सोनसाखळी - 6

  • 6.5k
  • 2.3k

एक होता राजा. तो फार दुष्ट होता. तो प्रजेला फार छळी. प्रजेला कोणतेही सुख नाही. डोक्यावर कर मात्र वाढत होते. प्रजा हवालदील झाली. 'असा कसा हा राजा, मरत का नाही एकदा,' असे ती म्हणे. पुढे काय झाले. राजा आजारी पडला. त्याच्या सर्व शरीराला व्रण झाले. त्या व्रणातून पू येई, रक्त येई, माशा सभोवती भणभण करीत. गावोगावचे वैद्य आले. हकीम आले, नाना उपाय झाले. परंतु गुण पडेना, व्रण बरे होई ना. ती क्षते मोठी होऊ लागली. अपार वेदना होऊ लागल्या. राजाला वाटे मरण बरे. गावाबाहेर एक नवीन साधू आला होता. लहानशी झोपडी बांधून तो राहिला होता. तो कोणाच्या आगीत नसे दुगीत नसे. रामनाम घेण्यात रंगलेला असे. राजा, गावाबाहेर एक साधू आला आहे. त्याच्याकडे जाऊन पाया पड. तो काही उपाय सांगेल. एक जुना वृद्ध मंत्री म्हणाला. न्या मला पालखीतून. पाहू या प्रयत्न करुन. राजा म्हणाला. पालखीतून राजाला नेण्यात आले. साधू रामनामात रंगला होता. महाराज, राजा तुमच्याकडे आला आहे. पाहा त्याची स्थिती. किती दुर्दशा झाली आहे! तुम्ही सांगा काही उपाय. राजाला चैन पडत नाही. त्यामुळे राज्यकारभाराकडे लक्ष लागत नाही. तुम्ही दया करा. असे मंत्री हात जोडून म्हणाला.