मी नांदेड जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक या पदावर काम करीत असून फावल्या वेळांत लेखनाचे काम करतो. गेल्या पंचवीस वर्षांपासून मी लेखन करीत आहे. पूर्वी छोटे छोटे माहितीपर लेख लिहायचो. त्यातूनच मला ऊर्जा मिळत गेली आणि मी लिहीत गेलो. माझ्या वाचक वर्गाचे खास करून आभार मानतो कारण त्यांनी दिलेल्या प्रोत्साहन आणि प्रेमामुळे आज या ठिकाणी पोहोचलो आहे. विचार करा आणि लेखन करा हा माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे. वाचन जीवनाचा अविभाज्य भाग बनले की, सवय होऊन जाते. म्हणून माणूस विचार करू शकतो. वाचन केलेच नाही तर आपल्य

*जीवनातील अनमोल मित्र*

मित्र जीवनात हवेहवेसे वाटतात कारण प्रत्येक सुख-दुःखामध्ये फक्तनिफक्त मित्राची साथ आपणाला मिळते. बालपणीचे मित्र, शाळेतले मित्र, महाविद्यालय मित्र आणि नौकरीच्या ठिकाणी मिळणारे मित्र असे मित्राचे वर्गीकरण करता येईल.
बालपणीचे मित्र जेंव्हा खूप वर्षानंतर मिळतात तेंव्हा खूप आनंद होतो. काय बोलावे ? हे ही सुचत नाही. खूप गप्पा होतील, चहा-पाणी होईल, त्या॑नी ज्या ठिकाणी खाल्ले, झोपले, उठले, बसले अभ्यास केले, रुसले, मारामारी केले आणि खेळले त्या जागेत काय काय बदल झाले यावर विचार होईल आणि मनात एक वेगळाच आनंद देऊन जाईल. बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा असे म्हटल्या जाते ते यामुळेच याची प्रचिती यनिमित्ताने पुन्हा एकदा येते. दिवसभर उन्हात खेळण्याचे ठिकाण आज मात्र ओसाड दिसून येते. आज त्या ठिकाणी कोणीच खेळत नाही. मुलांची खेळ खेळण्याची आवड कमी झाली म्हणावे की आई-बाबा त्यांना खेळू देत नाहीत, हे न उलगडणारे कोडे आहे. काही असो पण आम्ही लहान असताना जे काही उद्योग केले, खेळ खेळले, ते आजची मुले नक्कीच करत असताना आढळून येत नाहीत. टीव्हीवरील कार्टून आणि मोबाईलवरील गेमने या मुलांना पुरते वेडं केले आहे. जुने मित्र भेटले की या विषयावर हमखास चर्चा होणारच.
शाळेत गेल्यावर जे आपल्या शेजारी बसतील त्याच्या सोबत मैत्री होते. त्यास आपण पाटी मित्र म्हणतो. LKG, UKG सारखे वर्ग त्यावेळी नव्हते त्यामूळे पेंसिल-वही हे पाचव्या वर्गात जाईपर्यंत माहीत व्हायचे नाहीत. कलम-पाटी एवढेच काय आमच्या दफ्तरमध्ये असायचे. बरे दफ्तर तरी कसले ती पिशवीच असायची. शुद्धलेखन असो वा बेरीज-वजाबाकी सर्व काही त्या पाटीवरच. कलम उधार देणारे मित्र फार कमी मिळायचे. शाळा संपल्यावर आम्ही कलम जिंकण्याचा खेळ खेळायचो आणि डब्यात सर्व कलम जमा करून ठेवायचो. काही मित्र कलमने लिहायचे नाही किंवा आमच्या सोबत खेळायचे सुध्दा नाही तरी त्याची कलम कश्या काय संपायच्या याचा शोध लावायला वेळ लागला नाही. शाळेच्या पाठीमागे बसून तो संपूर्ण कलम खाऊन टाकायचा आणि कलम नाही म्हणून लिहिणे टाळायाचा मात्र गुरुजी त्याला कसे सोडणार. ते काही ऐकुन घ्यायचे नाही आणि शेवटी येथे मदत करणारा तो मित्रच. गृहपाठ पूर्ण करणे असो वा एखादे चित्र काढायचे असो त्यावेळी फक्त मित्रच मदतीला धावून येतात. शालेय मित्राची ओळख आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. या लहान वयात हेच तर आपणाला चांगले वळण लावतात. या वयात ज्यांना चांगले मित्र लाभले त्याचे आयुष्य सफल झाल्यासारखे आहे. कारण मित्र हे जीवनाला वळण लावणारे तट आहेत. एकमेकांची खोड काढायची आणि गुरुजींचा मार इतरांना मिळवून देण्यात धन्यता मानण्यात येणाऱ्या या वयात आपल्या मित्रांसोबत केलेल्या लहानमोठ्या चेष्टा मस्करी आज आठवले की हसावे की रडावे हेच कळत नाही. शालेय जीवन असेच हसत खेळत कधी संपले हेच कळत नाही आणि सर्व मित्रांची ताटातूट होते. शाळेतील काही स्वप्नं घेऊन महाविद्यालयात जाऊन पोहोचतो. आजपर्यंत विहिरीत पोहणारे मासे जेंव्हा मोठ्या समुद्रात किंवा नदीत जाऊन पडतात तेंव्हा त्या माश्यांची जी अवस्था होते जवळपास तीच अवस्था या ठिकाणी होते. आपल्या विचारांशी सहमत असणारे मित्र मिळणे खूपच कठीण असते. या वयातील मित्र अगदी सहजपणे जोडल्या जात नाही. यांचे समझदारीचे वय असते. काय चांगले, काय वाईट आहे, कोण कसा आहे या सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करूनच ते मित्र बनवितात. या ठिकाणी मिळालेले मित्र आजीवन सोबत राहतात. म्हणून यांच्यासोबत कधीही गद्दारी करू नये. अन्यथा जीवनात कोणी मित्र होतच नाहीत. पाण्याशिवाय मासोळीचे जीवन ज्याप्रमाणे काहीच नाही अगदी तसेच मित्राशिवाय जीवन आहे.

