Ankilesh - 1 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 1

अंकिलेश - एक प्रेमकथा - 1

Dr Nitin More

१.

@ अंकिता

माझी एक मेथड आहे, न्यू कमर टीचर असेल तर मी हळूच पाठी बसून लेक्चर अटेंड करते.

तशीच त्यादिवशी बसले होते. थिंग्स हॅवन्ट चेंज्ड मच इन सो मेनी इयर्स. पाठी बसणारे लाॅर्डस आॅफ लास्ट बेंचेस तशाच इकड तिकडच्या गप्पा मारतात. आमच्या वेळी मी फर्स्ट बेंचर होते पण पाठी काय चालतं माहिती होतं मला .. त्यादिवशी मी पाठी हळूच येऊन बसलेले. लास्ट बेंचवर पाठी दोन मुली गप्पा मारत होत्या.. हलक्या आवाजात, पण मला ऐकू येत होते क्लियरली..

"यू नो दॅट मॅडम.. साळवी मॅडम.."

"ओह! दॅट वन?"

"यस्स.. त्याच त्या. कशा आहेत ना.."

"बट यू नो.. शी इज सर्जिकल बाॅस डाॅ.साळवी'स वाईफ.."

"हाऊ ही मस्ट हॅव मॅरीड हर?"

"आय नो. बट आय हर्ड शी इज व्हेरी रीच. यू नो हर दोन्ही पेरेंट्स वेअर अ बिग शाॅट."

"ओह! दॅट्स दॅट! मनी टाॅक्स! पैशांसाठी! बाकी गोष्टी कोण बघतेय?"

"यस. वर्ल्ड रिव्हाॅल्व्स अराउंड इट! व्हाय शुड यू एक्पेक्ट एक्सेप्शन्स?"

"आय नो!"

सी, हाऊ एनीबडी जजेस!

मला सगळे ऐकून राग नाही आला, गंमत वाटली. साधारण विशीतल्या त्या मुली. आजूबाजूला जे बघतात त्यातूनच शिकतात. आणि तसा आपला समज असतोच. अ गर्ल फाॅलिंग फाॅर अ रीच गाय आॅर व्हाइसाव्हर्सा .. जजमेंट इज, इट्स आॅल ओन्ली द मनी स्पिकिंग! आपण त्या मागची कधी रियालिटी पाहतो का? नाहीच. पण नाही, वुई आरन्ट रियली बाॅदर्ड अबाऊट रियालिटी! आपल्याला फक्त आपल्या मतांची पिंक टाकायची नि पुढे जायचं असतं. कित्येकदा समोर जे दिसतं त्याच्यामागची वस्तुस्थिती अगदी वेगळीच असू शकते.. आणि मनी इज इम्पाॅर्टंट, पण त्याच्या पलिकडेही एक मोठी दुनिया आहे.. आणि या पृथ्वीवरचे कित्येक रहिवासी तिकडेही राहतात.. आणि ते ही आनंदाने नि समाधानाने!

*

हाय!

