लघुकथाए - 2 - संगीत in Marathi Short Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories Free | लघुकथाए - 2 - संगीत

लघुकथाए - 2 - संगीत

३  संगीत

 

पंडितजींनी तंबोरा खाली ठेवला. गेले दोन तास त्यांचा रियाज सुरू होता. मनवा त्यांचा रियाज संपण्याची वाटच पहात होती. तंबोरा खाली ठेवल्याच्या आवाजा सरशी ती गरम दुधाचा पेला घेऊन दिवाण खान्यात आली. पेला पंडितजींच्या हातात देऊन तंबोऱ्याला गवसणी घालण्यास तिने सुरवात केली.

पहाटेचा रियाज पंडितजी एकटेच करत. दिवस सुरू झाला की शिकायला येणारे विद्यार्थी, काही कार्यक्रम असला की तबलजींबरोबरचे दुपारचे रियाज, सायंकाळ कार्यक्रम ठरवायला येणाऱ्या लोकांसाठी असे.

ऐन चाळीशीत पंडित स्वरराज यानी चांगलेच नाव कमावले होते. गावी असताना रियाज भरपूर पण कार्यक्रम कमी असत. मग ते मित्राच्या सांगण्यावरून शहरी आले. इथे आल्या आल्या एका खासगी बैठकीत गाण्याची संधी त्याना मिळाली आणि त्त्यांच्या या गाण्याने बैठक प्रचंड भारावून गेली. लोक वेडावले या सच्चा स्वराने!

कर्णोपकर्णी स्वरराजचे नाव इतरांपर्यंत पोहोचले. मित्राच्या मदतीने विद्यार्थीही मिळाले बरेच. कार्यक्रमही व्हायला लागले. वाहवा आणि पैसा दोन्ही पंडितजींच्या प्रेमात पडल्यासारखे सतत दार ठोठावू लागले.

‘मनवा’, स्वरराजची पत्नी, स्वरराजच्या वडिलांनी मरणोन्मुख मित्राला दिलेले वचन पाळले व या दोघांचा विवाह झाला. गंमत अशी की गाण्याच्या बाबतीत मनवाला फारशी गती नव्हती. पण गृहकृत्यात अत्यंत दक्ष. आजतागायत  स्वरराजांनी तंबोरा खाली ठेवल्यापासून तिसऱ्या मिनीटाला गरम दुधाचा पेला हाती आला नाही असे घडले नव्हते. मनवा मुळातच अबोल, त्यातून स्वरराज सतत गाण्याच्या धुंदीत. दोघांचे नाते बाहेरून पहाण्याऱ्याला कोड्यात टाकणारे असेच होते.

दिवसभरात चारदोन वाक्यांपलिकडे बोलणे होत नसे. दोन पाठोपाठ झालेली मुलगा व मुलगी तर कसे वाढले हे स्वरराजला आठवतही नव्हते. आता दोघेही शाळा संपून पुढच्या शिक्षणाच्या उंबरठ्यावर होते.  दोघांचेही गाणे आईवर गेलेले. पण स्वरराजांना त्याची खंतच काय विचार करायलाही वेळ नव्हता मिळाला. स्वत:च्याच गाण्यात ते मश्गुल होते.

मनवाला शहरी आल्यापासून तर क्षणाची उसंत मिळत नव्हती. घरातला राबता इतका वाढला होता की नोकर माणसं ठेऊनही तिला क्षणाची फुरसत मिळत नव्हती.

अलिकडे गाण्याच्या मैफिलींना तिनेही चलावे असा स्वरराजांचा आग्रह असे. ती  त्यांचा शब्द कधीच मोडत नसे. पण हळू हळू तिथे नटून थटून येणाऱ्या सुंदर स्त्रिया व शहरी संगीतप्रेमी यांना देखणे स्वरराज व त्यांची ही साधीसुधी, गाणं न कळणारी पत्नी यांच्यात फारच विजोड आहे असं वाटू लागलं. स्वरराजचे जवळचे मित्र तसं सुचवू लागले.

मग एक दिवस जेवण झाल्यावर स्वरराज पत्नीस म्हणाले “तुला गाणं मुळीच नाही का गं आवडत?”

मनवा म्हणाली “कळला नाही तरी देव नावडतो का कुणाला?”
“मग समजून पण घे ना. अधिक आवडेल” मनवा फक्त हसली.
मग अधून मधून स्वरराज तिच्याशी निरनिराळे राग, त्यातले खास बारकावे, कुठला स्वर कोमल, कुठला तीव्र, आरोहात कोणते, अवरोहात कोणते, कोणता राग कोणत्या वेळी गायचा, राग व त्यातील भाव वगैरे बोलण्याचा प्रयत्न करू लागले.
मनवा ऐकून घेई सगळंच पण तिचं मन त्या तांत्रिक माहितीत मुळीच रमत नसे. पंडितजींच्याही ते लक्षात येई. मन खट्टू होई. बाहेर मंडळी आपली काहीशी कीव करतात बेसूरी बायको मिळाली म्हणून असा कयास होता त्यांचा.