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड

Read More

मी लिहिलेलं पहिलं पुस्तक

पाऊलवाट हे मी लिहिलेलं पहिलं पुस्तक. शालेय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली. ज्याप्रकारे एखाद्या स्त्रीला पहिलं बाळंतपणाचे डोहाळे असतात अगदी तसेच मलाही माझ्या या पहिल्या पुस्तकांविषयी झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी सांगायचो त्या त्या गोष्टी घरी आल्यावर टिपून ठेवायचो. विद्यार्थ्यांना ठरवून असे काही बोलायचे नाही मात्र जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांना गप्पा मारण्याच्या ओघात सांगत गेलो. त्यातून एक कल्पना सुचली की हे सारे इतर मुलांनाही कळायला हवे. शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक आणि शिक्षक हे देखील अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून त्यांच्या विषयीदेखील या पुस्तकात लिहायचा प्रयत्न केलोय. पुस्तक प्रकाशन झाल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी ते पुस्तक रोज एका प्रकरणाचे अभिवाचन केले. तेवढा एक आनंद या पुस्तकाच्या निमित्ताने मिळालं. पुस्तक वाचणे खूप सोपे आहे मात्र एखादे पुस्तक लिहून काढणे आणि प्रकाशित करणे खूपच कठीण बाब आहे. प्रकाशकांचा शोध घेणे ही एक दिव्यपरीक्षा आहे, असे मला वाटते. नवोगत साहित्यिकांना लवकर प्रकाशक भेटत नाहीत, एखादे वेळी भेटले तरी पुस्तक प्रकाशनासाठी लागणारा खर्च बघून कोणी पुस्तक प्रकाशित करण्याचा आपला विचार मागे घेतात. पुस्तक लिहिणे, त्यांची छपाई करणे आणि प्रकाशन करणे खरोखरच खूप कठीण असते याची जाणीव एखादे पुस्तक काढल्याशिवाय लक्षात येत नाही. पुस्तक निघाल्यावर त्याची विक्री होईल की नाही याची देखील खात्री नसते. प्रकाशक ही लेखकांना खूप कमी पुस्तक देतात. अर्ध्याहून जास्त पुस्तकं मित्रांना किंवा नातलगांना भेट म्हणून देण्यात संपतात. ते या पुस्तकाचे वाचन करतात की नाही याचे कधी कधी मनात शंकाच येते. उत्तम साहित्याला प्रसिद्धी नक्कीच मिळते. पण एखादा गरीब साहित्यिक असेल, त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याचे साहित्य कोण प्रकाशित करणार ? त्याचे साहित्य त्याच्याच जवळ पडून राहील. आज सगळेच प्रकाशक व्यावसायिक झाले आहेत. ( हाताच्या बोटावर मोजता येतील असे प्रकाशक सोडून ) मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. त्यातून अशा एक दोन गरीब साहित्यिकांचे साहित्य त्या व्यासपीठावरून प्रकाशित केल्यास संमेलनाचे सार्थक होईल असे वाटते. यदाकदाचित ही पद्धत सुरू झाली आणि पुन्हा तिथे वशिलेबाजी सुरू झाली तर पुन्हा या लेखकांच्या नशिबी वाईट दिवस येतील. एका पुस्तकाचा अनुभव पाठीशी घेऊन त्यानंतर दुसरे पुस्तक प्रकाशन करण्याची कधी हिंमत केली नाही. मात्र याच काळात ई साहित्य प्रकाशनाशी माझा संबंध आला आणि ई साहित्याच्या माध्यमातून काही।पुस्तकं प्रकाशित केलोय. आज माझ्या नावावर पाऊलवाट या पुस्तकासह वैचारिक लेखसंग्रह असलेले सात, एक कवितासंग्रह व कथासंग्रह असे एकूण 10 पुस्तकं प्रकाशित झाले आहे. एक कादंबरी व दोन कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. पुस्तकाची छपाई करून पंचवीस हजार रुपये खर्च करून माझ्या पुस्तकाला जी प्रसिद्धी मिळाली नाही ती प्रसिद्धी ई बुकने मिळवून दिली. आपल्या राज्यातीलच वाचक नाही तर देश-विदेशात जिथे मराठी माणूस आहे तिथे माझे ई पुस्तक वाचले गेले आणि वाचले जात आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आणि पर्यावरण वाचविण्यासाठी ई साहित्य एक चांगले मध्यम असून अगदी अल्प खर्चात आपले पुस्तक प्रकाशन होऊ शकते. वाचकांची संख्या देखील आपण विचार करू शकत नाही यापेक्षा मोठी आहे. पुस्तकं विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे मात्र मोफत पुस्तकं मिळवून वाचणाऱ्याची संख्या जास्त आहे. या वाचकांसाठी खास करून ई साहित्य मोलाची भूमिका बजावत आहे. इंटरनेटवर ई साहित्य लिहून शोधल्यास आपणांस अनेक प्रकारचे आपल्या मनासारखे साहित्य वाचण्यास मिळू शकेल. लॉकडाऊनच्या काळात घरी बसल्या बसल्या आपण कंटाळले असाल तर नक्की वाचत राहा.

