Mala Kahi Sangachany - Part - 14 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय.... - Part - 14

मला काही सांगाचंय.... - Part - 14

१४. तडजोड


कुमारचे आई - वडील , आकाश आणि सुजितचे वडील गावाला पोहोचले. ते कुठेही न थांबता सरळ घरी आले. अंगण कसं रखरखं झालं होतं.. ते दुचाकीहून खाली उतरताच घरासमोर शेजाऱ्यांची

गर्दी जमली... आकाशने घराच्या कुलुपाची चावी घेऊन दरवाजा उघडला... जे काही लोक, कुमारला रात्री भेटायला जाऊ शकले नाही.. ते तब्येत आता कशी आहे ते विचारण्या त्याच्या अंगणात

जमले होते.... सर्व कुमार कसा आहे..? हाच एक प्रश्न विचारत होते ... वारंवार कुमारचं नाव आणि त्याची विचारणा ऐकून ती माउली व्याकुळ झाली आणि घरात न जाता ... डोळ्यात जमा झालेल्या आसवांना वाट मोकळी करून देत ... दाराच्या पायरीवर बसली .


ती माउली कशीतरी शोक आवरता घेत कुमार अजून बेशुद्ध असल्याचं सांगत होती. शेजारी त्यांना धीर देत त्यांचा मुलगा लवकर बरा होवो असं मनोमन देवाकडे मागत निरोप घेत होते. गर्दी हळूहळू कमी झाली . सर्व कुमारची विचारपूस करून आप आपल्या घरी जायला लागले....


शेवटी वास्तव इतकेच , आपल्या वाटेतील अडथळ्यांना आपण स्वतःच सामोरं जावं लागतं. जीवनात येणाऱ्या अडचणी, वाईट परिस्थिती असो वा कोणतेही संकट यांचा सामना स्वतःच करावा लागतो. लोक काय तर दिलासा आणि सल्ला देतात, बाकी जे काय करायचे ते स्वतः च करावे लागते...


आकाश आणि सुजितचे वडील सर्व लोक घरी गेल्यावर त्यांना धीर देत घरात घेऊन गेले. आकाशने सर्वांना पाणी दिले. ती माउली जरा आसवं पुसून खाली बसली. थोडावेळ तिथे नीरव शांतता पसरली होती. बराच वेळ कुणी काहीच बोललं नाही...


रात्रभर दवाखान्यात राहिल्याने आकाश वास्तव जाणत होता तेव्हा न राहवून ...

" काका , काकू तुम्ही काळजी करू नका लवकर बरा होईल कुमारदादा । ऑपरेशन झालं ना कि सगळं ठीक होईल " आकाश धीर देत म्हणाला.


आकाशला पाणावलेल्या डोळ्यांनी त्या दोघांनी प्रतिसाद दिला. तसेच त्यांना ऑपरेशन करिता आवश्यक ती तयारी करायला हवी याची जाणीव झाली.


" बरं काका मी घरी जातो आणि आंघोळ वगैरे आटपून लगेच परत येतो ." असं म्हणत आकाश घरी जायला निघाला.


" आपण ऑपरेशन साठी पैश्याचा बंदोबस्त करायला पाहिजे.." सुजितचे वडील म्हणाले.


तशी चिंतेची लहर त्या दाम्पत्यांच्या चेहऱ्यावर उमटली. घरची परिस्थिती लक्षात घेता इतकी मोठी रक्कम जमा करणं हे त्यांच्यासाठी एक आव्हान होतं. घरी शेती नाही की कुणाची रोजची कमाई होईल असं काही साधन नाही . म्हणून जे काय कमवावं ते घर चालवण्यास पुरेसं इतकंच होत . त्यामुळे शिल्लक काही राहत नव्हतं पण कुमार खाजगी नोकरीला लागला तसं देणं देऊन आवक थोडी वाढली होती . सर्व गोष्टी जरा सुधारत होत्या तोच नियतीनं त्यांचं जीवन पूर्ववत करायचं ठरवलं होतं की काय...? हा समय त्यांच्यावर ओढवला . काय करावं कि सर्व ठीक होईल ...? हाच सवाल त्यांना पडला होता...


बराच वेळ विचारचक्र त्यांच्या मनात फिरत होते . ते विचारचक्र थांबवत सुजितचे वडील म्हणाले...


" आपल्याला पूर्ण रक्कम लगेच जमा नाही करावी लागणार . काही रुपये ऑपरेशन करण्याआधी आणि बाकीचे ऑपरेशन झाल्यावर द्यायचे आहे. तेव्हा पैश्याची काळजी नका करू आत्ताच.. "


" घरी निदान पंधरा हजार रुपये तरी असतील . " पदराने आसवं पुसत ती म्हणाली.


" आणखी पाच हजार जमवता येतील ." स्वतःला सावरत कुमारचे वडील म्हणाले.


" म्हणजे वीस हजार रुपये आज आपण जमा करू शकतो . ठीक आहे ना , ऑपरेशन होण्याअगोदर इतकी रक्कम पुरेशी आहे ." सुजितचे वडील म्हणाले.


" पैसा मोलाचा नाही आज , आमचा कुमार तितका बरा होऊ दे परमेश्वरा ! कुमार बरा झाला कि मिळालं समदं ! आम्हाला बाकी काही नको . " कुमारची आई त्या दोघांच्या मनातलं बोलली.


" जरा सांभाळा एकमेकांना , आवरा जे काय करायचं ते , आपल्याला जायला हवं लवकर परत दवाखान्यात ...." सुजितचे वडील म्हणाले .


त्यावर त्या दोघांनी नुसता मानेनं होकार दिला .


" बरं , मी निघतो , तयार लगेच होऊन परत येतो . तुम्ही आटोपून घ्या . आपल्याला घाई करायला हवी..." म्हणत सुजितचे वडील घरी जायला निघाले.


