Mala Kahi Sangachany - Part - 7 - 8 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय.... - Part - 7 - 8

मला काही सांगाचंय.... - Part - 7 - 8

७. आसवांची परीक्षा


गावातून बाहेर जात असता रस्त्यावरचे दिवे मनात येणाऱ्या विचारांसारखे एका मागून एक मागे जात होते. मनात असंख्य प्रश्न डोकं वर काढू पाहत होते, नेमकं काय झालं असेल कुमार सोबत?

असा अचानक अपघात झाला कसा? फार लागलं तर नसेल ना त्याला? परमेश्वरा कुमारला काही होऊ देऊ नकोस. असं मनात सुरु असता सुजित आणि कुमारची आई शहराकडे जायला निघाले....


या सर्व प्रकारापासून अलिप्त ... त्याच्या आईला मात्र याचा अजून थांग पत्ता नव्हता . चंद्र आणि चांदण्यांनी रस्ता प्रकाशमान होता जणू त्याच्या वाटेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कि काय ? बराच वेळ दोघंही शांत होते. त्यासाठी दोन कारणं होती पहिलं असं कि रात्रीची वेळ त्यात दुचाकीचा प्रवास आणि दुसरं असं कि सुजितला पेच पडलेला कि बोलता बोलता काकूंना जे कळायला नको ते कळेल कि काय?


आतापर्यंत आसवांनी ओल्या पापण्या कश्या तरी त्याने लपविल्या होत्या पण मनात प्रत्येक क्षणाला येणारे विचार हे आसवं लपविण्यापेक्षा जास्त त्रास देत होते... रस्ता मोकळा असल्याने विचारांना आवर घालून त्याने दुचाकीचा वेग वाढवला कधी रुग्णालयात जातो आणि कुमारला पाहतो असं त्याला वाटत होतं ...


तेव्हा "अरे सुजित हळू चालव" म्हणत कुमारच्या आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, क्षणात सर्व वाईट विचार त्याच्या मनातून निघून गेले....


परिस्थिती कशीही असो मायेनं कुणी खांद्यावर किंवा पाठीवर हात ठेवला कि बरं वाटतं ... एक आधार मिळतो... अस्वस्थ मनाला नवीन उमेद मिळते संकटांशी दोन हात करायला ...


मी असं भान हरपून जायला नको, कुमार माझा जिवलग मित्र आहे मला तो भाऊ मानतो मग यावेळी काका, काकू व प्रशांतला मी आधार दयायला हवा तर मी स्वतः खचून जात आहे . मी आपल्या मैत्रीची जबाबदारी निभावणार, तुझ्यासाठी वाटेल ते करणार, मी येत आहे कुमार .. असे विचार करत तो केव्हा रुग्णालयाला आला त्याला कळलं नाही . पण लक्षात येताच त्याने दुचाकी थांबवून-

"काकू , उतरा पोहोचलो आपण" सुजित म्हणाला.


"अरे पण हे कुठे आलो आपण? प्रशांत तर पोलीस स्टेशनला जातो म्हणाला होता" कुमारची आई म्हणाली.


"हो काकू, पण इथे बोलावलं प्रशांतने "

असं सांगून तो पायरी चढू लागला ..


"अरे पण हे तर रुग्णालय आहे इथे कशाला बोलावलं ?" ती म्हणाली अन जणू तिला अस्वस्थ वाटून गेलं होतं की काय ती जड पावलांनी पायऱ्या चढत होती आणि तिचे प्रश्न टाळण्यासाठी वास्तविकता लपवून ठेवण्यासाठी तो एक पायरी समोर राहण्याचा प्रयत्न करत होता...


आत प्रवेश केल्यावर तिथल्या लोकांचे आशेने अन आसवांनी भरलेले डोळे पाहून जणू तिला हि वास्तव्याचा स्पर्श झाला असावा ..... आता दोघेही पायऱ्या चढून आत येताच त्यांना कोणत्या वेगळ्याच दुनियेत आल्याचं जाणवलं. आजूबाजूला नजर फिरवली तर रुग्णालयात मंद उजेड देत लाईट भिंतीला लागून असलेल्या बेडवर हवा तितकाच प्रकाश देत होते तर भिंतीची रंगसंगती पाहून त्या दुनियेचं वेगळपण कसं जपून ठेवलं जातं याची जाणीव होत होती....


भिंतीच्या खालील बाजूचा चौथा हिस्सा गर्द कथ्था तर उर्वरित भाग पांढरा रंग लावून चकाचक करून किती काळ लोटला ते फक्त त्या भिंतींना व त्या रंगालाच ठाऊक असेल. सुजित अजूनही जरा अंतर ठेवून समोर चालत होता. कुमारची आई आजूबाजूला पाहत त्याच्या मागे जात होती, तोच तिची नजर समोरच्या बेडवर अपघात झालेल्या तरुणावर पडताच तिला हृदयाचा ठोका चुकल्यासारखं वाटलं आणि आणखी काही वेदनेने त्रस्त झालेले रुग्ण पाहता न राहवून तिने पुन्हा सुजितला प्रश्न विचारला ...