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Read More

चला कवितेच्या जगात .........

कविता म्हणजे गीत-गाणे-काव्य. अगदी लहानपणापासून प्रत्येकांना कवितेची गोडी असते. लहान बाळाला जेवू घालतांना किंवा झोपू घालतांना आई नेहमी काहीतरी गुणगुणत असते. तिचे ते गुणगुणने म्हणजे एकप्रकारे कविताच असते. एक घास चिऊचा एक घास काऊचा म्हणत आई बाळाला जेवू घालते तर निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई हे गीत म्हणत बाळाला झोपू घालते. बाळाच्या कानावर लहानपणापासून असे काव्य आदळत असतात त्यामुळेच कविता आवडत असते. शाळेत जाण्यापूर्वी अंगणवाडी किंवा बालवाडीमध्ये गेल्यावर बाळाच्या कानावर येरे येरे पावसा, एवढा मोठा भोपळा, आपडी थापडी गुळाची पापडी असे बडबड गाणे ऐकायला मिळतात. कवितेला ताल मिळाले की ते गाणे बनते. लहान वयात अश्या तालमय कविता खूप आवडतात. शाळेत प्रवेश केल्यावर मग कवितेचा अभ्यास सुरू होतो. अनेक कविता येथे वाचायला मिळतात. वर्ग वाढत जातात तसे कवितेची गंभीरता वाढत राहते. पुढे कळते की, कविता दिसते सोपी पण त्याची निर्मिती करणे खूप कठीण बाब आहे. जीवनात आजपर्यंत ज्या कोणत्याही गोष्टी सहज आणि सोपी वाटतात प्रत्यक्षात ते करणे खूप कठीण गोष्ट असते. स्वयंपाक करणे हे सोपे आहे असे वाटते मात्र प्रत्यक्षात जेंव्हा किचनरुममध्ये प्रवेश करतो त्यावेळी कळते की किती कठीण आहे. असेच काही कवितेच्या बाबतीत आहे. कवितेत काय असते ? शब्दांचे यमक जुळवले की झाली कविता तयार. पण तसे मुळीच नाही. यमक तर जुळवावे लागते तरच त्याला ताल मिळते पण नुसते यमक जुळवून काही फायदा नाही तर त्यातून काही अर्थ बाहेर पडणे देखील गरजेचे आहे. कवी आपल्या मनातील भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. साहित्यात कवितेचे अनेक प्रकार आहेत. सोशल मिडीयावर एक नजर फिरवली असता असे दिसून येते की, सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक शीघ्रकवीचा जन्म झाला आहे. अनेक समुहातील संयोजक नवसाहित्यिकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी कविता तयार करण्याचे कार्यक्रम ठेवत आहेत, काही ठिकाणी ऑनलाईन कविता वाचन चालले आहे, कविसंमेलन देखील घेतल्या जात आहे. अनेक वृत्तपत्रात कवितेला स्थान दिल्या जात आहे. साहित्य निर्मितीसाठी या सर्व गोष्टी खूपच आवश्यक आणि चांगल्या आहेत, याबद्दल वाद नाही. मोबाईल आणि इंटरनेट या दोन गोष्टींमुळे खेड्यापाड्यातला कवी व त्याच्या कविता राज्यात, देशात काय जगात पोहोचत आहेत. ज्याच्याजवळ प्रतिभा आहे त्याची कविता कधी ना कधी नक्की प्रकाशज्योतात आल्याशिवाय राहणार नाही. पण काही मंडळी या सोशल मीडियात असे ही आहेत जे की, दुसऱ्याचे साहित्य आपल्या नावावर प्रसिद्ध करायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. साहित्याची चोरी करणाऱ्या अशा लोकांवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण बाब आहे. नकल करून कविता करताच येत नाही. त्यासाठी स्वतःमध्ये एक प्रतिभा असावी लागते. अभ्यास करण्याची सवय असावी लागते. भाषेतील व्याकरणाचे नियम माहीत असणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत त्या भाषेतील शब्दसंपत्ती देखील तितकीच महत्वाची आहे. एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द माहीत नसेल तर कविता करताना अनेक अडचणी येतात. म्हणून समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल शब्द, अलंकारिक शब्द, वावप्रचार, म्हणी या साऱ्या गोष्टींचा चांगला अभ्यास असेल तरच सुंदर कवितेची निर्मिती करू शकतो. कविता करतो म्हणजे करता येत नाही. तर कविता सहज सुचणारी प्रक्रिया आहे. त्याला अनुसरून आपला अभ्यास आणि अनुभव दांडगा असेल तर नक्कीच उत्तम दर्जाची कविता जन्मास येईल. कविता उत्तम आहे किंवा नाही हे स्वतः कवी कधीही ठरवू शकत नाही तर त्यासाठी एक वाचक वर्ग असायला हवे. जे की कवितेतील चूका आणि दुरुस्ती सांगू शकेल. जन्मतःच कोणी कवी किंवा कवयित्री राहत नाही. तर त्यासाठी कठोर मेहनत, परिश्रम आणि अभ्यास करण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे.
- नासा येवतीकर

