श्यामचीं पत्रें - 4

  • 6.6k
  • 2
  • 1.2k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. मी मागें एकदां एका खेडेगांवात गेलों होतों. रात्रीची वेळ होती. गांवांतील लोक कसली तरी पोथी वाचीत होते. मी त्यांना नम्रपणें म्हटलें, 'आज काँग्रेसची पोथी वाचावयास मी आलों आहें. आजच्या दिवस तुमची पोथी राहूं दे. आज माझी ऐका.' त्यांनीं ऐकलें. मी माझें काँग्रेसचें आख्यान सुरू केलें. काँग्रेस म्हणजे माझें दैवत. देवाजवळ कोणाला मज्जाव नाहीं. देव सर्वांचा. त्याप्रमाणें काँग्रेसजवळ सर्वांना वाव आहे. सर्वांना तेथें अवसर आहे. काँग्रेस म्हणजे माझें रामनाम. मरतांना माझ्या तोंडांतून 'राम राम' असे शब्द कदाचित् नाहीं येणार. परंतु 'काँग्रेस काँग्रेस' असें शब्द येतील. आणि त्यांत काय बिघडलें? काँग्रेस सर्वांचे कल्याण करूं पहात आहे. म्हणून काँग्रेस हें देवाचेंच नांव.