संपूर्ण बाळकराम - 15

  • 7.8k
  • 2
  • 2.3k

मनसा चिंतितं कार्य दैवमन्यच्च चिंतयेत्। - संस्कृत सुभाषित. परमेश्वराच्या या विविधविषय विश्वविद्यालयात प्राणिमात्राला आजन्म अनुभवाच्या शिक्षणक्रमांतून पसार व्हावे लागत असते. आणि या आयर्ुव्यापी अभ्यासात प्रत्येकाला त्रिकालबाधित सत्यापैकी कोठल्या तरी प्रमेयाचा कृत्य सिध्दान्त स्वरूपाने यथाबुद्ध्या प्रत्यय येत असतो. कोणाला 'सत्यमेव जयते नानृतम्' या तत्त्वातल्या सत्याची समज पडते तर कोणाची 'नरो वा कुंजरो वा' यासारख्या दुटप्पी बोलण्यावाचून जगात निभावणी होत नाही, अशी खातरजमा होत जाते. एकाला या हातावरचे झाडे या हातावर देण्याचा खरेपणा हाती येतो तर, दुसरा चित्रगुप्ताच्या खातेवहीत पुष्कळदा चुकभूल होत असल्याबद्दल बिनचूक टाचण करून ठेवितो. याप्रमाणे प्रत्येकाला ह्या ना त्या तत्त्वाचे अनुभवजन्य ज्ञान मिळत असते. परंतु त्यातल्या त्यात काही सत्यतत्त्वे अशी व्यापक स्वरूपाची आहेत की, त्यांचा प्रत्यय प्रत्येकाला उभ्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो. चालू लेखाच्या मथळयावर दिलेल्या श्लोकांतील सूत्रात्मक सत्य हे असल्या सर्वव्यापक तत्त्वांचे उत्तम उदाहरण आहे.