Read More

मन करा रे प्रसन्न

मन चंचल असते, मन सैरभैर फिरते, मन क्षणात इथे असते तर क्षणात दूरवर कुठं तरी फिरून येते. मनाचा वेध आणि वेग आजपर्यंत कोणालाही साधता आले नाही. आपले मन आपल्या भलाचा विचार करतेच पण इतरांच्या भल्याचा विचार करणारे मन सर्वात सुंदर असते. असे म्हटले जाते की सुंदर तन काही कामाचे नाही जर आपले मन सुंदर नसेल तर. म्हणून आपले मन सुंदर राहण्यासाठी मनात चांगले विचार येऊ द्यावे, सकारात्मक विचार करावे, दुसऱ्यांना त्रास, ईजा होईल असे विचार आपल्या मनात कधीच येऊ नये याची काळजी घ्यावी. आज देशात ज्या काही अप्रिय अशा घटना घडतांना दिसून येत आहेत त्यामागे सर्वस्वी कारण आपले मन आहे. कणखर आणि मजबूत मनात कुणाचे वाईट करावे असे येतच नाही. मनाला मजबूत बनविण्यासाठी योगा करणे आवश्यक आहे. आपल्या मनाला काहीतरी विरंगुळा ठेवावे, आवडीचे गाणे ऐकावे, चित्रपट पहावे, पुस्तक वाचावे, लेखन करावे, कविता लिहावी म्हणजे मनाला आत्मिक समाधान मिळेल. कुणासोबत शक्यतो वादविवाद टाळावे, राग येईल असे काही वर्तन करू नये म्हणजे मन शांत राहील. डोळे-कान हे दोन महत्वाचे इंद्रिय आहेत जे की आपल्या मनाला हवे ते सुख-शांती देऊ शकतात. तेव्हा त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्या डोळ्याला वाईट पाहण्याची व कानाला वाईट ऐकण्याची सवय लागली की मन देखील तसेच वागते. माणूस जेव्हा एकटा राहतो त्यावेळी त्याच्या मनात नानाप्रकारचे विचार येतात. तुम्ही जर सुखात किंवा आनंदात असाल तर त्याच प्रकारचा विचार कराल पण दुःखात किंवा काळजीत असाल तर जीवाचे बरे-वाईट करून घेण्याचा विचार मनात घुटमळत राहतो. मग त्यातूनच आत्महत्त्येचे प्रकार घडत असतात. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. प्रत्येकजण आपापल्या घरातच कैद आहेत. घरातील वाढत चाललेले वास्तव्य देखील कुटुंबाला एका वेगळ्या वळणावर नेत असल्याच्या चीनमधील बातम्या वाचण्यात आल्या होत्या. तश्याच काही बातम्या भारतात देखील वाचण्यात आले आहेत. कोरोना पॉजिटिव्ह अहवाल आल्यानंतर व्यक्तीच्या मनाची घालमेल जास्त वाढत आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार लोकं कोरोना रोगाने कमी आणि त्याच्या धसकीने जास्त मृत्यू पावत आहेत. म्हणून कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या मनाचे संतुलन ढळू द्यायचे नाही. काही समुपदेशन करणाऱ्या मित्रांच्या मदतीने आपल्या कमजोर बनत चाललेल्या मनाला मजबूत करायला हवे. आजच्या या काळात तर आपले मन भक्कम ठेवणे अत्यावश्यक आहे. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण हे संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेले वचन नेहमी लक्षात असू द्यावे. आपण अंधारात चालताना नेहमी देवाचे नामस्मरण करीत चालत असतो. कारण त्यावेळी आपल्या मनाला सांगत असतो की, भिऊ नको तू एकटा नाहीस तर तुझ्यासोबत अजून कुणीतरी आहे. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना एकच वचन देतात ते म्हणजे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नुसते कोणी सोबत आहे असे जरी म्हटले तरी आपणाला तेवढी भीती वाटत नाही. म्हणूनच आपल्या मनाला कधी ही एकटे ठेवू नका. त्याला सदोदित कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त करून ठेवावे. म्हणजे आपल्या मनाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीवर विचार करायला वेळ मिळणार नाही. रिकाम्या डोक्यात भूतांचे वास्तव्य असते आणि ते आपल्या मनाला नको असलेले काम करायला भाग पाडते. सदा असतो जो कामामध्ये, उत्साह दिसतो त्याच्या चेहऱ्यामध्ये आणि जो काम न करता आळस करतो त्याच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत नाही. संत बहिणाबाई चौधरी यांनी देखील मन वढाय वढाय असे म्हटले आहे. चला तर आपल्या मनाला सदा प्रफुल्लीत ठेवू या आणि निरोगी व आनंदी जीवन जगू या.