मी डाॅ.अंकिता साळवी. कसे आहात? आॅल वेल? आय सेड, आज माझी स्टोरी सांगूनच टाकावी. त्याचं काय आहे ना, लवस्टोरी ऐकायला नि सांगायला लोकांना आवडते खूप. म्हणून म्हटले माझी स्टोरी सांगावी. तशी आयॅम गुड ॲट स्टोरी टेलिंग. आय टेल यू, माझी ममा म्हणते, माझ्या नवऱ्याचे कान दुखतील इतकी मी बोलते. बट व्हाय नाॅट? गाॅडने जीभ अँड स्वरतंत्र.. नो आय थिंक यंत्र.. म्हणजे सोप्या लँग्वेजात व्हाॅइस बाॅक्स दिला तो बोलायला. बाकी सर्वांना नाही बोलता येत. म्हणजे अगदी लायन टायगरना पण नुसता रोअर करता येतं. पण वुई कॅन टाॅक! म्हणजे गाॅड वाँट्स अस टू टाॅक. गाॅडच्या विशच्या अंगेस्ट कशाला जायचे? व्हाय गो अंगेस्ट द विश आॅफ द गाॅड? आय टेल यू.. बोलणे इज अ वे टू एक्सप्रेस युवरसेल्फ. सो टाॅक! बोलायला पैसे पडत नाहीत. उलट काही लोक बोलायला मनी चार्ज करतात म्हणे! आणि मी इथे फ्री मध्ये बोलते नि ममा म्हणते आय टाॅक टू मच! खरंतर ममा इज अ बिट टू मच! एनी वेज.. मी थोडी थोडी म्हणजे मला आठवेल त्या सिक्वेन्समध्ये सांगते माझी स्टोरी. काय आहे ना एक आठवायला लागले की नंतर नंतर घडलेल्या दुसऱ्या गोष्टी आठवायला लागतात. मग सारे मिक्स अप. लाइक अ कॅलिडोस्कोप. थोडा अँगल फिरवला की डिझाइन चेंज! म्हणजे तशी आमची स्टोरी काही फार जुनी झालीय असे नाही. आणि नव्या जमान्यासारखे आम्ही ब्रेक अप वगैरे ॲट ड्राॅप आॅफ अ हॅट करतो असं ही नाही. पण मला वाटतंय की देअर इज समथिंग इंटरेस्टिंग इन माय स्टोरी. अँड यू फोक्स विल शुअरली लाईक इट.. सो आय नीड टू टेल यू. आणि असे ऐकणारे कुणी सापडले की आय कान्ट जस्ट नाॅट टाॅक.. तर लेट मी स्टार्ट.. लाईक ही सेज.. ई स्टार्ट!

आय टेल्यू.. तो असाच आहे. म्हणजे त्याला इंग्रजी माझ्या दृष्टीने थोडेफारच येते. म्हणजे ही इज हायली एज्युकेटेड. पण त्याला जिथे तिथे मराथी बोलण्याची सवय आहे. आणि यु नो गरजच वाटली तर तो इंग्रजी बोलतो. अनलाइक मी. आयॅम मोअर कंफी विथ क्वीन्स लिंगो यु नो. बट आय टेल्यू, तशी मी पण बिघडलीय आता. भांडतेना त्याच्याशी तर आपोआप मराथी येते तोंडात. इंग्रजीत भांडायला तशी फन नाही. बिकाॅज मी काही बोलली तर हा रिस्पाँड करणार मराथीत. त्यामुळे मी ठरवून टाकले.. भांडण्यासारख्या इसेंशियल ॲक्टिव्हिटीत मराथीच ठीक.

तर सांगायचे ते आमच्या स्टोरीबद्दल..

कित्येक वर्षांपूर्वी.. मी गेले.. त्याला पाहिलं.. त्यानं जिकलं.. मग मला त्याच्यासाठी पार्वतीसारखे तप करायला लागलं.. तेव्हा कुठे हे शंकर भगवान प्रसन्न झाले! झाली त्याला काही वर्षे, पण आपापली प्यारवाली लव्हस्टोरी कोणी विसरतं का? आणि गंमत म्हणजे सर्वांना या लव्हस्टोऱ्यांत खूप इंटरेस्ट असतोच. नसता तर बिचारी सिनेमा इंडस्ट्री चालली कशी असती? तर ऐकवायची आहे ती स्टोरी.. एकदा मी बोलायला सुरूवात केली तर थांबेन तर ना? पण तुम्ही थांबा.. आलेच मी.. पण मिलते हैं ब्रेक के बाद. डोन्ट गो एनीव्हेअर.. विल्बी राइट बॅक!

*****

@ अखिलेश

नमस्कार मंडळी. अंकिता थोडा ब्रेक घेऊन गेलीय तोवर मला तेवढीच संधी! नाहीतर आपल्याला तोंड उघडायला वाव फक्त जांभई देताना, नाहीतर खाताना. अंकिता म्हणजे चॅटर बाॅक्स आहे अगदी. जिव्हालौल्य किंवा लालित्य वगैरे लालित्यपूर्ण वर्णन करता येईलही. पण मथितार्थ.. बडबडी नंबर वन. म्हणजे जिभेचा पुरेपूर उपयोग करणारी!

