Samudra in Marathi Anything by Madhavi Marathe books and stories PDF | समुद्र

समुद्र

                                                                                                समुद्र

    आम्ही अलिबाग, मुरुड जंजिरा असे फिरायला चाललो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. ऊन तापलं असले तरी जवळच असलेला समुद्रकिनारा आपल्या खाऱ्या वाऱ्यानी स्वतःची जाणिव करून देत होता. ढगांच्याविना ते उन्हाळ्यातले मोकळे आभाळ स्वच्छ निळाईत बुडून गेलेलं. मधुनच उडणारे दोनचार पक्षी, त्यावर नक्षी चितारून जात होते. पहाता पहाता गाडीने वळण घेतलं आणि समुद्रच सामोरा आला. रस्त्याच्या बाजूनी सोबत करू लागला. पांढरीशुभ्र पुळणी आणि निळाभोर समुद्र यात मन बुडून गेलं. कुणाचीही जाणिव उरली नाही. निसर्ग खरं तर एकट्यानी अनुभवावा असा असतो. त्यामध्ये शब्द हा त्या शांततेला ओरखडा असतो. एकट्याने त्या शांततेच्या निःस्तब्धतेत बुडाल्यावर त्याचं सौंदर्य अजुन खुलायला लागतं. निसर्गाचं संगीत ऐकू यायला लागतं. सागराच्या लाटांचा नाद मनात घुमायला लागतो. वाऱ्याचा आवाज, जणू त्याला तंबोऱ्यावर साथ करत असतो. हवेची पातळ कंपने अंगावर शिरशिरी आणू लागतात. सागराच्या त्या पांढऱ्या शुभ्र पुळणीवर धडकणाऱ्या लाटेमध्ये एक प्रकारची मस्ती असते. फुटून पडणाऱ्या थेंबांमध्ये जीवन उपयोगी पडून संपवल्याची भावना असते. पुळणीवर आपलं क्षणिक ओलं अस्तित्व दाखवून वाफेने आपल्या आकाशात जातात, परत येण्यासाठी. जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी.

     सागराच्या मध्यावर निळाई वारा हळुवार तरंग उठवत असतो. कल्लोळ हा नेहमी काठावर आल्यावरच होतो. मध्यात नेहमी शांतता असते. गहन, गुढ, गंभीर. पण आतल्या खोलीचा अंदाज न दाखवणारं असं या मध्याच्या खोलीचं अस्तित्व, तिथेच बराच खजिना लपलेला असतो. त्या समुद्राच्या मध्यावर नजर रोवून बसलं की जाणवते, ती जीवनाची गुढता. कल्लोळात जीवन शांत नसते. तिथे फक्त संघर्ष असतो. संघर्ष हा जरी जीवनाचा भाग असला तरी मन संघर्षमय जीवन जगू शकत नाही. म्हणून ते त्यातून बाहेर पडायची धडपड करू लागतं. मन जीवन जगतं ते फक्त गुढतेत, शांततेत आणि त्याच शांततेच्या शोधात ते कायम हिंडत असतं. सुखातही मन रमत नाही. कारण तिथेही सुख नामक वेदनेचा कल्लोळ असतो. जो कधी संपू नये म्हणून धडपड केलेली असते. यात संघर्षाचे रूप वेगळे असते. मग अचानक निसर्गामधे अश्या अवचित ठिकाणी, अवचित वेळी मनामध्ये ती शांतता डोकावते. ज्यासाठी मन कायम आसुसलेलं असतं. सतत काही नवीन मिळवण्याच्या नादात मन स्थिर रहात नाही. ही स्थिति त्याने स्वतः निर्माण केलेली असते. पण निसर्गात त्याला स्वतःचे अस्तित्व सापडते. मग सागराच्या मध्यात मन खोल उतरू लागलं की जाणवू लागतात, त्यातले निळे जांभळे, ओले शांततेचे क्षण. तिथेही खोलवर मनाला भटकवायला तयार असतात, रंग बिरंगी मासे, शिंपल्यातले मोती, सागरी वनस्पती, भोवरे, पाण्याचा उबदार स्पर्श, वहाता प्रवाह, पण मनाला आता कुणीच भुलवू शकत नाही. एक अनामिक अथांग सत्य त्याच्या समोर उलगडत चाललेलं असतं. त्या सत्याला ना आदि ना अंत. तिथे असतो एक अद्भुत संधिप्रकाश. तिथे कुठलाही आवाज नसतो. तिथे असतो एक अनाहत नाद. जो नाद मन फक्त आपल्या सुक्ष्मतेतच ऐकू शकतो. निसर्गात विलीन झाल्यावर ती मिळालेली एक देवी देणगी असते. आपल्या अमर्याद शक्तीचं दर्शन या खोलीमध्ये जाणवून या सगळ्यांच्या उगमस्त्रोताकडे मन धावायला लागते. आता त्याला विलीन व्हायचे असते. संपायचे असते. एका अज्ञाताचा स्पर्श झालेलं मन जगात राहुच शकणार नाही. प्रचंड व्याकुलतेने धावणाऱ्या मनाला आता कुणीच धरून ठेऊ शकणार नसतं. कारण ती अज्ञाताची ओढच त्याला आता कुठे थांबू देणार नाही. सर्व बाजूनी लोप पावलेलं, अनाहत नादात भिजून गेलेलं मन त्या अथांग सत्याला सामोरं चाललेलं असतं.

       आणि अचानक एक कल्लोळ सामोरा येतो. प्रचंड प्रकाशमान, नाद, विराट रूप. पण मन त्यात अलगद विसावतं. सामावून जातं. वेगळेपणाचं अस्तित्व संपवून त्या प्रकाशात, त्या सामर्थ्यात विलीन होतं. आपण विलीन झालो आहोत हे जाणवायलाही मन उरत नाही. तो सागराचा शेवट असतो. सगळे समुद्र तिथे येऊन मिळत असतात. महासागराची ती सुरवात असते.

                                                                          .................................................

Share