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Read More

हिंदूंचा पवित्र महिना श्रावण

हिंदू धर्मियांत सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण. आषाढ महिना संपला की श्रावण महिन्याला सुरुवात होते. पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झालेली असते, निसर्ग कात टाकून सर्वत्र हिरवेगार दिसतो. सर्वत्र पाणीच पाणी दृष्टीस पडतो. असे म्हटले जाते की या महिन्यात पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याकारणाने आहाराच्या बाबतीत काळजी घेतली जाते. काही दिवस सूर्यदर्शन देखील होत नाही. म्हणून विशेष करून जड अन्न म्हणजे मांसाहार टाळले जाते. त्याचबरोबर उडदाची डाळ, कांदा व लसूण हे देखील वर्ज्य करतात. त्यामागे नक्कीच काही तरी शास्त्रीय कारण आहे. पूर्वी या महिन्यात एवढं पाऊस पडायचा की, लोकांना प्रातर्विधी करायला देखील बाहेर पडता येत नसे. याच महिन्यात जुलाब आणि हगवण सारख्या आजाराची साथ देखील वाढत असे. पण आजकाल पाऊस ही कमी झाला आणि लोकं स्वच्छतेच्या बाबतीत खूप जागरूक झाली त्यामुळे हा त्रास कमी झाला. शेतातली जवळपास सर्व कामे संपलेली असत त्यामुळे घरी बसले तरी मनाला काही रुखरुख वाटत नसे. श्रावण महिन्यातील 26 जुलै 2005 ही तारीख मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. सतत दोन दिवस पडलेल्या पावसाने पूर्ण मुंबई शहर जलमय झाले होते, अनेक ठिकाणी नदीला पूर आला होता, राज्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता, शाळेला दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली होती, इतका पाऊस त्यानंतर केरळमध्ये 2018 या वर्षी पहायला मिळाला. दर काही वर्षांनी पाऊस आपले रूप दाखवत असतो. जुन्या काळातील लोकं या महिन्यात पोथी व पुराण यांचे वाचन करून वेळ घालवीत असत कारण त्याकाळी टीव्ही व मोबाईल यासारखे मनोरंजनाचे कोणतेही तंत्रज्ञान नव्हते. गावात एक ठिकाण ठरवायचे त्याठिकाणी गावातील शिकलेली व्यक्ती नित्यनेमाने रात्रीच्या वेळी तेथे येऊन तास-दीड तास पारायण करायचे आणि आपापल्या घरी झोपायला जात असत. आज असे चित्र बघायला मिळत नाही, तसेच कोणी या काळात रामायण किंवा महाभारत वाचत नाहीत तर टीव्हीवर मालिका पाहतात किंवा मोबाईलवर गुंग होऊन गप्पा मारत बसतात. त्यामुळे त्यांचा वेळ कसा निघून जातो हेच त्यांना कळत नाही. काही भाविक महिला श्रावण सोमवारी भगवान शंकराची आराधना म्हणून उपवास करतात तर पुरुष मंडळी शनिवारी बलोपासक मारोतीरायाची उपासना करण्यासाठी उपवास करतात. तर काही भाविक असे ही आढळून येतात की जे फक्त दिवसातून एकदाच जेवण करण्याचे व्रत करतात. ज्याप्रकारे मुस्लिम बांधव त्यांच्या पवित्र रमजान महिन्यात दिवसातून एकदाच जेवण करतात, अगदी त्याप्रमाणे म्हटलं तरी चालेल. याच महिन्यापासून सणांची खरी सुरुवात होत असते. आखाडी पौर्णिमेला माहेरी आलेली मुलगी नागपंचमी व राखीपौर्णिमा करून सासरी जात असे. नवीन लग्न झालेल्या मुलीला आषाढी सणानिमित्त माहेरी आणल्या जाते. काही दिवसांनी पुढील सण येत असल्याने ये-जा करण्यास त्रास नको म्हणून एवढं दिवस राहत होते. पण आज एवढे दिवस कोणी माहेरी राहत नाहीत. कारण दळणवळणाची खूप मोठी सोय आज झालेली आहे. स्वतःची किंवा खाजगी गाडीने माणूस एका दिवसांत आपला प्रवास पूर्ण करत आहे. त्यानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि गोपाळकाला म्हणजे मुलांचा आवडता दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. असे करत करत महिन्याचा शेवटी अमावस्येला बैलांचा सण पोळा येतो. शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणजे बैल. बैलामुळे त्याचे अनेक अवजड कामे सोपी होतात. म्हणून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. यादिवशी सर्वांच्या घरात पुरणपोळीचे जेवण तयार केले जाते. अगोदर घरातील बैलांना खाऊ घालून मग सारेजण पुरणपोळीचा आस्वाद घेऊन हा सण साजरा करतात. या पद्धतीने श्रावण महिन्यातील विविध सणामुळे हा महिना प्रत्येकांसाठी अत्यंत महत्वाचा आणि पवित्र समजल्या जातो.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

Read More

       लोकमान्य टिळक 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव
तेथे जन्मले सुपुत्र बाळ केशवराव

शिक्षक वडीलांचे नाव होते गंगाधर पंत
त्यांच्या जीवनात नव्हते कशाचेही खंत

शालेय जीवनात आवडीचा विषय गणित
बालपणापासून ते कोणालाही नाही मानीत

पुण्यात भेटले त्यांना गोपाळ आगरकर
मराठा केसरी वृत्तपत्रातून केले लोकजागर

इंग्रजा विरोधी लोकांत करण्या जनजागृती
सुरू केली त्यांनी गणेशोत्सव शिवजयंती

त्यांचे क्रांतीकारी विचार होते खूप जहाल
म्हणूनच ते वागले नाही कधीच मवाळ

मंडालेत त्यांना कारावास भोगावा लागला
गीतारहस्य ग्रंथ तिथेच लिहिण्यात आला

सूर्याचे पिल्लू पदवी दिली त्यांच्या गुरूंनी
लोकमान्य ही उपाधी दिली भारतीयांनी

सिंहगर्जना केली आणि दिला त्यांनी मंत्र
स्वराज्य मिळविण्या सांगितला अनोखे तंत्र

प्रखर विरोध केला जुलमी गोऱ्या इंग्रजाना
असंतोषाचे जनक पदवी मिळाली त्यांना

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे तेच खरे रत्न
स्वातंत्र्यासाठी त्यांनी केले अनेक प्रयत्न