"अरे , सुजित मला कळत नाही प्रशांतने आपल्याला इथे का बोलावलं ? तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? कुमार ठीक तर आहे ना ?"


काय उत्तर द्यावं या प्रश्नांच हा प्रश्न त्याला पडला. आतापर्यंत रोखून ठेवलेले आसवं पापण्यांचा बांध मोडून गालावरन खाली येत होते. आता काय बोलावं त्याला काही सुचत नव्हतं . काय बोलाव आणि कसं बोलावं ? त्याला काहीएक कळत नव्हतं. आता तो जरा थांबून मोबाईल बाहेर काढत म्हणाला "काकू ,मी प्रशांतला फोन करून बघतो कि तो कुठे आहे ?"


तो त्याला फोन लावणार इतक्यात त्याच्या डाव्या बाजूला पाण्याची बॉटल घेऊन येतांनी आकाश दिसला. मग सुजित मोबाईल परत खिश्यात घालत तिथेच थांबला. काकू, हा बघा आकाश येत आहे इकडेच , हळूच म्हणाला. जवळ आल्यावर आकाश त्या दोघांना-


"कधी आले तुम्ही? चला थोडं समोर जायचं आहे अजून. "

म्हणत तो कुमारच्या आईला टाळण्याचा प्रयत्न करत होता त्यावर घाईतच सुजित म्हणाला ...


"अरे बस, आत्ताच आलो आम्ही. प्रशांत कुठे आहे? "


यावर "आहे ना इथे " असं म्हणत तो तसाच चालत होता.


काही मिनिटातच ते प्रशांत आणि त्याचे वडील जिथे बसले होते त्याठिकाणी पोहोचले. आता खरी आसवांची परीक्षा सुरु होणार होती कारण आतापर्यंत लपवून ठेवलेली वास्तविकता तिला कळणार होती तर तिला सांगणार कोण ? हा एक प्रश्न तिथं वाटेत उभा होता... आईला घेऊन येत दिसल्याने प्रशांत आधीच खचून गेला त्याच्या तळ हातापायाला घाम सुटला तर हृदयाची धकधक वाढली . ती जवळ येताच तिचा हात धरून जवळ बसवत तो म्हणाला ...


"आई...आई ..दादा ..दादाला अपघात झाला."


प्रशांतचं ते वाक्य ऐकून ती भान हरपून कुमार.. कुमार.. असं नाव घेत अनावरपणे शोक करत होती. कुठे आहे माझा कुमार ? काय झालं त्याला ? कसा झाला अपघात ? असे प्रश्न विचारत ती टाहो फोडत होती. सुजित ,आकाश तिला "काकू, सांभाळा स्वतःला रडू नका बरा होईल कुमार म्हणत दिलासा देत होते काकू ,पाणी घ्या बरं तूम्ही"


प्रशांत काय करत आहे तू ?आईला सांभाळायचं तर तुही रडत आहे! असं खचून कस चालणार, सुजित त्याला सांगत होता . कुमार आणि सुजित जिवलग मित्र आणि दोघेही भावासारखे राहत असल्याने सुजित त्या दोघांना समजावीत होता तर इकडे बाजूच्या भिंतीला टेकून, आता जसा त्या भिंतीचा आधार घेऊन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कुमारचे वडील करत होते, शेवटी परिस्थिती काहीही असो वडील मनातलं वादळं रोखून असतात ते स्वतःला खचून गेल्याच इतरांना दाखवत नाहीत पण कुमारने जबाबदारी घेतल्यापासून त्यांनाही आता काळजी वाटतं नव्हती ,आता कुठे ,त्यांना थोडी सवड मिळायला लागली होती पण नियतीला कदाचित हे मान्य नव्हतं....


कुमारची आई काही रडणं थांबवत नव्हती आणि मला कुमार जवळ घेऊन चला. म्हणत होती काय केलं हे परमेश्वरा? तुला काय कमी केलं मी?

अशी तक्रार करत होती,आसवं ढाळत होती.


सर्व तिला समजावत होते... सावरायला सांगत होते... पण आईच मन काही केल्या आवरत नव्हतं... ती कुमारला साद घालत होती.... कुमार .... कुमार...

म्हणत प्रशांतला जवळ घेऊन आसवं ढाळीत होती...

८. कुमारची डायरी

बराच वेळ असं सुरु असताना डॉक्टर कुमार शुद्धीवर आला की नाही? आता त्याची तब्येत कशी आहे ? तसेच काही सुधारणा आहे की नाही यासाठी कुमारला पाहायला आले असता कुमारची आई डॉक्टरच्या समोर आली.....


