संपूर्ण बाळकराम - 8

  • 6.6k
  • 1
  • 2.1k

प्रस्तावनेच्या इतर बाजूप्रस्तावनेच्या इतर बाजूप्रस्तावनेच्या इतर बाजू जिल्हानिहाय गौरकाय अधिकारी, जिल्ह्यांच्या विस्तृत पटांगणात कलेक्टर, मॅजिस्ट्रेट व प्रसंगी पोलिटिकल एजंट या तीन निरनिराळया रूपांनी वावरत असतो त्याचप्रमाणे बार्शी लाइट रेल्वेचा अर्धगौर गार्ड, गाडी चालत असेपर्यंत गार्ड, स्टेशनवर उभी राहावयाचे बेतात असताना उतारूंजवळ तिकिटे घेणारा तिकिट कलेक्टर, गाडी उभी असेपर्यंत स्टेशनावर झपाटयाने येरझारा घालणारा स्टेशनमास्तर व शेवटी गाडी सुटावयाचे वेळी बावटा दाखविणारा पोर्टर, हे चार निरनिराळे हुद्दे सांभाळून असतो. सकृद्दर्शनी यांची कर्तबगारी मोठीशी वाटते खरी परंतु नाटयसृष्टीमधील गौरमुख सूत्रधार त्याच्या उज्ज्वलतेस काळिमा लविल्याखेरीज राहणार नाही. हा प्राणी प्रस्तावनेच्या आकुंचित जागेतच पाच निरनिराळया नात्यांनी वावरत असतो. बोलण्याच्या भरात कोणतीही गोष्ट सहज विसरणारा अजागळ, घरांतील सर्व भानगडींबद्दल बेदरकार राहून हमेशा नाटकांच्या जाहिराती ठोकणारा लोकरंजनाचा मक्तेदार, ग्रंथकार व नट यांच्याबद्दल देवाजवळ व प्रेक्षकांजवळ वकिली करणारा स्वयंसेवक, एका सदैव उपवर पोरीचा दैववादी बाप व नाटकांचा तिटकारा करणार्या एका हट्टवादी बायकोचा निश्चयी नवरा, ही सूत्रधाराची पाच अंगे आहेत. यथाछंद यांचा थोडथोडा विचार करू.