गीत रामायणा वरील विवेचन - 27 - कोण तू कुठला राजकुमार

  • 1.5k
  • 534

भरत ने श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर प्रस्थापित केल्या व स्वतः अयोध्येच्या बाहेर एका आश्रमात राहून अयोध्येचा कारभार अलिप्तपणे बघू लागले. बघता बघता दहा वर्षे निघून गेली. भरताने दहा वर्षे अगदी उत्तमरीत्या राज्यकारभार निर्लेपपणे बघितला आणि यापुढेही त्यांचे व्रत सुरूच राहिले. इकडे श्रीरामांनी चित्रकूट सोडला व नाशिक जवळच्या पंचवटी क्षेत्री गोदावरी नदीच्या तीरी पर्णकुटी बांधली व तिथे राहू लागले. ह्या दहा वर्षांच्या काळात अनेक ऋषींचे पावन सान्निध्य श्रीरामांना लाभले व ऋषींना सुद्धा श्रीरामांकडून राक्षसांचा उपद्रव दूर करण्यास वेळोवेळी मदत मिळत गेली. एके दिवशी गोदावरी नदीच्या तीरी असलेल्या पर्णकुटीत श्रीराम ध्यानस्थ बसलेले असताना त्यांच्या जवळ एक षोडश वर्षीय सुंदर मोहक तरुण स्त्री येते.