तेवीस जुलै रोजी त्यांची असते जयंती
वंदितो त्यांच्या कार्याला लावूनी पणती

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Read More

माझा चष्मा

चष्मा म्हणजे ऐनक. लहानपणी या चष्म्याचे खूप अप्रूप वाटायचं. चष्मा लावलेला कोणी व्यक्ती दिसला की तो खूप महान व्यक्ती आहे असे समजायचं. पुस्तकात जे महान व्यक्ती बघितलं त्यांच्या डोळ्यावर चष्मा असायचा म्हणून तो समज झाला होता. घरात आजी- आजोबाचा चष्मा खाली दिसला की ते डोळ्यावर लावून पाहायचो. थोड्याच वेळात चक्कर आल्यासारखे व्हायचं आणि लगेच काढून टाकायचं. कॉलेजमध्ये जाणारा मोठा भाऊ त्याच्याकडे ही एक चष्मा असायचा त्याला तो गॉगल म्हणत असे. तो मात्र त्या गॉगलला कोणाला हात लावू देत नसे. कधी चुकूनमाकून मिळाला तर ते डोळ्यावर लावायचं आणि आरश्यात निरखून पाहायचं. गॉगलला हात लावला म्हणून तो ओरडायचा. गावाजवळ एखाद्या सणानिमित्त जत्रेचे आयोजन होत असे. त्या जत्रेतून खरेदी करायची एकच वस्तू असायची ते म्हणजे चष्मा. घरात दोन-चार चष्मे पडून असताना अजून हा नवीन चष्मा कशाला घेतलास म्हणून आई ओरडायची. तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. चष्मा लावून सायकल फिरवायची भारी हौस. शाळेत गुरुजी चष्मा लावण्यास मनाई करायचे. बहुतांशवेळा तर शाळेत गुरुजींला चष्मा दिसला की ते जप्त करीत असत. वर्गात एक मुलगा होता त्याच्या डोळ्यावर नेहमी चष्मा असे गुरुजी त्याचा चष्मा का जप्त करत नाहीत ? हे कळायला थोडा वेळ लागला. त्या मुलाने जर चष्मा लावला नाही तर त्याला अभ्यास करता येत नाही. न राहवून त्याला एकदा म्हणालो, " तुझी तर भारीच मजा आहे बाबा, तुला रोज चष्मा वापरायला मिळतो. यावर तो जराश्या नाराजीच्या सुरात म्हणाला, " कसली मजा रे भाऊ, चष्मा लावणे म्हणजे सजा आहे. चष्मा लावला नाही ना तर मी आंधळाच होतो." हे ऐकून मला त्याची कीव आली. वर्गातले काही मित्र त्याला चष्मेबद्दूर म्हणायचे, काहीजण चसमिस म्हणायचे तर काहीजण बॅटरी म्हणून चिडवायचे. असे शब्द ऐकून तो खूप नाराज व्हायचा, हे पाहून मी पण दुःखी व्हायचो. असे दिवस कोणाला येऊ नये अशी प्रार्थना करायचो. चष्मा म्हणजे परावलंबन हे त्या दिवशी कळले. शाळेतील बहुतेक शिक्षक आणि शिक्षिकांच्या डोळ्यावर चष्मा असतोच. एके दिवशी भारी गंमत झाली. आमचे मराठी शिकवणाऱ्या बाई आपला चष्मा शोधू लागली. चष्माशिवाय त्यांना वाचता येईना. आपली पर्स चेक केली, सर्वत्र शोध घेतली, मुलांना कळेना की बाई काय शोधत आहेत ? समोरच्या एका मुलाने धाडस करून विचारले, " बाई, तुम्ही काय शोधत आहात ?" यावर बाईने थोड्या रागातच म्हटले, " अरे माझा चष्मा शोधतोय, कुठं ठेवलं हेच कळेना." यावर सारा वर्ग हसू लागला. मुलांचे हसणे पाहून बाईनी टेबलावर जोरात छडी मारली आणि गप्प बसा म्हणाली. तेव्हा त्याच मुलाने बाईना सांगितलं, " बाई, तुमचा चष्मा तुमच्या डोक्यावर आहे." गंमत आहे की नाही. असे चष्म्यासोबत अनेकवेळा घडते. विसरभोळे माणसं चष्मा विसरून जाऊ नये म्हणून त्याला दोरी बांधून गळ्यात अडकवून ठेवतात. एका मित्राने विनोद म्हणून संशोधन करण्यासारखा प्रश्न विचारलं. देवाने आपणाला दोन कान दिले म्हणून बरे झाले नसता चष्मा कुठं अडकवता आला असता ? त्याचसोबत आज काही वृद्ध माणसे आढळून येतात ज्यांचे वय सत्तरीच्या पार झालेलं आहे मात्र चष्मा लागलेला नाही. टीव्ही जास्त वेळ पाहिलं नाही तर डोळे चांगले राहू शकतात. आजकाल लहान मुले मोबाईलवर विविध गेम आणि इतर काम करतांना आढळून येत आहेत. त्यामुळे डोळे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळे आहेत तर सर्व आहे. डोळ्याला चष्मा लागणे म्हणजे आपले जीवन परावलंबी झाल्यासारखे होय. म्हणून डोळ्यांची काळजी घ्या आणि चष्म्यापासून दूर राहा.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Read More