" साहेब , मला माझ्या कुमारला भेटू द्या, त्याला पाहू द्या , आज सकाळी 10 वाजता घरून गेला तेव्हापासून मी त्याचा चेहरा बघितला नाही..."


ती डॉक्टरला विनवणी करत होती त्यावर डॉक्टर "मी आत जाऊन बघुन येतो कि त्याला शुद्ध आली कि नाही तोवर तुम्ही कृपया इथेच थांबा" असं म्हणून डॉक्टर आत गेले . त्यांच्या मागेच जात ती दाराजवळ उभी राहून तिच्या मुलाला काचेतून पाहत होती.


ती आता कुठे रडणं थांबवून बोलायला लागली होती. पुन्हा कुमारला त्या अवस्थेत पाहून शोकारंभ करेल म्हणून प्रशांत तिच्या जवळ जाऊन ....


"आई, तू जरा बाकावर बस डॉक्टर बाहेर आले की सांगतील दादा कसा आहे ते"


पण ती माउली अजून तिथेच उभी राहून डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत होती तर डॉक्टर कुमारचं बारकाईने निरीक्षण करत होते. कुमार काही हालचाल करतो काय? ते पाहत होते सलाईन संपली होती पुन्हा एक सलाईन त्यांनी लावली. अजून कुमारने काहीएक प्रतिक्रिया न दिल्याने हाता पायाच्या मलमपट्टी ठीक करून डॉक्टर बाहेर येत.... आपसात कुमारच्या डोक्याचं सिटीस्कॅन आणि x ray काढावा लागेल असं बोलत आतून बाहेर आले.


ते बाहेर येताच त्यांची वाट पाहत दाराजवळ उभी असलेली त्याची आई विचारायला लागली "कसा आहे माझा कुमार? काय झालं त्याला? "


तिच्या निरागस चेहऱ्याकडे नजर टाकली तर तिला कसं सांगावं कि कुमारची तब्येत अजूनतरी ठीक नाही हाच प्रश्न त्यांना पडला होता मग जरा आधार देत डॉक्टर म्हणाले , "तुम्ही काळजी करू नका. तो बरा होईल."


"डॉक्टर मी बघू का त्याला जवळून एकदा?" ती विनवणी करत होती.


त्यावर "जास्त वेळ कुणीही आत थांबू शकत नाही." म्हणत डॉक्टरांनी तिला होकार दिला. तसेच डॉक्टरांनी नर्सलाही सांगितले मग सर्व कुमारला बघण्यासाठी आत गेले .कुमारला त्या अवस्थेत पाहून सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, त्याची आई तर त्याला बिलगून रडायला लागली तेव्हा तिला कुमार पासून बाजूला सारत बाहेर आणण्याचा प्रयत्न सगळे करत होते पण ती जास्त अनावर होऊन त्याला साद घालत होती.... " कुमार उठ बाळा , बघ माझ्याकडे , काय झालं हे? कुमार..कुमार......"

शेवटी सर्वांनी मिळून तिला अतिदक्षता विभागातून बाहेर आणून बाकावर बसवलं. प्रशांतनं आणि कुमारच्या वडिलांनी तिला समजावत बाकावर बसविले आणि पाणी दिले . तेवढ्यात इंस्पेक्टर पाटील पोलीस स्टेशनहून हातात कुमारची बॅग आणि टिफिन घेऊन परत आले.


इन्स्पेक्टर पाटील यांनी पोलीस स्टेशनला जावून अपघात झाला तेव्हा तिथे मिळालेल्या वस्तू गोळा करून पंचनामा पूर्ण केला होता तेव्हा कुमारची बॅग आणि टिफिन घेऊन ते परत रुग्णालयाला आलेे. बॅग आणि टिफिन प्रशांतला देऊन ते डॉक्टरला भेटायला गेले . प्रशांतने बॅग व टिफिन हाती घेऊन बाजूला ठेवले.....


आता सर्व शांतपणे बसले होते पण कुमारचं काय होईल याचीच चिंता सर्वांना लागली होती . कुमार अजूनही जसाचा तसा होता म्हणून रात्रीला थांबावं लागणार होतं... आकाश व सुजीतने आपल्या घरीसुद्धा रुग्णालयाला आल्याचं सांगितलं नव्हतं म्हणून त्त्यांनी घरी फोन करून कुमारच्या अपघाताचं आणि तब्येत खूप खराब असल्याने रात्रीला इथेच थांबणार असल्याचं सांगून सर्वांसाठी जेवणं बोलावलं होतं, खरं तर कुणालाही जेवणाची मुळीच ईच्छा नव्हती पण कुमारच्या कुटुंबीयांचा विचार करून त्यांनी घरून टिफिन बोलावले होते ... कुमारच्या वडीलांना हि जरा समवस्कांची सोबत होईल म्हणून सुजित आणि आकाश यांचे वडिल तिथे येत होते असा फोनवरचा संवाद संपवून ते प्रशांत, त्याच्या आई वडील जवळ बसून त्यांना धीर देत होते तेवढ्यात डॉक्टर आणि इन्स्पेक्टर तिथं आले ... सर्वजण उठून उभे झाले ....