सुजीतच्या वडिलांना जाऊन बराच वेळ झाला तरी ते दोघे अजून तसेच बसून होते . काय करावं ? कसं करावं? त्यांना काही सुचत नव्हतं . कुमार म्हणजे त्यांचा धीर , तोच त्यांची हिंमत , त्यांचा आधार ! त्याला त्या अवस्थेत बघून ते दोघेही पार खचून गेले होते... आयुष्यात संकटांना तोंड द्यावं लागलं नाही असं नाही . गरिबी , बेकारी , उपासमार , दुष्काळ , आजार हे त्यांनी सोसलं होत .. पण मुलगा आज बरोबरीचा झाला आणि नियतीनं म्हणा कि नशिबानं म्हणा त्यांना या वेळी जीवनाच्या या वळणावर आणून उभं केलं जे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं...


काही वेळाने स्वतःला सावरत ते दोघेही उठले . तिने कपाट उघडून आतला कप्पा चावीने उघडला. जे काय जमा असलेले पैसे होते ते बाहेर काढले ... कुमारच्या वडिलांना देत...

" एकदा मोजून घ्या किती आहे ते... पंधरा हजार असायला पाहिजे.."


" पंधरा हजार तीनशे रुपये आहेत.."


" तुम्ही आणखी पाच हजार जमतील म्हणालात... पण कसे..? कुणाकडून घ्यायचे आहे का ? "


" हो , घ्यायचे ठरवले .... सोनाराकडून , दागिना ठेवू म्हणत होतो.. ५००० ला ... काहीतरी तडजोड केली पाहिजे ..."


त्यावर तिने त्याच कप्प्यात ठेवलेली लाल डबी बाहेर काढून त्यांच्या पुढे केली... कोणताही सवाल जवाब न करता... डबी हातात देतेवेळी तिच्या पापण्या ओलावल्या... आसवं पदराने पुसत ती म्हणाली ...

" गेल्या दिवाळीला कुमारने मला भेट आणले हे कानातले ..."


क्षणभर दोघेही ती दिवाळी आठवून तसेच उभे राहिले... किती उत्साहाने कुमारने सर्वांसाठी कपडे आणले होते... आठवडाभर घर कसं चमचम करत होत त्यांनच घर रंगवून छान सजवलं होतं...

पण आज काही वेगळंच चित्र त्याच्या जीवनात नशिबानं रेखाटलं होतं... एका क्षणात सार काही बदललं... नियतीनं घात केला ...


मग तिने आवराआवर करायला सुरुवात केली . काल घरून गेल्यापासून सगळं जिथल्या तिथं होतं . जेवायची मुळीच इच्छा नव्हती पण दवाखान्यात कुमारजवळ प्रशांत ,आकाशचे वडील , सुजित असल्याने त्यांच्यासाठी डबा घ्यायचा म्हणून तिने स्वयंपाक केला . वेळ कोणतीही असो रोजची काम जी आहेत ती करावीच लागतात ...


थोडा वेळ झाला न झाला तोच आकाश तयार होऊन आला . दुचाकी बाजूला लावून त्याने दाराबाहेर चप्पल काढून ठेवली ... घरात जात ....

" काका , काकू ... " त्याने आवाज दिला..


" आला का आकाश ? " कुमारची आई ..


" हो काकू , काका कुठे आहेत ? " आकाश...


इतक्यात पैसे खिश्यात ठेवत कुमारचे वडील आतल्या खोलीतुन बाहेर आले... बाहेर दुचाकी थांबल्याचा आवाज ऐकू आला ... कोण आलं ते पाहायला आकाश आणि कुमारचे वडील बाहेर पडले तर सुजितचे वडील दुचाकी स्टँडवर लावत होते... दुचाकी उभी करून ते आत यायला लागले तर समोर त्या दोघांना घराबाहेर आलेले पाहताच....


" आटोपलं सगळं ... निघायचं का ...? " सुजितचे वडील


त्यावर मानेनं होकर देत कुमारचे वडील चप्पल पायात घालून त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले.... "हो झालं सगळं बस निघूया , जातेवेळी एक काम करायचं बाकी आहे . मी वाटेत सांगतो तुम्हाला काय ते.."

कुमारचे वडील म्हणाले..


" बरं ठीक आहे , चला मग " सुजितचे वडील


दवाखान्यात जावं लागेल त्याआधी देवघरात जाऊन तिने देवापुढे दिवा लावला , हात जोडून कुमारला लवकर बरा होऊ दे , म्हणत देवाला नमस्कार केला . सोबत डबा घेऊन ती बाहेर आली .

तिने दार बंद करून कुलूप लावलं ...


" पिशवीत काय आहे त्या...? डबा घेतला का ...? " सुजितचे वडील


" हो . ते तिघे सकाळपासून तसेच आहेत तिथं म्हणून घेतला " ती मायेच्या स्वरात म्हणाली...

" तुम्ही कश्याला त्रास करून घेतलात मी आणला डबा त्यांच्यासाठी ... बरं असू द्या चला जाऊ आता..." सुजितचे वडील

वेळ वाया न घालता ते घरून निघाले...


वाटेत जात असता कुमारच्या वडिलांनी सोनाराकडे जायचं आहे म्हणून त्यांना सांगितले ... मग शहरात आल्यावर ते सोनाराकडे गेले . तिथून पैसे घेऊन ते पुढच्या रस्त्याला लागले...

Rate & Review

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 9 months ago

Milu

Milu 1 year ago

Radhika

Radhika 3 years ago

Priyanka Rajak

Priyanka Rajak 3 years ago

Anushri Kanhere

Anushri Kanhere 3 years ago