खदा खदा हसली..

शाल्मालीच्या चेहऱ्यावर लागलेले रक्त आता वाळून त्याचे पोपडे बनले होते आणि ते गालाला चिकटून बसले होते. तिने केलेल्या उलटीचा घाणेरडा वास खोलीत भरून राहिला होता.

“इथून हिला घेऊन जायचा प्रयत्न करू नका, तिच्या शरीराचा आणि आत्म्याचा ताबा हाय माझ्याकडे…” असा दात विचकत नेत्रा म्हणाली आणि मग खोलीच्या कोपर्यात गुडगे पोटाशी घेऊन बसून राहिली.

रात्रभर शाल्मली जागी होती आणि त्या तिघांकडे नजर ठेऊन होती. सकाळी कधी तरी ती जमिनीवर आडवी झाली. बहुदा नेत्रा तिच्या शरीरातून बाहेर पडली आणि शाल्मली झोपेच्या आहारी गेली.


“बाबा.. आईला काय झालं?”, आकाशला हलवतं मोहीत विचारत होता.

आकाशने डोळे उघडुन बघीतले. शाल्मली गुडघ्यात डोकं खुपसुन हमसुन हमसुन रडत होती.

आकाश तिच्या शेजारी जावुन बसला.

आकाशला पाहुन शाल्मलीला अजुन भरुन आलं.

“आकाश!.. हे .. हे काय झालं आहे सगळं?? हे रक्त कसलं लागलं आहे माझ्या अंगाला..?? आणि ही उलटी कधी केली मी??? मला काहीच का आठवत नाहीये??”, शाल्मलीने विचारले

“शमु.. डोन्ट वरी काही नाही झालंय.. जा तु फ्रेश होऊन ये, बरं वाटेल”, शाल्मलीच्या डोक्यावरुन हात फिरवत आकाश म्हणाला.

एव्हाना रामुकाका आणि जयंता सुध्दा उठले होते आणि ते शाल्मलीच्या शेजारी उभे होते.

“हे बघ बेटा..”, रामुकाका म्हणाले, “काही गोष्टी अश्या असतात ज्या माहीत नसलेल्याच बर्‍या असतात. अज्ञानात सुख असते म्हणतात ना!, तसंच काहीसं.. तुला काहीही होणार नाही, आम्ही आहोत ना इथं…”

“पण रामुकाका….”

“काही गोष्टी घडतात आपल्याला जा आपल्याला क्लेश देऊन जातात, संकटात टाकतात, पण तेंव्हाच तर आपली कसोटी पणाला लागते ना! तेंव्हाच आपण मनापासुन त्या परमेश्वराची आराधना करतो. आणि जेंव्हा आपण त्या संकटातुन बाहेर पडतो तेंव्हाच तर आपला देव ह्या संज्ञेवर विश्वास बसतो हो कि नाही?”, रामुकाका म्हणाले.

शाल्मलीने होकारार्थी मान हलवली.

“ह्या जगात चांगलं आहे तर वाईट असणारच, रात्र आहे तर दिवस असणारच, तसेच जर दानव आहे, जर त्याचा आपल्याशी सामना झालेला आहे तर मग देव सुध्दा आहे ह्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे?”, रामुकाका

रामुकाकांच्या बोलण्याने सर्वांना पुन्हा एकदा हुरुप आला. शाल्मली उठुन बाथरुममध्ये फ्रेश व्हायला गेली.

“रामुकाका, बोलण्यापुरते ठिक आहे, पण आता काय करायचं? प्रश्न दिवसेंदिवस बिकटच होत चालला आहे”, आकाश म्हणाला

रामुकाका हनुवटीवरुन हात फिरवत विचार करण्यात मग्न होते.

“मला वाटते आपण ह्या बंगल्यात काही शोध-शोध केली तर?”, बराच वेळ विचार केल्यावर रामुकाका म्हणाले.. “”म्हणजे मला तशी खात्री नाही, परंतु एखादा सुगावा, कसल्याही प्रकारची माहिती आपल्या उपयोगी पडेल. नेत्राचे दर्शन होणारे काही आपण पहिले नक्कीच नसणार. त्या काळी जी लोक इथ रहात होती त्यांनाही काही प्रसंगातून जावेल लागले असणारच. मग त्या वेळी, त्यांनी काय केले होते? अशी कुठली गोष्ट आहे, किंवा असे काय आहे कि ज्यामुळे नेत्रा अजूनही ह्या बंगल्यातच अडकून पडली आहे, असे काय आहे कि ज्यामुळे तिला इथून बाहेर पडता आलेले नाही?”

“हम्म विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी”, जयंता म्हणाला.

“चला तर मग शुभस्य शीघ्रम,,”, रामुकाका उठून उभे रहात म्हणाले.

शाल्मली त्याचवेळी बाथरूम मधून फ्रेश होऊन बाहेर येत होती. आकाशाने प्रश्नार्थक नजरेने रामुकाकांकडे बघितले.

रामुकाका म्हणाले, “तिला आराम करू देत, फार गरज आहे तिला त्याची. आज रात्री पुन्हा काय होईल आपल्याला माहित नाही..” असं म्हणून रामुकाका खोलीच्या बाहेर पडले. पाठोपाठ आकाशही बाहेर गेला

शाल्मली पहिल्यापेक्षा जरा बरी दिसत होती. आकाशाने तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर एक चुंबन दिले व म्हणाला, “शमू, तू काळजी करू नकोस, जोवर मी आहे तोवर तुला काही होणार नाही. तू आराम कर, आम्ही आहोतच बाहेर. काही लागले तर हाक मार.” अस म्हणून आकाश सुध्दा खोलीच्या बाहेर पडला.


बाहेरच्या व्हारांड्यामध्ये रामुकाका, जयंता आणि आकाश खोल्यांचे वाटप करून घेत होते.

“जयंता, तु वरची खोली बघ, मी दिवाणखाना बघतो आणि आकाश तु ही बेडरुमच शोध. जेणेकरुन आपलं काम पण चालु राहील आणि तु शाल्मलीच्या जवळही रहाशील.”, रामुकाकांनी आपला प्लॅन सांगीतला ज्याला सगळ्यांनी अर्थातच संमती दर्शवली.

“प्रत्येक कपाट, खण, कोपरा काही म्हणजे काही सोडु नका. एखादी बारीकशी गोष्ट सुध्दा आपल्याला ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल…”

आपआपल्या मार्गाने जाताना जो तो एकमेकांना हेच सांगत होता.

अर्थात तळघर ह्या शोधमोहीमेतून वगळण्यात आले होते हे वेगळे सांगायची गरज नाही.

काय होणार पुढे? त्या तिघांना काही रस्ता सापडणार का? एखादी माहीती त्यांना ह्यातुन बाहेर पडायला मदत करणार का? का नेत्रा आपल्या उद्देशात यशस्वी होणार?

[क्रमशः]

Rate & Review

Abhishek

Abhishek 4 weeks ago

Sharmila

Sharmila 2 months ago

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 5 months ago

अजय भगत
Swapna Tempalle

Swapna Tempalle 9 months ago