#सावधान पुन्हा लॉकडाऊन

संपूर्ण भारतात 75 दिवसाचे लॉकडाऊन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र रविवारपासून काही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जनतेत चिंतेचे आणि काळजीचे वातावरण पसरले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की, भारतात 12340 कोरोना बाधित होण्यासाठी तीस दिवसाचा कालावधी लागला होता आणि आज मात्र चोवीस तासात चोवीस हजार रुग्ण आढळून येत आहेत. खरोखरच खूपच चिंतनीय बाब आहे. शासनाने घेतलेले निर्णय काही चुकीचे आहेत असे जनमानसांत आज चर्चिले जात आहेत. ज्यावेळेस कोरोना रुग्णाची संख्या कमी होती त्यावेळी जनताकर्फ्यु, संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आलं होतं. पण ज्यावेळी रुग्णांची संख्या वाढू लागली होती त्यावेळी मात्र रोजगाराचे स्थलांतर करून एकप्रकारे कोरोनाला एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाण्याची परवानगी दिल्यासारखे झाले. सुरुवातीच्या पाच टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये भारतात सव्वा लाख लोकं बाधित झाली होती आज तोच आकडा किती वाढला आहे, हे आपण पाहू शकतो. हे असेच चालू राहिले तर भारतात एका दिवसात एक लाख रुग्ण आढळून येण्याची शक्यता एका तज्ञाने व्यक्त केली, ते चुकीचे वाटत नाही. कोरोना आजारातून बरे होण्याची संख्या देखील खूप आहे. पण रुग्णांची संख्या वाढू लागली तर सर्वांना वैद्यकीय सेवा मिळणार नाही, तसे आज ही काही ठिकाणी वैद्यकीय सेवा मिळत नाही अशी ओरड होत आहे. त्याला शासन किंवा प्रशासन जबाबदार नाही. लाडक्या लेकरांचे सर्व हट्ट पुरविल्या जातात आणि दहा लेकरं असल्यावर कोणाचीही मागणी पुर्ण होत नाही, हे वास्तविक आहे. त्यामुळे लोकांनी या दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात समजदार नागरिक होऊन सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यावर लॉकडाऊन करण्याची नामुष्की आली हे खरोखरच चिंतनीय बाब आहे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात पोलीस व डॉक्टर यंत्रणेवर ताण येणार नाही याची आपण सर्वजण काळजी घेऊ या. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. एक-दोन सामान खरेदीसाठी बाजारात जाणे टाळावे. आवश्यक सामानाची यादी करावी ज्या दिवशी यादी खूप लांबली असे वाटते त्या दिवशी सवलतीच्या वेळात जाऊन खरेदी करावी. घराबाहेर पडतांना नेहमी तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स हा नियम लक्षात ठेवूनच काम करावे. भाजीपाला आठवड्यातून एकदाच आणून घ्यावं. रोजच्या रोज ताजा भाजीपाला विकत घेण्याचा आपला नाद यापुढे सोडून द्यावे. घरातील लहान मुलांना शक्यतो कुठे ही बाहेर पाठवू नका. काही पालक आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान वाचावं म्हणून घरच्या घरी किंवा मित्रांच्या घरात चार-पाच जणांना एकत्र करीत शिकवणी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. ती चांगली गोष्ट आहे, मात्र त्यात कोणी बाधित रुग्णांशी संपर्क झालेला असू नये म्हणजे झाले. अन्यथा लहान मुलांना 14 दिवस आई-वडिलांपासून दूर कोविड सेंटर किंवा क्वारनटाईन करून ठेवणे खूपच अवघड बाब आहे. पालकांनी एकवेळ यावर विचार करणे आवश्यक आहे. सॅनिटायझर आपल्या सोबत असू द्यावे, दर काही मिनिटांनी वा तासांनी आपले हात सॅनिटायझरने स्वच्छ करत राहावे. जेवढे आपण स्वतः सुरक्षित राहू तेवढे आपला परिवार, आपले शेजारी, आपले मित्रमंडळी आणि आपला गाव सुरक्षित राहू शकतो याचा वेळोवेळी विचार करावा. खबरदरी हीच आपली जबाबदारी आहे, म्हणून प्रत्येकानी पाऊल ठेवत असतांना अगदी जागरूकपणे ठेवणे अत्यावश्यक आहे. कोरोनाची मजबूत साखळी कमकुवत करण्यासाठी आपण सर्वांनी जागरूकतेने वागणे आवश्यक आहे. एकाची चूक देखील इतरांना त्रासदायक ठरू शकते. म्हणून चला स्वयंशिस्तीने वागू या आणि कोरोनाला संपवू या.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Read More

