सोनसाखळी - 7

  • 6.3k
  • 2.2k

एक होता राजा. त्याचा स्वभाव जरा विचित्र होता. लोक त्याला कधी नावे ठेवीत, कधी त्याची स्तुती करीत. त्या राजाला एकदा एका साधुपुरुषाच्या दर्शनाची इच्छा झाली. राजाने त्या साधूची कीर्ती ऐकली होती. परंतु त्या साधूचे दर्शन त्याला कधीच झाले नव्हते. जो कोणी मला साधुपुरुषाचे दर्शन करवील, त्याला मी एक हजार सोन्याची नाणी देईन. अशी राजाने सर्वत्र दवंडी देवविली. त्या साधूला कोणीच पाहिले नव्हते. साधू निरनिराळ्या वेशात वावरतो, निरनिराळी स्वरुपे धारण करतो, असे लोक म्हणत. साधूला ओळखायचे कसे? एक गरीब मनुष्य होता. त्याला बायको होती. त्याला मुलेबाळे होती. परंतु घरात खायला नव्हते. आपली उपाशी मुलेबाळे पाहून त्याला वाईट वाटे. तो राजाकडे गेला व म्हणाला, राजा, मला आजच हजार सोन्याची नाणी दे. दोन महिन्याचे आत साधूचे दर्शन तुला घडवीन. राजा म्हणाला, दर्शन न घडविलेस तर? दरिद्री म्हणाला, मरणाची शिक्षा मला दे. राजा म्हणाला, ठीक. त्या दरिद्री माणसाला एक हजार सोन्याची नाणी देण्यात आली. तो घरी गेला. मुलांबाळांना आनंद झाला. बायको आनंदली. घरी आता कशाला वाण नव्हती.