Swpnasparshi - 2 in Marathi Moral Stories by Madhavi Marathe books and stories PDF | स्वप्नस्पर्शी - 2

स्वप्नस्पर्शी - 2

                                                                                    स्वप्नस्पर्शी : २

   

      रोजच्या ऑफिसच्या रस्त्यांचा राघवांनी मनानेच निरोप घेतला. कार घरापाशी थांबली. बाळू रोजच्या सवयीने ऑफिसबॅग घेण्यासाठी मागे गेला. ते पाहून राघव हसू लागले तसा बाळूही हसू लागला. “ पहा आता मला पण किती सवयी तोडाव्या लागणार.” क्षणभर उसासा टाकत ते म्हणाले. पण परत सावरून उत्साहाने गप्पा मारत आत शिरले. दोघांना घरात अकारण शांततेची झुळूक जाणवली. ते हॉलमध्ये आल्यावर एकदम स्वागताचा धबधबा त्यांच्या अंगावर कोसळला. नातवंड अंगाला झोंबू लागली. मोठा मुलगा नील आणि त्याची बायको जानकी समोर येऊन त्यांच्या पाया पडले. राघवांनी आश्चर्यचकित होऊन त्याला जवळ घेत विचारले “ नील कधी आलास अमेरिकेहून ? कळवलस पण नाही.”

  तसे हसत जानकी म्हणाली “ बाबा आम्ही कालच आलो. तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं.”

 त्यांचा दुसरा मुलगा मधुर आणि त्याची बायको अस्मिता दोघांनी त्यांना विचारलं “ बाबा कसं वाटलं सरप्राईज?” 

 तसे राघव त्या दोघांना जवळ घेत सुखावून म्हणाले “ फारच छान. किती करता रे आमच्यासाठी.”

  मधुर म्हणाला “ तुम्ही इतक्या जणांसाठी करता बाबा. आता तुम्हाला तृप्त झालेलं पहायचं आहे. त्या क्षणासाठी सगळं करायचं आहे.”

 मग स्वरूपा पुढे झाली “ अहो, नील जानकी कालच आले. तुम्हाला आज ऑफिसमधून आल्यावर सरप्राईज द्यायचं म्हणून हॉटेलमध्ये उतरले. मग तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर घरी आले. कधीपासून या चौघांची तयारी चालू होती. चला हातपाय धुवा. कपडे बदला.”

 “ हो बाबा. अमेरिकेहून तुमच्या आवडीच्या रंगाचा शर्ट आणला आहे. तो घाला.” जानकी म्हणाली

   बाळूला थांबवून घेत स्वरूपा, जानकी, अस्मिता आत वळल्या. नातवंडांचे लाड करून राघव बेडरूममध्ये गेले. सुखाच्या अत्त्युच्य लहरीवर असल्यासारखे त्यांना वाटू लागले. तेव्हढ्यात त्यांच्या लक्षात आले. नील आला ते एकापरीने बरेच झाले. आपलं हिरवं स्वप्न आता सगळ्यांसमोर मांडता येईल. फ्रेश होऊन पलंगावर ठेवलेला शर्ट उलगडला. फिक्या निळ्या रंगावर पांढऱ्या रेषा हा त्यांचा आवडीचा पॅटर्न होता. तो घालून सेंट फवारला आणि डाइनिंग टेबलवर सगळ्यांमधे सामील झाले. टेबलावर चहा, मिठाई, नमकीन बघून राघव हसतच म्हणाले “ अरे, तुमची पार्टी एव्हढयावरच आटोपली की काय ?”

  तशी स्वरूपा म्हणाली “ आता तुम्ही रिटायर्ड झाले. खाण्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. आणि आता तुम्ही माझ्या तावडीत सापडले आहात. त्यामुळे मी देईन आणि जे देईन तेव्हढच तुम्हाला मिळेल.”

 “ अरे बापरे! हा तर फार मोठा तोटा झाला. याचा तर विचारच केला नव्हता.” सगळे हसले. त्यांच्या फिरतीच्या कामामुळे खुप वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे पदार्थ खायला मिळायचे. ठिकठिकाणचे फेमस पदार्थ घरी घेऊन यायचीही त्यांना हौस होती. लोकही काही खास पदार्थ घरी पाठवून द्यायचे. आता हे सगळं संपणार होतं. सुदैवाने कुणाला आजार नसल्यामुळे खाण्यावर बंधनं नव्हती. हसत खेळत गप्पा मारत चहा नाष्टयाचा आस्वाद घेणं चालू होतं. सहा वाजत येऊ लागले तसे टेबलवरून एकेकजण निघून जावू लागले. शेवटी स्वरूपाही आलेच हं म्हणून तिथून निघून गेली.

       तेव्हा राघव बुचकळ्यात पडले. बाळू अजुनही तिथेच होता. त्याला का थांबवून घेतले हे दोघांनाही कळत नव्हते. खोल्यांमधून गडबडीचे आवाज ऐकत, दोघ गप्पा मारत बसले. गप्पा अर्थात ऑफिसच्याच होत्या. तेव्हढ्यात एक मोठी व्हॅन आतमध्ये येऊन मागच्या दारी उभी केल्याचे त्यांनी पाहिले. घाईतच मधुर तिकडे गेल्याचही लक्षात आलं. असेल काहीतरी म्हणत परत दोघं गप्पा मारू लागले. लवकरच गच्चीवरून कुणाचे चालण्याचे, बोलण्याचे आवाजही कानी पडू लागले. काय प्रकार आहे ते बघावं म्हणून राघव उठले, तेव्हढ्यात नील, मधुर आले आणि बाबा गच्चीवर चला एक गंमत दाखवतो म्हणत वर घेऊन गेले.