शुभ प्रभात

सकाळचा गार वारा अंगाला झोम्बला खूप बरे वाटते. जे सकाळी लवकर उठत नाहीत त्यांना सूर्यवंशी असे म्हटले जाते. पहाटे पहाटे मॉर्निंग वॉक करणे प्रत्येकांसाठी आवश्यक आहे. कारण सकाळची शुद्ध हवा दिवसभरात मिळणे जरा अवघड बनत चालली आहे. शहरात तर आवश्यक आहे. कारण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दूषित वातावरणाचे प्रमाण जरा जास्तच असते. त्याचसोबत आजकाल बैठे काम वाढल्याने शरीराला कसल्याच प्रकारचा व्यायाम होत नाही. घर ते काम करण्याचे ठिकाणी जाण्यास वाहनांचा वापर होत असल्याने शारीरिक कसरत देखील कमी झाले आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकचे अजून जास्त महत्व वाढले आहे. विशेष करून महिलांना पहाटेची कामे पुष्कळ असतात. अंगण साफ करणे, सडा टाकणे, पाणी भरणे ही कामे सकाळी करावीच लागतात. घराची कळा अंगण सांगते, म्हणून प्रत्येक स्त्रिया सकाळी लवकर उठून हे काम करत असतात. लहान मुले मात्र सकाळी उठण्याचे टाळतात. सकाळच्या झोपेला साखर झोप असे म्हटले जाते. यावेळी त्यांना उठवले तर ते चिडचिड करतात. झोपू दे ना आई असे ते बोलतात. आई मात्र रोजच सकाळी लवकर उठण्याचे महत्व आपल्या प्रवचनातून देत असते. सकाळी उठून अभ्यास केल्यामुळे केलेला अभ्यास दीर्घकाळ स्मरणात राहते, असे म्हटले जाते. त्यामुळे घरातील वडील मंडळी लहान मुलांना सकाळी लवकर उठण्याचे सांगतात. मात्र ती मुले सकाळी लवकर उठण्यास आळस करतात. जी मुले सकाळी लवकर उठून आपले काम करतात, त्यांना दिवसभर कसल्याही प्रकारचा आळस येत नाही. ग्रामीण भागात सकाळी सकाळी मंदिरावरून भक्तीगीत ऐकू येतात तेव्हा मन प्रसन्न वाटते. कालच्या दिवसाचा थकवा निघून जाऊन सकाळी नव्याने कामाला सुरुवात होते. पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमणामुळे दिवस-रात्र होते आणि एक एक दिवस पुढे सरकत राहतो. प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणारी प्रत्येक पहाट काही ना काही नवीन घेऊन येत असते. म्हणूनच किती ही संकटे येवो नव्या पहाटची वाट पाहत राहणे आवश्यक आहे. कुणाच्या ही जीवनात उष:काल होता होता काळ रात्र आली असे होऊ नये, प्रत्येकाची मॉर्निंग गुड राहावी, हीच अपेक्षा.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Read More

कोंबड्याचा व्यवसाय

पूर्वीच्या काळी म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी प्रत्येकांच्या घरी कोंबड्या पाळले जायचे. शेळीपालन जरासे जिकरीचे जाईल किंवा त्याला एखादा व्यक्ती ठेवावे लागेल पण कोंबड्या पाळण्यासाठी विशेष असे कष्ट लागतच नाही. कोंबडी अंडी देते, ते अंडी जेवढे विकता येतील तेवढे विकायचे, खाऊ वाटतील तेवढे खायचे आणि राहिलेले अंडी उबविण्यासाठी ठेवायचं. कोंबडी अंडी देणे बंद केलं की तिला अंड्यावर बसवायचं. बरोबर 20-21 दिवसानी मग कोंबड्याच्या पिलांचा आवाज येऊ लागायचं. कोंबडी आपल्या लहान लहान पिलांना घेऊन अंगणात इकडे तिकडे फिरायची. आपल्या पिलांची ती काळजी ही घ्यायची आणि संरक्षण देखील करायची तरी देखील काही पिल्ले मांजरीच्या घशात तर काही पिल्ले घारीच्या तोंडात जायची. एवढ्या संकटातून जे जगले ते आपले, मांजर, घार, कुत्री यांच्या तोंडात गेले त्याला काही करता येत नाही. सायंकाळ झाली की कोंबडे आपल्या खुराड्या कडे वळतात. त्यांना झाकून ठेवायचं काम मात्र करावे लागते. घरातील लहानसहान मुले हे काम आनंदाने करतात. अशा रीतीने एकाचे दहा आणि पुन्हा दहाचे पाच-पंचवीस कोंबड्या वाढतच राहतात. घरी कोणी पाहुणा आला म्हटलं की एखाद्या कोंबड्यावर वेळ यायची आणि त्यादिवशी तिचा बलिदान दिला जायचा. पैसे लागत नव्हते काही नाही त्यामुळे घर की मुर्गी दाल बराबर अशी स्थिती होती. कोंबडा आरावला की सकाळ झाली असे समजायचं. ना घड्याळ होते ना किती वाजले याचे गणित होतं. आज मात्र सर्व परिस्थिती बदलून गेली. आज गावात तर कोंबड्या कमी झाल्याच शिवाय कोंबडे पाळणारे लोकं ही कमी झाले आहेत. माझ्या अनुभवावरून सांगतो की, आज ही गावरान कोंबड्या पाळणे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. पोल्ट्री किंवा बॉयलर सारखे कोंबड्या पाळण्यापेक्षा गावरान कोंबड्या पाळणे केंव्हाही चांगले. त्याला योग्य आणि चांगला भाव मिळतो तसेच जनतेचे आरोग्य देखील सुरक्षित राहते. मात्र झटपट कमाई आणि लवकर श्रीमंत होणे या लोभापायी मनुष्य विचार न करता पोल्ट्री फॉर्म उघडून बसला आहे. जे व्यवसाय आपण करतो त्याची चव कधी आपणा स्वतःला घेता यावी असा व्यवहार करणे गरजेचे आहे. आजच्या बेरोजगार युवकांनी आणि शेती करणाऱ्यानी शेती करत करत असे छोटे छोटे असे उद्योग देखील करावे म्हणजे हातात पैसा खेळत राहील आणि मन सदा प्रसन्न राहील.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Read More