Hey, I am on Matrubharti!

मोकळे व्हा..


‘शाल्मली’ एका मल्टिनॅशनल कंपनीत एका उच्च पदावर नव्याने रुजू झालेली आधुनिक विचारांची मुलगी. वय साधारण २४- २५ वर्ष, दिसायला सर्वसाधारण असली तरी कामात प्रतिभा दिसून यायची.  सळसळतं तरुण रक्त. एकदा का काम हातात घेतलं की काही तासांतच  ते हातावेगळं झालंच म्हणून समजा. तिचा हा आत्मविश्वासच तिला यशाच्या शिखरावर नेऊन जात होता. 


काही दिवसांपूर्वीच चांगलं पॅकेज, सिनियर पोजिशन आणि काही नवीन शिकण्याच्या उद्देशाने ती पुण्याहून दिल्लीला आली.आणि इथे आल्यावर फार कमी अवधीतच तिने बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. चांगले प्रोजेक्ट देऊन तिने कंपनीच्या उत्कर्षासाठी हातभार लावला.  त्यामुळे अगदी कंपनीच्या डायरेक्टर पासून सर्व सहकाऱ्यांची ती आवडती सहकारी बनली होती. 


पण गेल्या काही दिवसांपासून शाल्मली उदास राहू लागली. तिचं कामात लक्ष लागेना. कामात चुका वाढू लागल्या. नेमकं कारण काही समजत नव्हतं. एक दिवस त्या कंपनीच्या एच. आर. मॅनेजर, सुजाता मॅडमनी शाल्मलीला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून घेतलं. आणि तिला कारण विचारलं. आधी ती काहीच बोलत नव्हती. घाबरली होती. पण ही गोष्ट कॉन्फिडेन्शियल राहील हा विश्वास दिल्यावर शाल्मलीने तोंड उघडलं. तिच्या तोंडून त्यांनी जे ऐकलं ते ऐकून त्यांना धक्काच बसला. शाल्मली सांगू लागली.,


“मॅडम, मी जेव्हा इथे जॉईन झाले तेंव्हा खूप खुश होते. मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळत होती. सर्वजण माझ्या कामामुळे खुश होते. पण ज्या दिवशी मि. व्यंकट माझे सिनियर म्हणून आले. त्या दिवसापासून सारे चित्रच बदलून गेलं. ते मुद्दाम माझ्याशी सलगी करत होते. मुद्दाम उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबवून घ्यायचे. कधी  खांद्यावर कधी पाठीवरून हात फिरवायचे. कधी कंबरेला,कधी नको तिथे स्पर्श करत होते. कधी हात पकडायचे. खूप घाण वाटायची मला. कधी कधी तर केबिनमध्ये बोलवून कॉम्प्युटरवर अश्लील फोटो, व्हिडिओ दाखवायचे. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत काम करणाऱ्या कलीगला पण सांगितलं. पण ती म्हणाली, “हे कॉर्पोरेट जग आहे. इथे हे चालतच. तुलाच परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागेल. आणि ज्यांच्या विषयी तू सांगतेस ते डायरेक्टर साहेबांचे खास आहेत. तुझ्यावर कोण विश्वास ठेवेल? सो कीप मम.”


मला हे सहन होत नव्हतं. मी त्यांच्याकडे माझा राजीनामा दिला तर त्यांनी तो फाडून टाकला. आणि म्हणाले, तू कंपनीचा बॉण्ड साइन केला आहेस. तुझे ओरिजिनल सर्टिफिकेट आमच्याकडे आहेत. आधीच बॉण्ड तोडल्यास तुला त्याची पेनल्टी क्लोज म्हणून साधारण दोन लाख भरावे लागतील. नाहीतर माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. सी. ई. ओ. च्या पोजिशन साठी मी तुझं नाव सुचवू शकतो. पण त्यासाठी तुला माझ्या सोबत…”  मी खूप घाबरले. मी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. इतके पैसे कुठून आणू. जॉब सोडता येत नव्हता. आणि त्यांचे अश्लील चाळे सहन होत नव्हते. माझे सिनियर मि. व्यंकट मला  सेक्सश्यूली अब्युज करण्याचा प्रयत्न करत आहेत. ”


मैत्रिणींनो, हा एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बहुतांशी शाल्मलीला येणारा अनुभव. तुम्ही शाल्मलीच्या जागी असता तर काय केलं असतं? कोणी या अनुभवातून गेलं असेल.. आजूबाजूला असे प्रसंग घडताना पाहिलं असेल.. तर चला बोलूया.. मोकळे होऊ या.. या अन्यायाविरुद्ध वाचा फोडू या..

©निशा थोरे (अनुप्रिया )

Read More