मनवाच्याही लक्षात येई त्यांचे खट्टू होणे. पण बनावटी बोलणे, वागणे तिच्या स्वभावातच नव्हते. ती तरी काय करणार. खोटा खोटा आवेश कसा आणणार?
काहीसा तणाव निर्माण झालाच होता त्यांच्यात यामुळे. दिवस जात होते. पंडितजींच्या गाण्याचे चाहते वाढत होते. स्वरराजाना इतरांनी मनवाला कमी लेखले की टोचत होते. महफिलीनंतर हिरहीरीने त्याच्या गाण्यातील तांत्रिक बाबींवर चर्चा करणाऱ्या सुसंगीत स्त्रिया पाहिल्या की त्यांच्याशी नकळत मनवाची तुलना त्याचे मन करू लागे. ‘ही’ का नाही शिकत असं बोलायला? असंही वाटे.

पण मनवाला काही फरक पडत नव्हता. ती घरी महफिल असेल तर अत्यंत काटेकोरपणे येणाऱ्या व्यक्ती कोण, त्यांच्या आवडी निवडी, यांचा बारीक विचार करून सर्व जय्यत तयारी करून ठेवी. नोकर चाकर ही इतके उत्तम तयार केले होते तिने की ऐन महफिलीच्या वेळी तिची मेहनत कुठेच दिसू नये, असं वाटावं की सगळं परस्पर आपोआप घडतंय. बाहेरच्या महफिलींमधेही इतर गायक गायिकांसाठी त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू बिनबोभाट त्यांच्यापर्यंत पोहोचत. स्वरराजनेच दिल्या असं समजून त्यांनाच धन्यवाद देत.

पंडितजींच्या पहाटेच्या रियाजाच्या वेळेस मनवा आतल्या खोलीत बसून राही. रोज.
त्या दिवशी पहाटेही लवकरच होणाऱ्या खास महफिलीचाच विचार स्वरराजांच्या मनी होता. सुरवातीचे काही राग, तराणे, बंदिशी गाऊन झाल्यावर गरम पाण्याच्या पेल्यातून घोट घेऊन पंडितजीनी भैरवी सुरू केली. कितीतरी वेळ ते नुसती सुरवातीची सुरावटच आळवत होते. त्यातच इतके तल्लीन झाले की काळावेळाचं भानच नाही उरलं . आर्त स्वरधारा वाहू लागल्या आणि पाहता पाहता  मनवाच्या डोळ्यातून अश्रुधारा! एक क्षण असा आला की आपण काय करतोय याचे भान न राहवून ती झर्कन उठून बाहेर आली व काही समजण्यापूर्वी तिने स्वरराजांच्या  तंबोऱ्यावर फिरणाऱ्या बोटांवर आपला हात ठेवला. गाणे थांबले, मिटलेले डोळे खाडकन उघडले, आणि आपण काय करून बसलो याचे तिला भान आले.
गाणाऱ्या पंडितजींना थांबवणे म्हणजे केवढा घोर गुन्हा! झट्कन हात मागे घेतला. “मा..माफ करा म..ला, कळलंच नाही काय करतेय.. इतके दिवस ही सुरावट ऐकतेय पण आजची ही आर्तता .. सहन नाही हो झाली मला.. आत आत तुटत गेलं काहीतरी.. तुमच्याही आत तुटतंय काहीतरी जाणवलं मला.. जन्मभराचं आर्त होतं त्या स्वरात.. माफ करा मला.. तुमच्या समाधीत विघ्न आणलं मी.. पण कुठून आलं हे असं आर्त तुमच्या स्वरात हा विचार छळतोय मला..”

कित्येक दिवसांचं कोडं सुटलं जणू पंडितजींच्या मनातलं. गदगदून भरलेल्या आभाळानंतर मुसळधार पाऊस पडून जावा आणि धरा स्वच्छ ताजी तवानी व्हावी तसं झालं त्यांचं मन.

मनवाचा तोच हात हाती घेतला त्यांनी.. म्हणाले आज खरी दाद मिळाली .. आज खरा गायक झालो.. इतके दिवस तुला काही गाण्यातलं समजत नाही असा बालीश विचार करायचो, पण तुला कळणारं गाणं मलाच गाता येत नव्हतं गं.

आज लागला तो खरा स्वर, आणि थेट पोहोचला तुझ्यापर्यंत.. धन्य झालो मी. आता महफिलीची चिंता नको.

मनवाला काय बोलावं कळेना... बिचारी पाहत राहिली आपल्या आराध्याकडे एकटक.  पण मळभ स्वच्छ झालं होतं हे तिलाही उमगलंच!

 

 

 

 

 

 

 

Rate & Review

Be the first to write a Review!