ते जवळ येताच सर्वजण त्यांच्या समोर उभे राहून डॉक्टर काय म्हणतात ते ऐकण्यासाठी आतुर होते, त्यांच्याकडे नजर फिरवत कुमारच्या वडील आणि आई कडे नजर रोखून पाहत डॉक्टर म्हणाले, "जरा केबिनमध्ये चला, मला तुम्हाला काही सांगायचं आहे" आणि सर्व केबिनमध्ये गेले तेव्हा कुमारच्या डोक्याचा x ray दाखवत डॉक्टर सांगत होते .


"हे पहा, डोक्याचा खालच्या बाजूला मार लागल्याने येथून रक्त वाहत होत आणि रुग्णालयात येईपर्यंत रक्त गोठून त्याठिकाणी मासपेशींची गाठ पडली त्यामुळे आणि खूप रक्त गेल्याने अशक्त होऊन कुमार असा निपचित पडून आहे तेव्हा ऑपरेशन करावे लागेल .सिटी स्कॅनचा रिपोर्ट आल्यावर मी तुम्हाला कळवतो"


त्यावर कुमारचे आई वडील कुमार बरा होईल ना? डॉक्टरसाहेब असे विचारत होते ... तेव्हा आम्ही पूर्ण प्रयत्न करू म्हणत डॉक्टर ऑपरेशन कधी करायचं ते मी सकाळी आल्यावर सांगतो म्हणाले. असा संवाद संपताच सर्व बाहेर पडले एकदा पुन्हा दुःख नव्याने बोचल्याचं त्यांना जाणवलं. काही वेळानंतर सुजित आणि आकाशचे वडील , नातेवाईक तसेच इतर काही शेजारी कुमारला पाहण्यासाठी आले . तर प्रश्नांना सुरुवात झाली होती सर्वजण कुमारच्या कुटुंबाला धीर देत होते...


असं सगळं घडत असताना धक्का लागल्याने बाकावर ठेवलेली कुमारची बॅग खाली पडली. ती उचलून ठेवायला सुजितने बॅग हाती घेतली तर अपघाताने बॅगहि फाटल्याचे त्याला दिसून आले. तेव्हा हातानेच झटकून परत वर ठेवतांना बॅगच्या आतून काहीसं जाड कवर असलेलं बाहेर लोंबकळतांना त्याला दिसलं . बॅगची चैन उघडून पाहताच त्याला आत काळ्या रंगाचे कवर असलेलं छोट्या नोटबुकासारखं काही असल्याचं दिसलं. इकडे सर्व आपसात बोलत असल्यामूळे सुजीतकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. शेवटी न राहवून त्याने ते नोटबुकासारखी दिसणारी वस्तू बॅगच्या आतच उघडून पाहता त्याला नवल वाटलं की इतक्या वर्षापासून ते दोघे मित्र असून त्याला त्या वस्तूबद्दल काहीही माहीती नव्हतं तर कुमारने स्वतःहून कधी त्या वस्तूबद्दल सांगितल्याचे त्याला आठवत नव्हतं. तेव्हा ती वस्तू काय आहे हे माहिती करून घ्यायला पाहिजे असं वाटून सुजित आजूबाजूला कुणी पाहात तर नाही ना? याची खात्री करत ती बॅग घेवून जरा आडोश्याला गेला आणि ती वस्तू बाहेर काढून पाहिली तर ती डायरी असल्याच त्याला समजलं. मग भिंतीचा आधार घेत त्याने ती डायरी उघडली , त्याला जणू आश्चर्याचा धक्काच बसला, कुमार आणि तो जवळ जवळ 12 ते 14 वर्षापासून मित्र असून ...कुमार डायरीत काही लिहीत असल्याचं त्याला अजून माहित नव्हतं आणि नवल या गोष्टीच कि त्याला याबद्दल साधी कल्पनाही कधी कुमारने दिली नाही की कधी चुकून डायरी लिहीत असल्याचा विषय कुमारने त्याच्यासोबत काढल्याचा त्याला आठवत नव्हतं...


थोडक्यात इतक्या दिवसांपासून जिवलग मित्र असून , डायरीचं गुपित हे त्याला माहित नव्हतं....


Rate & Review

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 months ago

monika

monika 3 years ago

Shivani

Shivani 3 years ago

Mahadev Domble

Mahadev Domble 3 years ago

Priyanka Rajak

Priyanka Rajak 3 years ago