पण ती मला भेटली ती ह्या बडबडीमुळेच. मी जी एस मेडिकलचा विद्यार्थी. काॅलेजचे ते दिवस. काॅलेजवीक मध्ये बाहेरच्या काॅलेजातून वेगवेगळ्या टीम यायच्या. काॅलेजवीक मध्ये कित्येक इव्हेंटस असायच्या. त्यात ह्या मॅडम एकपात्रीमध्ये भाग घ्यायला आलेल्या. तिचे स्क्रिप्टही इंग्रजाळलेल्या मराठीतलेच. इंग्रजीने केला मराठी भ्रतार! ती बोललीही मस्त. त्यामुळे त्यात तिला पहिले बक्षिस मिळणार यात कोणालाच संशय नव्हता. मराठी वाङमय मंडळाचा मी सेक्रेटरी म्हणून तिला बक्षिस द्यायच्या मिषाने अभिनंदन म्हणायला गेलो.. तर तिनेच पुढे विषय वाढवला.. 'आय थिंक वुई हॅव मेट बिफोर' म्हणत. आजवर मुले ही ट्रिक वापरायची मुलींना पटवायला.. तीच हिने माझ्यावर वापरावी? म्हणजे माझी तशी हरकत नव्हती. पण नायर हाॅस्पिटलची ती आमच्या जीएस मेडिकल काॅलेजात येते काय नि भेटते काय.. सारे काही आज स्वप्नवत वाटते. इंग्रजी फाडफाड बोलणारी ती, मराठी एकपात्रीत भाग घेते काय.. नि जिंकते काय! तेही तिच्या मराठीची सारी बोंब असताना ही. सारेच गंमतीदार. तर ही झाली पहिली भेट. मराठी वाङमय मंडळाच्या सेक्रेटरीपदाचा हा एकमेव फायदा. नाहीतर मेडिकल काॅलेजात इंग्रजी इलोक्यूशनचा वगैरे बोलबाला असतो फार. मराठीला कोण विचारतोय? पण हे व्हायचे होते. म्हणतात ना विधीलिखित टळत नाही. ते टळायचं नव्हतंच. आमची जोडी वरून बनून आलेली ती बनणार होतीच. आता आमची गोष्ट सांगतोय तर दी एंड माहितीच आहे. पण मुक्कामाला पोहोचण्याहून ही खरी गंमत प्रवासात असते. तेव्हा ह्या कहाणीची गंमत.. डेव्हिल इज इन डिटेल्सच्या धर्तीवर गंमत इज इन डिटेल्स आहे.. अंकिता सध्या प्रेयसी पदावरून बढती मिळून पत्नीपदावर आरूढ आहे. अंकितादेवीच्या हाती सारी सूत्रे.. खरेतर लगामच म्हणा.. आहेत. मी बापुडा कधीच हीरोचा झीरो झालोय. म्हणजे ती तसे म्हणून दाखवत नाही. पण कळतं आपलं आपल्याला! साहजिकच आहे. तू मेरा हीरो है गाणं सिनेमात लग्नाआधीच म्हणते हीराॅईन. लग्नानंतर फक्त तू एक झीरो है गाणं म्हणताना दाखवत नाहीत एवढंच! असो. मुद्दा तो नाही. म्हणजे सांगायचीय ती लव्ह स्टोरी. त्यात हे सगळं कशाला? तर अंकिताने असा पहिलाच डाव खेळला खरा. तेव्हा मला कळले नव्हते. पण तिच्या त्या बोललेल्या शब्दांची मी कित्येक दिवस मनातल्या मनात रेकाॅर्ड वाजवत होतो.. हिला मी कधी पाहिले नाही. तिने मला कुठे पाहिले असेल? मागील जन्मात? कहीं सात जन्मोंका साथ होगा.. आणि होपफुली हा सातवा जनम असावा! सेकंड इयरला होतो आम्ही. त्यामुळे वेळच वेळ जवळ होता. स्वप्ने आणि दिवास्वप्ने पहायला. फक्त त्यात परिक्षेत दिवे लागू नयेत म्हणून काळजी घेतली की झाले! तेवढी हुशारी होती माझ्याकडे. आणि अंकिताचं काय? ती तर अति हुशारच होती!

Rate & Review

Nikita Gavade

Nikita Gavade 7 months ago

Aquilon playz

Aquilon playz 8 months ago

शारदा जाधव
Nitin More

Nitin More Matrubharti Verified 9 months ago

SHUBHAM DEVKAR

SHUBHAM DEVKAR 9 months ago

boring