       वर जाताच राघव क्षणभर बघतच राहिले. गच्चीवर आलिशान मंडप उभारला होता. त्यांचे सगळे नातेवाईक, मित्रमंडळ, ऑफिसमधले लोकंही हजर होते. एका मोठ्या राजेशाही खुर्चीवर बाबा बसलेले पाहून राघवाना एकदम भरून आलं. धावतच ते त्यांच्यापाशी गेले. बाबांचा थरथरता हात राघवांच्या डोक्यावरून फिरला तेव्हा त्यांना आलेल्या उर्मी तिथल्या सगळ्या माणसांचा ठाव घेऊन गेल्या. नील, मधुरला राघव म्हणाले “ हे खरं गिफ्ट दिलं तुम्ही मला.”

“ बाबा आम्हाला माहित आहे, आजोबांना पहिलं की किती आनंद होतो तुम्हाला. म्हणुनच त्यांनाही गावाकडून कालच आणून नीलच्या रूमवर ठेवलं होतं.” मधुर म्हणाला.

  काकांची गळाभेट घेऊन राघव मग बाकीच्यांकडे वळले. लोकांच्या गाठीभेटी, गप्पा, शुभेच्छा, खाणेपिणे चालू राहिले. उत्साहाने ओसंडलेल्या वातावरणात सगळ्यांच्याच आनंदाला उधाण आलं होतं. तृप्त नजरेने आजोबा, काका आपल्या पोराचं मनुष्यवैभव, धनवैभव, किर्तीवैभव न्याहाळत होते. सगळं असुनही जमिनीवर पाय ठेवून उभ्या असलेल्या मुलाबद्दल त्यांना अभिमान वाटत होता. हळूहळू पार्टी रंगात आली तशी नंतर एकमेकांचे निरोप घेत ओसरत गेली. दोघा मुलांना जवळ घेत राघव म्हणाले “ मुलांनो, आजच्या सरप्राईजबद्दल खुप धन्यवाद. खुपच सुंदर क्षण दिले तुम्ही मला. किती मेहनत केलीत. स्वरूपा तू ही त्यांना सामील झालीस. कुणीही काही सुगावा लागू दिला नाहीत. बाबा आणि काकांना पाहून लहान झाल्यासारखं छान वाटलं.” राघवांनी केलेल्या कौतुकाने सगळे आनंदले. त्यांच्या लाघवी स्वभावामुळे प्रत्येकालाच त्यांच्यासाठी काहीतरी करावसं वाटायचं. भारावलेल्या वातावरणात रात्र चढत गेली. प्रत्येकजण आपापल्या समाधानाच्या कप्प्यात डोकावून झोपेच्या अधीन झाले. प्रत्येकाचे समाधान वेगवेगळ्या पातळीवरचे होते. अस्मिता मधुर आणि नीलला कार्यक्रम पुर्णपणे यशस्वी पार पाडल्याचे, बाबांना आनंद दिल्याचे समाधान होते. जानकी नीलला भारतात येऊन सगळ्यांची भेट झाली याचा आनंद होत होता. स्वरुपाला आता राघवांची वडवड थांबणार आणि आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरवात होणार याचा आनंद होता. तसेच मुलांनी नियोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुकही होते. बाबांना मुलासाठी पाहिलेलं स्वप्न सुफल संपुर्ण झाल्याचं समाधान मिळालं होतं. लहान मुलांना आई बाबांचं लक्ष नसल्याने यथास्थित आईसक्रीम चोपता आल्याचा आनंद होता.

       राघवांना मात्र रितेपणाची भावना घेरली होती. माणसांची आवड असलेले राघव जाणून होते, हा जो समारंभ झाला हा शेवटचा. यानंतर एव्हढे माणसं आपल्या आयुष्यात रहाणार नाही. प्रत्येकजण आपापल्या व्यापात गुंतत जाणार. ही जीवनाची रीत आहे. अधुन मधुन मुलं, नातवंड, आणि आता तर अजुनच सावली सारखी असणारी बायको एव्हढच विश्व हळुहळू आपल्याला पलीकडच्या तीराला लागेपर्यंत रहाणार. उदास खिन्न झालर त्या रितेपणाला अजुनच गडद करून गेली. पण तेव्हढ्यात आपल्या बाबांचा पसारा त्यांच्या डोळ्यासमोर आला. पुर्ण गावच त्यांचं होतं, आणि ते गावाचे. हिरव्या स्वप्नांच्या स्पर्शाने राघव भानावर आले.

       अरे! केव्हढं मोठ्ठं , समृद्ध विश्व आपल्या समोर उभं आहे. निसर्ग स्वप्न आणि अध्यात्ममार्ग हे दोन्ही एकमेकांना पोषक आहेत. निसर्ग तुम्ही जगायला लागता तेव्हा तुमची आध्यात्मिक उन्नती झाल्याचीच ती खुण असते. आता राघवांचा समाधानाचा कप्पा पुर्ण भरला. समाजाने जे काही आपल्यासाठी केले त्या संदर्भात कृतज्ञता ठेऊन आपण समाजऋण फेडायला पाहिजे. या जाणिवेसरशी त्यांनी उद्याच या विषयावर बोलायचा निश्चय केला आणि ते ही समाधानाने झोपी गेले.

                                                                                        ...................................................

   

 

Rate & Review

Kamalakar Shinde

Kamalakar Shinde 6 months ago